तुम्हीच गुरुवर मायेने मज सदैव म्हटले गुणी
आज त्यामुळे कृतार्थ जीवन अखंड तुमचे ऋणी ॥ध्रु.॥
खेळ खेळलो रमलो दमलो, गिरिवर केव्हा चढलो, पडलो
कठोर केले कष्ट प्रसंगी, कधी भांडलो, रुसलो, हसलो
या सर्वांचे साक्षी झाला तुम्ही सर्व सोसुनी ॥१॥
बालिश होत्या भावभावना, अनुभव अपुरा, भव्य कल्पना
मी असला अन् मी तसला हा, अहंपणाचा गंड देखणा
तरीही तुम्ही हसत कौतुके नेले सांभाळुनी ॥२॥
अल्प यशाचे कौतुक केले, वेडे साहस थोर मानले
सतत चुका त्या केल्या आम्ही, मूकपणे फळ तुम्ही भोगले
शिष्यांसाठी श्वास वेचला स्वत:सही विसरूनी ॥३॥
कोणी कुठला मूक उपेक्षित, त्याला फुलवी करूनी दीक्षित
वित्तसागरामधला मोती, कुणी योजला करण्या जनहित
योजक तुम्ही दुर्लभ ऐसे आजकालचे मुनी ॥४॥
पूर्ण अम्ही जगजेते आम्ही, हेच आमुच्या मनी ठसविले
अवघड, अर्धे, उणे आमुचे, अलगद यत्ने तुम्ही पुसले
मानवातली मूळ पूर्णता उलगडली शिक्षणी ॥५॥
स्नेहाचे ऋजु बंध जोडुनी, जे उत्तम ते नित्य वेचुनी
उद्यम ईर्ष्या वैराग्याचे, स्वत्त्वाचे गुण सतत पेरूनी
मायभूमिच्या सेवेचे व्रत बिंबविले मन्मनी ॥६॥