९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती

स्वीकार, रूपांतर आणि प्रतिभा : प्रबोधिनीत रूढ असलेल्या दैनंदिन उपासनेची रचना हळूहळू विकसित होत गेली आहे. तिच्यामधले विरजा मंत्र थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रार्थनेतून घेतले आहेत. सामूहिक उपासना करण्याची पद्धत गांधीजींच्या आश्रम-प्रार्थनेच्या प्रभावामुळे स्वीकारली आहे. या स्वीकारशीलतेबरोबरच गायत्री मंत्राबरोबर उच्चारायच्या सात व्याहृती म्हणजे जणू सप्तलोक असा अर्थ नवीन दृष्टीने मांडून विचाराची वेगळी दिशा दाखविली आहे. अशा सर्व प्रयोगांनंतर उपासनेतील सामाजिक आशय कमी वाटला म्हणून कै. आप्पांनी स्वतःला स्फुरलेल्या शक्ती मंत्रांची भर त्यात घातली. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बाहेरून स्वीकारणे, असलेल्याचे रूपांतर करणे व आपल्या प्रतिभेने भर घालणे या तीनही पद्धती वापराव्या लागतात आणि त्या वापरल्या पाहिजेत.

उपासनेप्रमाणे शिक्षण पद्धतीतही : सैन्यातल्या अधिकाऱ्यांसाठी चालणाऱ्या वाचन-वेगाच्या वर्गातून प्रबोधिनीत वाचन कौशल्यांचे संशोधन व प्रशिक्षण सुरू झाले. टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरमधले समस्या परिहाराचे वर्ग पाहून प्रश्न विचारणे, सामुदायिक समस्या परिहार, कल्पनास्फोट, इ. तंत्रे प्रबोधिनीत आली. प्रकल्प-पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दोन अध्यापिका ब्रिटिश कौन्सिलची शिष्यवृत्ती घेऊन सहा-सहा महिने इंग्लंडला जाऊन आल्या.

बर्चीनृत्य हे लेझिमच्या प्रकारांमध्ये केलेले आमूलाग्र रूपांतर आहे. वर्षारंभ, वर्षान्त, विद्याव्रत हे अनुक्रमे प्राचीन उपाकर्म, उत्सर्जन आणि उपनयन या संस्कारांचे आधुनिक रूपांतर आहे. अनेक ठिकाणची तंत्रे शोधून स्वयं-अध्ययन कौशल्यांचा अभ्यासक्रम आपल्या सोयीने आपण बनवला आहे.

परिस्थिती ज्ञानाचे तास, गटकार्यांचा अभ्यासक्रम, निर्णय कौशल्यांचे संशोधन, प्रतिभा विकसनाचे अभ्यासक्रम, पुण्यातील इयत्ता सातवीसाठीची शिष्यवृत्ती योजना, सोलापूरची विद्याव्रत शिबिरे, निगडीतील देह-परिचय उपक्रम, हराळीची समाज-संपर्क अभियाने, साळुंब्यातील पवनामाईचा उत्सव हे सर्व प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रतिभेने फुलवलेले उपक्रम आहेत.

प्रयोगातून उद्देशाचा अर्थविस्तार : परिच्छेद ३.४ मध्ये दिलेल्या चारित्र्य-गुणांचा विचार करताना आपण संघटन-चातुर्य हा एक गुण पाहिला. त्यामध्ये कै. आप्पांनी मांडलेले बुद्धीचे दहा पैलू दिले आहेत. परंतु गिल्फर्ड या मानसशास्त्रज्ञाने बुद्धीचे १२० पैलू सांगितले होते. १९८२ ते १९९२ या काळात प्रबोधिनीमध्ये त्यावर संशोधन होऊन त्यातील प्रत्येक पैलू स्वतंत्रपणे मोजणाऱ्या १२० चाचण्या तयार झाल्या. या चाचण्या प्रमाणित करण्यासाठी त्या महाराष्ट्रात एकूण सुमारे २५००० विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यातून असे लक्षात आले की बऱ्याच जणांच्या बुद्धीचा कोणता तरी पैलू सरासरीपेक्षा अधिक विकसित असतो. त्यामुळे ‘कुशाग्र बुद्धीचे कोण?’ या ऐवजी ‘प्रत्येकाच्या बुद्धीचा कोणता पैलू कुशाग्र आहे?’ असा प्रश्न विचारायला पाहिजे हे लक्षात आले. अर्थातच १९९२ नंतर या संशोधनाच्या आधारे प्रबोधिनीचे विद्यार्थी-निवडीचे क्षेत्र ‘रूढार्थाने बुद्धिमान विद्यार्थी शोधणे’ या ऐवजी ‘सर्व समाजातील बुद्धिमत्ता शोधणे’ असे झाले.

प्रबोधिनी : एक प्रयोगभूमी : १९६२ ते १९९२ या तीस वर्षांत सर्वांगीण शिक्षणातल्या अनेक अभिनव कल्पना प्रबोधिनीत आकाराला आल्या. १९९२ नंतरच्या पंधरा वर्षांत मात्र ‘सर्व समाजातील प्रत्येकाच्या बुद्धीचे कुशाग्र पैलू शोधणे’ अशा विस्तारित अर्थाच्या उद्देशाने नवे प्रकल्प सुरू झाले.

नवे प्रकल्प, योजना आणि विभाग : १) छात्र प्रबोधन मासिक व २) स्पर्धा परीक्षा केंद्र हे नव्याने निर्माण झालेले विभाग आहेत. मासिकाद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क प्रस्थापित करून शिबिरे, सहली व प्रशिक्षण वर्ग यांतून विद्यार्थ्यांची कौशल्ये व प्रेरणा वाढवणारे शिक्षण देणे हा छात्र प्रबोधन मासिकाचा हेतू होता. स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण हा प्रबोधिनीच्या घटनेत लिहिलेलाच उपक्रम आहे. स्वयंअध्ययन कौशल्ये, गटचर्चा आणि मौनाभ्यास ही अभ्यासाची तंत्रे व वृत्ति-घडणीसाठी उपासना, मुलाखती, अभ्यास सहली आणि शिबिरे यांचा, विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात येतील त्या प्रमाणे, सुयोग्य मेळ घालत स्पर्धा परीक्षा केंद्र दृढ होत गेले.

त्याचप्रमाणे ३) साखरशाळा, ४) ग्रामीण प्रज्ञा विकास योजना व५) किशोरी विकास योजना हे तीनही नवीन कृति संशोधनाचे उपक्रम आहेत. व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे शिक्षण ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही असे गट शोधून काढून त्यांच्यासाठी हे प्रकल्प सुरू झाले. साखरशाळा प्रकल्पातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालेच परंतु त्याशिवाय प्रशिक्षण सााहित्य, प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम व पद्धती, शैक्षणिक साहित्याची निर्मिती असेही मोठे काम झाले.

प्रज्ञा मानस संशोधिकेमध्ये ६) बाल प्रज्ञा विकास प्रकल्प व ७) बाल-युवक व्यक्तिमत्त्व विकास प्रकल्प गेल्या काही वर्षांत झाले. या दोन्ही प्रकल्पातून वेगवेगळ्या वयोगटांसाठी शाळा-महाविद्यालयांच्या वेळा सोडून साप्ताहिक किंवा मोठ्या सुट्ट्यांमध्ये घेता येतील असे प्रशिक्षण वर्गांचे आराखडे तयार झाले.

चालू विभागांचा विस्तार : प्रबोधिनीच्या निगडी केंद्रामध्ये सुरू झालेले ८) क्रीडाकुल तसेच ९) पंचकोशाधारित गुरुकुल हेही कृति-संशोधनाचे दीर्घकालीन प्रकल्प आहेत. दीर्घकालीन प्रकल्पासाठी आवश्यक अशी भौतिक रचनाही त्यासाठी उभी राहिली आहे. क्रीडाकुलाला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे खेळाडू तयार करणे, असे नेमके उद्दिष्ट आहे.

आत्तापर्यंत उल्लेखिलेल्या पहिल्या आठ उपक्रमांमध्ये शारीरिक, भावनिक, बौद्धिक, प्रेरणात्मक, सामाजिक किंवा कौशल्यात्मक अशा व्यक्तिमत्त्वाच्या सुट्यासुट्या अंगांचा विचार केला आहे. या उपक्रमांमध्ये योजना करताना दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्त्वाचे पैलू पंचकोशाधारित गुरुकुलाच्या उपक्रमांमध्ये सहज लक्षात येतात.

व्यक्तिविकसनासाठी सुयोग्य अशी शैक्षणिक पद्धत शोधण्यासाठी आणि व्यवहारात आणण्यासाठी अ) जगातील प्रगत देशांच्या शैक्षणिक कल्पना व प्रणाली यांचा अद्ययावत अभ्यास करणे, आ) भारताच्या दृष्टीने त्यातील योग्य ते स्वीकारणे आणि इ) प्रयोगशील राहून आपल्या प्रतिभेतून आपली प्रणाली निर्माण करणे व ती निर्दोष करणे हा प्रबोधिनीच्या घटनेतील उद्दिष्टांचा पाचवा परिच्छेद आहे. त्यातील न) व आ) हे भाग आपण फारसे जाणीवपूर्वक अजून केलेले नाहीत. इ) हा भाग मात्र सदैव करत असतो.

ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.५

प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अशी गुणसंपदा निर्माण होण्यासाठी, म्हणजेच व्यक्तिविकसनासाठी सुयोग्य अशी शिक्षणपद्धती शोधणे आणि व्यवहारात आणणे. हे साधण्यासाठी …अ) जगातील प्रगत देशांच्या शैक्षणिक कल्पना व प्रणाली यांचा अद्ययावत तौलनिक अभ्यास करणे, आ) त्या अभ्यासातून भारताच्या दृष्टीने योग्य ती शैक्षणिक तत्त्वे स्वीकारणे आणि इ) प्रयोगशील राहून आपल्या प्रतिभेतून आपली प्रणाली निर्माण करणे व ती निर्दोष करणे.