१. विमल राष्ट्र घडो अभिजात

प्रबोधिनीचे विकसनशील चिंतन

काळ बदलतो तसे शब्दांचे अर्थ बदलतात. प्राधान्यक्रम बदलतात. दीर्घ काळ काम करू इच्छिणाऱ्या संघटनांना त्यामुळे आपली उद्दिष्टे त्या त्या काळातील अर्थवाही शब्दांमध्ये मांडावी लागतात. ‌‘मनुष्यघडण‌’ ऐवजी ‌‘देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणे‌’ अशी पुनर्मांडणी आपण या करताच केली. हे आपले मध्यंतर उद्दिष्ट आहे. त्याहून लांबच्या दीर्घकालीन उद्दिष्टाची नवीन
भाषेत पुनर्मांडणी करावी लागेल का, असा विचार करत होतो. त्या दृष्टीने प्रबोधिनीतील प्रकाशित साहित्य वाचत होतो. प्रबोधिनीच्या संस्थापक संचालकांना अशी गरज जाणवली होती का ? त्यांनी या दिशेने काही प्रयत्न केले होते का ? याची उत्तरे शोधण्याकरिता केलेल्या वाचनातून असा एक प्रयत्न झाला असावा असे वाटले. मला जाणवलेला पुनर्मांडणीचा प्रयत्न पुढे दिलेला आहे.

कोणत्या प्रकारचे दोनशे कार्यकर्ते ?

डिसेंबर 1975 मध्ये मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‌‘एक्सलन्स्‌‍ ॲवॉर्ड‌’ स्वीकारताना कै. आप्पांनी प्रबोधिनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट पुढील शब्दांत मांडले होते – This ideal of equality, fraternity, social justice, excellence in science blended with Indian spiritualism is the basis of all work at JP. To give to the Nation at least 200 young men and women who are inspired with the above ideals, is the ‘not-too-distant’ goal or objective of Jnana Prabodhini.

समता, बंधुता, सामाजिक न्याय ही भारतीय घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वे आहेत. विज्ञानातील उत्तमता आणि भारतीय शैलीची आध्यात्मिकता यांच्यासह त्यांचा स्पष्ट उल्लेख आणि तोही प्रबोधिनीच्या उद्दिष्टांच्या संदर्भात जाहीरपणे याच कार्यक्रमात पहिल्यांदा झाला. या पाच तत्त्वांपासून प्रेरणा घेणारे दोनशे युवक-युवती प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशासाठी काम करू लागावेत हे प्रबोधिनीचे मध्यंतर उद्दिष्ट आहे, असे त्यावेळी प्रबोधिनीच्या संस्थापकांनी सांगितले.

प्रबोधिनीचे मध्यंतर उद्दिष्ट

देशाला दोनशे कार्यकर्ते देणे हे उद्दिष्ट कै. आप्पा आधीपासूनच मांडत होते. हे दोनशे कार्यकर्ते कसे असावेत याचे तपशील या भाषणाच्या निमित्ताने प्रथमच मांडले गेले. या पुरस्काराच्या निमित्ताने पूर्वीपासून मांडलेल्या कल्पनाच कै. आप्पांनी लोकांना जास्त परिचित शब्दांध्ये मांडल्या आहेत असे म्हटले पाहिजे. प्रबोधिनीच्या घटनेमध्ये मांडलेल्या प्रबोधिनीच्या उद्देशांच्या अंतिम
परिच्छेदात पुढील हेतू मांडला आहे. ‌‘स्वदेशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे. तो साध्य होईल अशा तऱ्हेने कार्य घडविणे‌’. घटनेतील या उद्देशांध्ये ‌‘येथे पुनरुज्जीवन व्हावे‌’ हा उद्देश अर्थातच वरील पाच तत्त्वांधील भारतीय शैलीची आध्यात्मिकता याला समांतर आहे. ‌‘देशाचा कायापालट व्हावा‌’ याचा संबंध वरील पाच तत्त्वांपैकी विज्ञानातील उत्तमतेशी येतो. ‌‘विचारप्रबोधन, कार्यप्रबोधन व देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण‌’ अर्थातच समाजामध्ये समता, बंधुता व सामाजिक न्याय ही मूल्ये प्रतिष्ठित झाली तर होईल.

प्रेरक मूल्ये आणि अपेक्षित परिणाम

ज्ञान प्रबोधिनीचे उद्दिष्ट ‌‘धर्मसंस्थापना‌’ या शब्दातही कै. आप्पा मांडायचे. प्रबोधिनीच्या घटनेच्या परिशिष्टातच ‌‘स्वदेशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे,…… नवचैतन्य निर्माण व्हावे‌’, ही धर्मसंस्थापना या अंतिम ध्येयाची स्पष्ट मांडणी आहे असे म्हटले आहे. कै. आप्पांना धर्मसंस्थापना म्हणजेच समाजसंस्थापना म्हणजेच राष्ट्रनिर्माण असे स्पष्टीकरण कालांतराने करावेसे वाटले. समाजसंस्थापना करणे म्हणजे समाज-रचना काही मूल्यांवर प्रतिष्ठित करणे. समाजसंस्थापनेचे कवा धर्मसंस्थापनेचे स्पष्टीकरण देताना घटनेध्ये समाजात विचारप्रबोधन ते नवचैतन्य निर्माण असे पाच परिणाम दिसले पाहिजेत असे म्हटले आहे. हे पाच परिणाम दिसण्यासाठीच समता, बंधुता, सामाजिक न्याय, विज्ञान आणि आध्यात्मिकता या मूल्यांची मांडणी केली आहे.

1983 साली विवेकानंद जयंतीच्या प्रबोधिनीच्याच कार्यक्रमात केलेल्या भाषणामध्ये कै. आप्पांनी देशापुढील प्रश्नांची सहा विभागांध्ये मांडणी केली होती. त्यामधील एक परिच्छेद पुढीलप्रमाणे आहे. ‌‘तिसरा प्रश्नसमूह म्हणजे नव्या समाजरचनेचा. नव्या प्रकारच्या समाजरचना यायला हव्यात ज्या सामंजस्यावर आधरलेल्या आहेत, समतेवर आधारलेल्या आहेत, बंधुत्वावर आधारलेल्या आहेत, असे झाले पाहिजे. या टोकापासून त्या टोकापर्यंत बंधुत्वाचे नाते निर्माण करणारे, एकच एक झेंडा फिरवणारे जे हिंदुत्व आहे, त्याचे काम करणाऱ्या समाजरचना पाहिजेत.‌’

उद्दिष्ट तेच, शब्द कालोचित

प्रबोधिनीचे दोनशे कार्यकर्ते ज्या पाच तत्त्वांच्या समूहाने प्रेरित झाले पाहिजेत ती १९७५ मध्ये सांगितलेली तत्त्वे व नव्या समाजरचनेविषयी १९८३ साली व्यक्त केलेली अपेक्षा यातील साम्य पाहिले म्हणजे कै. आप्पांनी ती तत्त्वे किमान आठ वर्षांच्या दीर्घचिंतनातून मनःपूर्वक स्वीकारली होती, हेच दिसते.

समता, बंधुता, सामाजिक न्याय व विज्ञानातील उत्तमता ही खरे तर युरोपातील सामाजिक, राजकीय व वैचारिक चळवळींतून पुढे आलेली तत्त्वे. म्हणूनच या चार तत्त्वांबरोबर पाचवे तत्त्व सांगताना Spiritualism आध्यात्मिकता असे न म्हणता Indian spiritualism – भारतीय शैलीची आध्यात्मिकता असे शब्द कै. आप्पांनी वापरले. भारतीय आध्यात्मिकता मुख्य. तो पाया पक्का असेल तर अध्यात्माचे व्यावहारिक जीवनात उपयोजन करताना मदतीसाठी इतरत्र विकसित झालेली तत्त्वे चालतील असेच जणू सुचवायचे आहे. यासाठी प्रबोधिनीचे मध्यंतर उद्दिष्ट (not-too-distant goal) म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या पुढील वचनाचा अनुवाद आहे असे कै. आप्पांनी १९७५ मधल्या भाषणातच सांगितले होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, “समानता, स्वातंत्र्य, उद्योग आणि उत्साह यात पाश्चात्यांतील पाश्चात्य आणि त्याच वेळी धर्म, संस्कृती, सहज प्रेरणा यात कट्टर हिंदू तुम्ही होऊ शकाल का ?”

प्रबोधिनीतील चिंतन असे विकसनशील असले पाहिजे, हे मला कै. आप्पांच्या या वैचारिक प्रवासातून कळले. तुम्हाला या प्रवासासंबंधी काय वाटते ?