कार्यकर्ता किंवा नेता कार्यक्षम असला पाहिजे. यासाठी त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या जोडीला पुढील पाच गुण आवश्यक आहेत असे प्रबोधिनीच्या घटनेत सांगितले आहे.
अभ्यासशीलता : एखाद्या विषयाचा १) सर्व बाजूंनी अभ्यास करणे, २) त्याच्या मुख्य गाभ्याचा आणि शाखा-उपशाखांचा अभ्यास करणे, ३) मुळापासून अभ्यास करणे, ४) अनुभव घेऊन व समजून घेऊन अभ्यास करणे, ५) इतर अभ्यासकांचे अनुभव व मते यांचा पडताळा घेणे, ६) अभ्यासलेली तत्त्वे व तपशील विविध प्रसंगी वापरून पाहणे, ७) अनुत्तरित प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासलेली तत्त्वे उपयोजून पाहणे, ८) पूर्वी अभ्यासलेल्या इतर विषयांशी तुलना करून साम्य आणि भेद शोधणे, अशा अभ्यासाच्या व चिंतनाच्या उत्तम पद्धतींचा उपयोग करण्याची सवय लावून घेणे म्हणजे अभ्यासशीलता.
उद्योगप्रियता : निरलसपणे व अविश्रांतपणे बुद्धीने व शरीराने काम करण्याची सिद्धता व एकांतिक निष्ठेने यश मिळेपर्यंत सतत परिश्रम करणे म्हणजे उद्योगप्रियता. उत्पादनक्षमता, उत्पादकता, उत्पादनातील विविधता, गुणवत्ता वाढ, यासाठी सतत प्रयत्न करत राहणे म्हणजे उद्योगप्रियता. ज्या ज्या गोष्टी होणे शक्य नाही असे इतर सांगत असतील त्या करून पाहण्याच्या खटपटीला तयार असणे म्हणजे उद्योगप्रियता. ‘केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे’ या सूत्रावर विश्वास ठेवून काम करणे म्हणजे उद्योगप्रियता.
स्वावलंबन : स्वतःचा दिनक्रम स्वतः ठरवून तो पार पाडण्यापासून स्वतःचा आयुष्यक्रम ठरवून तो पार पाडण्यापर्यंत स्वावलंबनाची व्याप्ती आहे. दिनक्रमातील सर्व कामे पार पाडण्याचे कौशल्य मिळवणे म्हणजे स्वावलंबन. आपले आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, यासंबंधीचे निर्णय घेणे; कुटुंबियांसंबंधी व सहकाऱ्यांसंबंधी आवश्यक ते ते निर्णय घेण्यासाठीचे कौशल्य व आत्मविश्वास मिळवणे म्हणजे स्वावलंबन; आजारपण, अपघात, नैसर्गिक आपत्ती, अनपेक्षित परिस्थिती यांना धीराने सामोरे जाऊन, त्यातून वाट काढण्याचे कौशल्य मिळवणे म्हणजे स्वावलंबन, आपले भवितव्य आपणच ठरवून त्यासाठी झटणे म्हणजे स्वावलंबन.
उत्स्फूर्तिसंपन्नता (पुढाकार, इनिशिएटिव्ह) : परिस्थितीला प्रतिसाद देण्याइतकेच परिस्थितीला वळण देण्याचा स्वतः प्रयत्न करणे ही महत्त्वाचे आहे. अनेक वेळा, १) काही न होणे, २) अपेक्षेप्रमाणे होणे व ३) अपेक्षेपेक्षा वेगळे होणे, या तीनही शक्यता सारख्या प्रमाणात असतात. आपण सुरुवात केली तर आपल्या अपेक्षेप्रमाणे होते. इतर कोणी सुरुवात केली तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे होते. ‘मी परिस्थिती पालटीन’, ‘मी नवयुग निर्मिन’, ‘मी परिस्थिती कापून काढीन’ असे म्हणून सुरुवात करणारा त्या प्रमाणे घडवण्याची शक्यता जास्त असते. परिचय करून घेणे, संवाद सुरू करणे, भांडण किंवा अबोला संपवणे, आवराआवर सुरू करणे, मांडामांड सुरू करणे, नवीन प्रथा सुरू करणे, प्रवाह वळवणे, प्रतिकार करणे या सर्व बाबतीतच पुढाकार घेणे हे व्यक्तीला, कार्यकर्त्याला व नेत्याला आवश्यक आहे.
अंतःप्रेरणा (इण्ट्युशन) : नवीन सुचणे दोन प्रकारचे असते. तर्कविचाराने, पूर्वनिश्चित शिस्तीने विचार करून, बदलाच्या पद्धती ठरवून त्यानुसार क्रमाने बदल करत गेल्यावर नवीन सुचते. हा पहिला प्रकार. या प्रकारच्या प्रतिभाशक्तीच्या किंवा सर्जनशीलतेच्या विकासाचे शास्त्र हळूहळू तयार होते आहे. या प्रकारच्या सुचण्याला परिवर्तनपद्धती म्हणता येईल. सर्व विचार शांत झाल्यावर, जाणीवपूर्वक सुचण्याचा प्रयत्न थांबल्यावर, जागृत मनाच्या पलीकडून जे एकदम जाणवते तो सुचण्याचा दुसरा प्रकार. त्याला येथे अंतःप्रेरणा म्हटले आहे. इथे बाहेरील परिवर्तन न होता आपल्या आत असलेल्या कल्पनांचे प्रकटन होते. कामाशी तद्रूपता किंवा तन्मयता या अवस्थांनंतर अंतःप्रेरणा काम करायला लागते. परिवर्तनपद्धतीच्या प्रतिभेने तात्पुरती नवनिर्मिती होते, ती निर्मिती शिळी होऊ शकते. प्रकटन पद्धतीच्या प्रतिभेने म्हणजे अंतःप्रेरणेने दीर्घकाळ ताजी राहणारी नवनिर्मिती होते. वेद, उपनिषदे, गीता यांची रचना; वेरूळ, कैलासची शिल्पे; विवेकानंदांची भाषणे; आइन्स्टाइनचे शोध ही सर्व त्या त्या वेळी झालेली सदैव ताजी राहणारी नवनिर्मिती आहे. असे सदा ताज्या नवनिर्मितीचे काम करू इच्छिणाऱ्याची अंतःप्रेरणा वाढायला हवी.
कामाबाबत आस्था, कामाची क्षमता व कामाशी बांधिलकी या सगळ्याचीच व्यक्तीला आवश्यकता असते. कार्यक्षमता वाढायला अनेक गुण अंगी बाणायला लागतात, त्यापैकी प्रबोधिनीच्या घटनेत लिहिलेले पाच पायाभूत गुण आपण पाहिले. बांधिलकी व्यक्त करणारे गुण पुढील भागात पाहू.