स्वीकारुनि ही नमने सुमने आशीर्वच द्यावा
नमोऽस्तु ते गुरुदेवा॥ध्रु.॥
आलो तेव्हा अनुभव होता मायपित्यांच्या वत्सलतेचा
परंतु तुमच्या परिसस्पर्शे ज्ञानचक्षु उघडला
परंपरेचा संस्कारांचा सहज लाभला ठेवा॥१॥
सांगुन शिकवुन कधि उपदेशुन, विमल सुचरितातुनी दाखवुन
अज्ञानातुन अज्ञाताच्या जवळ घेउनी गेला
ऋषिकुल-प्रतिनिधी! कृतज्ञतेचा प्रमाण हा घ्यावा॥२॥
आजवरी अतिपरिचय होउन, तुम्हास प्रियमित्रासम मानुन
कधी अवज्ञा कधी अनादर अजाणतेपणि घडला
क्षमस्व गुरुवर! क्षमा असावी मनात राग नसावा॥३॥
तुमचे हे व्रत पुढे चालवू निरलस श्रमुनी सुयश मेळवू
तुमच्या कर्मरतीतुन अमुच्या मनि आहे रुजला
‘कर्मातच ज्ञानाचे सार्थक’-हा तुमचा सांगावा॥४॥
तुमच्या इच्छा अमुची स्फूत तुमची स्वप्ने अमुच्या ज्योती
बळ अमुच्या पंखांतुन वाहे ती तुमची माया
त्या मायेची ऊब लाभुनी तेज मिळे सद्भावा॥५॥
गुरुतेचे आकर्षण भेदुन नीलनभी लीलेने विहरुन
स्वर्गंगेतील कमळे खुडुनी नटवू भारतभूला
त्यासाठी आचार्य ! आम्हांला आशीर्वाद हवा॥६॥