हाक तुझी परी मनी वसे

तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे
अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे॥ध्रु.॥

पार्थासम एकाग्र साधना, उग्र विरागाचीच अर्चना
संन्यस्तांच्या संघटनेला सेवेची दृढमूल प्रेरणा
शतशतकांचे द्रष्टे चिंतन तुझ्या अंतरी उमलतसे…॥१॥

सप्तसिंधुच्या पार घुमविली तू हिंदूंची विजयघोषणा
ज्ञानकर्मयोगातुन दिधली वीरत्वासह अपार करुणा
जे जे शोषित ते नारायण, पूज्य मानले देव जसे…॥२॥

आज पश्चिमा वित्तबळाने पदोपदी दुनिया झुकवी
स्वत्वाला विसरला देश हा गुलामीच त्याला सुखवी
वज्राघाती वेदान्ताची शास्त्रसंपदा हवी असे…॥३॥

राष्ट्र दीनवाणे झालेले, धर्मतेज नाही उरले
वनराजाचे गोत्र विसरता, करुण केसरी भेदरले
या भ्रांतीतुन जागे होण्या शब्द तुझे आसूड जसे…॥४॥