विद्यारंभ उपासना

भूमिका

ज्ञान प्रबोधिनीमध्ये १९७२ सालापासून इयत्ता आठवीमधल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षाग्रहण अथवा विद्याव्रत संस्कार योजणे सुरू झाले. या विद्याव्रत संस्कारात व्यक्तिमत्त्व विकसन म्हणजे काय हे समजून घेऊन ते साधण्यासाठी विद्यार्थी ब्रह्मचर्याश्रमामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात पंचकोशाधारित गुरुकुलामध्ये इयत्ता पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १९९७सालापासून विद्यारंभ उपासनेची योजना करण्यात आली. या विद्यारंभ उपासनेची अधिक मोठी आवृत्ती पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत २०१४ साली वापरण्यात आली. आता ही वाढवलेली आवृत्ती मुद्रित स्वरूपात प्रकाशित करत आहोत.
मुला-मुलींवरील संस्कार गर्भावस्थेत असतानाच सुरू होतात अशी एक विचारधारा आहे. मुले पूर्व प्राथमिक शाळेत येतात तेव्हा त्यांच्यावर औपचारिक रित्या शैक्षणिक संस्कार होणे सुरू होते. त्या वेळी त्यांनी काय शिकावे ? कसे शिकावे ? व कोठे शिकावे ? हे निर्णय त्यांचे आई-वडील व शिक्षकच घेत असतात. इयत्ता आठवीत विद्याव्रत संस्काराच्या वेळी विद्यार्थ्यांनी स्वतः विचारपूर्वक व्यक्तिमत्त्व विकसनाचा व त्यासाठी व्रतपालनाचा संकल्प करावा अशी अपेक्षा आहे. याची पूर्वतयारी म्हणून इयत्ता पाचवीच्या सुरुवातीला विद्यारंभ संस्कार योजावा अशी कल्पना सुचली.
विद्यारंभ उपासनेमध्ये प्रथम गणेश व शारदा स्तवन, जाणकारांकडून काय काय शिकावे, लेखन-वाचन-काम-खेळ सेवा नम्रता इ. सद्गुणांचे स्मरण, बुद्धी आणि मनाची शक्ती वाढवण्याचा संकल्प, असे पद्यरूपात म्हणायचे आहे. नंतर हाच आशय थोडक्यात गद्य प्रार्थनेतही म्हणायचा आहे. उपासनेचा शेवट शांति-मंत्राने व शिवमंत्राने होतो.
विद्यार्थ्यांना त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी साहाय्य करणारे पालक, शिक्षक व अन्य ज्येष्ठ सदस्यांनी ‘आम्ही आमच्या मुलांसमोर वर्तनादर्श (रोल मॉडेल) म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न करू’ असा संकल्प करावा असे ही या उपासनेत सुचवले आहे.
ज्ञान प्रबोधिनीत शैक्षणिक /आर्थिक वर्षाच्या प्रारंभी सर्वच विद्यार्थी व सदस्य वर्षारंभ उपासना करतात. आपल्या ध्येयाच्या वार्षिक स्मरणासाठी व नवीन वर्षाचे व्यक्तिगत व सामूहिक कार्यसंकल्प करण्यासाठी ती असते. पाचवी ते आठवी अशा तीन-चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा व स्वतःच्या घडणीच्या प्रवासाचा संकल्प विद्यारंभ उपासनेत व्हावा अशी कल्पना आहे. ही पोथी अतिशय सोपी. सुटसुटीत आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये या पोथीचा वापर करणे शक्य आहे.
सुमारे तीस मिनिटांच्या या उपासनेत आपल्या शिक्षणाचा उद्देश ठरवायचा असतो, या कल्पनेचा स्पर्श तरी विद्यार्थ्यांना व्हावा. शिक्षणाची योजना करताना कसे? व काय ? या प्रश्नांबरोबर कशासाठी ? असा प्रश्नही विचारायचा असतो, एवढे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न अध्यापक व पालकांनी करायला हवा. त्याचे एक साधन म्हणजे ही विद्यारंभ उपासनेची पोथी !

गिरीश श्री. बापट
संचालक

************************************************************************************************

अध्वर्यू : प्राथमिक शिक्षण संपवून माध्यमिक शाळेत शिक्षणाला सुरुवात करताना आपण यापुढील शिक्षण का घ्यायचे आहे हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी आजच्या विद्यारंभ उपासनेची योजना केली आहे. या उपासनेमध्ये विद्यार्थी आणि पालक दोघांनीही संकल्प करायचे असतात. संकल्प करणे म्हणजेच निश्चय करणे. विद्यारंभ उपासनेला आपण तीन वेळा ॐ कार म्हणून सुरुवात करूया. मी ॐ म्हणेन, माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणावे. असे तीन वेळा म्हणूया.

अध्वर्यू : हरिः ॐ
सर्व उपस्थित : हरिः ॐ
अध्वर्यू :
सर्व उपस्थित :
अध्वर्यू :
सर्व उपस्थित :

अध्वर्यू : भारतीय संस्कृतीत गणपती आणि शारदा या विद्येच्या देवता आहेत. समर्थ रामदासांनी रचलेल्या मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक म्हणून आपण दोन्ही देवतांचे स्मरण करूया. मी एक-एक ओळ सांगेन. माझ्या पाठोपाठ सर्वांनी ती-ती ओळ म्हणावी.

अध्वर्यू आणि सर्व उपस्थित :

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ।।
(मनाचे श्लोक – १)

अध्वर्यू : प्राथमिक शिक्षण पूर्ण करून इयत्ता पाचवीत आलेल्या विद्यार्थ्यांनी या विद्यारंभ उपासनेत अनेक विद्या शिकण्याचा संकल्प करायचा आहे. अनेक प्रकारची माहिती मिळवणे व वापरणे, विविध कला शिकणे आणि वेगवेगळी कौशल्ये शिकणे म्हणजे विद्या मिळवणे. त्या त्या विद्येच्या जाणकारांकडून विद्या शिकायची असते. आता मी दासबोधातील काही ओव्या सांगेन. या ओव्यांमध्ये जाणकाराकडून म्हणजेच जाणत्याकडून काय-काय शिकावे हे सांगितले आहे. ओवीची अर्धी-अर्धी ओळ सांगितल्यावर माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणावे.

अध्वर्यू आणि सर्व उपस्थित :

जाणत्याची संगती धरावी । जाणत्याची सेवा करावी ।
जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी । हळुहळु ।।
जाणत्यापार्सी लेहों शिकावें । जाणत्यापासीं वाचूं शिकावें ।
जाणत्यापार्सी पुसावें । सकळ कांहीं ।। (पुसावें = विचारावे)
जाणत्यापार्सी गावें गाणें । जाणत्यापासी वाजवणें ।
नाना आळाप शिकणें । जाणत्यापासी ।। (आळाप = शास्त्रीय संगीत)
जाणत्यापासी परीक्षा सिकणें । जाणत्यापासी तालिम करणें । (परीक्षा = निवड करणे) (तालिम = व्यायाम)
जाणत्यापासी पोहणें । अभ्यासावें ।।
जाणता बोलेल तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसें चालावें ।
जाणत्याचें ध्यान ध्यावें। नाना प्रकारी ।। (ध्यान ध्यावें = एकाग्रता शिकावी)
(दासबोध दशक १८ समास २ मधील निवडक ओव्या)

अध्वर्यू : इयत्ता पाचवीमधल्या विद्यार्थ्यांना त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या शिक्षकांची, पालकांची आणि इतर जाणत्या लोकांच्या मदतीची गरज असते. अशी मदत करणाऱ्यांनी स्वतःला त्यासाठी सज्ज केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडून शिकायचे त्या पालक, शिक्षक व जाणत्यांचे जनांमधले म्हणजेच समाजातले चालणे-बोलणे शुद्ध व संयमित असावे लागेल. तसे ते व्हायचे असेल तर आपणा सर्वांना आपले मन शुद्ध ठेवावे लागेल. म्हणून पालक आणि शिक्षकांनी माझ्यापाठोपाठ पुढील श्लोक म्हणावा. मी श्लोकाची एक एक ओळ सांगेन. पालक, शिक्षक व इतर उपस्थित ज्येष्ठ सदस्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे. विद्यार्थ्यांनी फक्त ऐकावे.

अध्वर्यू आणि पालक, शिक्षक व इतर ज्येष्ठ सदस्य :

विचारूनि बोले विवंचूनि चाले । (विवंचूनि = बऱ्या-वाईट परिणामांची काळजी घेऊन)
तयाचेनि संतप्त तेही निवाले ।।
बरें शोधिल्यावीण बोलों नको हो ।
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ।।
(मनाचे श्लोक – १३२)

अध्वर्यू : शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी शुद्ध करण्याचा संकल्प पालक आणि शिक्षकांनी उच्चारला आहे. आता विद्यार्थ्यांनी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी कसे वागावे, हे मी सांगतो. मी एक-एक ओळ सांगेन. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्यापाठोपाठ म्हणावे

अध्वर्यू आणि विद्यार्थी :

दिसामाजि काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें ।।
वयें श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे ।
बरे बोलणे सत्य जीवीं धरावे ।।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा । (सदालस्य = आळशीपणाची सवय)
समस्तांसि भांडेल जो तो करंटा ।। (समस्तांसि = सगळ्यांशी)
बहुतां जनालागि जीवे झिजावे ।
भले सांगती न्याय तेथें भिजावे ।। (भिजावे = नम्र व्हावे)
(समर्थ रामदासांची स्फुट रचना)

अध्वर्यू : विद्या मिळविण्याचा संकल्प करायचा म्हणजे त्यासाठी आपली बुद्धी आणि आपल्या मनाची शक्ती वाढविण्याचा संकल्प करायचा. प्रथम बुद्धी वाढवण्याचा संकल्प करण्यासाठी विज्ञानगीतातील एक कडवे म्हणू या. मी एक-एक ओळ सांगेन. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्यापाठोपाठ म्हणावी.

अध्वर्यू आणि विद्यार्थी :

डोळे उघडुन बघा गड्यांनो झापड लावू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ।। ध्रु. ।।
भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले
प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन, भीतिदायी
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका ।।१।।

अध्वर्यू : बुद्धीची शक्ती वाढविण्याचा संकल्प केल्यानंतर आता मनाची शक्ती वाढवण्याचा संकल्प आणखी एका पद्यातील दोन कडवी म्हणून करू या. मी एक एक ओळ सांगेन. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्यापाठोपाठ म्हणावे

अध्वर्यू आणि विद्यार्थी :

प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया
समर्थ मायभूमिला जगी करावया ।। ध्रु. ।।
हातचे न हात हे कधी सुटायचे
बिकट वाट ही तरी पुढेच जायचे
ना रुसायचे, सदा हसायचे
गीता गाऊ या, या प्रेरणा घेउ या ।। १ ।।
मान मायभूमिची जगात उंचवू
जेथ जाउ तेथ तेथ विजय मेळवू
जिद्द जागवू, मशाल पेटवू
ही हाक ऐकून या, या ज्योत घेऊन या ।। २ ।।

अध्वर्यू : आता सर्व विद्यार्थ्यांनी जे पद्यरूपात म्हटले, त्या सर्वांतला आशय आता थोडक्यात गद्यामध्येही म्हणून विद्यारंभाचा निश्चय करू या. सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे

अध्वर्यू आणि पाठोपाठ सर्व विद्यार्थी :

विद्या शिकण्याच्या तयारीची
पहिली पायरी म्हणून
आम्ही खूप खेळ खेळू,
उत्तम व्यायाम करू.
शरीर सुदृढ करू, काटक करू.
उत्तम लेखन करायला शिकू.
भरपूर वाचन करू.
खूप पाठांतर करू.
अनेक कौशल्ये शिकू
व विविध कलांचा अभ्यास करू.
स्वच्छता आणि नम्रतेच्या सवयी
आमच्या अंगी बाणवू.
आमचा सर्व अभ्यास
आमच्या कुटुंबियांना, शेजाऱ्यांना
आणि ज्यांना मदतीची गरज आहे
अशा सर्व लोकांना उपयोगी व्हावा
यासाठी आम्ही प्रयत्न करू.
आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की,
आमचा हा संकल्प
पूर्ण करण्यासाठी
लागेल तेवढे बळ आम्हाला मिळो.

अध्वर्यू : पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपापले संकल्प एकमेकांना सांगून झाले. आता विद्यार्थी आणि पालक, शिक्षक व इतर ज्येष्ठ सदस्य सर्वांनी मिळून एकत्र माझ्या पाठोपाठ पुढील शांतिमंत्र म्हणू या. मी अर्धी अर्धी ओळ सांगेन. माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणावे.

अध्वर्यू आणि सर्व उपस्थित :

ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्विषावहै ।।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।
(कठोपनिषद शांतिमंत्र)

अध्वर्यू : या संस्कृत मंत्राचा अर्थ आहे की तो परमात्मा आम्हा दोघांचे (शिक्षक व विद्यार्थ्यांचे) रक्षण करो. आमचे पालन करो. आम्ही दोघे एकत्र मिळून पराक्रम करू. आमचे अध्ययन तेजस्वी असो, आम्हा परस्परांमध्ये द्वेष उत्पन्न न होवो. शांती असो. शांती असो. शांती असो.
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असणारा ईश्वर तुम्हां आम्हां सर्वांमध्येही खरं तर राहत असतो. ईश्वराचे मंगल स्वरूप म्हणजे शिव. ‘मी शिव आहे’ या अर्थाचा ‘चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्’ हा मंत्र म्हणून विद्यारंभ उपासनेची सांगता करूया. चिदानंदरूपी म्हणजे उत्साहपूर्ण आणि आनंदमय. माझ्या पाठोपाठ संस्कृतमध्ये व मराठीत हा मंत्र सर्वांनी पाच वेळा म्हणावा.

अध्वर्यू आणि सर्व उपस्थित :

चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्।
चिदानंदरूपी शिव मी शिव मी ।
(संस्कृत व मराठीत आळीपाळीने पाच वेळा)
शिवोऽहं शिवोऽहम्।
शिव मी शिव मी ।
(आलटून पालटून संस्कृत व मराठी मंत्र प्रत्येकी तीन वेळा)

अध्वर्यू : यानंतर ‘नमस्ते एक’ म्हटल्यावर सर्वांनी हात जोडावेत. ‘दोन’ म्हटल्यावर मान खाली वाकवावी. ‘तीन’ म्हटल्यावर हात खाली सोडन समोर बघावे.

नमस्ते – एक, दोन, तीन.

अध्वर्यू : यानंतर पाच मिनिटांची मोकळीक आहे. सर्वांनी जागच्या जागी पाय मोकळे करावेत. नंतर सभेचा कार्यक्रम होईल.