२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व

भारताच्या भवितव्याचे कर्णधार : १) भारत हा समृद्ध देश व्हावा. प्रत्येक भारतीय कुटुंबात समृद्धी यावी. २) भारतात सर्व प्रकारची उत्पादने तयार करणारे उद्योग असावेत. या उद्योगांनी कोणाही व्यक्तीचे, समाज-गटाचे व निसर्गाचेही शोषण न करता उत्पादन करावे. ३) भारतातील शेती सर्वांना भरपूर अन्न, उद्योगांना कच्चा माल व अनेकांच्या हातांना सन्मानाचे काम देणारी असावी. ४) भारतात सर्वांना स्वावलंबी, स्वाभिमानी, उद्यमशील, समूहशील बनवणारे शिक्षण सर्व वयोगटांना मिळावे. ५) भारतातील वैज्ञानिक संशोधन जगाला दिशा दाखवणारे व देशाचे सर्व व्यावहारिक प्रश्न सोडवणारे असावे. ६) भारतातील शासन लोकाभिमुख, पारदर्शक, लोकांना निर्भय बनवणारे व लोकांच्या न्याय्य उपक्रमशीलतेला मदत करणारे असावे. ७) भारतातील शेती, उद्योग, विज्ञान संशोधन, शिक्षण, अर्थव्यवहार आणि प्रशासन, सुलभ व योग्य गतीने होण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान भारतातच तयार व्हावे. ८) भारताची संरक्षण क्षमता बाह्य व अंतर्गत शत्रूना जरब बसण्याइतकी तत्पर, सुसज्ज व आधुनिक असावी.

वर एकेका वाक्यात ज्या आठ क्षेत्रांतील प्रगतीची दिशा मांडली आहे, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञच त्या वाक्यांचा विस्तार करू शकतील. या आठ क्षेत्रांमध्ये अन्य क्षेत्रांची भरही घालता येईल. या सर्व क्षेत्रांमध्ये भारत सतत प्रगतिशील राहावा यासाठी त्या त्या क्षेत्रातील उद्दिष्टांची मांडणी आणि फेरमांडणी पुन्हा पुन्हा कोणीतरी करायला लागेल. त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि कार्यक्रमही सांगायला लागेल. त्या कार्यक्रमानुसार काम करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या ते ही सांगावे लागेल. प्रत्येक क्षेत्रात असे शेकडो, हजारो लोक लागतील. प्रत्येक क्षेत्रातील त्या त्या वेळची गरज ओळखून नेमके जे करायला हवे असेल ते करायला जे पुढे सरसावतील ते सर्व त्या क्षेत्रातील नेते. स्थानिक स्तरापासून देशाच्या स्तरापर्यंत अशा नेत्यांची आवश्यकता नेहमीच असते. ही जबाबदारी स्वीकारण्याची व पार पाडण्याची शक्ती म्हणजे नेतृत्व शक्ती. मागील लेखात मांडलेल्या विशेष शिक्षणाद्वारे अशी नेतृत्वशक्ती विकसित करणे हे प्रबोधिनीचे उद्दिष्ट आहे.

नेतृत्वशक्तीचे स्रोत : दुसरे महायुद्ध संपताना दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचे सरसेनापती असलेले जनरल आयसेनहॉवर यांनी नंतर नेतृत्वावर एक पुस्तक लिहिले आहे. युद्धातील नेतृत्व, उद्योगातील नेतृत्व, राजकारणातील नेतृत्व यांच्या पैलूंची चर्चा करत करत शेवटी त्यांनी म्हटले आहे, की या सर्व प्रकारचे नेतृत्व हे तात्पुरते असते. खरे नेतृत्व येशू ख्रिस्त व गौतम बुद्धाने केले. कारण अशा नेत्यांचे लोकांच्या मनावरील अधिराज्य अनेक पिढ्या टिकते. शेकडो वर्षे ते लोकांच्या मनाला दिशा देतात.

नेपोलियन ब्रिटिशांच्या तुरुंगात असताना त्याला आत्मपरीक्षण करायची बरीच संधी मिळाली. सहा वर्षे तुरुंगवास झाल्यावर त्याने लिहून ठेवले की ‘सीझर, शार्ले मॅग्ने, नेपोलिअन जगज्जेते व्हायला निघाले. काही काळ ते यशस्वी झाल्यासारखे दिसले. आज त्यांना कोणी विचारत नाही. परंतु येशू ख्रिस्त मात्र हजार वर्षे होऊन गेली तरी सर्वांना आकर्षित करत असतो.’

या दोन्ही सेनानींच्या लिखाणात नेतृत्वाच्या दोन प्रकारांची तुलना केलेली आहे. पहिल्या प्रकारात मन-बुद्धीच्या अनेक शक्ती वापराव्या लागतात. दुसऱ्या प्रकारात आत्मिक शक्ती वापरली जाते. पहिल्या प्रकारचे नेतृत्व लवकर समजणारे आहे. दुसरे लक्षात यायला दोन्ही सेनानींना आत्मपरीक्षण करायला लागले. पहिल्या प्रकारात आपल्या मन-बुद्धीच्या सर्व शक्तींचा योग्य वेळी उपयोग करता यावा लागतो. त्यात परिस्थिती बदलली जाते व इतर लोकांचा त्या कामातील साधन म्हणून उपयोग केला जातो. दुसऱ्या प्रकारात सर्व व्यक्तींना सारखेच महत्त्व देऊन प्रत्येक व्यक्तीला सत्प्रवृत्त करणे हेच साध्य असते.

पहिल्या प्रकारच्या नेत्यांना पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सत्ता किंवा अहंकार सुखावणे अशा कुठल्या तरी पद्धतीने आपल्या नेतृत्वाचा मोबदला हवा असतो. उद्योग, शासन आणि सैन्यात यासाठी अधिकारानुसार बंगला, गाडी, नोकर, दूरभाष, पर्यटनाच्या सवलती, क्रेडिटकार्ड, क्लबचे सभासदत्व, अशा अप्रत्यक्ष सुख-सोयींची (perks) व्यवस्था केली जाते. या सुखसोर्याच्या अपेक्षेने व त्यांच्या लाभाने अनेकांचे कर्तृत्व फुलते. इतर क्षेत्रात अन्य मार्गांनी ही गरज पूर्ण होते.

या सगळ्यांचा तात्कालिक उपयोग मान्य करून प्रबोधिनीला मात्र नेतृत्वशक्तीचा दुसराही स्रोत विकसित करायचा आहे. त्यासाठी नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या नेतृत्वशक्तीचा स्रोत मन-बुद्धीच्या शक्तीऐवजी आत्मशक्तीमध्ये कसा शोधायचा, हे शिकायची दिशा दाखवायची आहे.

दुसऱ्या स्रोताकडे जाण्याचे टप्पे : प्रबोधिनीच्या घटनेत प्रबोधिनीचा दुसरा उद्देश मांडताना पहिलेच वाक्य असे आहे—- भारताच्या आर्थिक, औद्योगिक, शेतकी, शैक्षणिक, वैज्ञानिक, शासकीय, तांत्रिक, सैनिकी इत्यादी प्रांगणात श्रेष्ठ चारित्र्याचे आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाहीत. नेतृत्वशक्तीचा पहिला स्रोत वापरणारे अनेक जण त्यांचे चारित्र्य आणि राष्ट्रीय वृत्ती प्रकट न होताही नेतृत्व करताना दिसू शकतात. क्वचित ते आपापल्या क्षेत्रातील काम काही प्रमाणात पुढेही नेतात. परंतु ते काम राष्ट्र-जीवनाच्या इतर क्षेत्रांशी सुसंगत राहतेच असे नाही. ते काम भारतीय समाजाच्या हिताला पोषक होते असेही नाही. वरील आठही क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्यांनी समाजाच्या सांस्कृतिक चौकटीत आपल्या क्षेत्राचा व कामाचा विचार केला पाहिजे. भारतीय संस्कृतीतून प्रेरणा घेऊन आणि भारतीय समाजाचे हित सर्व प्रथम डोळ्यासमोर ठेवून काम करणारी नेतृत्वशक्ती प्रबोधिनीला विकसित करायची आहे. भारतीय संस्कृतीतून प्रेरणा घेणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य श्रेष्ठ दर्जाचेच असेल. भारतीय समाजाचे हित सर्वप्रथम डोळ्यासमोर ठेवून काम करणारी व्यक्ती राष्ट्रीय वृत्तीचीच असेल. प्रबोधिनीला श्रेष्ठ चारित्र्य आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीच्या बरोबर राहणारी नेतृत्वशक्ती विकसित करायची आहे.

ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.२

भारताच्या आर्थिक, औद्योगिक, शेतकी, शैक्षणिक, वैज्ञानिक, शासकीय, तांत्रिक, सैनिकी इत्यादी प्रांगणांत श्रेष्ठ चारित्र्याचे आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाहीत. अशा नेत्यांची आवश्यकता ही केवळ प्रचलित कालापुरतीच नसून ती नित्याचीच निकड आहे. म्हणून सर्वंकष नेतृत्वाची धुरा आपापल्या क्षेत्रात स्वीकारतील आणि राष्ट्राच्या हाकेला ‘ओ’ देतील असे कार्यकर्ते निर्माण करणे.