संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६

प्रस्तावना

एखाद्या संस्थेचा संस्थानिर्मिती लेख (मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन) आणि तिची नियमावली (रुल्स रेग्युलेशन्स्) मिळून तिची कायदेशीर घटना होते. ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी दर पंधरा वर्षांनी आपल्या घटनेचा आमूलाग्र आढावा घेऊन बदलत्या काळानुसार तिच्यात आवश्यक वाटल्यास समूळ बदल करावेत अशी तरतूद ज्ञान प्रबोधिनीच्या नियमावलीत प्रथमपासूनच होती. त्यानुसार नियमावलीत व संस्थानिर्मिती लेखातील उपक्रमांच्या परिच्छेदात वेळोवेळी काही बदल झाले, भर पडली, काही भाग वगळलाही गेला. परंतु १९६२ मध्ये स्थापना झाल्यापासून २०२४ पर्यंत गेल्या ६२ वर्षांमध्ये संस्थानिर्मिती लेखातील संस्थेच्या उद्देशांच्या परिच्छेदात काही बदल झाला नाही.

या उद्देशांच्या परिच्छेदातील पहिल्या उप-परिच्छेदातील (परिच्छेद क्र. ३.१ पृष्ठ ७ आणि ४२) पहिलेच वाक्य ‘ज्ञान प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्य पुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे’, असे नकारात्मक भाषेतील आहे. घटना-दुरुस्तीच्या वेळी अनेक वेळा ‘घटनेची सुरुवात नकारात्मक वाक्याने नको’ असा मुद्दा चर्चेत येऊनही ते पहिले वाक्य आजपावेतो बदलले गेले नाही. अनघड वाटांनी जायचे ठरवलेल्या कार्यसंघाला चाकोरीच्या वाटेने जाण्यासाठी आपल्या संघटनेची निर्मिती झालेली नाही याचे जणू काही स्मरण करून देण्यासाठीच वेळोवेळीच्या सदस्यांनी चर्चेनंतरही ते वाक्य तसेच ठेवले.

प्रबोधिनीपुरते राष्ट्रघडणीच्या कामातील विधि-निषेध ठरविताना सुरुवात निषेधापासून झाली असली तरी उरलेला पुढचा भाग विधींचा आहे. उद्देशांमधील शेवटचा उपपरिच्छेद (परिच्छेद क्र ३.७ पृष्ठ क्र. ३६ आणि ४४) तर सकारात्मक, कृतिपर, आवाहनात्मक भाषेची एक उत्तुंग उंची गाठतो. प्रबोधिनीच्या घटनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिला दोन परिशिष्टे आहेत. त्यापैकी दुसऱ्या परिशिष्टात ‘भारतीय समाजाची धारणा करणारा जो धर्म, त्याची पुनर्संस्थापना करणे हे ज्ञान प्रबोधिनीचे अंतिम ध्येय आहे’, (पृष्ठ ४७) असे म्हटले आहे. त्याला संदर्भउद्देशांच्या या अंतिम उप-परिच्छेदाचा आहे.

प्रबोधिनीच्या कामाचे स्वरूप निश्चित करण्यापासून प्रबोधिनीचे अंतिम ध्येय मांडण्यापर्यंत ‘प्रबोधिनी’ या संघटनेची व्याप्ती या सात उप-परिच्छेदांमध्ये आली आहे. पंचेचाळीस वर्षे त्यात बदल करण्याची गरज जाणवली नाही, यात त्या मांडणीची ताकद आहे.

संघटनेचा संस्थानिर्मिती लेख बासनात बंद न राहता कार्यकर्त्यांच्या नित्य चिंतनाचा भाग व्हावा असे वाटत होते. मला असे चिंतन अनेक वेळा पर्यायांची निवड करताना उपयोगी पडले आहे. या चिंतनाची दिशा दाखविण्यासाठी फेब्रुवारी २००६ ते जानेवारी २००७ असे वर्षभर प्रत्येक महिन्याला एक या प्रमाणे घटनेतील उद्देशांच्या परिच्छेदावर बारा प्रकट चिंतने लिहिली होती. त्यापैकी एक पूर्णपणे नव्याने लिहून व इतरांमध्ये किरकोळ फेरफार करून ती या पुस्तिकेत संकलित केली आहेत.

ही चिंतने विचाराला चालना देणारी व्हावीत असा या संकलनाचा हेतू आहे. हे काही प्रबोधिनीच्या उद्देशांवरचे अधिकृत किंवा एकमेव भाष्य नाही. उलट या प्रमाणेच अनेकांनी आपल्या संघटनेच्या म्हणजे प्रबोधिनीच्या उद्देशांचे चिंतन विविध दिशांनी करावे अशी अपेक्षा आहे. पहिल्या ६२ वर्षांमध्ये जे करावे लागले नाही ते, अंतिम ध्येय आहे तेच ठेवून उद्देशांची पुनर्मांडणी करण्याचे काम, प्रबोधिनीच्या स्थापनेच्या ७५व्या वर्षी आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात करता यावे, अशी मनीषा आहे. धर्मसंस्थापनेच्या अंतिम ध्येयाकडे जाणारे नव्या काळाच्या भाषेतील नवे उद्देश प्रबोधिनीच्या संस्थानिर्मिती लेखात यावेत यासाठी चिंतनाला प्रारंभ करण्याचे आवाहन म्हणून हे संकलन आहे.