प्रार्थना

राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची
ईर्ष्या निजांतरि धरूनि करावयाची
ही हिंदुभू परमश्रेष्ठपदास न्याया
आम्ही कृती नित करू झिजवोनि काया ॥ ध्रु. ॥

विज्ञान-ज्ञान अमुचे परिपूर्ण होवो
अभ्यास देशस्थितिचा समतोल चालो
निष्ठा विवेक प्रकटो मन पूर्ण शुद्ध
वर्तू अम्ही दृढप्रसन्न नि ध्येयधुंद ॥ १ ॥

होती अनेक हृदये जरि एकरूप
सामर्थ्य तेथ प्रकटेल तरी अमूप
हा मंत्र संघरचनार्थ सदा जपू या
हे ज्ञान-कर्म-युत भक्ति-व्रत आचरू या ॥ २ ॥

की पुण्य-श्रेय-यश-कीर्ति सदैव लाभो
निंदा-प्रहार अथवा नच कोणि लोभो
आशा हसो विमल वा भिववो निराशा
सोडू कधी न पथ हा चिर ठेवु आशा ॥ ३ ॥

दाही दिशांत घुमुनी जयनाद जेव्हा
होई अखंड प्रियभूमि अजिंक्य तेव्हा
हन्मंदिरातिल निवेल तृषा कधीची
हे देव आस पुरवी तव पूजकांची ॥ ४ ॥

की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे ॥ ५ ॥