३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II

सूर्याजी मालुसरे व आनंदराव गुजर : शिवकालातील दोन प्रसंगांवर अनेक पोवाडे आणि कविता लिहिल्या गेल्या आहेत. पहिला प्रसंग आहे कोंडाणा जिंकण्याचा आणि दुसरा प्रसंग आहे प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांच्या बलिदानाचा. कोंडाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांची होती. पण लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यावर मराठा फौजेची पळापळ सुरू झाली. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी पळणाऱ्या मावळ्यांना थोपवले, पुन्हा लढाईकडे वळवले आणि त्यांना धीर व प्रेरणा देत लढाईत विजय मिळवला.

प्रतापराव गुजर व त्यांचे सहा सरदार, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कवितेमुळे अनेकांना माहीत झाले आहेत. हे सात वीर हुतात्मा झाल्यानंतर आठवा सरदार, प्रतापरावांचा भाऊ आनंदराव गुजर पुढे आला आणि त्याने मराठी सैन्यासह आदिलशाही फौजेशी लढा चालू ठेवला. मागे राहिलेल्या फौजेने या सातांना मारणाऱ्या बहलोलखानाच्या फौजेचा नंतर पूर्ण पराभव केला आहे.

सूर्याजी व आनंदराव यांनी प्रसंगाची गरज ओळखून आपापल्या फौजेचे नेतृत्व करायची जबाबदारी अंगावर घेतली व ती पार पाडली. त्यांचे नेतृत्वगुण प्रसंगानुसार प्रकट झाले. परंतु ते गुण काही आयत्या वेळी निर्माण झाले नाहीत. जे गुण त्यांच्यामध्ये आधीपासूनच गुप्तपणे होते, ते प्रसंगानुसार प्रकट झाले.

प्रतिसादातून नेतृत्वाचे प्रकटीकरण : नेतृत्वगुण प्रकट होणे हे काही प्रमाणात परिस्थितीवर अवलंबून असते व काही प्रमाणात नेत्याच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. परिस्थितीला प्रतिसाद देणे हा व्यक्तिमत्त्वाचा एक गुण आहे. तो सूर्याजी व आनंदराव या दोघांकडे होता. प्राप्त परिस्थितीत आपल्या गटाला त्या वेळचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे व प्रेरित करणे हा व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक गुण आहे. तो ही सूर्याजी व आनंदराव यांच्याकडे होता. परिस्थिती व व्यक्तिमत्त्व या दोन्हीचा परिणाम म्हणून त्यांचे नेतृत्वगुण प्रकट झाले. त्यांच्याकडे स्वराज्यनिष्ठा, शत्रूच्या अन्यायाची चीड, शौर्य, लष्करी डावपेचांचे ज्ञान, आत्मविश्वास हे सर्व गुण होतेच. पण त्यांच्यावर नेतृत्व करण्याचा प्रसंग आल्यावर त्यांनी परिस्थितीची हाक ऐकली व ‘ओ’ दिली हे महत्त्वाचे. स्वतःवर एकट्यावर कठीण प्रसंग ओढवल्यावर त्यातून वाट काढण्याला हिकमतीपणा (रिसोर्सफुलनेस) म्हणतात. पण आपल्या गटावर, समाजावर आणि देशावर किंवा आपल्या धर्मावर, तत्त्वावर आणि ध्येयावर आपत्तीचा प्रसंग ओढवला तर त्यातून गटाला पार नेणे याला नेतृत्व म्हणतात.

केवळ प्रतिसाद पुरेसा नाही: नेतृत्व परिस्थितीनुसार प्रकट होते. शासनात आणि सैन्यात एका प्रमुखाला काम करणे अशक्य झाले तर कोणी जबाबदारी घ्यायची याचा क्रम ठरलेला असतो. तिथला प्रत्येकजण परिस्थितीला नियोजित प्रतिसाद देतो. मोठ्या समाजामध्ये व समाजातल्या शासन आणि सैन्याशिवाय अन्य विविध क्षेत्रांमध्ये त्या त्या परिस्थितीला आवश्यक नेतृत्व उत्स्फूर्त प्रतिसादातून येते.

एखाद्या गटाचे नेतृत्व करायचे म्हणजे गटातील सर्वांबरोबर परस्पर सहकार्याची, व एकजुटीने कामाची, आवड व सवय असावी लागते. सूर्याजी व आनंदरावांकडे हे गुण असणार. आपले नेतृत्वगुण प्रकट करण्याचा त्यांच्यावर प्रसंग येईपर्यंत ते त्यांच्या फौजेमध्ये मिळून मिसळून वागत असणार. त्यांचे युद्धकौशल्य आणि स्वराज्यनिष्ठा यांची सर्वांना खात्री असणार. म्हणूनच त्यांनी आपणहून अंगावर घेतलेली नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्या फौजेने मानली.

एका प्रसंगाच्या वेळी प्रकर्षाने पुढे आलेले त्यांचे नेतृत्वगुण नंतरच्या इतिहासात मात्र पुन्हा प्रकट झाले व नोंदले गेले असे दिसत नाही. सातत्याने नेतृत्व करण्यासाठी प्रतिसाद देणे, जबाबदारी घेणे, सहकार्य भावना जोपासणे यांच्याबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीत प्रतिभापूर्ण, नाविन्यपूर्ण कामकाजाची पद्धत वापरावी लागते. इतरांमध्ये प्रेरणा जागवावी लागते.

पंतप्रधान कै. लालबहादूर शास्त्री यांचे नेतृत्वगुण : लाल बहादूर शास्त्रींकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी अचानकच आली. त्यांनी त्या परिस्थितीचा स्वीकार केला. स्वतःच्या उदाहरणाने व भावनास्पर्शी आवाहनाने, सगळ्या मंत्रीमंडळाला, काँग्रेस पक्षाला व सर्वसामान्य जनतेला परस्पर सहकार्याने काम करण्याला उद्युक्त केले. धाडसी व अनपेक्षित निर्णय घेतले. त्यांच्या ठामपणामुळे इतरांमध्ये ठामपणा निर्माण झाला. पंतप्रधान होऊन नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे येईपर्यंत सर्वजण त्यांना पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असेच समजत होते.

कार्यकर्ताच नेता बनावा : उद्दिष्ट ठरवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी, योजना करण्यासाठी नेत्याकडे बुद्धी लागते. त्याशिवाय प्रतिसाद देणे, जबाबदारी घेणे, सहकार्य करणे, चाकोरी सोडून लवचिकतेने नवे मार्ग शोधणे आणि इतरांमध्ये प्रेरणा जागवणे हे मनाचे भावनिक गुणही लागतात. ज्याचे मन-बुद्धीचे असे गुण विकसित झाले आहेत तोच सर्वंकष नेतृत्व करू शकेल. परिस्थितीची गरज ओळखून जो पुढे होतो, तो ती वेळ येईपर्यंत त्याच गटात राहून त्या गटाचे काम करत असतो. असे काम करणाऱ्याला कार्यकर्ता म्हणतात. श्रेष्ठ चारित्र्याचे, कणखर राष्ट्रीय वृत्तीचे कार्यकर्तेच वरील मन-बुद्धीचे गुण अंगी बाणवून सर्वंकष नेतृत्व करू शकतील. प्रबोधिनीच्या घटनेत प्रबोधिनीचा दुसरा उद्देश मांडणाऱ्या परिच्छेदाचा शेवट पुढील प्रकारे केला आहे – अशा नेत्यांची आवश्यकता ही केवळ प्रचलित कालापुरतीच नसून ती नित्याचीच निकड आहे. म्हणून सर्वंकष नेतृत्वाची धुरा आपापल्या क्षेत्रात स्वीकारतील आणि राष्ट्राच्या हाकेला ‘ओ’ देतील असे कार्यकर्ते निर्माण करणे.