सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत

लेख क्र. ३५

९/७/२०२५

संत्रिकेच्या पौरोहित्य उपक्रमाबद्दल आपण मागच्या काही लेखांमध्ये बघितले. पोथ्यांचे प्रशिक्षण देऊन विभागाने अनेक पुरोहित घडवले. हे पुरोहित फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्र, भारत व परदेशीसुद्धा संस्कारांसाठी जातात. आता साधारण ५० पुरोहित संस्कारविधी करत आहेत. असे संस्कार जेव्हा सुरुवातीला होत होते तेव्हा त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, काही चांगल्या अन् काही वाईट. काहींना संस्कारपद्धत आवडली परंतु त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. १९८० सालाच्या सुमारास ज्यांनी हे संस्कार करून घेतले त्यांपैकी ज्यांनी विवाहसंस्कार करून घेतला त्यातील सौ. विद्या काटदरे यांचे मनोगत येथे दिले आहे.

लहान मोठ्या आकाराच्या नि वयाच्या अनेक लोकांनी गजबजलेलं वातावरण- कपडे नि दागदागिन्यांची हलती प्रदर्शनं – “नारायण! केरसुणी कुठे आहे ?” इ. वार झेलणारा एक नारायण – त्या गोंगाटात सूर हरवून बसलेली केविलवाणी सनई नि धुराबिरानं रडकुंडीला आलेले अत्यंत बावळट दिसणारे (बिच्चारे!) वधूवर- हे सगळं कळायलाही लागण्याच्या आधीपासून पाहिलेलं. विचार करता येण्याचं वय झालं तेव्हा पुष्कळदा वाटायचं, “या सगळ्याला काही सार्थता नाही का आणता येणार ?”- इतके लग्नसमारंभ पाहूनही मला त्यातला संस्कार कळलेला नव्हता. समारंभ म्हणून पहावं तर ते हेतूही विरून गेलेले-उरलंय काय तर देण्याघेण्याचे आर्थिक हिशेब !

केव्हातरी सोळा संस्कारावरचं एक पुस्तक वाचनात आलं- जन्मतःच बालकाला ‘वेदोऽसि’ म्हणून आत्मतत्त्वाशी त्याचं नातं जोडणाऱ्या जातकर्म संस्कारापासून ते अंत्यसंस्कारापर्यंतचे सगळे संस्कार समजावून घेताना हिंदुसंस्कृतीच्या उदात्त दर्शनानं अक्षरशः भारावून जायला झालं. प्रत्यक्षात हे संस्कार कधी समजावून दिले जात नाहीत. समजावून घेतलेही जात नाहीत. मग “हाताला हात लावून मम म्हणा” एवढंच समजतं.

प्रबोधिनीत वर्षान्त वर्षारंभ, उपनयन या संस्कारांचे अनुभव घेतले होते. प्रबोधिनीच्या पद्धतीने झालेले काही विवाह पाहिले होते. त्यामुळे स्वतःच्या विवाहाचा प्रश्न आला तेव्हा, आपण चाकोरीबाहेर पडून लग्न करायचं हा निश्चय पक्का झालेला होता!

लग्नाचं ठरलं तेव्हा अशोक म्हणाला, “आपण नाही हं त्या भयंकर पारंपरिक पद्धतीनं लग्न करायचं. मला तर त्यात दोन कुटुंब जोडली जाण्यापेक्षा तोडलीच जातात असं वाटतं. आपण आपलं नोंदणीपद्धतीनं करूया.” ‘लग्न’ म्हणजे ‘समारंभ’ ही कल्पना त्याच्या मनात घट्ट रुजलेली होती. तो एक ‘संस्कार’ आहे ही कल्पनाच पुसली गेली होती. ‘संस्कार’ आणि ‘समारंभ’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात आणून दिल्यावर आम्ही ‘विवाहसंस्कार’ घेण्याचं ठरवलं. अर्थ समजावून घेऊन म्हणजे अर्थातच प्रबोधिनीच्या विवाहसंस्कार पोथीनुसार हे आलंच. दोघांनीही पोथी वाचली. नंतर पुन्हा आचार्यांकडून ती समजावून घेतली.

सर्वजण एकत्र जमले आहेत. वधू-वरांनी गणेशाला आवाहन करून विवाहाची इच्छा प्रकट केलेली आहे. वरज्येष्ठ नि वधूज्येष्ठ यांनी विवाहाची तयारी केली आहे. आचार्यांचे आशीर्वाद सर्वांनी घेतले आहेत. वराकडील मंडळींचं मधुपर्कानं स्वागत झालं आहे. मग वधुपित्यानं कन्यादान केलं आहे. दोघांना सर्वांनी आशीर्वाद दिले आहेत. नंतर दोघांनी एकमेकांबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एकनिष्ठतेची वचनं एकमेकांना दिली आहेत. त्याच्या खुणा म्हणून मंगळसूत्र, कंठी एकमेकांना दिल्या आहेत. नंतर अग्नीच्या साक्षीनं दोघांनी विवाहप्रतिज्ञा घेतली आहे. अग्नीकडून सामर्थ्य, संपत्ती, संतती आणि चांगल्या गृहस्थाश्रमाला आवश्यक असे आशीर्वाद घेतले आहेत. अग्नीला प्रदक्षिणा घालून नंतर सप्तपदीनं संसार प्रवासाला प्रारंभ केलेला आहे. आचार्य आणि आप्तेष्ट त्यांना आशीर्वाद देत आहेत.

असा हा संस्कार. संस्कार घेताना मंत्रमुग्ध व्हायला झालं होतं. प्रत्येक शब्द आत कुठेतरी कोरला जात होता. याचं कारण प्रत्येक शब्दाचा, श्लोकाचा अर्थ सुंदर मराठीत दिलेला आहे. श्लोक आणि अर्थही आम्ही स्वतः आचार्यांच्या मागोमाग वाचत होतो. प्रत्येक गोष्ट का करायची तेही श्लोकावरून कळत होतं.

अक्षतारोपणम्, प्रधानहोम आणि सप्तपदी हे तीन विधी मला विशेष आवडले. संपूर्ण समारंभात वधू-वरांना सारखेच श्रेष्ठ समजलं गेलं आहे- हेही खूप महत्त्वाचं वाटतं. “इमं अश्मानमारोह अश्मेव त्वं स्थिरा भव”- “या दगडावर आरूढ होऊन पाषाणखंडाप्रमाणे स्थिर हो” हे ऐकताना गृहस्थाश्रमाच्या जबाबदारीची वेगळीच जाणीव होत होती. सप्तपदीतले तर सर्वच श्लोक सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. अन्नासारख्या मूलभूत गोष्टीपासून, बल, धन, संपत्ती, ऐहिक आनंद आणि त्याही पलीकडचं चिरंतन सख्य – या सर्वांसाठी एकमेकांना अनुकूल पावलं पडली तरच गृहस्थाश्रम ‘धन्य’ होणार. त्यासाठी अग्निसाक्ष संकल्प करण्याची कल्पनाच केवढी उत्तुंग आहे !

हा विवाह माझ्या आयुष्यातला एक अनुपम्य अनुभव होता – एवढंच! थोडक्यात कारण उरलं ते सर्व शब्दातीत.