तेजस्वी गतिशील संघटन

सहा समस्या, एकच उत्तर संघटनेविण सारे दुस्तर
तेजस्वी गतिशील संघटन सर्वदूर फलदायी सत्वर॥ध्रु.॥

उद्यम व्हावे यंत्रज्ञानें शास्त्रशोध फलदायी व्हावे
भरभरून उत्पादन व्हावे त्यासाठी जन जुळुनी यावे
संघटनेविण होणे नाही समजुन घेऊ चला खरोखर॥१॥

फुलाफळांचे रानवनांचे तगड्या हसऱ्या गावकऱ्यांचे
धनधान्याचे दुधामधाचे गाव सजावे पुनश्च साचे
सजीव त्यांचे लोकसंघटन सर्वाआधी हवे तेच तर॥२॥

बंधुभाव अन्‌‍ समानतेचे असु दे नाते नवे समंजस
समरसता अन्‌‍ अभंग एकी ज्या धर्माने होते बळकट
एकजात जे घट्ट जोडते हिंदुपणाचे सूत्र निरंतर॥३॥

भारतभूचे कसे प्रशासन परराष्ट्रांशी कैसे बंधन
कसे जागतिक संस्थाचालन कसे न्यायसंस्था संचालन
या सर्वास्तव हवे संघटन दूरदृष्टिचे आणि उच्चतर॥४॥

भारतभू स्वातंत्र्यसंगरी कोण कालचे होते रिपुजन
कोण आजचे आणि उद्याचे, कसे सैन्यदल करण्या रक्षण
या सर्वांची कशी बांधणी अवलंबुन असते कोणावर॥५॥