हे गाणे मुक्त मनांचे

हे गाणे मुक्त मनांचे हे गाणे मुक्त स्वरांचे
उलगडते यातून सहजी जे स्पंदन युवहृदयांचे॥ध्रु.॥

स्वच्छंद खगासम वाटे नभी उंच भरारी घ्यावी
मारता सागरी सूर ती गूढे उकलून यावी
प्राणांत वसावे धैर्य स्वप्नांस सत्य करण्याचे॥१॥

कोसळत्या धारांसंगे सृजनाची सूक्ते गावी
मग इंद्रधनू रंगांची अवनीवर उधळण व्हावी
येथेच निर्मू दे स्वर्ग फळ तेच आम्हा श्रमण्याचे॥२॥

विद्या नि अविद्या दोन्ही एकाच गुंफू धाग्यात
कर्मातून उमजे ज्ञान हे सूत्र असो मर्मात
तृषितांची मिटण्या आस शिंपूया उदक यत्नांचे॥३॥