गुरुपौर्णिमेनिमित्त शब्दांजली…

लेख क्र. ३६

१०/०७/२०२५

कै. वाच. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे ज्यांना मा. रामभाऊ ‘आमचे परात्पर गुरू’ म्हणून संबोधतात त्यांना अभिवादन करून संत्रिकेच्या कामावरती थेट प्रभाव असलेले सर्वांचेच गुरुस्थान म्हणजे मा. श्री. यशवंतराव लेले, मा. प्रा. विश्वनाथ गुर्जर, संस्कृत व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, प्रा. रामभाऊ डिंबळे, ज्यांना प्रबोधिनीचे आद्य पुरोहित म्हणून ओळखले जाते, कै. वाच. स्वर्णलताताई भिशीकर ज्यांच्या सौम्य व कणखर व्यक्तिमत्वाचा प्रभाव सर्वांवर होता व असणार आहे, कै. वामनराव अभ्यंकर उर्फ भाऊ या सर्वांचा अल्प परिचय आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त येथे देत आहोत. येथे या सार्‍यांनी केलेले काम विलक्षण आहे. या सर्वांना मनःपूर्वक नमस्कार!

मा. श्री. यशवंतराव लेले – मा. यशवंतराव १९६२ पासून ज्ञान प्रबोधिनीत वेगवेगळ्या कामांमध्ये सहभागी होते. त्यांनी प्रबोधिनीद्वारा आयोजित अनेक उपक्रम व दौर्‍यांमध्ये सहभाग घेतला व नेतृत्त्वही केले. काश्मिर, पूर्वांचल, बिहार या प्रदेशांमध्ये तिथल्या परिस्थितींमुळे दौरे करून मदतकार्य केले. त्यांनी सकवार या आदिवासींच्या गावाचे विकसन, देवदासी चळवळ, दारूबंदी आंदोलन अशा अनेक समाजसुधारणेच्या कामात भाग घेतला. प्रा. रामभाऊ डिंबळे, डॉ. भीमराव गस्ती अशा अनेकांना घडविण्यात, मार्ग दाखविण्यात यशवंंतरावांचा हात होता. १९८७-२००२ ते संत्रिकेचे विभागप्रमुख होते. तेव्हा त्यांनी देहदान, विवाहदिन, वानप्रस्थाश्रम दीक्षा इ. आशयघन पोथ्यांची निर्मिती केली व असंख्य संशोधन-प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन केले. संत्रिका विभागप्रमुख या पदावरून जरी ते निवृत्त झाले होते तरी ते कायम मार्गदर्शक म्हणून सगळ्यांसोबत कामात उभे असायचे आणि अजूनही असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व गंभीर, ध्येयवादी तरी मार्मिक आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक पोथ्यांच्या सुंदर व अर्थपूर्ण प्रस्तावना पुरोहितांनी व सगळ्यांनीच पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत.

प्रा. विश्वनाथ गुर्जर – ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी व तडफदार कार्यकर्ते, संस्कृतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ. त्यांनी युवकविभागातील विविध जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. त्यांना खेळाचीही लहानपणापासून आवड होती. खो-खो, लंगडी, व्हॉलीबॉल हे त्यांचे आवडते खेळ होते. त्यांनी ईशान्य भारत, कोयनाभूकंप असे अनेक अभ्यास व आपत्तिनिवारण दौरे केले. ते शास्त्रीय संगीत शिकले आहेत, त्यामुळे ते प्रशालेत संगीत-शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी प्रबोधिनीतील १९७५ पासून संस्कृत अध्यापक, प्राचार्य, सहकार्यवाह, पौरोहित्य प्रशिक्षक, संत्रिका विभाग प्रमुख ही पदे सांभाळली. याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे संस्कृतचे अध्यापन केले. योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. समग्र जीवन दर्शन, राष्ट्रवाद, आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे मार्गदर्शक. संस्कारांमागील अर्थपूर्णता, प्रतीकात्मकता समजून घेण्यासाठी पुरोहितांनी सातत्यपूर्ण अभ्यास करायलाच हवा असे सांगणारे विसुभाऊ!

प्रा. रामभाऊ डिंबळे – मा. आप्पांचे मानसपुत्र व प्रबोधिनीचे आद्य पुरोहित. सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेल्या कल्याण खेड्यातील पहिला साक्षर झालेला राम पुण्यात आप्पांच्या घरी राहून संस्कृतातील रामशास्त्री झाला असे त्यांचे वर्णन केले जाते. शाळेत संस्कृतची गोडी निर्माण झाल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणासाठी संस्कृत विषय निवडला व ते संस्कृतज्ज्ञ झाले. पुण्यातील आबासाहेब गरवारे व सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी काही काळ अध्यापनही केले. शिक्षणानंतर त्यांनी स्वतःच्या गावात संडास बांधणे, रस्ता व देऊळ दुरुस्ती करणे अशी कामे त्यांनी केली. पुढे प्रबोधिनीच्या ग्रामविकसनकार्याचे ते प्रमुख झाले. गुंजवणी खोर्‍यातील खांडसरी कारखान्याच्या बांधकामाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांनी दारूबंदीसाठी खूप परिश्रम घेतले आहेत, अनेक गावे व्यसनमुक्त केली. त्यांनी मा. कै. आप्पांवर ‘युवजननायक नमो’ ही कविता लिहिली आहे. ओघवती वक्तृत्त्वशैली व मिश्किल टिप्पणी करणारे रामभाऊ संत्रिकेतील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला असायलाच हवेत हा आमचा हट्ट ते नेहमीच पूर्ण करतात. त्यांनी स्वतः सर्व प्रकारचे संस्कार केले आहेत. संस्कारात नावीन्य कसे आणायचे, अभ्यासपूर्ण पण नेमके कसे बोलायचे ते त्यांच्याकडून शिकायचे. बहुजन समाजापर्यंत संस्कार पोहोचविण्यासाठी आपण त्यांच्यातील एक व्हायला पाहिजे अशी शिकवण ते नेहमी देतात.

कै. वाच. स्वर्णलता भिशीकर – प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक. त्या मानसशास्त्रातील वाचस्पती पदवीधर होत्या. त्या गतिवाचन (Faster Reading) तज्ज्ञ होत्या. त्यावर त्यांनी वर्गही घेतले. त्या युवती विभागाच्या पहिल्या सचिव व समर्पणाने कार्य करणार्‍या होत्या. तृतीय प्रतिज्ञा घेऊन कार्याला सिद्ध झालेल्या त्या पहिल्या युवती. त्यांनी देश-विदेशात प्रवास केला. त्यांचे श्री. गो. नी. दांडेकरांसह झालेल्या अमेरिकादौर्‍याचे वर्णन विशेष आहे. त्यांना अध्यात्माची आवड होती, त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने, प्रवचने दिली. अनेक प्रबोधन पद्यांच्या त्या कवयित्री, तसेच त्या भरपूर लेखनही करत असत. प्रबोधिनीच्या अनेक संस्कार पोथ्यांंचे लेखन त्यांनी आप्पांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या समवेत केले. पुढे कै. आप्पा पेंडसे यांच्या चरित्राचेही त्यांनी लेखन केले. ज्ञान प्रबोधिनीच्या सोलापूर व हराळी केंद्राच्या उभारणीत त्यांंचा महत्वाचा वाटा होता. पौरोहित्यामध्ये भावात्मकता जपताना पुरोहिताने कणखरही असायला हवे हे त्यांनी आमच्यापर्यंत नेमके पोहोचविले. अभ्यासक, संशोधक, लेखिका, समुपदेशक असलेल्या लताताईंनी पुरोहितांना त्यांच्या प्रिय उपासनेबद्दल मार्गदर्शन केले.

कै. वाच. वामन नारायण अभ्यंकर – १९६४ पासून ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे कामाला सुरुवात केली व पुढे अनेक जबाबदार्‍या सांभाळल्या. ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे ३५ वर्षांहून अधिक काळ केंद्रप्रमुख या नात्याने कार्यरत असलेले भाऊ म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्व, पंचकोशाधारित शिक्षणप्रणालीचे प्रणेते. ज्ञान प्रबोधिनीने तयार केलेल्या वेगवेगळ्या संस्कारंच्या पोथ्यांच्या संस्करणात सहभाग घेतला होता. चिंतनिका, विद्याव्रत संस्कार-पंचकोश विकसनाचा संकल्प अशी पुस्तके प्रसिद्ध. भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने व असंख्य विषयांवर व्याख्याने त्यांनी दिली. माणसे जोडणं, त्यांना आपलेसे करणे व कार्यात आणणे हे त्यांच्याकडून शिकावे.