१२. घटनेतील कार्यचिंतन आणि वैचारिक मूलतत्वे

समारोप

दोन गटांच्या विचारपद्धती

त्या त्या महिन्यातील प्रबोधिनीतील काही प्रसंग, देशातील काही घटना, आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा व्यक्तिगत अनुभव यांच्या निमित्ताने प्रबोधिनीतील कामाच्या धोरणांवर व भूमिकांवर प्रकाश टाकण्यासाठी प्रकट चिंतन वेळोवेळी प्रकाशित केले होते, त्याचे आत्तापर्यंत संकलन झाले. प्रबोधिनीच्या स्थापना-लेखातील म्हणजेच घटनेतील उद्देशांवरती काही ऊहापोह त्यानिमित्ताने सर्वांच्या चिंतनासाठी एकत्रित मांडून झाला.

एके दिवशी सहजच प्रबोधिनीच्या ‘ज्ञान प्रबोधिनी एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड ३’ मध्ये तत्त्वसप्तक या नावाने जे लेख छापले आहेत, त्या तत्त्व-सप्तकाची शीर्षके आलटून-पालटून घटनेतील वेगवेगळ्या उद्देशाच्या परिच्छेदांशेजारी ठेवून पाहिली. संबंध सापडत गेले. खरे तर घटनेतील उद्देशांचे परिच्छेद १९६२ साली व्यक्तींच्या एका गटाने लिहिलेले. तत्त्वसप्तकाची शीर्षके १९८७-८८ साली व्यक्तींच्या दुसऱ्या गटाने दिलेली. परंतु विचार करता करता घटनेचा एक परिच्छेद आणि तत्त्व-सप्तकाचे एक शीर्षक अशा जोड्या जुळत गेल्या.

परस्पर-संगतीचा शोध

कै. आप्पांनी १९६९ साली प्रबोधिनीची ध्येय व कार्यपद्धतीसंबंधीची मूलतत्त्वे म्हणून चार तत्त्वे मांडली होती. १९७९ साली प्रथमच महाराष्ट्रातील आठ-दहा जिल्ह्यांतील सुमारे दोनशे युवकांच्या शिबिरात आम्ही काही जणांनी कै. आप्पांशी चर्चा करून प्रबोधिनीच्या चार मूलतत्त्वांवर व्याख्याने दिली होती. पण त्या चारांची शीर्षके आणि त्यातील उपविषयांची रचना १९६९ च्या मानाने बदलली होती. मग १९८७-८८ मध्ये या तत्त्वांतील उपविषयांची पुनर्रचना करून तत्त्वसप्तक नावाने सात शीर्षकांचे सात लेख तयार झाले.

प्रबोधिनीच्या घटनेतील उद्देश आजवर बदलले नसले तरी ते बदलता येतील, असे प्रबोधिनीच्या घटनेतच मांडून ठेवलेले आहे. तत्त्वांची संख्याही बदलत आली आहे. पण उद्देश आणि तत्त्वे यांची आजच्या घडीला असलेली समान संख्या आणि त्यांची संगती मलाच आश्चर्यकारक वाटते.

सामूहिक स्वाध्यायाचे आवाहन

उद्देशांच्या पहिल्या परिच्छेदात शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक असा व्यक्तिमत्त्वाच्या सर्व अंगांच्या विकासाचा उल्लेख केला आहे. व्यक्तिमत्त्वाच्या अंगांमध्ये आत्मिक अंगाचा समावेश करणे, आणि सर्व अंगांना सारखे महत्त्व देऊन, त्यांच्यासह त्याचा उल्लेख करणे ही मला ‘हिंदू जीवनदृष्टी’ वाटते. संपूर्ण जीवनाकडे हिंदू जीवनदृष्टीने पाहणे हे प्रबोधिनीचे मूलभूत तत्त्व आहे.

अधिकाधिक मोठ्या सामाजिक वर्तुळांचा म्हणजे समष्टीचा आपण घटक आहोत या जाणीवेतून जगणे हे आत्मिक विकासाचे एक लक्षण आहे. समष्टीच्या हिताला पूरक होऊन वागणे हे घटकाचे कर्तव्य असते. त्यालाच प्रतिसादी असणे म्हणता येईल. घटनेच्या दुसऱ्या परिच्छेदातले ‘राष्ट्राच्या हाकेला ‘ओ’ देणारे कार्यकर्ते घडविणे’ हे उद्दिष्ट स्वतःला राष्ट्राचा घटक मानणाऱ्यांद्वारेच गाठणे शक्य आहे. ‘जनी जनार्दन’ असा घटकाचा प्रतिसादी भाव मनात असल्यामुळे हा उद्देश मांडला गेला. हे दुसरे मूलभूत तत्त्व आहे.

अगदी सुरुवातीपासून ‘व्यक्ती’चा विकास आणि ‘कार्य, समाज किंवा राष्ट्र’ यांचा विकास या एकाच नाण्याच्या दोन अविभाज्य बाजू आहेत हे तत्त्व प्रबोधिनीने स्वीकारले आहे. त्यापैकी ‘राष्ट्र’ हिताला अनुकूल प्रतिसाद देणे हे दुसऱ्या उद्देशामध्ये आले. त्याचीच दुसरी बाजू ‘व्यक्ती’च्या विकासाची. घटनेच्या तिसऱ्या परिच्छेदात नेतृत्वविकसनासाठी व्यक्तीच्या बुद्धिमत्तेच्या विकासाला अन्य गुणांची व साधनांची जोड देण्याचा उल्लेख ‘विकास’ हे तिसरे मूलभूत तत्त्व मनात असल्यामुळे आला.

चौथ्या परिच्छेदामध्ये सदाचारापासून संघटन-चातुर्यापर्यंतची विकसित व्यक्तिमत्त्वाच्या चारित्र्य-गुणांची यादी आहे. ही यादी ‘उत्तमता’ ही संकल्पनाच स्पष्ट करते. हा चौथा मूलभूत दृष्टिकोन आहे.

‘अध्यात्म आणि ईशचिंतन यात सनातन्यांतील सनातनी व विज्ञान आणि तंत्रज्ञान यात आधुनिकातील आधुनिक’ ही घोषणा प्रबोधिनीत अनेकवेळा होत असते. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे सोपे आहे. विज्ञानाची आधुनिक पद्धती मात्र प्रयत्नपूर्वक अंगी बाणवावी लागते. घटनेतील पाचव्या परिच्छेदातील शिक्षण-प्रणाली निर्मितीचा उद्देश घोषवाक्यात अपेक्षित असलेली ‘विज्ञानाभिमुखता’ दर्शवतो. हा पाचवा मूलभूत दृष्टिकोन आहे.

सहाव्या परिच्छेदात प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधिनीशी विद्याव्रताचे नाते आजीवन असावे व त्या नात्यातून त्यांना राष्ट्रीय कार्याची प्रेरणा मिळावी असा उद्देश मांडला आहे. अनेकांना प्रथम एका स्नेह-सूत्रात व मग एकाच ध्येय-सूत्रात गुंफणे आणि त्यांना ध्येयासाठी प्रेरित करणे म्हणजेच ‘संघटना’ करणे. हे प्रबोधिनीचे सहावे मूलभूत तत्त्व आहे.

सातव्या परिच्छेदातील अधिकाधिक व्यापक व दीर्घकालीन उद्देश म्हणजे ‘धर्मसंस्थापना’ या तत्त्वाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत हे तर प्रबोधिनीच्या घटनेच्या परिशिष्टातच (पृष्ठ ४७) म्हटले आहे.

तत्त्वांवरचे खंड-३ मधले लेख काही पानांचे आहेत. घटनेतील उद्देशांचे परिच्छेद काही वाक्यांचे आहेत. एकेका तत्त्वावरील लेखात उद्देशांच्या परिच्छेदांतील विषयांशिवाय इतर अनेक उपविषय आहेत. तरीही उद्देश आणि तत्त्वे दोन्ही अधिक समजायला हा संगती लावण्याचा प्रयत्न मला उपयोगाचा वाटला आहे. प्रबोधिनीतील वाचकांनीही असा स्वाध्याय अवश्य करून पाहावा.