पोथ्या

दिवाळी लक्ष्मीपूजन

आश्विन वद्य अमावास्येला सायंकाळी लमीदेवतेचं पूजन करयाची आपल्याकडे प्रथा आहे. खरं तर रोजच सायंकाळी घराची दारं लक्ष्मीच्या स्वागताला उघडी ठेवून, देवापुढे दिवा लावून, आपण शुभंकरोति म्हणतो, यात “घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य देवो” अशी प्रार्थना आपण करतोच. परंतु लमीपूजनाच्या दिवशी या प्रार्थनेचं विशेष महत्त्व आहे. बलिप्रतीपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवतानुसार नवीन वर्ष सुरु होतं. अनेक व्यापार-व्यावसायिकांचं आर्थिक वर्षही दिवाळीच्या पाडव्यापासून सुरू होतं. त्यामुळे हिशेबाच्या नवीन वह्यांची आदल्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजा करतात. त्यावेळी जुन्या वह्याही काही लोक पूजेत ठेवतात. तिजोरी-तराजू-लेखण्यांची देखील पूजा करण्याची काही ठिकाणी पद्धत असते. यामागील भाव आणि विचार समजून घ्यावा.

वेदपूजन उपासना (उदकशांती)

ज्ञान प्रबोधिनीच्या धर्मविधींमधे वेदपूजन उपासनेची भर घालताना मनःपूर्वक आनंद होत आहे. प्रस्तुत विधीची कल्पना उदकशांती या प्रचलित विधीवरून घेतलेली असली तरी ही पारंपरिक उदकशांती नव्हे. मूळ उदकशांतीचा विधी बोधायन गृह्यसूत्रात आलेला आहे. उदकशांतीमधील वेदब्रह्माचे आवाहन व पूजन हा धागा पकडून त्याभोवती एका नव्या चांगल्या विधीची रचना करता येईल असे वाटले. त्यामुळे पारंपरिक उपनयन संस्कारावर आधारित ज्याप्रमाणे विद्याव्रत उपासनेची रचना केली गेली, त्याप्रमाणे पारंपरिक उदकशांतीवर आधारित ही ‌‘वेदपूजन उपासना‌’ प्रसिद्ध करत आहोत.

‌'घटस्थापना‌' सार्थ विधी

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत नवरात्री उत्सव साजरा केला जातो. आश्विन शुद्ध दशमीला दुर्गाविजयस्मृति – विजयादशमी उत्सवाने याची सांगता होते. वर्षा ऋतूत सुस्नात होऊन सुप्रसन्न झालेली सृष्टी शारदीय चंद्रप्रकाशाने उजळून जाते आहे. वातावरणात उत्साहपूर्ण चैतन्यलहरी उसळून येण्याचा हा काळ आहे. नवरात्रोत्सवात शक्तीचे-महाशक्तीचे नाना आविष्कार आपल्या नजरेस पडतात. आसेतु-हिमाचल सारा देश आपापल्या वैशिष्ट्यानुसार या आदिशक्तीची उपासना करतो.

सुगीच्या काळात हा उत्सव साजरा होत असतो. खरीपाचे पीक हातात आलेले असते. मशागत करून रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकरी तयारीत असतो, या काळात दुर्गापूजा केली जाते. पीकचक्राचा तो अविभाज्य भाग आहे. दुर्गेचे वनस्पतींशी-वृक्षांशी व भूमीच्या सुपीकतेशी चिरंतन नाते आहे. तीच शाखांबरी आहे. तीच अन्नपूर्णा आहे. महालक्ष्मी, महासरस्वती महाकालीच्या रूपात तीच प्रकट होते. अशा या आदिशक्तीचे आवाहन व पूजन आता आपण करूया आपल्यामध्ये आदिशक्तीचे विविध गुण बाणविण्याचा संकल्प करू या.