संस्कारांचे पुनरुज्जीवन

लेख क्र. ३४

०८/०७/२०२५

प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी संस्कारांमागील तात्त्विक भूमिकेचा विचार मांडला. त्यानंतर महिला पुरोहितांचा धार्मिक कार्यातील सहभाग समजून घेतला. या लेखामध्ये आचार्य योगानंद उर्फ डॉ. श्री. वि. करंदीकर यांनी संस्कार व पुरोहितांची वृत्ती यावर प्रकाश टाकताना संस्कारांमागील अध्यात्मिक व मानसिक विचार मांडला आहे. वासनारूप देहावर संस्काराची आवश्यकता असते. सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीची वाढ सामान्य स्तरावर असते आणि अशा स्थितीतसुद्धा प्रगती साधण्यासाठी भारतीय संस्कृतीने ‘संस्कारांची’ योजना केली आहे. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावर सोळा संस्कार करण्याची योजना होती. त्यातील काही संस्कार काळाप्रमाणे नष्ट झाले. काहींमध्ये ज्ञान प्रबोधिनीने कालानुरूप बदल केले. विद्याव्रत, देहदान, साठीशांती अशा काही संस्कारांची भरही घातली. हा लेख ‘मी पुरोहित बोलतोय’ या पुस्तकात प्रस्तावना म्हणून प्रकाशित झाला आहे. सोबत ध्वनिमुद्रण जोडले आहे.

वासनारूप सूक्ष्म देहावर संस्काराची आवश्यकता असते. हा देह ऊर्जास्वरूप आहे आणि संस्कारक्षम आहे. तसेच हा सर्वगामी आणि वैश्विक स्वरूपाचा आहे. यात सर्व पूर्वजन्माचे संस्कार उपस्थित असतात; पण सध्या ज्या योनीत जन्म झाला आहे त्या जन्मामुळे प्राप्त झालेल्या अवतीभवतीच्या परिस्थितीत शरीरात योग्य वर्तन करण्यास उपयोगी असे संस्कार उजळून उठतात आणि मन-बुद्धीच्या साहाय्याने भान आणि कर्म-इंद्रियांच्या माध्यमातून स्थूल शरीराचे व्यवहार पार पाडता येतात. सद्यः स्थितीत मानवी जन्म प्राप्त झाल्यामुळे इतर प्राण्यांपासून वेगळी परिस्थिती असते; त्यामुळे जाती, देश, कालसापेक्ष सुयोग्य संस्कार जागृत होतात.

स्मृती आणि संस्कार एकरूप आहेत. अतृप्त इच्छा आणि पूर्वी केलेल्या क्रिया या स्मृतिरूपात नेहमीच असतात आणि योग्य भावनांना अनुरूप असे संस्कार आपोआपच बाहेर येऊन क्रिया घडते. मानवी योनी ही परमेश्वर-तत्त्वाची अनुभूती येण्यासाठी योग्य आहे. अशा अनुभूतीला ‘मोक्ष’ म्हणतात. ही अवस्था ‘निर्विकल्प’ आहे. विकल्प ही वृत्ती शब्दरूप आहे; पण ही अवस्था शब्दांच्या पलीकडे असल्याने ती निर्विकल्प आहे. असे जरी असले, तरी ती प्राप्त होण्यासाठी शरीराचे सर्वांत सूक्ष्म स्वरूप जे ‘आकाश’ ते आत्म्याचे प्रकटीकरण होण्यातील पहिली अवस्था आहे. आकाश या महाभूताच्या सर्वात सूक्ष्म स्वरूपाला ‘तन्मात्रा’ म्हणतात. ‘तत्’ म्हणजे परमेश्वर-तत्त्व आणि मात्रा म्हणजे ‘संज्ञा’. आकाशाची तन्मात्रा ‘शब्द’ ही असून भारतीय संस्कृतीत त्याचे रूपांतर भाषेत करून ते सूत्रबद्ध करून प्रकट केले. त्यांना ‘मंत्र’ म्हणतात, मंत्राची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, ‘मननात् त्रायते इति मंत्रः।’ मनन म्हणजे मनाच्या साहाय्याने अज्ञात वस्तूंचे ज्ञान होणे. असे ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग ‘जीव’ या ऊर्जेचे स्थान असलेल्या शरीरात स्थिर राहण्यासाठी ‘चिंतन’ म्हणजे पुनः पुनः त्याची उजळणी करणे, शरीराला ‘स्व’ म्हणतात आणि या ‘स्व’ ला हे ज्ञान अर्थपूर्ण होण्याला ‘स्वार्थ’ म्हणतात. म्हणूनच ‘चित्त’ या अंतःकरणाच्या पैलूची व्याख्या करताना ‘स्वार्थानुसंधानगुणेन चित्तम् ।’ अशी केली आहे आणि हे ज्ञान स्मृतिरूपात साठवून ठेवून त्याचा उपयोग करण्याची कला ‘बुद्धी’ या अंतःकरणाच्या पैलूत आहे. या बुद्धीला सदैव ध्येयाची आठवण ठेवण्यासाठी ‘निदिध्यास’ म्हणजे परिश्रम करावे लागतात. तात्पर्य, संस्कार होण्यासाठी मनन, चिंतन आणि निदिध्यास’ यांचे साहाय्याने अनुक्रमे मन, चित्त आणि बुद्धी या तीनही पैलूंच्या माध्यमातून अभ्यास करावा लागतो.

मानव आणि इतर सजीव योनी यांचेमध्ये प्रमुख फरक असणाऱ्या पैलूंमध्ये मुख्यत्वाने शिक्षण, आरोग्य आणि विवाह या तीन संकल्पना आहेत. मानवाव्यतिरिक्त योनीमध्ये ‘शाळा’ नसतात. त्यामुळे त्यांची ‘स्मृती’ मर्यादित असते. दवाखाना, हॉस्पिटल याही संकल्पना मानवातच आरोग्यरक्षणासाठी आहेत. याचा अर्थ मानव योनीतच आरोग्याच्या स्थितीच्या अनुभूतीमधून व्याधिग्रस्त व्यक्तीविषयीच्या सहानुभूतीमधूनच ‘वैद्यक’ प्रगत झाले. ‘विवाह’ ही संकल्पना ‘मैथुन’ या प्रमुख स्तंभाशी संबंधित आहे. विवाहाच्या माध्यमातून पुढील पिढी मागील पिढीपेक्षा जास्त प्रगत होणे साधते. ‘शिक्षण’ ही संकल्पना संस्काराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची. याच्या सहाय्यानेच बुद्धीला प्रगल्भता येते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाव्यतिरिक्त ‘मानवता’ येण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. असे शिक्षण देण्यानेच बुद्धीचे प्रकर्षात्मक स्वरूप ‘प्रज्ञा’ जागृत होते व ही प्रज्ञा ऋतंभरा अवस्थेपर्यंत जाण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असणे हे योगशास्त्राचे अभ्यासाने शक्य होते; पण सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीची वाढ सर्वसामान्य स्तरावरच असते आणि अशा अवस्थेत सुद्धा प्रगती साधण्यासाठी भारतीय संस्कृतीने उपाय योजले आहेत. त्यांना ‘संस्कार’ म्हणतात. संस्काराचा उपयोग ‘स्मृति-जागृतीसाठी’ आहे. स्मृति-परिशुद्धीतून माणसाच्या हातून घडणारी कर्मे ही जास्त शुद्ध स्वरूपात होतील. हे संस्कार कालसापेक्ष आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत हे शिक्षण चालू राहावे, एवढेच नव्हे तर मृत्यूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपयोगही मानवी उत्क्रांतीसाठी करता येतो. वेदांपासून हे संस्कार समाजात रूढ आहेत. त्यांना रूढी म्हणतात. ते कसे करावे याची एक शिक्षणपद्धती आहे आणि ते शास्त्र मंत्रबद्ध केले आहे. हे मंत्र संस्कृत भाषेत असल्याने सर्वसाधारण माणसाला आकलन होत नाहीत. तसेच सध्याच्या वैज्ञानिक पार्श्वभूमीवर मानवाने केलेल्या प्रगतीच्या चष्म्यातून पाहिल्यास त्याचे महत्त्व कमी झाले आहे आणि हळुहळू भारतीय संस्कृतीमधून हे संस्कार नाहीसे होऊ लागले आहेत. यामुळे भारतात जन्म झालेल्या मानवाची उत्क्रांत अवस्था ढासळू लागली आहे.

या संस्कारांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेने पुढाकार घेऊन केला आहे. भारतीय संस्कृतीत सोळा संस्कारांचे महत्त्व आहे. त्यापैकी नामकरण, विद्याव्रत, विवाह, साठीशांत, सहस्त्रचंद्रदर्शन हे संस्कार जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आयुष्याशी जोडले आहेत, तर मृत्यूनंतर करावयाच्या संस्कारांना श्राद्ध म्हटले आहे. हे संस्कार मृत पार्थिव शरीरावर करण्याखेरीज मृताशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीवरही करावे लागतात. असे श्राद्ध-संस्कार मृत्युविधीनंतर अकरा दिवसांनी व त्यानंतर दरवर्षी येणारे श्राद्धसंस्कार मृत व्यक्तीच्या वारसांनी करायचे असतात. त्या संस्काराच्या माध्यमातून मृत व्यक्तीविषयी आदर, प्रेम इत्यादी आठवणींना उजाळा देता येतो आणि त्यातूनच स्मृतीमध्ये त्या व्यक्तीचे आदर्श ठेवण्याची प्रेरणा मिळते.

या सर्व संस्कारांचे वर्णन ज्ञानप्रबोधिनी संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मराठी माध्यमातून लिखित स्वरूपात त्या साहित्याचे तीन विभाग पडतात. पहिला – मानवी आयुष्यात जिवंतपणी करण्याचे व मृत्यूनंतर करण्याचे असा आहे. दुसरा विभाग देवतापूजनासंबंधी आणि तिसरा वास्तूसंबंधी आहे. या संस्कारांचे प्रयोजन सांगण्यासाठी ‘पाराशर गृह्यमंत्रांचा’ आधार घेऊन संस्काराविषयी कविता दिली आहे. त्याला मानवी जीवनाला आकार देण्यासाठी विविध संस्कार आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या संस्कारांमध्ये संस्कार ज्या व्यक्तीवर करावयाचे त्याची भूमिका आणि संस्कार करणारी व्यक्ती ज्यांना ‘पुरोहित’ म्हणतात, त्याची भूमिका अशा दोन भूमिका आहेत.

‘पुरोहित’ शब्दाचा अर्थ हितकारक, पुढचा मार्ग दाखवणारा असा करता येईल. याचे शिक्षणही ज्ञानप्रबोधिनी संस्थेने शिक्षणार्थी विद्यार्थी स्त्री-पुरुषांना दिले. या व्यक्ती या संस्कारांचे पौरोहित्य करतात. समाजात सध्या धार्मिक कृत्ये करणारे पुरोहित सहसा ‘श्राद्ध’ संस्कार करण्याचे अनेक कारणांमुळे टाळतात. परंतु ज्ञानप्रबोधिनी-पद्धतीने संस्कार करणारे पुरोहित स्वखुशीने व आनंदाने हे करतात. हे कार्य समाजाभिमुख कार्य आहे. हे करत असताना वेळोवेळी मानवी मनाच्या पैलूंचे दर्शन त्यांना घडले आणि त्यांची हृदये हेलावून गेली. तो अनुभव इतरांनाही कळावा यासाठी हे अनुभव शब्दांकन स्वरूपात या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत.

या अनुभवातून मानवी ‘मन’ या संकल्पनेचे अनेक ‘भाव’ प्रकट झाले आहेत. वाचकांना आपण ही परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवतो आहोत असे क्षणभर वाटावे असे आहेत. सर्व अनुभवांचे विश्लेषण केल्यास ‘श्राद्ध’ संस्काराविषयीच्या लेखांची संख्या जास्त आहे. त्या मानाने नामकरण, विद्याव्रत, विवाह, साठीशांत, सहस्त्रचंद्रदर्शन या संस्कारांचे अनुभव कमी आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये सामाजिक उत्क्रांती व्हायची असेल तर व्यक्तीच्या बुद्धीची उन्नती झालीच पाहिजे. यासाठी प्रयत्नपूर्वक वर दिलेले संस्कार जास्त होणे आवश्यक आहे. त्यातूनच व्यक्तीच्या बुद्धीची उन्नती होईल. उदा. नामकरण संस्कारात मध आणि तूप एकत्र खलून सोन्याच्या काडीने नवजात बालकाला चाटविणे हा संस्कार अति महत्त्वाचा आहे. यात नवजात बालकाला केवळ आईच्या दुधावर अवलंबून न राहता वनस्पतीचे सारभूत मध आणि प्राणिजन्य दूध व सर्वोत्तम खनिज सोने या सर्वांचा स्पर्श त्या बालकाच्या जिभेला होणे यामुळे त्याची रससंवेदना प्रदीप्त होत असते.

‘विद्याव्रत’ हा संस्कार मुलामुलींवरही करावयाचा असतो. आजकालच्या जाहिरातींच्या युगात विषयवासना चाळवण्याचे काम प्रसारमाध्यमे करत आहेत त्यामुळे कळत नकळत ‘ब्रह्मचर्य’ व्रताचे महत्त्व कमी होत आहे आणि ज्ञानापेक्षा लैंगिक ‘भावनेला अवास्तव महत्त्व प्राप्त होत आहे. यातून अकाली तारुण्यावस्था प्राप्त होते आणि बुद्धी अपरिपक्व असताना ‘कुमारी मातृत्व’ निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी विद्याव्रताच्या संस्काराचा प्रसार व्यापक होणे आवश्यक आहे.

‘विवाह’ हा संस्कार मैथुनाच्या माध्यमातून पुढील पिढीचे उत्पादन करण्यासाठी आहे. या कामी वर आणि वधू यांचे आपसातील संबंध ‘प्रेमपूर्वक व मर्यादाभंग’ न करणारे असले पाहिजेत. सध्याच्या यांत्रिकी युगामध्ये आर्थिक सुबत्तेला अवास्तव महत्त्व आले. त्यातूनच पती आणि पत्नी आर्थिक गुलाम झाले. परिणामी, भावी पिढीवर संस्कार होण्याचे थांबले व नवीन तरुण हा जास्त भावनाहीन बनतो आहे. या सर्वांवर नियंत्रण होण्यासाठी विवाह-संस्कार आवश्यक आहे.

‘साठीशांंत’ हा संस्कार शरीराने प्रौढ झालेल्या आणि संसारिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या व्यक्तींसाठी आहे. अशा व्यक्तीने हा आधुनिक ‘वानप्रस्थ’ स्वीकारला पाहिजे. स्वतःच्या शारीरिक गरजा कमी कमी करून, अर्थप्राप्तीच्या मागे न लागता समाजाभिमुख जीवन जगले पाहिजे व अर्थाजर्नात व्यग्र असलेल्या तरूण पिढीवर, बाल्यावस्थेत असलेल्या पुढच्या पिढीवर संस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

‘सहस्त्रचंद्रदर्शन’ संस्कार ‘तृप्ती’चे प्रतीक आहे. अशी व्यक्ती समाजापुढे ‘आदर्श’ म्हणून राहिली पाहिजे आणि या व्यक्तीने समाजाला योग्य ते मार्गदर्शन निर्भीडपणे केले पाहिजे आणि हे करत असतानाच स्वतःचे आयुष्य योगार्पण करून परमेश्वर-तत्त्वाची अनुभूती जिवंतपणी घेण्याचा आटोकाटपणे प्रयत्न केला पाहिजे.

मृत्यूनंतर पार्थिव शरीराचे ‘दहन संस्कार’ हे तितके महत्त्वाचे नाहीत. त्या पार्थिवाचे पंचमहाभूतात विलीनीकरण सहजपणे व्हावे एवढाच त्या मागचा हेतू. परंतु ऊर्जास्वरूप सूक्ष्म देहाचा पुढचा प्रवास कसा होणार ? याचेही मार्गदर्शन, ‘सपिण्डीकरण’ या क्रियेतून होते. या ऊर्जास्वरूप वासना जिवंत व्यक्तीपासून दूर जाऊन परमेश्वर-तत्त्वात विलीन झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर मृत व्यक्तीविषयीच्या आठवणी प्रेम आणि श्रद्धापूर्वक ठेवल्या पाहिजेत. या ‘आदर्श’ म्हणून मार्गदर्शक ठरू शकतात.

‘वास्तुशांत’ हा विषय तर पूर्णपणे त्या वास्तूत निवास करणाऱ्या व्यक्तीला चित्तविक्षेपासून मुक्त करण्यासाठी आहे. त्या व्यक्तीने आपल्या भोवती असणाऱ्या अचर पांचभौतिक विश्वाशी सुद्धा प्रेमाचे नाते जोडण्यासाठी हा संस्कार करणे आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त विविध देवतांचे पूजनासाठी लागणारे संस्कार हे त्यामानाने कमी महत्त्वाचे आहेत. या उलट सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती पुरोहित म्हणून वागणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावाची. हे सर्व अनुभव, कथन वाचताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे पौरोहित्य करणाऱ्या व्यक्ती जास्त हळव्या होत आहेत. यामुळे यजमानांना धीर देण्याऐवजी पुरोहितच त्यांच्या दुःखात सामील होताना दिसतो आहे.

पौरोहित्य करणारी व्यक्ती ही ‘प्रचारक’ असली पाहिजे. त्यासाठी बुद्धीच्या साहाय्याने त्याने सर्व मानवी भावभावनांवर नियंत्रण केले पाहिजे. एका थोर व्यक्तीने ‘प्रचारक’ कसा असावा याचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘प्रचारकाने ज्या घरात प्रवेश करावयाचा त्यांच्याशी समरस झाले पाहिजे. बारसे असल्यास आनंद व बारावे असल्यास दुःख या इतरांच्या भावनांशी सहानुभूत झाले पाहिजे. समरस झाले पाहिजे. हे करत असताना स्वतःचे व्यक्तिमत्त्व विसरता कामा नये. आपण या घरातील वातावरण समृद्ध करण्यासाठी आलो आहोत. आपल्या भावभावनांना खतपाणी घालण्यासाठी नाही. हे सदोदित लक्षात ठेवले पाहिजे आणि घरातून बाहेर पडल्यावर चप्पल घालताक्षणीच त्या घराविषयी कोणत्याही भावभावनांचा परिणाम आपल्या मनावर होऊ न देता ‘मन-बुद्धी’ निर्लेप ठेवली पाहिजे.

पुरोहित व्यक्तीने ‘गुरू’ची भूमिका व्यक्त केली पाहिजे. समोरील व्यक्तीचे ‘हित’ काय आहे ? हे त्या संस्कारातून त्याचे मनावर ठसवले पाहिजे. यासाठी स्वतःची या संस्कारांवर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, ‘श्रद्धा ही नेहमीच आंधळी असते. ते एक ‘आगम प्रमाण’ असते.’ त्याचा विरोध करावयाचा नसतो, तर आपण हे स्वतः अनुभवले आहे अशाच वृत्तीने त्याने हे सर्व संस्कार केले पाहिजेत. त्यासाठी त्याने ‘धैर्य’ या वृत्तीची जोपासना केली पाहिजे. धैर्य हा गुण आहे. ‘भाव’ आहे. हा व्यक्त होण्यासाठी तशीच शारीरिक अवस्था प्राप्त झाली पाहिजे. ही एक ‘निर्लेप’ अवस्था शरीर आणि मन या दोन्हींच्या साहाय्याने प्राप्त करून घ्यायची असते. त्यासाठी मन म्हणजेच चित्त या ‘धर्मी’ चे पूर्ण ज्ञान असावे लागते. त्यासाठी आसन, प्राणायाम या योगशास्त्रांच्या पैलूंचे सखोल ज्ञान प्राप्त केले पाहिजे; तरच चित्ताची एकाग्र अवस्था प्राप्त होईल. वैद्य हा जसा परमेश्वराचा अवतार असतो तसा ‘पुरोहित’ हा परमेश्वराचा दूत असतो. तो नारदासारखा केवळ मंत्रवेत्ता होऊन चालणार नाही, तर सनत्कुमाराप्रमाणे आत्मवेत्ता होणे आवश्यक आहे. त्यासाठी धारणा ध्यान-समाधी या एकाग्रतेच्या अवस्थांचा अभ्यास करून ‘संयम’ अवस्थेपर्यंत प्रगती केली पाहिजे. या अवस्थेतच त्रिकाळ ज्ञान होईल आणि त्याचवेळी संस्काराचे खरे महत्त्व काय याचे ज्ञान होईल. अतृप्त इच्छा आणि क्रिया यांची स्मृती म्हणजे ‘संस्कार’ ही स्मृती परिशुद्ध होण्यासाठी ‘निर्विचार वैशारद्य’ ही अवस्था स्वतःच्या चित्ताची झाली पाहिजे तरच समाधी म्हणजे ‘आधि’ सम होण्याची अवस्था प्राप्त होईल.

या प्रस्तावनेच्या माध्यमातून संस्कार म्हणजे काम-योग संस्काराशी कसे एकरूप आहे; ‘पुरोहित’ ही भूमिका समाजात किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा हा एक अल्प प्रयत्न !

वाचक या प्रयत्नाला दाद देतील हीच अपेक्षा.