२. भारतीय जीवनपद्धतीचा गाभा

बाहेरील सुधारणा म्हणजे सभ्यता

सध्या सभ्यता (सिव्हिलायझेशन) आणि संस्कृती (कल्चर) असे दोन शब्द मानवी समाजाची प्रगती दर्शविण्यासाठी वापरले जातात. सभ्यता म्हणजे माणसांनी सामुदायिक रित्या नैसर्गिक शक्तींना नियंत्रणात आणून आपल्या सामुदायिक जीवनात घडवलेली सुधारणा. रानात उगवलेले धान्य वेचण्यापेक्षा बियाणे वापरून पाहिजे ती पिके घेणे ही सुधारणा. शेतात बियाणे विखरून टाकण्यापेक्षा शेत नांगरून बी जमिनीत पेरणे ही सुधारणा. पावसाच्या पाण्यावर शेती करण्यापेक्षा बागायती शेती करणे ही सुधारणा. रान तोडून एका भागात काही वर्षे शेती करणे व नंतर दुसरे रान तोडून पहिल्या शेतात रान माजू देणे ही सुधारणाच. पण एकाच शेतात खते वापरून आणि पिके बदलून शतकानुशतके जमिनीचा कस टिकवणे ही त्यापुढची सुधारणा. अन्नासाठी शेती करण्याऐवजी नगदी पिके घेणे ही देखील सुधारणा आणि हरितगृहात पाहिजे तसे वातावरण नियंत्रित करून शेती करणे ही त्यापुढची सुधारणा.

शेतीत सुधारणा करून मानवी समाजाची सभ्यता वाढली तसेच घरे, वाहने, चुली, इंधन, ऊर्जासाधने, रस्ते, पूल, रेल्वे, विमाने, कालवे, अंतरिक्षयाने यात सुधारणा होऊनही सभ्यता वाढली. प्रमाणित वजने मापे, चलन व्यवस्था, बँका, विमा, कर्जपद्धती, क्रेडिटकार्ड, डेबिट कार्ड यात सुधारणा होऊनही सभ्यता वाढली. निसर्गावर नियंत्रणाबरोबरच सर्व मानवी व्यवहार नियंत्रित करण्यालाही सभ्यता म्हणतात. लिखित घटना व कायदे, निवडणुका, लोकशाही, न्यायालये, पंचायती, जिल्हा परिषदा, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय करार-मदार ही देखील सुधारणा व सभ्यताच. लोकांचे विविध प्रकारचे हक्क मान्य करणे व त्यांच्या रक्षणाची व्यवस्था करणे ही देखील सभ्यताच. सामुदायिक पाणवठे, गावाची गायराने, वहिवाटीचे रस्ते, बौद्धिक स्वामित्व या सर्व रचना म्हणजेही सभ्यताच. भौतिक सुख-दुःखांचे नियंत्रण सभ्यतेने होते.

मनातील सुधारणा म्हणजे संस्कृती

मानसिक सुख-दुःखे भौतिक सुख-दुःखांशी काही प्रमाणात जोडलेली असतात. परंतु ती बऱ्याच प्रमाणात वेगळीही असतात. माझी भौतिक सुख-दुःखे मी इतरांशी कशी व किती वाटून घ्यायची आणि इतरांच्या सुखासाठी माझी सुख-दुःखे मी कधी बाजूला ठेवायची हे ज्या नियमांमधून कळते, त्याला सभ्यतेपलिकडची संस्कृती म्हणता येईल. कर्तव्य, संयम, त्याग, समर्पण, सेवा, आदर, कृतज्ञता, निष्ठा, श्रद्धा, विवेक, बंधुभाव, मैत्री, प्रेम, भक्ती, शरणता या सर्व गुणांच्या आधारे आणि त्यांच्यासाठी जगण्याच्या प्रयत्नातून मानवी समाजाने संस्कृती निर्माण केली आहे. समाजातील चाली-रीती, सण-उत्सव, रूढी-परंपरा या सगळ्यांमधून संस्कृती कळत असते. केळीच्या खुंटांचे खांब आणि आंब्याच्या पानांची तोरणे म्हणजे मांगल्य, बुक्का म्हणजे भजन, गुलाल म्हणजे गणेशोत्सव किंवा विजयोत्सव आणि भंडारा म्हणजे खंडोबा, तीर्थ-प्रसाद म्हणजे कोणतीतरी पूजा आणि रांगोळी म्हणजे स्वागत अशा प्रतीकांमधून संस्कृती व्यक्त होत असते. संस्कृतीमधून नीती-अनीतीचा बोध होतो तसेच सौंदर्य आणि कुरूपतेचाही निर्देश होतो.

सभ्यता आणि संस्कृती मिळून जीवनप्रणाली

सभ्यता आणि संस्कृती मिळून जीवनप्रणाली तयार होते. भारतीय जीवनप्रणालीचे वैशिष्ट्य असे आहे की नीतिबोध आणि सौंदर्यबोध याबरोबरच येथे आत्मबोधालाही महत्त्व दिले गेले आहे.

सभ्यता जशी फुलत जाते तसे सहिष्णुता, स्वीकारशीलता, इतरांचा आदर; आणि समाजव्यवहार व नैसर्गिक घडामोडींमध्ये अधिकाधिक नियोजन, व्यवस्थापन व दूरदृष्टी प्रकट होत जाते. संस्कृती जशी फुलत जाते तशी नीती आणि सौंदर्य यांच्या बोधाबरोबरच त्यांचे अनेक प्रकारे प्रकटीकरण व अभिव्यक्तीही होत जाते. जगभरच्या अनेक समाजांमध्ये सभ्यता व संस्कृतीच्या फुलण्याचे वेगवेगळे टप्पे व त्यातून तयार झालेल्या अनेक जीवनप्रणाल्या दिसतात.

भारताच्या जीवनप्रणालीत काही गोष्टी इतरांच्यापेक्षा कुठे प्रमाणाने व प्रकाराने वेगळ्या असतील. भारतातील सभ्यतेची म्हणजे भौतिक सुधारणेची पातळी अनेक बाबतीत आज इतरांच्या खाली असेल, ते प्रमाणाचे वेगळेपण आहे. ते भरून काढता येईल.

भारतीय संगीत, नृत्य, चित्रकला, खेळ, खाद्य-पदार्थ, वेषभूषा, इतरांच्या बाबतीत प्रकाराने वेगळे आहेत. तिथे संस्कृतीची सौंदर्य-मूल्येही वेगळी आहेत आणि त्यांची अभिव्यक्तीही वेगळी आहे. हे वेगळेपण टिकवून ठेवले पाहिजे आणि इतरांच्या वेगळेपणाचे रसग्रहणही केले पाहिजे.

या सर्वांच्या पलिकडे भारतीय जीवनप्रणालीत इंद्रियांनी न कळणाऱ्या पण बुद्धीला जाणवणाऱ्या शरीर-इंद्रिये मन-बुद्धी यांचे नियंत्रण करणाऱ्या स्वतःमधील एका स्वतंत्र केंद्राचा विचार सतत होत आला आहे. या केंद्राची ओळख होण्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाला आणि संपूर्ण आयुष्याला काही वेगळे वळण देण्याचा उपयोग होईल का याचा विचार भारतीय लोक फार पूर्वी पासून करत आले आहेत. याबाबतीत भारतीय लोकांइतके प्रयोग इतर कोणत्याही देशात झाल्याची जगाच्या इतिहासात नोंद नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे हे केंद्र सापडणे म्हणजे ‘आत्मबोध’. त्या केंद्राची ओळख होणे म्हणजे आत्मसाक्षात्कार. या आत्मसाक्षात्कारासाठी स्वतःची इंद्रिये, मन व बुद्धी यावर नियंत्रण मिळवण्याचा, स्वतःचे अनुभवविश्व, भावविश्व आणि विचारविश्व यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची अखंड परंपरा व त्यांचे असंख्य प्रयोग हे भारतीय जीवनप्रणालीचे वेगळेपण आहे.

आत्मबोधाभोवती फिरणारे संस्कृति-संवर्धनाचे प्रयोग हे आपल्या जीवनप्रणालीचे भाग आहेत. यातून तयार होणारी आपली जीवन-प्रणाली सदैव प्रगति-पथावर राहावी ही आपली जीवनदृष्टी आहे. या जीवनदृष्टीतून समाजजीवन घडविण्याला आपल्याकडे समाजसंस्थापना असे म्हणतात.