मायभूमिच्या वाऱ्यासंगे झेपावत जाईल आपुले
हे आनंदी गाणे, हे आनंदी गाणे॥ध्रु.॥
उसळुनि येता हृदयामधुनी उत्साहाचे झरे
पराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरे
अवकाशाला जिंकुनि येतिल अपुली विजयी याने॥१॥
श्रमता आपण हिमगिरिचे ते वितळतील हिमहिरे
मरुभूमीवर उभी राहतील विभवे सुखमंदिरे
सळसळणाऱ्या शेतांमधुनि हसेल हिरवे सोने॥२॥
शंका कसली? किमया असली! घडवू या हातांनी
सानवयातच स्वराज्यतोरण बांधियले शिवबांनी
हसतच पेलू नव्या युगाची नवी नवी आव्हाने॥३॥