उपासना सूक्ते
प्रस्तावना ‘उपासना सूक्ते’ या पुस्तिकेत ज्ञान प्रबोधिनीचे आद्य संचालक कै. आप्पांचे उपासनेविषयीचे विचार चोवीस सूक्तांच्या रूपात संकलित केले आहेत. यातील एका सूक्तामध्ये कौटुंबिक उपासनेचा उल्लेख येतो. चार सूक्तांमध्ये सामूहिक उपासनेचा उल्लेख आहे. तर इतर सर्व सूक्ते व्यक्तिगत उपासना का व कशी करावी यासंबंधी आहेत. तर, या संकलनातील शेवटचे सूक्त म्हणजे कै. आप्पांनी सामूहिक उपासनेसंबंधी पाहिलेले स्वप्न.. या सूक्तांच्या संकलनासोबत दिलेल्या सुरुवातीच्या तीन व शेवटच्या तीन अशा २०२० च्या करोना संचारबंदीच्या काळात लिहिलेल्या एकूण सहा पत्रांमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे विद्यमान संचालक आ. गिरीशराव बापट यांनी त्यांचे सामूहिक उपासनेविषयीचे चिंतन मांडलेले आहे. उपासनेविषयीच्या चोवीस सूक्तांपैकी पंधरा सूक्ते करोना संचारबंदीच्या काळात अनेक प्रबोधकांना पाठवली होती. उरलेली नऊ निवडून ठेवली होती. सूक्ते व पत्रे ज्या क्रमाने पाठवली होती, त्यापेक्षा पुस्तिकेत छापताना क्रम थोडा बदललेला आहे. प्रबोधिनी साहित्यात अन्यही अनेक ठिकाणी उपासनेसंबंधी विचार मांडलेले आहेत. या चोवीस सूक्तांचे, सहा पत्रांचे आणि आपल्या वाचनात येणाऱ्या अन्य साहित्याचे चिंतन करत, त्याचा अर्थ समजून घेत, आपल्या सर्वांची वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामूहिक उपासना अधिक अर्थपूर्ण होत जाईल, अशी अपेक्षा आहे. ——————————————————————————————————————————————————————————- सौर चैत्र २२ शके १९४२ ११/४/२० स. न. वि. वि. महाराष्ट्रामध्ये कोरोना साथीमुळे संचारबंदी सुरू होऊन दि. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूपासून काल २० दिवस पूर्ण झाले. आजच मा. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की ही संचारबंदी अजून २० दिवस चालणार आहे. पुणे व निगडीतील शाळा तर दि.१४ मार्च पासूनच बंद आहेत. गेल्या वीस ते अठ्ठावीस दिवसांमध्ये प्रबोधिनीच्या शैक्षणिक विभागांतर्फे इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अध्यापन, कार्यपत्रके, वैज्ञानिक खेळ, स्पर्धा, कथाकथन, काव्यवाचन, गणितयज्ञ, अध्यापक बैठकी, परीक्षा असे अनेक कार्यक्रम घेतले गेले. युवक-युवती विभागांतर्फे अनेक कार्यशाळा, रक्तदान, दल, बैठकी, मार्गदर्शक प्रशिक्षण, व्याख्याने, व्यायाम असे उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून केले गेले. काही पुरोहित इंटरनेटच्या माध्यमातून संस्कार कार्यक्रम करत आहेत. संशोधिकांचे सदस्य घरूनच संशोधन कार्य करत आहेत. कार्यालयीन सदस्यांनी घरून किंवा एक-दोन दिवस पास मिळवून कार्यालयात येऊन वेतनवाटपाची कामे केली. स्त्री-शक्ती ग्रामीण विभागातर्फे रोजच दूरभाषवरून बैठकी घेऊन कामाचा व परिस्थितीचा आढावा घेणे चालू असते. जागेवर पोहोचलेले बांधकाम साहित्य संपेपर्यंत ग्रामीण भागातली विहिरींची कामेही चालू होती. जागेवर पोहोचलेले बांधकाम साहित्य संपेपर्यंत ग्रामीण भागातली विहिरींची कामेही चालू होती. घरून करता येण्यासारखी कामे वेगवेगळ्या पद्धतीने समस्यापरिहार करून करण्याचा प्रयत्न अनेक विभागांतील सदस्यांनी केला. पुणे, निगडी, साळुंब्रे केंद्रांमध्ये संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्यांना मदत करण्याचे काम करण्याची संधी अजून यायची आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबर १९ मध्ये सांगली-कोल्हापूर-पुणे शहरातील पूरग्रस्तांसाठी विविध केंद्रांनी आपणहून पुढाकार घेऊन मदतकार्य केले, त्याप्रमाणे हराळी व अंबाजोगाई केंद्रातून व कालपासून वेल्हे व सोलापूर केंद्रांमधूनही तयार जेवण किंवा शिधावाटपाचे काम तेथील केंद्रांनी पुढाकार घेऊन सुरू केले. वरील चार-पाच परिच्छेदांमधील कामाचे काही ना काही निवेदन १ चैत्रपासूनच्या तीन साप्ताहिक वृत्तांमधून दिलेले आहे. पुढील २० दिवसांमध्ये आणखी काय करण्यासारखे आहे याबाबत काही विचार पुढे मांडत आहे. सर्व राजकीय पक्षांचे मुख्यमंत्री आज पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या बैठकीत एकमुखी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे कोरोना साथीमध्ये राजकारणाला स्थान नाही व आपल्याला त्यात करण्यासारखे लगेच नाही. प्रशासनापुढे खूपच आव्हाने आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रातले अनेक माजी विद्याथ-अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यासंबंधी मासिक वृत्तात आपल्याला अधिक वाचायला मिळेल. आर्थिक आणि प्रशासन क्षेत्रातील विविध प्रश्नांवरती उपाय सुचवणारे अनेक माजी विद्याथ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मानसशास्त्रज्ञ व काही अध्यापक कौटुंबिक व मानसिक समुपदेशन करत आहेत. आपत्तीकाळात ही सर्व कामे करणारे समाजपुरुषांची किंवा जनताजनार्दनाची उपासनाच करत आहेत. त्याशिवाय आपापली व्यक्तिगत उपासनाही चालू असेल. सुखात किंवा विपदाकाली आपली व्यक्तिगत उपासना चालू असलीच पाहिजे. परंतु प्रबोधिनीपण व्यक्तिगत आणि सामूहिक उपासनेत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर मदतकार्याला गेलेले गट जिथे कुठे मुक्कामाला असतील तिथे एकत्र उपासना करतात. अभ्यासदौरे, तंबूतील शिबिरे, सहलींमध्ये ही एकत्र उपासना होते. सध्या दैनंदिन काम बंद असले तरी पुणे, निगडी, हराळी केंद्रांमध्ये रोज सामूहिक उपासना, मग तीन-चार जणांची का असेना, होते. जिथे प्रबोधिनीचे केंद्र किंवा काम तिथे उपासना होते कारण तिथे प्रबोधक असतात. सध्या प्रबोधक आपल्या घरात स्थानबद्ध आहेत. आपल्या घरच्यांसह सामूहिक उपासना करता येईल का? प्रबोधक सदस्यांना आपल्या घरातच एकत्र साप्ताहिक सामूहिक उपासना करणारे प्रबोधक कुटुंब करता येईल का? Work from home, Study from home, मदत वाटप, त्यासाठी निधी संकलन ही कामे तर आपल्याला हिकमतीपणा वापरून करायची आहेतच. अखंड कर्मशीलता हे जसे प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे, ‘राष्ट्रार्थ भव्य कृती’ हे जसे प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे, तसेच किमान सामूहिक साप्ताहिक उपासना हे देखील प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे. आपल्या घरच्यांशी आजपर्यंत उपासनेबद्दल बोलला नसलात तर सध्याची स्थानबद्धता ही असे बोलायची व त्याप्रमाणे करण्याची संधी आहे. ही संधी जरूर घ्यावी व घेतल्यावर मला अवश्य कळवावे. आधीपासूनच आपले प्रबोधक कुटुंब असेल तर तसेही कळवावे. ————————————————————————————————————————————————————————————————– सौर चैत्र २५ शके १९४२ १४/०४/२०२० स. न. वि. वि. शनिवार, दि.२२ चैत्र (११/४/२०२०) या दिवशी प्रबोधिनीच्या सदस्यांनी आपापल्या घरी कुटुंबियांसमवेत दर आठवड्यात एकदा तरी सामूहिक उपासना करावी असे मी सुचवले होते. आजच्या पंतप्रधानांच्या घोषणेनुसार अशी उपासना करायला आणखी किमान तीन आठवडे तरी नक्की मिळतील. त्या आवाहनाला गेल्या तीन दिवसांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिसाद १२० जणांनी दिला. आमच्या कुटुंबात आम्ही या आधीच रोजची सामूहिक उपासना सुरू केली आहे, असे काही जणांनी कळवले. आवाहन वाचल्यावर दिवसभरात घरच्यांशी बोलून त्यांच्यासह उपासना केली. आता व्यक्तिगत उपासना नक्की सुरू करतो, घरच्यांशी उपासनेसंबंधी बोलण्याचा प्रयत्न करून पाहतो. असे आणखी काही जणांचे वेगवेगळे प्रतिसाद होते, काहींनी नमस्काराचे हात जोडून आवाहन-पत्राची पोच दिली. प्रतिसाद देणारे निम्मे सदस्य पुण्यातले होते. भाईंदर, डोंबिवली, चिपळूण, साळुंबे केंद्र, निगडी, सांगली, भालवणी, डोमरी, अंमळनेर, अंबाजोगाई, शिरूर, सोलापूर, बडोदा, आणि रांची येथूनही प्रतिसाद आले. ज्या कुटुंबांमध्ये आधीपासूनच सामूहिक उपासना सुरू आहे, तिथे उपासना विविध प्रकारांनी होते. ध्यान, योगासने व ध्यान, पूजा व आरती, रामरक्षा म्हणणे, भीमरूपी म्हणणे, जप करणे, पसायदान म्हणणे, घरी दासबोध बैठक करणे, पोथीवाचन व श्रवण, काही लोक म्हणणे, गीतेचा अध्याय म्हणणे, विरजा मंत्रासह प्रबोधिनीची पूर्ण उपासना म्हणणे, असे उपासनेचे अनेक प्रकार प्रतिसादांमध्ये होते. माझ्या आवाहनात मला कोणती उपासना अपेक्षित होती? साधनानाम् अनेकता’ हे हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आपल्या कुटुंबाला जी उपासना प्रिय, प्रेरक आणि आश्वासक वाटते, ती इतर कोणाला चालण्याचा किंवा न चालण्याचा प्रश्नच नाही. कुटुंबातल्या काही जणांनी किंवा सगळ्यांनी एकेकट्याने उपासना करण्याबरोबर सगळ्यांनी एकत्र बसूनही एकत्र उपासना करावी असे माझे आवाहन आहे. घरात पती-पत्नी दोघेच असतील तर त्यांनी एकत्र उपासना करणे सामूहिक उपासनाच आहे, असे गेल्या दोन दिवसांत मी पाच जणांना तरी सांगितले. आई-वडील आणि काही वेळ तरी बडबड न करता शांत बसू शकणारी मुले, असे तीन किंवा चार जणांचेच कुटुंब असेल, तरी त्यांनी एकत्र बसून केलेली उपासना म्हणजे सामूहिक उपासनाच आहे. अशी कौटुंबिक उपासना रोज करता आली तर चांगलेच, सध्याच्या संचारबंदीच्या काळात अनेकांना तसे शक्यही होईल. व्यवहारतः नेहमीसाठी ती साप्ताहिक करणे सोयीचे जाते. सुरुवातीला रोज केली तर सवय लागायला सोयीचे जाते. फक्त आताच्या