स्वप्न पाहूया उजळ उद्याचे
काळोखावर घालुनी घाव
गावाकडची आम्ही लेकरे
भीती आम्हाला कसली राव? ॥ ध्रु.॥
शिवार अमुचे हिरवे रान
झरे मोकळे झुळझुळ गान
निसर्ग अमुचा आम्हीच राखू
ओरबाडण्या देऊ न वाव ॥१॥
शक्ती-भक्तीचा मेळ आगळा
शिव-तुकयाची आण मनाला
तालीम – देऊळ दोन्ही घडवून
लंघून सीमा पुढेच धाव ॥२॥
कष्टांना ना भिणार कधीही
रगडून वाळू काढू तेलही
जगी कुठेही गेलो तरीही
स्मरून जगवू, सजवू गाव ॥३॥
आज जरीही हाती अमुच्या
माय काळी अन् काठी-बरच्या
ह्याच मुशीतून कातळ फोडून
शुद्ध जळाला देऊ रिघाव ॥४॥