पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन

लेख क्र. ४१

१५/०७/२०२५

कटुता न ठेवता, राग लोभ दूर सारून पुरोहितांना संघटनाचे म्हणजेच जोडण्याचे काम करायला लागते. ‘पुरोहित’ या शब्दाचा अर्थच मुळी सर्वांच्या अग्रभागी राहून मार्गदर्शन करणारा असा असल्याने योग्य प्रसंगी स्वतःचा अधिकार वापरून काही गोष्टी करायला लागतात. जात-पात, प्रांत, पंथ-भेद बाजूला ठेवून प्रामाणिकपणे स्नेहसिंचन करीत पुरोहितांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. कधी लोकशिक्षक तर कधी समुपदेशक, केव्हा मित्र तर कधी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीची भूमिका घेऊन ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असे म्हणावे लागते.

आज अनेक कुटुंबांतून प्रबोधिनीबद्दलचा स्नेहभाव वर्धिष्णू होत आहे. प्रबोधिनीच्या प्रत्यक्ष कामात सहभागी होता आले नाही तरी प्रबोधिनीचे हितचिंतक बनून आपल्या दातृत्वाचा ओघ ही कुटुंबे प्रबोधिनीकडे वळवीत आहेत. नाट्य, कला, संगीत, चित्रपट, खेळ, उद्योग, संशोधन, शिक्षण, कायदा, लष्कर, इ. क्षेत्रांतील व्यक्तींपर्यंतही ज्ञान प्रबोधिनीच्या विचारांचा वसा प्रबोधिनीच्या पुरोहितांनी पोचविला आहे. लोकांच्या सुखदुःखात पुरोहित सहभागी होतात. त्यांच्या कथा-व्यथा काळजीपूर्वक ऐकतात. कुठे चुकत असेल तर अधिकारवाणीने समजावून सांगतात. अशिक्षितांना ऋण काढून सण साजरा करायचा नाही असे सांगतात, तर अतिश्रीमंत घरात देवाला डामडौल नको तर ‘पत्रं, पुष्पं, फलम् तोयम्’ सुद्धा चालते असे सांगून आपल्याकडील ज्ञानाने, धनाने दरिद्री नारायणाची पूजा करूया असे सुचवितात. माणसे जोडत जातात. माणसे जोडण्याची कला प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी. कोणी संस्कार प्रसंगी ज्ञान प्रबोधिनीचे रसाळ भावपूर्ण वर्णन करतील, कोणी प्रबोधिनीच्या कामाचे अनेक वैविध्यपूर्ण पैलू सांगतील. कोणी कुटुंबियांशी मनमोकळे बोलतील तर कोणी आपल्या संस्काराने आणि व्यक्तिमत्त्वाने, अभ्यासाने समोरच्याला जिंकतील. यजमानांच्या घरी गेल्यावर आस्थेने सगळ्यांची चौकशी करणे, लहान मुलांना खाऊ किंवा गोष्टीचे पुस्तक, ‘छात्र प्रबोधन’चा अंक भेट देणे, ज्येष्ठांच्या तब्येतीची विचारणा करणे यातून भावबंध जुळतात. आजकाल दूरभाषवर पटकन निरोप देता येतो. पण ही सुविधा फारशी प्रचलित नव्हती तेव्हा एक ज्येष्ठ पुरोहित यजमानांकडील कार्याविषयीची आठवण पोस्ट कार्ड पाठवून करून देत. नियोजित संस्काराच्या आठ दिवस आधी तुमच्याकडे त्यांचे पत्र येणारच. हरळी जशी चिवटपणे एकाला-एक करीत फुटते, वाढते तसे संस्कारांच्या माध्यमातून अनेक व्यक्ती, कुटुंबे जोडली जात आहेत.

पौरोहित्याचा सामाजिक आशय – व्यक्तींइतक्याच संस्थाही महत्त्वाच्या! अनेक सामाजिक संस्था आज आस्थेने व अपेक्षेने प्रबोधिनीकडे पाहतात. नगर येथील स्नेहालयमधील अनाथ युवक-युवतींच्या विवाहाचे पौरोहित्य निरपेक्षपणे प्रबोधिनीचे पुरोहित करतात. अपंग कल्याणकारी संस्था, बुरुड, लिंगायत व परीट समाजामध्ये जाऊन पुरोहित व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधन करतात. हेतू एकच – छोट्या-छोट्या भेदाच्या रेषा मिटाव्यात व ऐक्यभावना वाढीस लागावी. माणसांमधील देवत्वाला आवाहन करावे लागते, हे प्रबोधिनीच्या पुरोहितांना शिकवले जाते. नवीन विचार रुजवायला जागा निर्माण करावी लागते. ज्ञान प्रबोधिनीचे पौरोहित्य शिकवताना वास्तविक स्वयं-पौरोहित्याचा आग्रह धरला जातो, पण ते समाजात रुजायला वेळ लागणार असे वाटते. आपल्या सुख-दुःखात सहभागी होणारा मार्गदर्शक पुरोहित लोकांना हवा असतो. कारण तो पोथीतील मंत्रातील दोन ओळींमधील भाव उलगडतो आणि ‘ये हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचवतो.

भारतभर कधी विमानाने तर कधी वातानुकूलित बसने अथवा रेल्वेने अनेक तासांचा प्रवास करीत पुरोहित जातात, तर कधी-कधी एका तासाच्या संस्कारासाठी छत्तीस तास प्रवास करताना ‘मी ज्ञान प्रबोधिनीचा कार्यकर्ता आहे’, हीच भावना मनात असते. कधी दोन बस बदलून भर उन्हात तर कधी धो-धो पावसात चालत जाऊन संस्कार केले जातात, व्यक्तिगणिक बदलणाऱ्या अस्मितांचा, आग्रहांचा चांगला वाईट अनुभव स्वीकारत पुढे जावे लागते ते मनात एक व्रत घेऊन! ‘आम्ही केलेल्या संस्कारातून धार्मिक क्षेत्रातील विषमता आणि अंधविश्वास दूर करण्याचा प्रयत्न करू. समाजमन भयमुक्त करण्यासाठी आमचे काम आहे. आम्ही केलेल्या संस्काराद्वारे व्यक्तिघडण व्हावी, दुर्बलतेतून सामर्थ्याकडे समाजाला नेण्याचा प्रयत्न केला तर अशा विकसित व्यक्तीच संघटित होऊन उपयोगी पडू शकतात.’

ज्ञान प्रबोधिनीच्या पुरोहितांवर ‘पौरोहित्य व्रत संस्कार’ होतो तेव्हा गांभीर्याने हे व्रत पुरोहित स्वीकारतात. व्यक्तीमध्ये गुणांचे संक्रमण करणे व तिच्यातील दोषांचे निरसन करणे या प्रक्रियेतून उत्तम व्यक्ती म्हणजे उत्तम कुटुंब, उत्तम कुटुंब म्हणजे प्रगल्भसमाज व असा प्रगल्भ समाज म्हणजे सुदृढ राष्ट्र ही साखळी निरंतर जोडत राहावी लागणार आहे. लहान बालकांपासून, वृद्धांपर्यंत सर्वच जण समाजसाखळीच्या कड्या आहेत. पुरोहित ह्या कड्या जोडण्याचे काम करतात.

म्हणूनच मग जिन्याखाली राहणारी एक गरीब महिला विचारते, ‘माझ्या बाळाचं बारसं कराल का तुम्ही? माझा नवरा चांगला नाही पण मला माझ्या बाळाला मोठं करायचं आहे. तुम्ही त्याला आशीर्वाद द्या.’ जिन्याखालीच तुटपुंज्या सामग्रीत बारसे होते. ती महिला आनंदून जाते.

वयाच्या नव्वदाव्या वर्षी एकसष्ट वर्षाच्या पुत्राच्या निधनाचे दुःख झेलावे लागणारे आजोबा शांतपणे श्राद्धविधी पाहत राहतात. विधी पूर्ण झाल्यावर ताईंचा हात हातात घेऊन म्हणतात, ‘ताई आता खूप शांत वाटतंय, आमचं मन समाधानी आहे’ तेव्हा अडीच तास सलग बोलणाऱ्या ताई निःशब्द होतात.

रांचीवरून एक मुलगी स्वतःच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुरोहित ताईंना पुष्पगुच्छ पाठवते आणि त्याला जोडलेल्या छोट्याशा पत्रात म्हणते, ‘तुम्ही आमचे जीवन अर्थपूर्ण केलेत.’ सगळेच अनुभव उत्तम आहेत असे नाही. कटू अनुभवांनाही पुरोहितांना सामोरे जावे लागते, पण तुमच्यामुळे आमचा संस्कार परिपूर्ण झाला असे सांगणारे निश्चितच अधिक आहेत. हेच समाधान मनात बाळगून ज्ञान प्रबोधिनीचे पुरोहित पुन्हा-पुन्हा कामाला लागतात तेव्हा आपल्याला या विशाल समाजाला एकत्र बांधायचे आहे ही खूणगाठ त्यांच्या मनाशी पक्की बांधलेली असते.