प्रबोधनाचे गीत आज हे

प्रबोधनाचे गीत आज हे मुक्त स्वरांनी गाऊ
पिढ्यापिढ्यांची दृढ चाकोरी ओलांडुनिया जाऊ॥ध्रु.॥

किती जानकी किती द्रौपदी पूर्वसुरींच्या गाथा
नारीच्या अश्रूंतून सजती आदर्शांच्या कथा
केवळ त्यांच्या पुण्यस्मृतींची नकोत कवने आता
नव्या युगाच्या, नव्या उषेची किरणप्रभा जागवू॥१॥

घरट्याच्या चक्रात अडकते स्त्रीची अमूर्त शक्ती
अंत:करणा अंध बनविते परंपरांची सक्ती
विशाल दृष्टी आप्तजनांची बळ देईल या हाती
त्याच बळाने समाजपुरुषा समतामार्गे नेऊ॥२॥

रुंद होत ती क्षितिजे आता प्रगतीसाठी किती
व्यवस्थापनी, राजकारणी, उद्योगी नच मिती
जी जी क्षेत्रे साद घालती यत्न तिथे पेरुनी
कस लावुनिया कर्तृत्वाचा ठसा नवा उमटवू॥३॥

साध्य जरी हे वाटे अवघड शक्य तिथे पोचणे
पूल उभविता मनामनांचे मार्ग सहज आक्रमिणे
याच ईप्सिताकरिता भेदून स्वार्थाची कुंपणे
आत्मशक्तीचे, पंख लेवुनी उंच नभांतरी जाऊ॥४॥