जगणे म्हणजे केवळ संगर, लढणे आपुल्या हाती
शब्दांपासून हो प्रारंभा, अंतिम आतील शक्ती॥ध्रु.॥
समाज भवती परजून आहे, परंपरांची शस्त्रे
किती पिढ्यांनी मूकपणाने स्वाधीन केली गात्रे
पराभवाची खंतही नव्हती इतकी शरणागती
ढकलीत होते बळे चितेवर, गर्जत मिरवत सती॥१॥
हक्कांच्या घनघोर लढाया, आजवरि किती झाल्या
संकट येता आधारास्तव, किती मिळाल्या काठ्या
अपूर्ण तरीही प्रवास जोवर, दुबळी अंत:स्फूत
भेदांच्या पल्याड नेतसे, अद्वैताची भक्ती॥२॥
शब्दांमधूनी मिळते विद्या, त्यातून उमले नवदृष्टी
विचार तेव्हा मुरतो चित्ती, निर्भय होते मती
अर्थ नवा अन् तर्क हवा, ही जाणीव होता जागी
स्वत्वासाठी विश्वासाने पाऊल पडते पुढती॥३॥