१०. आयुष्यभर राष्ट्राघडणीच्या कामाची प्रेरणा

कृतज्ञता बुद्धी आणि जाणती कार्यशक्ती : दोन-चार बौद्धिक कसोट्यांवर उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे, त्यांनी दोन-चार सार्वत्रिक परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च यश मिळविण्यासाठी, व त्यांना चार-दोन लक्षवेधक प्रकल्प करता येण्यासाठी, चार-सहा वर्षे शिक्षण योजणे ही प्रबोधिनीच्या कामाची अगदी सुरुवातीची पायरी होती. प्रबोधिनीच्या घटनेच्या सहाव्या परिच्छेदात विद्यार्थ्यांचे प्रबोधिनीशी निर्माण झालेले विद्याव्रताचे नाते आयुष्यभराचे ठरावे असे उद्दिष्ट मांडले आहे. ते वरील सुरुवातीच्या पायरीच्या पलीकडे बरचे काही करायचे आहे, हे दर्शविते.

प्रबोधिनीशी विद्याव्रताचे नाते आयुष्यभर का राहावे? व्यक्तिमत्त्व विकासाचा परिच्छेद समजून घेताना आपण पाहिले की व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंच्या विकासाचा परिणाम म्हणून स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव मनात सतत स्फुरणे अपेक्षित आहे. हा राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा केवळ कृतज्ञता बुद्धीतूनच स्फुरावा का? कोणताही झरा वाहता राहायचा असेल तर आतून पाण्याचा दाब लागतो. बाहेर पाणी वाहत जाण्यासाठी मोकळी जागा लागते. प्रबोधिनी हा विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा ठरावा या उद्देशाच्या पूर्तीकरता विद्यार्थिदशेत कृतज्ञता बुद्धी विकसित होऊन राष्ट्रीय ऋणाची जाणीव व्हायला पाहिजे. ही जाणीव म्हणजे वाहत्या झऱ्याच्या आतला पाण्याचा दाब आहे. परंतु विद्यार्थिदशेत आणि त्यानंतरही सामाजिक व राष्ट्रीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या बरोबर कर्तृत्वाच्या संधीही दिसल्या पाहिजेत. जाणत्या कार्यशक्तीचे प्रकटीकरण राष्ट्ररचनेसाठी करण्याचे मार्ग दिसले पाहिजेत. कृतज्ञताबुद्धी आणि जाणती कार्यशक्ती पूर्ण विकसित असेल तर राष्ट्रीय स्फूर्ती आपोआप प्रवाहित होईल. विद्यार्थि-दशा संपताना कृतज्ञता बुद्धी असेल आणि जाणती कार्यशक्ती अजून विकसित होत असेल तर झऱ्याचे तोंड दुसऱ्या कोणीतरी मोकळे करायला लागेल. म्हणजेच कार्याचे क्षेत्र व जाणत्या कार्यशक्तीच्या प्रकटीकरणाचा मार्ग दाखवावा लागेल.

कार्यशक्ती प्रकट करण्याची क्षेत्रे : प्रबोधिनीच्या घटनेतील उद्देशांनंतर येणारे उपक्रमांचे सर्व परिच्छेद अशी कार्यक्षेत्रे दाखवणारे आहेत. त्यातले कोणतेच काम शालेय स्तरावरचे विद्यार्थी पूर्णतः करू शकतील असे नाही. त्यातली अनेक क्षेत्रे शालेय विद्यार्थ्यांशी संबंध येतील अशी ही नाहीत. शालेय व महाविद्यालयीन दशा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर कोणत्या प्रकारच्या कामातून आपली कृतज्ञताबुद्धी व जाणती कार्यशक्ती प्रकट करत मातृभूमी या दैवताची पूजा करायची आहे हे या परिच्छेदांतून मांडले आहे.

उपक्रमांचे सर्व परिच्छेद (पृष्ठ ४४ ते ४६) पाहिले तर त्यात १) व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी आणि शेती-बागाईत, २) ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीचे प्रकल्प, ३) आरोग्य आणि वैद्यकी विषयक प्रकल्प, ४) स्थापत्य, मास कम्युनिकेशन, संगणक शास्त्र, संदेशवहन शास्त्र, सायबरनेटिक्स इ. शास्त्रे, ५) वाङ्मय प्रकाशन, युवक-युवती कार्य, क्रीडाकेंद्रांचे संचालन, अनौपचारिक शिक्षण, राष्ट्रीय अथवा सामाजिक ऐक्याचे उपक्रम आणि सामाजिक समतेचे उपक्रम, ६) विविध विद्याशाखांचा शास्त्रीय, तात्विक आणि तांत्रिक अभ्यास व संशोधन, ७) भारतातील व भारताबाहेरील शिक्षण व संशोधन संस्था, औद्योगिक व शेतकी संस्था, धार्मिक व सामाजिक संस्था, बँका व विमा कंपन्या, नाविक कंपन्या, सरकारी, खाजगी व निमसरकारी संस्था यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारे काम करणे, ८) व्याख्यानमाला, चर्चासत्रे, व नियतकालिके चालवणे, ९) पुस्तके व पत्रके काढणे, १०) व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय माहिती केंद्रे चालवणे; अशी अनेक कार्यक्षेत्रे नमुन्यादाखल सुचविली आहेत.

वरील सर्व कार्यक्षेत्रे ही कर्तृत्वाची क्षितिजे आहेत. या क्षितिजांपर्यंत दौडत जाण्याचा उत्साह प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा, विद्यार्थिदशेनंतरही तो टिकावा आणि वाढावा, हे प्रबोधिनीचे काम आहे. यासाठी अशा विद्यार्थ्यांचा परस्परांशी, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी, त्या त्या क्षेत्रात नव्या वाटा निर्माण करणाऱ्या प्रतिभावंतांशी संपर्क वा संवाद वाढावा, अशी तंत्रे व पद्धती विकसित करणे हे आयुष्यभर चालणाऱ्या शिक्षणाचे काम आहे. यातूनच शालेय वयात निर्माण झालेले विद्याव्रताचे नाते आयुष्यभर टिकेल.

स्फुरणाने प्रारंभ, प्रेरणेने सातत्य : प्रबोधिनीत शिकत असताना स्वतः वरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव ज्याला झाली आणि देशासाठी पराक्रम करण्याची परिस्थितीने घातलेली साद ज्याला कळली त्याच्यासाठी प्रबोधिनी हा राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा झाला. एकदा झरा मोकळा झाला की तो वाहत वाहत समुद्रापर्यंत जायला पाहिजे. देशासाठी पराक्रम करण्याची क्षितिजे खुणावू लागली की त्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणाही टिकून राहिली पाहिजे.

लहान वयातील राष्ट्रीय स्फूर्तीला स्वार्थाचा स्पर्श झालेला नसतो. तिच्यामध्ये सहज किंवा उपजत निःस्वार्थता असते. औपचारिक शिक्षणाचे वय संपले आणि धकाधकीच्या व्यावहारिक जीवनात उतरले की आजूबाजूच्या लोकांच्या मनातील स्वार्थाचा संसर्ग होतो. संसर्गाने निर्माण होणारा स्वार्थ व त्यातून उत्पन्न होणारे स्पर्धा, असूया, अहंता, मत्सर असे विकार यांना तोंड देऊन लहान वयातील उपजत निःस्वार्थतेचे रूपांतर स्वकष्टार्जित निःस्वार्थतेत करावे लागते. देशाच्या सेवेत अखंड राहता यावे यासाठी अशा निःस्वार्थ सेवारत लोकांकडून प्रेरणा घेण्याचे आणि स्वतः मध्येच प्रेरणेचा स्रोत शोधण्याचे काम करावे लागते.

राष्ट्रीय ऋणाची जाणीव होणे, सारे कर्तृत्व राष्ट्राला वाहिलेले जीवन जगावेसे वाटणे आणि राष्ट्रार्थ म्हणजेच निःस्वार्थ कामाचे सातत्य राखता येणे हे टप्पे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वयात येऊ शकतात. त्यामुळे सर्व वयांसाठी म्हणजे आयुष्यभरासाठी राष्ट्रघडणीची वाटचाल करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न व्हावी यासाठी आवश्यक अशा कल्पना व तंत्रे उदित करणे हा प्रबोधिनीच्या कामाचा उद्देश आहे. हे दीर्घ काळाचे काम आहे. यातले काही थोडे प्रयोग आजपर्यंत करून झाले आहेत.

ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.६

प्रबोधिनीतील विद्याव्रताचे नाते हे अल्पकालीन असणार नाही. शक्य झाल्यास हे नाते आयुष्यभराचे ठरावे अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ शालेय शिक्षणाच्या कालावधीतच नव्हे, तर त्यांच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणकालात आणि तदनंतरदेखील प्रबोधिनी हा त्यांच्या राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा ठरावा आणि त्यातून राष्ट्रघडणीची वाटचाल करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न व्हावी अशी अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक अशा कल्पना आणि तंत्रे उदित करणे.