रामायण

काशूर भाषेतील रामावतारचरित–कश्मीरी रामायण

लेख क्र. ५३ १६/०८/२०२५ रामकथा भारतीयांसच नाही तर जगासही ज्ञात आहे. परंतू त्या कथेत स्थळ-काळानुसार काही बदल आपल्याला दिसून येतात. संत्रिकेत खूप मोठा व विविध रामायणे असलेला संग्रह आहे. त्या संग्रहातील पंप रामायण व मोल्ल रामायणाची माहिती आपण मागील लेखांमध्ये बघितली. आज आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण रामायणाची माहिती येथे देत आहोत ते म्हणजे काशूर भाषेतील ‘रामावतारचरित’ म्हणजेच कश्मीरी रामायण. संत्रिकेच्या विभागप्रमुख डॉ. मनीषा शेटे यांनी या ग्रंथाचा अभ्यास केला व त्यावर माहितीपर लेख लिहिला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कश्मीर हे भारताचे नंदनवन धगधगते झालेले आहे. आजही तिथले राष्ट्रीयत्वाचे प्रश्न उसळी मारून वर येताना दिसतात. यासर्व पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शविणारे तिथले साहित्य नक्कीच अभ्यासायला हवे. ‘काशुर’ भाषेतील ‘रामावतारचरित’ हे अशा कश्मीरी संस्कृतीचे वहन करते. या रामायणातील भाषेवर नंतरच्या काळातील फारसीचाही प्रभाव दिसून येतो. शेरास लागाय पोश लवु हितयें सतिये वोतुये व्यवाह काल। शोक्लम करिथ ओम शब्दु सतिये वीद शास्त्र द्रायि रत्य रत्य गोन। वोलबा वरनख महागनुपतिये सतिये वोतुये व्यवाह काल ॥ – तुझ्या मस्तकावर दवबिंदूंनी मुक्त ताजी फुले माळूया, सीते तुझा विवाह काळ समीप आला आहे. या शुभयोगावर ओंकारासहित वेदशास्त्रांची मंगलवाणी निनादत आहे. वराची निवड करण्यास जणू महागणपती पण आले आहेत. हे सीते तुझा विवाह काळ समीप आला आहे. कश्मीरी संस्कृतीचे विलोभनीय चित्र रेखाटलेले हे राम सीतेचे विवाह गीत ‘रामावतारचरित’ या कश्मीरी रामायणातील आहे. वाल्मीकी रामायणाने भारतभर प्रवास केला तेव्हा त्यामध्ये साहजिकच जानपदीय संस्कृतीचे रंग मिसळत गेले व रामायणाचा गाभा जरी तसाच राहिला तरी रामायणाची अभिव्यक्ती बदलत गेली. मूळ वाल्मीकी रामायणात राम-सीतेच्या विवाहाचे वर्णन येते, तसे ते प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या रामायणात येत नाही. स्थानिक प्रथा परंपरांचे आल्हादक मिश्रण भाषांतरित रामायणात पाहायला मिळते. ‘काशुर’ भाषेतील ‘रामावतारचरित’ हे कश्मीरी संस्कृतीचे वहन करते. १९व्या शतकापर्यंत कश्मीरी मध्ये रामकथेपेक्षा कृष्णकथा अधिक दिसते. त्यानंतर मात्र रामावतारचरित, शंकर रामायण, विष्णुप्रताप रामायण तथा शर्मारामायण असे ग्रंथ निर्माण झाले. यातील ‘रामावतारचरित’ हे अधिक प्रसिद्धीस पावले. कुर्यग्राम निवासी प्रकाशराम यांनी इ.स. १८४७ मध्ये या ग्रंथाची रचना केली. भगवती त्रिपुरसुंंदरीच्या कृपाप्रसादाने त्यांना वाक्चातुर्य प्राप्त झाले अशी कथा सांगितली जाते. रामावतारचरित एक प्रबंध काव्य आहे, ज्यामध्ये भक्तिरसपूर्ण रामकथा गायली गेली. हा ग्रंथ पद्यस्वरूपात आहे. वाल्मीकी रामायण व अध्यात्म रामायणावर आधारित या ग्रंथात सात कांंड आहेत व अंती लवकुश-चरित भाग जोडलेला आहे. अध्यात्म रामायणात रामकथा शिवपार्वतीच्या संवादाने सुरू होते. राम परमात्मा व सीता ही प्रकृती रूपात गौरविलेली आहे. ‘रामावतारचरित’मध्येही शिव-पार्वती संवादाने सुरुवात होते परंतु पहिल्या ५४ कडव्यांमध्ये रामायणातील व्यक्तिरेखा रूपकात्मक रंगविलेल्या आहेत. रामायण म्हणजे व्यक्तिजीवनाचा प्रवास उत्तम ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. सत्याचरणी व्यक्तीची सु-इच्छा सीता आहे. सत्याचा सेतू राम व लक्ष्मण आहे, धीर किंवा हिंमत हनुमान आहे तर असत्य म्हणजे रावण आहे. म्हणून रावणाचे सारे वैभव इथेच राहिले. वैराग्यपूर्वक आत्मज्ञानरूपी धारदार तलवारीने असत्य असुररूपी रावण नष्ट करायचा आहे. रावणवध म्हणजे शुभवासनेने अशुभवासनेचा केलेला वध आहे. हे वर्णन करताना व्यक्तीचे जीवन म्हणजे ‘तुझे शरीर हे इष्टदेवतेचे गृह असून तू पूजारी होऊन त्याचे रक्षण कर म्हणजे राक्षस वृत्ती त्यावर आरूढ होणार नाही. अन्यथा रावण म्हणजे वाईट इच्छा वासना ह्या इष्ट देवतेचे गृह अपवित्र करेल. अहंकाराचा त्याग कर, मनरूपी मंदोदरी तुझी वाट पाहत आहे. मनाचा आरसा सत्यरूपी राखेने स्वच्छ कर तेव्हा तुला चतुर्भज रामाचे दर्शन होईल व मुक्ती मिळेल. गुरूने जो सत्पथ तयार केला आहे तो म्हणजे ‘रामावताराची’ ही कथा. या रामायणातील प्रकाशराम कुर्यग्रामी यांची कश्मीरी भाषा, कश्मीरी श्रुती परंपरा व भक्तिरस यांनी युक्त आहे. यात लयबद्धता आहे पण कश्मीरी भाषेचे प्रकटीकरण मात्र विशेष समजून घेण्यासारखे आहे. या भाषेची मूळ लिपी शारदा हळूहळू लुप्त होत गेली. १४ व्या शतकानंतर मुस्लिम शासनकाळात फारसी राजभाषा झाली व कश्मीरी भाषेसाठी फारसी लिपीचा उपयोग सुरू झाला. शारदा लिपी एका अर्थाने पंडित व पुरोहितांची राहिली. उर्दू, अरबी, पंजाबी, डोगरी या भाषांंचा प्रभाव वाढत गेला. कश्मीरमध्ये या भाषेला ‘कशीर’ अथवा ‘काशुर’ म्हटले जाते. डॉ. शिबनकृष्ण रैना या ज्येष्ठ अभ्यासक, अनुवादकाने मूळ लेखक प्रकाशराम यांच्यासंस्कृतनिष्ठ भाषेतील फारसी शब्दांची विपुलता व त्याला जोडून येणार्‍या ग्रामीण शब्दप्रभावाचा उल्लेख केला आहेच. पण रामावतारचरिताच्या हिंदी भाषांतरात सुद्धा गमख्वार, तदबीर, शमशीर असे शब्द सहज आले आहेत. उदा:- रावण ने कहा – “मेरी बात यदि मानते नहीं हो तो तुम्हे शमशीर से मार डालूंगा!” किंवा सीताहरण प्रसंगी सुरुवातीला लक्ष्मण रामाला शोधायला जाण्यास नकार देतो तेव्हा सीता उद्वेगाने लक्ष्मणाला म्हणते ‘अब मुझे मालूम हो गया कि तेरे दिल में खाम खयाल है। (तेरी नियत ठीक नहीं). शोर शराबा, गुलशन,बुरका, गुनाह बक्शना, तदबीर-उपाय, कारनामें, ईश्वर की मंशा (ईश्वरेच्छा), हनुमान को मुबारख बात देना अशा वाक्यांची व शब्दांची रेलचेल रामावतारचरितामध्ये दिसते व ते कुठेही वाचताना खटकत नाही. सूर्योदय होतोय व रात्र समाप्त होत आहे याचे वर्णन करताना, प्रभात रात्रीला म्हणते की आता तुझे मुख लपव (‘बुथिस तुम बुरक द्युत तमि लोग दरबार’) म्हणजे ‘वह मुहपर बुरका पहनकर कार्यकलाप करने लगी। या संमिश्र भाषेप्रमाणेच स्थानिक संस्कृतीचे दर्शन यात होते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे राम-सीता विवाह संस्कार चित्रण. विवाहाचा दिवस आला आणि विवाहगीताने सुरुवात झाली. विवाहाच्या प्रसंगी अनेक सुंदर लोकगीते म्हणण्याची परंपरा भारतभर दिसते. ‘येनि दाल्युक ग्यबुन’ सगळे ‘बाराती’ जमले आणि त्यांनी गायला सुरुवात केली ‘शाम रूप राम गछि सीताये’ म्हणजे शाम रूप राम सीतावरण करण्यास निघाले. या गाण्यामध्ये कश्मीर मधील स्थानिक देवदेवतांची नावे आली आहेत. सरस्वती, हिंगुला, विजया, पिंगला, मंगला, शारदा, उत्रस गावची उमा, लक्ष्मी, रुपभवानी, कालिका, शीतला, तोतला, गायत्री, सावित्री, त्रिसंध्या, जलन गावाची देवी,पवनसंध्या, लोदरसंध्या, बरगुशिखा या देवतांनी रामाला आभूषणे दिली व विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या. श्रीरामाची अशी भव्य वरात निघाली आहे आणि दुसरीकडे सीता विवाहासाठी तयार होत आहे. तिच्यासाठी सुद्धा लग्न गीते म्हणली जातात ‘लगनुक ग्यवुन’. तिच्या केसांमध्ये फुल माळत असताना ही गाणी म्हणली जात आहेत. ताज्या फुलांना फार सुंदर शब्द इथे वापरला आहे, ‘ओस-सिक्त’-दवबिंदूंनी सजलेली फुले. सीतेला ‘सतिये असे संबोधून सार्‍याजणी गातात, ‘विवाह वेळा जवळ आलीये सीते!’ तिला आशीर्वाद द्यायला महागणपती, विजया सरस्वती जमुना, शारदा, भूतेश्वर राज्ञी, हिंगुल, मंगला, भद्रकाली आल्या. कोणी तिच्या पावलात सुवर्ण पैंजण बांधत आहेत. ब्रह्माजींनी स्वतः द्वारपूजा केली, ज्वाला, लंबोदर, गणपत यांनी पाम्पोर गावात केसरची वाटिका लावली. विवाहाच्या निमित्ताने धान्य पेरणे, ते वराकडे घेऊन जाणे ‘अंकुरारोपण’ विधी किंवा तुळशीचे रोप अशा स्थानिक परंपरांचे पालन आजही केले जाते त्याचेच हे जणू प्रतीक… बालुहाम, अकिनगाम उत्रस, वासुकुर अशा सर्व ठिकाणाहून आलेल्या देवतांनी जनकाचे विवाहघर जणू गजबजून गेले आहे. कश्मीरी विवाहात शेवटी वधूवरांवर मंगलगान करत पुष्पवृष्टी करतात त्यासाठी राजकुमारीची फुलांनी पूजा करावी म्हणून देवता फुलांचे भांडार जमवीत आहेत.’ ‘लायबोय’ व ‘गंगव्यस’ हे कश्मीरी विवाहातील विशेष कृत्य वधूकडील बालक बालिका संपन्न करतात त्याही विधीचा येथे उल्लेख आला आहे. कश्मीरी रामायणातील रामविवाहानंतर येणारे रामचरित्र वाल्मीकी रामायणाप्रमाणे पुढे जात राहते. काही महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण मात्र वेगळ्या रीतीने केलेले दिसते.

काशूर भाषेतील रामावतारचरित–कश्मीरी रामायण Read More »

मोल्ल रामायणाचा संक्षिप्त परिचय

लेख क्र. ५२ ९/८/२०२५ रामायणसंग्रहातील अजून एक विशेष रामायण म्हणजे तेलगू कवयित्री ‘मोल्ल’ने रचलेले रामायण. म्हणूनच याला ‘मोल्ल रामायण‘ म्हटले जाते. अशा ह्या एका कवयित्रीरचित रामायणाचा अभ्यास डॉ. सुजाता बापट यांनी करून सामान्यांना या रामायणाची थोडक्यात ओळख करून दिली आहे. या लेखाचे ध्वनिमुद्रणही सोबत जोडले आहे. श्रीराम कथा ही देश-विदेशांत, विविध भाषांमधून, संस्कृतींमधून, विचारांमधून, साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेली आहे. अशाच एका तेलगू भाषेतील रामायणाचा परिचय ह्या लेखाच्या माध्यमातून करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.  मोल्ल रामायण असे नाव असणारे हे रामायण तेलगू भाषिक असणाऱ्या मोल्ल नावाच्या एका  स्त्रीने लिहिलेले रामायण आहे. तेलगू हा शब्द त्रिलिंगवरुन आला आहे, असे मानले जाते. श्रीशैलावरचा मल्लिकार्जुन, महांकालेश्वर आणि द्राक्षरामम येथील भीमेश्वर ही ती तीन लिंगे होत. तेलगू या शब्दाचा अर्थ मधुर असाही होतो. या भाषेच्या माधुर्यामुळे तिला तेलगू म्हटले जाऊ लागले असावे. संस्कृत, प्राकृत आणि इतर काही भाषा यांच्या समन्वयातून तेलगू ही भाषा उत्पन्न झाली, असे उल्लेख साहित्यात आढळतात. तेलगू भाषेच्या इतिहासकारांनी तिच्या कालखंडाविषयी पुढीलप्रमाणे सांगितले आहे. अज्ञातकाल – इ.स. ५०० ते १०००, पुराणकाल – इ.स. १००० ते १४००, काव्य प्रबंधकाल – इ.स. १४०० ते १६५०, ऱ्हासकाल – इ.स. १६५१ ते १८५०, आधुनिककाल – इ.स.१८५१ ते आजतागायत. महाभारताप्रमाणेच रामायणाचा अनुवाद हा पुराणकाळात झालेला पहायला मिळतो. भास्कर हा कवी व त्याच्या अनेक शिष्यांनी यांनी मिळून चंपूपद्धतीने रामकथा लिहून पुरी केली. या रामायणाला भास्कर रामायण असेही म्हणतात. आंध्रात घरोघरी आणि मंदिरांमधून हे रामायण वाचले आणि गायले जाते. रंगनाथ या कवीने द्विपद छंदात लिहिलेले रामायण हे रंगनाथरामायण या नावाने प्रसिद्ध आहे. यानेच तेलगूत रामकथेची परंपरा सुरु केली. मोल्ल रामायणाची रचनाकार कुम्मर मोल्ल ही प्रबंधकाळातील प्रसिद्ध कवियित्री आहे, हिने रचलेले हे रामायण हे प्रासादिक आहे. मोल्ल कृष्णदेवरायाच्या कालखंडातील मानली जाते. हिच्याचबरोबर तंजावर येथील रामभद्रांबा, मधुरवाणी, पसुपलेटी, रंगाजन्म या सोळाव्या सतराव्या शतकातील काही कवयित्री देखील उल्लेखनीय आहेत. दंडक हा काव्यप्रकार संस्कृतातून केवळ तेलगू भाषेत आलेला आपल्याला दिसतो. ७०००० ओळींचे एक दंडकरामायणही तेलगू भाषेत रुपांतरित झालेले आहे. तेलगू भाषेतील काव्याचे स्वरुप कसे बदलले याचा विचार करता असे लक्षात येते की, या काळातील तेलगू बोलीचा तत्कालीन लोकगीतांत आणि नंतर काही शिलालेखांत गद्य-पद्यरुप उपयोग झाल्याचे दिसते. नन्नया या प्राचीन कवीने तेलगू काव्याचा पाया घातलेला दिसून येतो. सुरुवातीच्या काळात अनुवाद आणि अनुकरण यांच्याकडेच या सर्वांची प्रवृत्ती असलेली दिसून येते. महाभारत, रामायण, भागवत, यांवर अनेकांनी रचना केल्याचे उल्लेख सापडतात. संस्कृतातील अनेक पुराणें तेलगू भाषेत अवतरली. धार्मिक प्रबोधन किंवा प्रचार हे या वाङ्मयाचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यामुळे आशयापेक्षा अविष्कारपद्धतीत काही प्रमाणात प्रयोगशीलता दिसून येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तेलगू साहित्य हे बहुतांश पद्यात्मक होते, नंतर मात्र अनेक अंगांनी या साहित्याची वाढ झाली. काव्याचे दोन मुख्य प्रवाह दिसू लागले, एकात जुनीच परंपरा चालू राहिली आणि दुसऱ्यात भाव, भाषा, मांडणी याबाबतीत स्वातंत्र्य आणि नाविन्याचा पुरस्कार केला गेल्याचे दिसून येते. पण मोल्ल रामायणाची रचना मात्र आधीच्या काळातील आहे. हे रामायण काव्यमय, प्रासादिक आणि साधे-सोपे आहे.     मोल्ल रामायणाची प्रमुख वैशिष्ट्ये – याची रचना कुम्हर किंवा आतुकोरि मोल्ल या एका स्त्रीकडून झालेली आहे. ती कुंभार होती असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. मोल्ल ही तेलगू साहित्यातील प्रथम कवयित्री आहे, जिने अशा पद्धतीची काही काव्य रचना केली आहे. तिचा जीवनकाल इ.स. १३२०-१४०० मानला जातो. पण तिच्या आयुष्याविषयी कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही. ती ब्रह्मचारिणी होती, असे मानले जाते. हिचे पिता शिवभक्त होते आणि ती स्वतः रामभक्त मानली जाते. मोल्ल रामायणाची रचना करताना मोल्लने कुठेही अलंकारिक शब्दांचा वापर केलेला दिसत नाही, अतिशय साध्या सोप्या भाषेत तिने ही रचना केली आहे. भक्तीतून आनंद देणारे आणि मुक्ती देणारे असे श्रीराम आहेत, त्यांचे गुणवर्णन करायला कोणाला नाही आवडणार? मला जसे काही रामायण समजले, त्याचे वैशिष्ट्य जाणवले, ते लिहिताना जे काही सुचले, त्यातून मी रामायणाची रचना केली आहे, असे मोल्ल नोंदवते. श्रीरामांची भक्ती करताना त्यातून जी प्रेरणा किंवा स्फूर्ती मिळाली त्यावरुन ही रामायणाची रचना करावी असे सुचले, असे ती म्हणते. रामांच्याच प्रेरणेने हे रामचरित गुणगान मी करते आहे आणि त्यांच्याच चरणकमलांवर मी हे कथापुष्प समर्पित करते आहे, असे ती अत्यंत विनयाने सांगते. यावरुन तिचा विनयशील स्वभाव स्पष्ट होतो. वेदांप्रमाणेच ही रामकथा पवित्र आहे. परमानंदाच्या प्राप्तीसाठीच मी ही रचना करते आहे हे सांगायला ती विसरत नाही. एकूण सहा कांडांमध्ये मोल्लने  ही रामकथा मांडली आहे. बालकाण्ड – पहिल्या बालकाण्डात अयोध्येच्या वैभवाचे वर्णन ती करते आणि दशरथ महाराजांचा उल्लेख महापट्टण असा करते. बालकाण्डाचा शेवट तिने श्रीराम आणि सीता यांच्या (कल्याण वैभवमु) म्हणजेच विवाहाने केला आहे. अयोध्याकांड – यात श्रीरामांच्या वनवास गमनाचे वर्णन आहे. गुहाच्या अनन्यभक्तीचा उल्लेख येथे लेखिकेने केला आहे. त्यासाठी प्रपत्ति असा शब्द तिने वापरला आहे. अयोध्या कांड हे तुलनेने लहान आहे. अरण्यकांड – यात सुरुवातीलाच चेंचु जातीच्या आदिवासी स्त्रियांनी वनात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. त्यांना असे वनात पाहून या स्त्रियांना वाईट वाटल्याचा उल्लेख देखील ती करते. शूर्पणखा आगमन, रावणासमोर शूर्पणखेचे सीता सौंदर्य वर्णन, खर दूषण संहार, मारिच राक्षसाचा प्रवेश, सीताहरण, जटायू वर्णन, रामाचा विलाप, लक्ष्मणाकडून सांत्वन, जटायूचे रावण वर्णन आणि पुढे शबरी श्रीराम भेट याचासुद्धा उल्लेख आहे, तिच्या भक्तीचे उदात्त चित्र ‘मोल्ल’ने रंगवले आहे.     किष्किंधाकांड – यात हनुमान आगमन, श्रीराम-हनुमान भेट, सुग्रीवाशी मैत्री, वाली वध, सुग्रीवाचा राज्याभिषेक आदिंचे वर्णन आहे. सीतावियोगात श्रीराम वर्षाऋतूत देखील परितप्त होत आहेत, असे त्यांच्या मनःस्थितीचे वर्णन मोल्ल करते. सीताशोधासाठी समस्त वानरसेना चारही दिशांना पाठवली जाते आणि हनुमंताजवळ श्रीराम आपली अंगठी त्यांच्या परिचयासाठी जानकीला देण्यासाठी देतात. या कथाभागाबरोबरच हे कांड येथे संपते. सुंदरकांड – हे कांड  इतर कांडांच्या मानाने विस्तृत आहे. संपातिकडून सीतास्थान माहिती, लंकेचा मार्ग, लंका वर्णन, रावणाची सीतेकडे प्रार्थना, सीतेकडून रावणाची निंदा, श्रीरामांची स्तुती, रावणाचा क्रोध, सीतेला विचार करण्यासाठी काही अवधी, जानकीचा संताप, हनुमंतांचे सीतेसमोर ते कुशल असल्याचे निवेदन, मुद्रिका प्रदान, हनुमानाचे भव्य स्वरुप, हा कथाभाग आहे. माझ्या हृदयात श्रीरामांची प्रतिमा कोरलेली आहे. तिला कोणीच धक्का लावू शकत नाही. मी तुम्हांला उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी श्रीरामांसमीप नेऊ शकतो असे हनुमंत म्हणताच, सीता म्हणते, ‘मला असे चोरासारखे पळून जायचे नाही. मी रामांना सोडून अन्य कोणालाही स्पर्श करु शकत नाही, त्यामुळे मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही.’ यातून सीतेचे बाणेदार व्यक्तिमत्व मोल्ल आपल्यासमोर उभे करते. हनुमंतांचा विक्रम विहार, राक्षसवीरांचा नाश, जांबुवालीचा वध, अक्षयकुमार आणि पवनसुताचा भीषण संग्राम, इंद्रजिताचे हनुमानावर आक्रमण, मेघनादाच्या ब्रह्मास्त्राने हनुमानाचे वश होणे, रावणाची निंदा आणि श्रीरामांचे गुणवर्णन, वालाग्रज्वालांनी त्याचे लंका दहन, दधिवनात वानरांचा उत्साह, अंगदाकडून दधिमुखाचा पराभव, हनुमंताकडून श्रीरामांना सीतेच्या कुशल असण्याविषयीचे निवेदन, सीतेकडून तिचे शिरोरत्न श्रीरामांसाठी देणे आणि शेवटी माल्यवान पर्वतावरुन प्रस्थान या गोष्टींसह हे कांड येथे समाप्त होते. युद्धकांड – या शेवटच्या कांडात संपूर्ण युद्धाचे, त्याआधीच्या तयारीचे वर्णन, रावणास बिभीषणाचा उपदेश, प्रहस्ताकडून समजुतीच्या काही गोष्टी रावणाला सांगणे, बिभीषणाची शरणागती, रावणाच्या बलसंपदेचा परिचय, नलाद्वारे सेतू निर्माण, लंकेत प्रवेश, युद्धास सुरुवात, वानरांनी मांडलेला उच्छाद, कुंभकर्णाकडून वानरांचा संहार, श्रीरामांकडून त्याचा वध, इंद्रजिताचा वानरसेनेवर हल्ला,

मोल्ल रामायणाचा संक्षिप्त परिचय Read More »

नागचंद्रकृत पंप रामायणाचा परिचय

लेख क्र. ५१ २/८/२०२५ १९९७ साली श्री. ग. न. साठे यांनी त्यांचा जवळजवळ ३७१८ ग्रंथे असलेला संग्रह संत्रिकेला दान दिला, त्यात रामचरित्रावर आधारित अनेक ग्रंथ होते. तेव्हा मा. श्री. यशवंतराव लेले व श्रीमती अमृता पंडित यांनी त्या पुस्तकांची सूची तयार केली. नंतर या संग्रहात वेळोवेळी भर पडत गेली. १९ – २२ जानेवरी २०२४ मध्ये अयोध्येत राममंदिर स्थापनेच्या पार्श्वभूमीवर संत्रिकेने रामायण संग्रहाचे ‘अक्षरराम’ प्रदर्शन भरविले. त्यात ३४ भाषा व १८ लिपी असलेले एकूण १९७७ रामायण ग्रंथ होते. या भव्य प्रदर्शनाला प्रतिसादही भरपूर मिळाला. सद्यस्थितीत २००० च्या वर रामायण ग्रंथ संत्रिकेत आहेत. ‘वाल्मीकी रामायण’ हे नाव आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहे. ते सोडून विविध भाषा व लिपीमध्ये असलेली ही रामायण पुस्तके आपल्याला माहितही नसतात. त्यातील काही रामायणांची ओळख व्हावी म्हणून संत्रिकेतील संशोधकांनी सारांशरूपात माहिती लिहिली. आज डॉ. आर्या जोशी यांनी कन्नड भाषेतील ‘पंप रामायणावर’ लिहिलेला लेख व सोबत ध्वनिमुद्रण देत आहोत. भारतीय धर्म-संस्कृतीत रामायण या महाकाव्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. वाल्मीकी रामायणाचा परिचय आबालवृद्धांना थोड्याफार प्रमाणात असतो. वाल्मीकी रामायणाच्या सर्वपरिचित कथानकाव्यतिरिक्त काहीसे वेगळे कथानक ‘पंप रामायणात’ अनुभवाला येते. रामचंद्रचरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नड साहित्यप्रकारात येते. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या पंप रामायणाचा कर्ता आहे – नागचंद्र. याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. अभिनव पंप असेही नामाभिधान असलेले हे चम्पू काव्य आहे. चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही पद्धतीने विषय मांडलेला असतो. भावनात्मक विषय पद्यात आणि वर्णनात्मक विषय गद्यात अशी याची रचना असते. याचे कन्नड नाव रामचंद्र-चरिते पुराण असे नाव आहे. उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनिक आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले. कथेचा सारांश- मिथिलेचा अधिपती महाराज जनकाची पत्नी गर्भवती राहिली. पूर्वजन्मीच्या वैमनस्यातून एक निशाचर त्या गर्भाला नष्ट करण्याची वाट पहात होता. राणीने जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांपैकी मुलाचे अपहरण निशाचराने केले. आकाशमार्गाने जात असता पूर्वजन्मीच्या तपस्येचे स्मरण होवून निशाचराने त्या बालकाला कोणतीही इजा न करता, अलगदपणे पृथ्वीवर उतरविले. ते बालक हळूहळू पुढे जात रथनुपुर चक्रवालपुरच्या महाराज इंदुगती यांना मिळाले. आनंदलेल्या राजाने त्या बाळाचे नाव प्रभामंडल ठेवले. जनकाने ज्योतिषांकडून आपले दुसरे बालक सुखरूप आहे असे समजून घेतल्यावर कन्येचे नामकरण केले व तिचे नाव सीता ठेवले. सौंदर्यवती सीता मोठी होवून शास्त्रादी कलांमध्ये निपुण झाली. (वाल्मीकी रामायणात राजा जनकाला सीता शेतामध्ये नांगराच्या फाळाशी सापडली अशी कथा आहे.) अनेक किरातांकडून होणार्‍या त्रासामुळे पृथ्वीवर अनाचार माजू लागला. या संकटातून सोडविण्यासाठी मदत करायला जनकाने राजा दशरथाला विनंती केली. त्यावेळी तरूण, अत्यंत पराक्रमी असे दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण यांनी त्या किरातांचा पराभव केला. या पराक्रमाने आनंदित झालेल्या जनकाने सीतेचा विवाह रामाशी करण्याचे ठरविले. ही बातमी समजताच नारद उत्सुकतेने पहायला गेले व स्वत:च मोहित झाले. त्यांनी सीतेचे एक चित्र तयार केले व मणीमंडपात ठेवले. प्रभामंडलाने (निशाचराने नेलेला तिचा जुळा भाऊ) ते सीतेचे चित्र पाहिले व त्याने आपल्या वडिलांना तिला मागणी घालायला सांगितले. जनक राजाने हा प्रस्ताव नाकारला. सीतेचा विवाह रामाशी करायचा असल्याचे जनक राजाने सांगितल्यावर इंदुगती राजा चिडला, त्याने त्याच्या कुलातील वज्रावर्त धनुष्यावर प्रत्यंचा चढवून दाखविण्याचे सामर्थ्य रामात असेल तरच सीतेचा विवाह रामाशी करावा असा युक्तिवाद केला. रामाच्या पराक्रमावर विश्वास असलेल्या जनकाने स्वयंवर योजले. देशोदेशीचे राजे हरले, पण रामाने मात्र हे आव्हान पेलले व सीतेने रामाला वरमाला घातली. सागरावर्त नावाच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून लक्ष्मणानेही आपला पराक्रम सिद्ध केला. त्यामुळे चंद्रध्वज राजाने आपल्या अठरा कन्यांचे विवाह लक्ष्मणाशी करून दिले. (वाल्मीकी रामायणात लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिचाच उल्लेख सापडतो.) या पराक्रमामुळे प्रभामंडलाच्या मनात रामाविषयी ईर्ष्या व मत्सर निर्माण झाला. रामावर आक्रमण करण्यासाठी प्रभामंडल निघाला त्यावेळी आपल्या जन्माचे रहस्य समजल्यावर त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर आल्यावर त्याला शोक झाला कारण त्याने आपल्या बहिणीचाच लोभ धरला हे त्याला समजले होते! त्यानंतर प्रभामंडलावर राज्य सोपवून राजा इंदुगतीने जैन धर्माची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येस येताना राजा दशरथाने संपूर्ण परिवारासहित भूतहितरत भट्टारकांचे दर्शन घेतले. अयोध्येस आल्यावर दशरथाने रामाला राज्यभार स्वीकारण्यास सांगितले. भरताने विरक्त होवून वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कैकेयी दु:खी झाली व तिने दशरथाकडे भरतासाठी चौदा वर्षांपर्यंत राज्यभार मागितला. हे ऐकून सर्वजण व्यथित झाले, परंतु रामाने चौदा वर्षे दिग्विजयासाठी बाहेर पडण्याचे जाहीर केले. सीता व लक्ष्मणही रामासह निघाले. प्रयाणाला निघताना राम-सीता-लक्ष्मणाने रत्नभवनात जावून जिनदेवांचे आशीर्वाद घेतले. विविध नगरांमधून प्रवास करीत असताना वाटेवर आड आलेल्या शत्रूंचा नाश राम-लक्ष्मणाने केला तर विनयाने सामोरे आलेल्या राजांची मैत्री स्वीकारली. ज्या राजांना यांची मदत झाली त्यांनी राम व लक्ष्मण यांच्याशी आपापल्या कन्यांचे विवाह करून दिले. (वाल्मीकी रामायणात श्रीराम हा एकपत्नी आदर्श पती म्हणून मान्यता पावला आहे.) कर्णध्वज नावाच्या सरोवराकाठी शांतीच्या अपेक्षेने अणुव्रत स्वीकारलेल्या एका गिधाडाला सीतेने आपला पुत्र मानले – हा जटायू! दंडकारण्यात रहात असताना एक प्रसंग घडला- रावणाची बहीण चंद्रनखी हिचा मुलगा अरण्यात तप करीत होता. अनवधानाने राम-लक्ष्मणाकडून त्याची हत्या झाली. ते ऐकून खर व दूषण रामावर चालून गेले. सीतेला एकटी सोडून जाण्यापेक्षा लक्ष्मणाने युद्ध करावे व गरज भासल्यास लक्ष्मण रामाला बोलावून घेईल असे ठरले. युद्धभूमीवर लक्ष्मण पराक्रम गाजवीत असताना रावणाने एका शक्तीदेवतेला वश केले. लक्ष्मणाच्या मदतीसाठी रामाला खोटी हाक त्या देवतेने मारली व ती ऐकून; सीतेला एकटे सोडून राम युद्धासाठी आले. त्यानंतर राम-लक्ष्मणाला लक्षात आले की कोणी मायावी शक्तीने हा कट रचला होता परंतु तोपर्यंत रावणाने सीतेचे हरण केले होते. जटायूकडून त्यांना ही बातमी समजली. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या भेटीनंतर शोकाकुल राम-लक्ष्मणाने रावणाचे पारिपत्य करण्याचे ठरविले. त्यापूर्वी हनुमानाने लंकेत जावून सीतेची भेट घेतली व स्व-पराक्रमाने लंकेची नासधूस केली. ते सारे पाहून रावण अतिशय रागावला. नभोगमन-विद्या बलाने राम-लक्ष्मणासह सर्व सैन्य आकाशमार्गे लंकेच्या रणभूमीवर येवून पोहोचले. युद्धात लक्ष्मणाने वीरश्री गाजविली. रावणाने फेकलेल्या सुदर्शन चक्रानेच रावणाचा नाश करण्याची आज्ञा रामाने लक्ष्मणाला केली व त्यानुसार लक्ष्मणाने रावणाचा वध केला! (वाल्मीकी रामायणात श्रीरामानेच दशानन रावणाचा वध केला आहे.) रावणाच्या वधानंतर त्याची पती मंदोदरी हिने ४८,००० विद्याधर स्त्रिया व आपल्या कुटुंबासह जिनव्रताची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येला सुखरूप परत आल्यावर; राम-लक्ष्मणाने ज्या ज्या कन्यांचे पाणिग्रहण केले होते त्यांनाही अयोध्येला बोलावून घेतले. एके रात्री सीतेला दोन स्वप्ने पडली. एका स्वप्नात दिसले की दोन बाण तिच्या मुखात प्रवेश करीत आहेत व दुसर्‍या स्वप्नात ती पुष्पक विमानातून खाली पडली आहे. पहिले स्वप्न शुभसूचक असून सीतेला दोन पराक्रमी पुत्र होतील पण दुसरे स्वप्न दु:खरूप ठरेल असे रामाने सीतेला सांगितले. कालांतराने सीता गर्भवती राहिली. तिच्या मनात जिनपूजेची तीव्र इच्छा जोर धरू लागली. त्याचवेळी काही ग्रामीण लोक रामाकडे आले  व दुराचारी रावणाकडे राहिलेल्या सीतेचा रामाने स्वीकार केल्याबद्दल टीका करू लागले. याविषयी लक्ष्मणाने सीतेची बाजू घेतली

नागचंद्रकृत पंप रामायणाचा परिचय Read More »