एका आंतरराष्ट्रीय संघटनेचा अनुभव ‘मेन्सा’ नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. चाळीस-पंचेचाळीस देशांमध्ये तिच्या शाखा आहेत. भारतीय मेन्साचे कार्यालय प्रबोधिनीच्या पुण्यातील वास्तूमध्ये १९७२ पासून आहे. भारतीय मेन्साचा अध्यक्ष म्हणून दहा-बारा वर्षे वेगवेगळ्या देशातील मेन्सातर्फे प्रकाशित होणारी नियतकालिके माझ्याकडे सस्नेह भेट म्हणून येत असतात. समाजातल्या प्रातिनिधिक दहा हजार लोकांनी बुद्धिमत्ता चाचणी दिली तर त्यांतील गुणानुक्रमे पहिल्या दोनशे जणांना मेन्साचे सदस्य होता येते. म्हणजेच समाजातल्या बुद्धिमान गटाचे प्रतिनिधी मेन्साचे सदस्य होत असतात. मेन्साच्या अशा सदस्यांनी लिहिलेले लेख, पत्रे, चुटके, कोडी, इ. या सप्रेम भेट येणाऱ्या नियतकालिकांमध्ये छापलेली असतात.
ही नियतकालिके चाळली तर लक्षात येते की आपला वेळ चांगला जावा, चांगले मित्र-मैत्रिणी मिळावेत एवढ्याच कारणासाठी बहुसंख्य लोक मेन्साचे सदस्य होतात. मेन्सा ही संस्था एखाद्या क्लबसारखी वाटते. मेन्साच्याच सदस्यांनी आपापसात बोलून सर्वांना आवडणारे कार्यक्रम करायचे असतात. खेळ, सहली, गप्पा, सहभोजन, गंमत-जत्रा, असेच बहुतांश कार्यक्रम असतात. समोर काही सामूहिक ध्येय नसेल तर बुद्धिमान लोकसुद्धा त्या त्या देशातील समाजाचा मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा किंवा व्यक्तिगत आयुष्यातील वेळ घालविण्याच्या कल्पनांचा जो काही स्तर असेल, त्या प्रमाणेच वागतात, असे ही मेन्साची नियतकालिके पाहून वाटते.
आधी कळले पाहिजे: प्रबोधिनीच्या कामाचा प्रारंभही समाजातले बुद्धिमान विद्यार्थी निवडून घेऊन झाला. मेन्साच्या सदस्यत्वासाठी जशी बुद्धिमत्ता चाचाण्यांवरील गुणांची अट होती तशी प्रबोधिनीच्या प्रबोध – वर्गांसाठीही होती. . परंतु मेन्साचे सदस्यत्व घेतलेल्या बुद्धिमान सदस्यांनी काय करायचे हे इतर सदस्यांशी बोलून ठरवायचे असते. काय करावे या बाबत मेन्साचे काहीच म्हणणे नसते. प्रबोधिनीच्या सदस्यांनी काय करावे याबाबत प्रबोधिनीचे मात्र निश्चित म्हणणे आहे. ‘रूप पालटू देशाचे’ हाच ध्यास प्रबोधिनीच्या सदस्यांनी घ्यावा, असे प्रबोधिनीचे ध्येय ठरलेले आहे. देशाचे रूप पालटायचे तर देशाचे आजचे रूप कळले पाहिजे. ते असे का हे कळले पाहिजे; हे रूप पालटून नवे रूप कसे असले पाहिजे हे कळले पाहिजे; नवे रूप कसे आणायचे हे कळले पाहिजे; नवे रूप आणण्यात अडचणी कोणत्या ते कळले पाहिजे; अडचणी दूर कशा करायच्या हे कळले पाहिजे; हे काम आपण स्वतःच करायचे आहे हे कळले पाहिजे; आणि शेवटी कळल्याप्रमाणे वागता आले पाहिजे. कळणे आणि त्याप्रमाणे वागणे हे महत्त्वाचे !
या सर्व गोष्टी कोणाला लवकर कळतील? प्रबोधिनीच्या प्रारंभी या प्रश्नाचे पहिले उत्तर आले ज्यांना कळण्याची विशेष शक्ती म्हणजे कुशाग्र बुद्धी आहे त्यांना. सुरुवातीला नवीन, उपयुक्त आणि आवाक्यातील आरंभबिंदू वाटला म्हणून बुद्धिमान विद्यार्थ्यांपासून प्रारंभ झाला. परंतु सर्व विद्यार्थ्यांसाठी काम करायचा संकल्प पहिल्यापासून होता.
त्रयस्थाच्या दृष्टीतून प्रबोधिनी: प्रबोधिनीचे शिक्षण कार्य पाहण्यासाठी एक अमेरिकन विदुषी काही वर्षांपूर्वी आल्या होत्या. आठवडाभर राहून त्यांनी चिकित्सक दृष्टीने पुणे, शिवापूर व थेऊरच्या साखरशाळेतील आपले काम पाहिले. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी आठवडाभराच्या निरीक्षणांवर लेख लिहिला. त्या लेखात त्यांनी बुद्धिमंतांच्या शिक्षणातील अमेरिकेतील अनुभव व प्रबोधिनीच्या कामाची तुलना केली आहे. अशी तुलना करताना अमेरिकेतील शिक्षण तज्ज्ञांना त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की, ‘मी प्रबोधिनीमध्ये पाहिलेले तीन आग्रहाचे मुद्दे बौद्धिक विकास, आत्मिक विकास आणि सामाजिक कृतिशीलता – अमेरिकेत का बघायला मिळत नाहीत?’ पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, ‘अमेरिकेत आपण फक्त बौद्धिक विकासावर भर देतो, तो ही प्रमाणित चाचण्यांवरील गुण वाढवण्यासाठी. आणि बुद्धिमान विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग ज्यामध्ये फार कष्ट आणि त्याग करायला लागणार नाही असे व्यवसाय आणि जीवनशैली निवडण्यासाठी करतात. आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग ते समाजाशी जुळवून घेण्यासाठी करतात. समाज बदलण्यासाठीची कृतिशीलता शिकवणे आमच्या गावीही नसते.’ या विदुषीने आत्मपरीक्षणाच्या मनःस्थितीत स्वतःच्या देशाचे अमेरिकेचे चित्र जास्त काळे आणि प्रबोधिनीचे जास्त उजळ रंगवले असे क्षणभर गृहीत धरू. पण अमेरिकेने जो आदर्शही समोर ठेवला नाही तो प्रबोधिनीने ठेवला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्या आदर्शाची आठवण सतत केली आहे हे त्या विदुषीचे निरीक्षण खरेच आहे. कै. आप्पांनीही पाश्चात्य देशातील आणि प्रबोधिनीतील बुद्धिमंतांच्या शिक्षणातील फरक स्पष्ट करताना ‘Ours is a school with a purpose’, असेच म्हटले आहे. हा purpose किंवा हेतू समाजकेंद्रित आहे, व्यक्तिकेंद्रित नाही.
बुद्धी आणि अन्य व्यक्तिमत्त्व गुणांचा एकत्रित विकास : १) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, २) कार्यकर्ते घडणीसाठी विद्यार्थ्यांचे वृत्ति-घडण व प्रेरणा जागरण, आणि ३) नेतृत्व विकसनासाठी कार्यकर्ते घडण अशी अधिकाधिक नेमकी व अवघड उद्दिष्टे प्रबोधिनीच्या घटनेतील पहिल्या दोन परिच्छेदात क्रमाने आली आहेत, हे आपण यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये पाहिले. नेतृत्वविकसनासाठी विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास पुरणार नाही, हे देखील आधीपासून माहीत होते. त्यामुळेच प्रबोधिनीच्या घटनेतील तिसऱ्या परिच्छेदात पुढचे उद्दिष्ट मांडले आहे – या उगवत्या पिढीच्या निसर्गप्राप्त कुशाग्र बुद्धिमत्तेला आवश्यक त्या अन्य गुणांची व साधनांची जोड मिळू शकल्यास वर अभिप्रेत असलेले (परिच्छेद ३.२ मध्ये मांडलेले) सर्वंकष नेतृत्व अधिक द्रुतगतीने विकसित होऊ शकेल. म्हणून तसे गुण संपादन करण्याची आणि व्यक्तिविकसन करण्याची संधी व सोय नवोदित पिढीला उपलब्ध करून देणे.