निर्भयता बळ आस्था यांचे एकी हे दैवत समजावे
जे जे वंचित त्यांच्यासाठी संघटना हे सूत्र बनावे॥ध्रु.॥
भरभरून मी धन मिळवावे, जग जिंकोनी घर सजवावे
अपयश चिंता अपमानांचे दिवस दरिद्री दूर सरावे
आप्तेष्टांच्या विधिलिखिताचे काळे वास्तव पूर्ण पुसावे
उघड्या डोळ्यांनी हे दुर्लभ स्वप्न साजिरे कसे बघावे॥१॥
भवतालीची पिसाट दुनिया अफाट गतीने धावत आहे
विश्वाच्या अंताला वेढुनी गणिती प्रज्ञा वाढत आहे
उद्योगांची चौखुर चक्रे रोज जिंकिती नवीन गावे
विज्ञानाच्या विस्फोटातही अज्ञ जनांनी कसे जगावे॥२॥
दुरावती जन तुटकपणाने जो तो वेची अपुले नाणे
रानदांडग्या शर्यतीमध्ये चिरडुन गेले चिमणे गाणे
एकाकी जन दुर्लक्षित जन आप्त एकमेकांचे व्हावे
केवळ आभाळीच्या देवा भिउनी कोणी किती भजावे॥३॥
आजवरी जे भिउन राहिले पूर्ण अडाणी दुबळे झाले
परस्परांचे पाय ओढुनी होते तेथुनी मागे आले
एक जयांचे दुखणे त्यांनी समदु:खी बंधू समजावे
आणि एकता हेच आपुले याच्यापुढती दैवत व्हावे॥४॥