लेख क्र. ४४
१८/०७/२०२५

राष्ट्रवाद अभ्यास मंडळाच्या सुरुवातीपासूनच ‘इस्लाम’ हा विषय पुन्हा पुन्हा चर्चिला गेला. इस्लामची मूलतत्त्वे – श्री. श्रीपाद जोशी, इस्लामी राज्याची संकल्पना – श्री. स. मा. गर्गे, मुस्लीम प्रश्नाची आंतरराष्ट्रीय बाजू – वैद्य ब. ल. वष्ट, स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लीम राजकारण – श्री. व. ग. कानिटकर याच्या सोबत डॉ. स. ह. देशपांडे यांनीही मुस्लिम प्रश्न मांडला. पाकिस्तानपेक्षा अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारतात हिंदू-मुस्लिम संबंध हा विषय नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. २०१७ पासून ‘भारतीय मुस्लिम स्त्रियांना शिक्षणामुळे मिळणारी संधी, प्रेरणा आणि आत्मविश्वास’ या विषयावरील एक अभ्यास संत्रिकेत झाला. कोविड मुळे अभ्यास दीर्घ काळ सुरू राहिला पण त्यातूनच कुरआन अभ्यासाची एक तासांची शंभर सत्रे व मशीद भेटीचा कार्यक्रमही झाला. आजचा लेख या विषयी ..
भारतीय मुस्लिम स्त्रियांचे शिक्षण: संधी, प्रेरणा आणि आत्मविश्वास
‘भारतीय मुस्लिम स्त्रियांना शिक्षणामुळे मिळणारी संधी, प्रेरणा आणि आत्मविश्वास’ याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने वाच. मनीषाताई शेटे आणि मानसीताई बोडस यांनी सुरू केला. त्याला जवळपास पाच वर्षे लागली (२०१७ ते २०२३), ज्यात लॉकडाऊनमुळे दोन वर्षांचा खंड पडला.

अभ्यासाची प्रेरणा आणि पार्श्वभूमी
या अभ्यासाची प्रेरणा स्त्रियांच्या प्रश्नांवरील चिंतेतून आणि समाजात सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशातून मिळाली. सोलापूरला जाताना भर उन्हात बुरखा घातलेल्या स्त्रियांना पाहून त्यांच्या जीवनाबद्दल प्रश्न निर्माण झाले, ज्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याची गरज वाटली. स्वरूपवर्धिनीने ज्ञान प्रबोधिनीमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसीय इस्लाम अभ्यास वर्गात असे दिसून आले की, धर्म, तलाक, बुरखा, बहुपत्नीत्व, लव्ह जिहाद यांसारख्या विषयांवर अभ्यास होत असला तरी, या समाजाच्या जवळ जायचे असेल तर धर्मापेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून लवकर संपर्क करता येईल व प्रबोधिनीच्या शिक्षणावरील कामाच्या कार्यदिशेशी सुसंगत असल्याने हा विषय निवडला.
पूर्वाभ्यास (संदर्भ साहित्य) – अभ्यास सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे अहवाल आणि साहित्य तपासले.
- २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ९ कोटी हिंदू आणि १.२५ कोटी मुस्लिम होते.
- कुराणमध्ये ‘इक्रा’ (वाचन करणे) आणि ‘इल्म’ (शिक्षण) हे शब्द येतात, आणि स्त्रियांच्या शिक्षणाला कुठेही विरोध आढळला नाही.
- २००६ च्या सच्चर समितीच्या अहवालात मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षण कमी असल्याचे नमूद केले होते.
- २०११ च्या जनगणनेनुसार शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलींची संख्या जास्त होती.
- २०१७ च्या इंडियन एक्सप्रेसच्या लेखानुसार, मुस्लिम मुलींचे पदवी घेण्याचे प्रमाण १६८ टक्क्यांनी वाढले होते.
- २०१६ च्या जॉन कुरियनच्या अहवालानुसार, मुस्लिम मुली शिक्षणात मुलांपेक्षा पुढे होत्या.
- याशिवाय, “इस्लाम परिवर्तन” (३८ पानी सूची), १०० हून अधिक मुस्लिम लेखकांची पुस्तके, अरब स्प्रिंगवरील लेख आणि भारतीय मुस्लिम महिला चळवळी (नूरजहाँ बांदऱ्यांचे कार्य, आवाज-ए-निस्वा) यांचा अभ्यास केला.
संशोधनाची उद्दिष्ट्ये – या अभ्यासाची विशिष्ट उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती:
- मुस्लिम महिलांना शिक्षणासाठी कुटुंबीयांकडून मिळणारी प्रेरणा शोधणे.
- कौटुंबिक वातावरणाचा मुस्लिम महिलांच्या शिक्षणावर कसा परिणाम होतो हे शोधणे.
- चौकट मोडू पाहणाऱ्या, रोल मॉडेल ठरलेल्या किंवा स्वतःच्या पलीकडे पाहणाऱ्या मुस्लिम महिला आणि त्यांचे विचार समजून घेणे.
- मुस्लिम महिलांच्या शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन काय आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न करणे.
कार्यपद्धती
प्रबोधिनीच्या ‘अन्य समाजांबरोबर पूल बांधणे’ या संकल्पनेचा उपयोग करून मुस्लिम महिलांशी संपर्क साधण्यात आला. सुरुवातीला प्रतिसाद मिळेल का ?, त्या मोकळेपणाने बोलतील का ?, किंवा अभ्यासाचा वेगळा अर्थ लावला जाईल का ? अशा शंका होत्या. काही ज्येष्ठांनी ‘तुम्ही हा अभ्यास का करत आहात?’ असे प्रश्नही विचारले. तरीही त्यांच्या बद्दल असणारी उत्सुकता, वाटणारी तळमळ आणि कळकळ यामुळे हा विषय पुढे नेण्याचा निर्णय घेतला.
मुलाखती आणि प्रश्नावली:
- प्रज्ञा मानस संशोधिकेतून वनिताताई पटवर्धनांनी मुलाखतींची संख्या आणि प्रश्नावली तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.
- सुरुवातीला ५० जणींच्या मुलाखती घेण्याचे ठरवले होते, पण वेळेअभावी प्रत्यक्षात २४ मुलाखती झाल्या. प्रत्येक मुलाखतीला एक ते दोन महिने लागत होते.
- प्रश्नावलीत सुरुवातीला ६०-७० प्रश्न होते, परंतु शिक्षण या विषयावरच लक्ष केंद्रित केले. धर्म, तलाक, बुरखा किंवा पुनर्विवाह यावर प्रश्न विचारले नाहीत, परंतु जर मुलाखत घेणाऱ्यांना यावर बोलायचे असेल तर त्यांना मोकळीक दिली.
सराव आणि प्रक्रिया – मुलाखत घेण्यापूर्वी संदर्भ साहित्य तपासले. प्रश्नावली वनिता ताईंकडून तपासून घेतली. प्रत्यक्ष मुलाखतीपूर्वी पत्राद्वारे किंवा ईमेलने संपर्क साधून अभ्यासाची ओळख आणि अपेक्षा स्पष्ट केली, तसेच लेखी परवानगी घेतली. मुलाखतींचे ध्वनीमुद्रण करण्यासाठीही लेखी परवानगी घेतली. प्रत्येक मुलाखत दीड ते दोन तास चालली.
सहभागी महिलांचे गट आणि क्षेत्र:
- मुलाखती दिलेल्या महिला २५ वर्षांवरील आणि पदव्युत्तर किंवा व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या होत्या.
- त्यांचे अर्थार्जनाचे मार्ग व्यवसाय आणि नोकरी असे होते.
- त्यांच्यामध्ये पत्रकार, स्वयंउद्योजक, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या, वकील, वैद्यकीय प्रशासक, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, शिक्षिका, संशोधक आणि लेखिका यांचा समावेश होता.
- पुण्यातून ७, सोलापूरमधून ७, कराडमधून १, उस्मानाबाद आणि वेल्हा येथून प्रत्येकी २, आणि वसईतून १ महिला सहभागी झाल्या.
निरीक्षणे (Findings) अभ्यासात मिळालेली काही प्रमुख निरीक्षणे:
- घरातील सदस्यांचा पाठिंबा आणि स्व-प्रेरणा या दोन्हीचा शिक्षणात उपयोग झाला.
- अनेक महिलांची कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षणाची होती (आई-वडील, काका, आजी शिक्षक होते).
- १० जणींचे प्राथमिक/शालेय शिक्षण उर्दू माध्यमातून, १० जणींचे मराठी माध्यमातून, आणि एका महिलेचे इंग्रजी माध्यमातून झाले होते.
- आर्थिकदृष्ट्या महिलांनी सक्षम व्हायला हवे, असे सर्व जणींनी नोंदवले.
- पती-पत्नी यांच्या शिक्षणात फार तफावत नव्हती.
- सर्वांनी धार्मिक शिक्षण घेतले होते, कुराण वाचता येत होते आणि मुलांनाही काही प्रमाणात धार्मिक शिक्षण दिले जात होते.
- प्रेरणास्थान म्हणून इस्लामव्यतिरिक्त व्यक्तींची नावे अधिक होती.
- विवाहानंतर शिक्षणासाठी पाठिंबा मिळालेल्याही काही जणी होत्या.
- सर्वांनी घरातल्या आर्थिक नियोजनात आणि निर्णयात सहभाग असल्याचे नोंदवले.
- १९ जणींना शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो असे वाटले, तर दोघींना तो मुळातच असावा लागतो असे वाटले.
- शिक्षिका होण्याकडे कल जास्त दिसला, कारण ती सुरक्षित नोकरी असते असे सांगण्यात आले.
इतर निरीक्षणे –
- समाजात वावरताना मुस्लिम म्हणून अडचण आली नाही, असे सामायिक मत होते.
- मोहल्ल्यात वाढलेल्या तीन जणी होत्या, तर सर्वसाधारण समाजात वाढलेल्या १९ जणी होत्या.
- हिंदू कुटुंबांबरोबर सलोख्याचे संबंध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
- काही जणींना आपली वस्ती सोडून सर्वसामान्य वस्तीत घर मिळण्यास अडचण आली (उदाहरणार्थ, एक डॉक्टर मुस्लिम असल्याने घर नाकारले), ज्यामुळे त्यांना मुस्लिम वस्ती मध्येच राहावे लागते असे वाटले. मात्र, काही जणींना इतर वस्त्यांमध्ये घर मिळण्यास अडचण आली नाही.
- एका महिलेने तलाक नाकारून कायदेशीर घटस्फोट मिळवला आणि पुनर्विवाह केला, ज्यामुळे शिक्षणामुळे आलेली सजगता आणि आत्मविश्वास दिसून आला.
- तलाक, बुरखा, समान नागरी कायदा आणि चालू घडामोडी हे विषय कोणीच काढले नाहीत.
- तीन जणी अविवाहित होत्या, एकीचा पुनर्विवाह झाला होता, तर दोघींनी आंतरधर्मीय विवाह केले होते (तरीही त्या कट्टर इस्लामला धरून असल्याचे जाणवले).
- बहुतेक महिला प्रथमविवाहित होत्या आणि अपत्य संख्या साधारणपणे एक ते तीन होती.
निष्कर्ष (Conclusions) अभ्यासाचे प्रमुख निष्कर्ष असे होते:
- बहुतांश सदस्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षणाची होती आणि मुलांना व मुलींना शिक्षण देताना भेदभाव केला नव्हता. ही सर्व प्रगत कुटुंबे होती.
- या अभ्यासात शिक्षण हा विषय घेतल्यामुळे ज्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, ती सगळी प्रगत किंवा शिक्षणामुळे प्रगत झालेली कुटुंबे होती, त्यामुळे निष्कर्ष काढताना एकच सूर दिसत होता.
- शिक्षणामुळे विचारांमध्ये सजगता आणि समतोल आलेला जाणवला.
- आर्थिक स्तर कुठलाही असला तरी कुटुंब आणि स्व-प्रेरणा यामुळे शिक्षण होऊ शकले.
- मुलींच्या शिक्षणाकडे अजूनही दुय्यम दृष्टीने पाहिले जाते असे जाणवले, विशेषतः कमी महत्त्व दिले जाते असे दिसले.
- घरची पार्श्वभूमी आणि शालेय वातावरण याचा थेट परिणाम आत्मविश्वास वाढण्यात दिसला.
- धार्मिक शिक्षण आणि लौकिक शिक्षण यांचा समन्वय करण्याकडे कल होता; लौकिक शिक्षण घेतल्यामुळे धार्मिक शिक्षण दुर्लक्षित केले जात नव्हते.
- वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य याच्यात समन्वय ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या (आपले सण साजरे करण्याबरोबरच गणपती किंवा ध्वजवंदन यांसारख्या सामाजिक उत्सवातही सहभागी होत होत्या).
- शिक्षण आणि निधर्मीकरण यांचा परस्पर संबंध नाही असे आढळले.
- विवाहाच्या निर्णयाचे स्वातंत्र्य मात्र मर्यादित होते, बघून आणि ठरवून विवाह जास्त होत होते.
- बाहेरील सामाजिक परिस्थितीचा आणि राजकीय निर्णयाचा परिणाम काही प्रमाणात सकारात्मक आणि काही प्रमाणात नकारात्मक असा झाला.
- मुलाखती घेताना महिला म्हणून एका पातळीवर असल्याचा अनुभव आला आणि सूर जुळले.
- काही जणींनी आवर्जून सांगितले की, त्या गणेशोत्सवात सहभागी होतात आणि त्यांना आरत्याही म्हणता येतात.
- लॉकडाऊननंतरच्या मुलाखतींमध्ये काही बदल जाणवले; काही शिक्षिका किंवा डॉक्टर्सनी बुरखा घालण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे त्यांना संरक्षण मिळते असे त्यांना वाटले.
- धर्माबद्दलचा त्यांचा अभ्यास चांगला होता, परंतु इतर धर्म किंवा जागतिक/राष्ट्रीय पातळीवर काय चालू आहे, यात फारसा समतोल वाटला नाही.
- राजकीय पातळीवरच्या घडामोडी काही प्रमाणात पुढे नेणाऱ्या आणि काही प्रमाणात मागे खेचणाऱ्या आहेत, असे काही जणींचे मत होते.

सहाय्य आणि पुढील वाटचाल – संत्रिकेच्या संशोधन संस्थेतून या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य झाले. वनिताई पटवर्धनांनी या अभ्यासाला ‘लहान पातळीवरील अभ्यास’ असे म्हटले, परंतु तो कसा करावा यासाठी खूप मार्गदर्शन केले. संत्रिकेचे ज्येष्ठ आणि भूतपूर्व प्रमुख मा.विसूभाऊ / विश्वनाथ गुर्जर यांनी या संशोधनाला पाठिंबा दिला. तसेच डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्रतिभाताई रानडे, डॉ. रझिया पटेल, गौरीताई कापरे, सुनीताताई चकोत, डॉ. केतकी भोसले, राज्यश्री क्षीरसागर, उज्वला पवार आणि डॉ. अजित कानिटकर यांचे प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि मदत मिळाली. या अभ्यासासोबतच, लॉकडाऊनच्या काळात ७-८ जणांनी मा.अनीस चिश्ती यांच्या ऑनलाइन मार्गदर्शनाखाली कुरआनचा अभ्यास केला. त्यांच्या साहाय्याने पुण्यातल्या तांडेल मशिदीला भेट देऊन माहिती करून घेतली. हा अभ्यास धर्मावर पूर्वग्रह न ठेवता समजून घेण्याच्या हेतूने केला गेला.
हा अभ्यास सध्या दोन वर्षांपासून पुढे गेलेला नाही. सध्या एक व्हॉट्सॲप गट आहे, जिथे चर्चा होतात आणि अभ्यास मांडले जातात, परंतु ठोस पुढील पाऊल अजून उचलले गेले नाही. तरीही, हा विषय समाजात ‘पूल बांधणे’ या महत्त्वाच्या उद्देशाने पुढे लावून धरायचा आहे, जिथे एकमेकांबद्दलची असूया किंवा द्वेष न ठेवता, ‘दोन गुण पटतात ना, तर त्यावरच काम करा’ या आ.आप्पांच्या शिकवणीनुसार, एकत्र जाता येणारे समान धागे शोधून पुढे जायचे आहे. या उपक्रमात ‘पूल बांधणे’ हे मुख्य उद्दिष्ट काही प्रमाणात साध्य झाले असे वाटते.
कुरआन अभ्यास गटाची मशिदीला भेट
मार्गदर्शक – प्रा.अनिस चिश्ती, सदस्य – डॉ. मनीषा शेटे, मानसी बोडस, सायली आगाशे, आरती, अमोल फाळके, वामन पारखी, आशुतोष बारमुख, श्रेयश फापाळे, प्रथमेश कुलकर्णी, अखिलेश कसबेकर
पूर्व पीठिका
राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सुरक्षा गटाचा एक उपक्रम म्हणून जुलै २०२० पासून प्रा.अनीस चिश्ती यांच्या बरोबर नियमित कुरआन वर्गाला सुरुवात झाली. कुरआन समजून घेत असताना इस्लामचे ५ स्तंभ रोजा, नमाज(सलात) ५ वेळा , हज, जकात, शहादा (कलमा पढणे) याविषयी पण माहिती घेतली. यामध्ये मशिदीत जाऊन ५ वेळा नमाज पढणे या विषयी चर्चा झाली, त्याच बरोबर त्यावेळी नक्की काय म्हंटले जाते, कृती काय असतात, महिलांना प्रवेश का नाही? असे प्रश्न चर्चिले गेले. त्यामुळे प्रत्यक्ष मशिदीला भेट देण्याचे निश्चित झाले.
१० जानेवारी २०२१, रविवारी संध्याकाळी पुण्यातील कॅम्प भागातील तांडेल मशिदीला (अहले सुन्नत वाल जमात) भेट देण्याचे निश्चित झाले. ही मशीद १७७७ मधील पेशवेकालीन मशीद आहे. याभेटीसाठी प्रा. अनिस चिश्ती यांनी परवानगी घेतली होती. संध्याकाळी ५.३० वाजता आमच्या अभ्यास गटाचे ११ सदस्य मशिदीच्या दारात एकत्र झाले. महिलांनी डोके झाकून घ्यावे असा नियम सांगितला गेला. पाय धुवून सर्वजण मशिदीच्या मुख्य सभागृहात गेले. इक्बाल शेख (मे.इंजिनिअर) हे तिथे माहिती देण्यासाठी होते. सर्वप्रथम मशीद म्हणजे काय ? तिथले नियम काय असतात इ. समजावून सांगितले गेले. .
इथे सांगितलेला महत्त्वाचा नियम होता की मशिदीत कोणताही भेदभाव केला जात नाही. राजा आणि नोकरही एकमेकांच्या शेजारी बसू शकतात. माणूसकी व मानवता हा इस्लामचा संदेश आहे असे चिश्ती सरांनी सांगितले.
मशीद भेट – एक उत्सुकता आणि विशेष अनुभव

मशीद भेटीसाठी आलेल्या आमच्या सदस्यांमध्ये वैविध्यपूर्णता होती. काहीजण युवक युवती गटातील होते तर काही प्रौढ सदस्य. मात्र या सगळ्यांच्या मनातील उत्सुकता सारखीच होती. सगळ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न होते. उदा. मशीद म्हणजे काय? आणि नेमकं आत जाऊन करतात तरी काय? मशिदीत मुस्लिमेतर नमाजमध्ये सहभागी होऊ शकतात का?
लहानपणापासून मुस्लिम, कुराण, मस्जिद अश्या गोष्टींबद्दल आपल्या मनात उत्सुकता भीती व एक प्रकारचे गूढ निर्माण केले जाते/ तयार होते. ह्याचे एक कारण असे असू शकते की या विषयांवर मोकळेपणाने कधी घरांमध्ये आपापसात चर्चा होत नाहीत. त्यामुळे मनात असेच काही गूढ आणि भीती मिश्रित चित्र ह्या सगळ्याबद्दल होते.
एका युवतीने तिचा अनुभव नोंदवताना लिहिले की, “M.Phil करत असताना पहिल्यांदा मुस्लिमांबरोबर खूप जवळून वावरण्याची वेळ आली. अनेक मुस्लिम शिक्षक, सहाध्यायी, रुग्ण ह्यांच्याशी खूप जवळून संबंध आला व ‘मुस्लिम’ विषयक गूढ, भीती आपोआपच गेली. नंतर दिल्लीला पहिल्यांदा ‘जामा’ मस्जिद बघितली. तिथली पद्धत आणि वातावरण बघून हे काहीतरी वेगळे आहे असे जाणवले नाही. शांतता आणि प्रत्येकजण आपापली प्रार्थना करतोय असे काहीसे चित्र तिथे होते. मंदिरात दिसते तशी फक्त कुठली मूर्ती तिथे नव्हती. तेव्हापासून मस्जिदीबद्दलची उत्सुकता अजून वाढली.”
एका युवकाने नोंदवले, “प्रशालेत असताना घरी जायच्या वाटेवर डेक्कन कॉर्नर जवळची मशीद रोज पहायचो. त्यामुळे मनात एक प्रकारचे कुतूहल होते. विशेषत: रमजानच्या महिन्यात तिथे असलेली वर्दळ, अझान, जमलेले लोक आणि नेहमीपेक्षा उत्सवाचे वातावरण ह्यामुळे एक आकर्षण मनात निर्माण झालेले होते”.
मशिदीमध्ये पहाटे पहाटे अजान होते ती म्हणजे जणू परमेश्वराला हृदयापासून मारलेली हाक किंवा घातलेली साद ऐकून खूप छान वाटायचं असा अनुभव पूर्वी घेतल्याने, मशिदीत जाऊन एकदा तो अनुभव घ्यावा, ही एका सदस्याची इच्छा होती.
कधीतरी दर्ग्याला भेट देण्याची संधी मिळाली होती त्यामुळे दर्गा आणि मशिदीत फरक तरी काय असतो अशीही उत्सुकता होती. मुळात मशीद, मुस्लिम, इस्लाम याबद्दल एक प्रकारचा बंदिस्तपणा जाणवत असल्याने कदाचित गटातील प्रत्यक सदस्याच्या मनात संमिश्र भावना होत्या.
मशिदीतील वातावरण व नमाजचा अनुभव
प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मात्र सगळ्यांना आलेला अनुभव सारखा होता आणि तो म्हणजे आपुलकीचा.. मशिदीत प्रवेश केल्यानंतर तिथली शांतता, स्वच्छता व साधेपणा सगळ्यांना भावला. आमचे मार्गदर्शक अनीस सर आणि त्यांचे स्नेही इक्बाल शेख यांनी मशिदीच्या प्रवेशद्वारातूनच सगळ्यांचे स्वागत करीत सहजपणे तिथल्या नियमांचा परीचय करून दिला. पाय धुवून आम्ही गर्भगृहात प्रवेश केला तेव्हा अनेकांच्या मनात मंदिरात जाताना आपण करत असलेल्या कृतींची उजळणी झाली. मशिदीच्या अंतर्गत भागात भिंतीवर काबागृहाचे सोनेरी दार आहे त्याचा फोटो लावला होता. मुख्य भिंतीवर आयती काढलेल्या होत्या. मशिदीची दिशा काबागृहाच्या दिशेने असते. छोटे ग्रंथालय होते त्यात हदीसचे ग्रंथ होते. काबागृहावरचे काळे आवरण वर्षानंतर बदलले जाते व त्याचे तुकडे लोकांना वाटले जातात. त्यातील एक तुकडा फ्रेम करून तिथे लावलेला होता. मशिदीची दिशा ही काबागृहाच्या दिशेने असते. फारशी सजावट नाही, फुलं, उदबत्त्या, हार वगैरे काहीही गर्भगृहात नव्हते तर होती एक नितळ शांतता..
सुरवातीला असणारा सूक्ष्म ताण गप्पा सुरु झाल्यावर हळूहळू विरघळत गेला व त्या वातावरणात सगळे रमले. संध्याकाळी होणारी नमाज ज्याला ‘मघरीब’ ची नमाज म्हणतात त्याची वेळ झाली व बांगीने अजान दिली. ’अल्लाहू अकबर’ ने सुरवात झाली. मुख्य हॉलच्या बाहेर भिंतीच्यामागे स्पीकर ठेवला होता तिथे उभे राहून अजान दिली गेली. ती जवळून ऐकताना त्यादिवशी आलेला अनुभव हृद्य होता. अतिशय मनापासून ईश्वराला घातलेली ती साद आहे असे काहींच्या मनात आले.
त्यानंतरचा अनुभव सगळ्यांना चकित करणारा होता. अजान झाल्यावर काही मिनिटात १०० पेक्षा जास्त सदस्य मशिदीत जमा झाले आणि पुढच्या काही वेळात मशीद भरून गेली. आडव्या रांगांच्या मध्ये असे शिस्तीत जमायचे असा संस्कार ह्या समूहाच्या वर रोज होतो असे त्यांच्या सहज शिस्तीने लक्षात आले. ईश्वराची स्तुती आणि शरणागती व्यक्त करणाऱ्या कुराणातील विविध आयती म्हणणे म्हणजे नमाज. त्याला जोड म्हणून शारीरिक आसनांचा काही विशिष्ट क्रम सामूहिक कृतींचे शिक्षण घडवत राहतो. एकूण समूहात वावरण्याचे शिक्षण त्या वेळात मुस्लिम समाजावर सतत घडत असते हे त्यावेळी लक्षात आले.
पुरुष सदस्यांनी प्रत्यक्ष नमाजमध्ये सहभाग घेतला. मोबाईल बंद ठेवण्यास सांगण्यात आले. इमामांनी सुरवात केली आणि कृतियुक्त प्रार्थना सुरु झाली. पुरुषांची डोकी झाकलेली होती. सुरवातीला कानाला हात लावून उभे राहिले. त्यानंतर ओणवे वाकून परत उभे राहिले. नंतर गुडघ्यावर बसून डोके जमिनीला लावले. परत उभे राहून कानाला हात लावला. उभे राहताना दोन पायात अंतर ठेवून उभे. ही कृती ३ वेळा केली. बसताना वज्रासनात बसल्याप्रमाणे डावा पाय व उजवा पाय किंचित बाजूला केलेला होता.जणू काही वेगवेगळ्या आसनस्थिती! मध्ये एकदा इमामानी एक घोषणा केली की “आपले हिंदू भाई येथे मशीद पाहायला आले आहेत, त्यांनी मशीद पाहिली, काही प्रश्न विचारले. आपणही खरा इस्लाम काय आहे याचा परिचय आपल्या गैरइस्लामी बांधवांना करून द्यायला हवा. ते पाहू इच्छित होते की मुस्लीम इबादत कसे करतात. त्यांनी हे पाहिले की सर्व भेदभाव सोडून इथे सर्वजण एकत्र येऊन इबादत करतात”.
नमाजच्यावेळी आम्ही महिला सदस्य गर्भगृहाच्या बाहेर बसून निरीक्षण करत होतो. अंदाजे दहा मिनिटांच्या या काळात वातावरण भरून गेले होते.कसलाही गोंधळ नाही, राजा रंक अशी विभागणी नाही, कृतींमधील सारखेपणा यातून समभाव निर्माण होत होता. गटातील पुरुष सदस्यांसाठी प्रत्यक्ष नमाजमध्ये सहभागी होता येणे हा विशेष अनुभव होता. अनेकांनी त्याचे नेमके वर्णन केले आहे.
“नमाज पढायला सुरुवात केल्यावर मनामध्ये सर्वांमध्ये असलेल्या ईश्वरशक्तीचं स्मरण सुरू झालं. ‘पूर्णमद: पूर्णमिदं ..’ आणि ‘सर्वेपि सुखिनः सन्तु ..’ हे म्हणत नमाजच्या वेळी सर्व करत असलेल्या आसनांमध्ये सहजतेने स्थिर व स्वस्थ होऊ शकलो. शास्त्रीय संगीत ऐकताना मनाला होणारा आनंद जाणवला.”
“आपल्या बरोबर जवळपास शंभर जण असतानाही असलेली शांतता आणि एका विविक्षित वेळी धर्मगुरूंनी कुराणातील आयती (ओव्या, वचने) म्हणायला केलेली सुरुवात याने माझं अजूनही थोडं कुठे अस्थिर असलेलं मन त्या अनादी अनंताकडे खेचलं गेलं. कृती (हात-पाय धुणे), शांतता, मग मंत्रोच्चार (आयती पठण) आणि शेवटी समूहाच्या एकत्रित कृतीमधून (नमाजाच्या वेळी केलेल्या आसनामधून) परमेश्वराशी, अल्लाहशी मी संधान बांधू पाहत होतो.
मी स्वतःला नास्तिक मानतो. त्यामुळे आग्रहाने देवळात जात नाही. पण गेलो तर नमस्कार करतो आणि म्हणतो, ” हे देवा तू असशील तर इथे येणाऱ्या आणि न येणाऱ्या सर्वांवर तुझी कृपा ठेव. त्यांना जे हवं ते ते मिळू दे”. मशिदीत नमाज पढत असताना ही वाटलं, की या देवाकडे, अल्लाकडे तरी मी काय मागायचं? या देवाला मी नमस्कार केला तर माझा देव खट्टू होईल का? मी माझ्या देवाशी फारकत घेतोय का? खरंतर हे असं कधी आधी चर्च मध्ये नव्हतं वाटलं सुवर्णमंदिरात नव्हतं वाटलं, जैन मंदिरात ,बुद्ध मंदिरात सुद्धा नव्हतं वाटलं. मग हे इथेच का वाटलं? म्हणजे माझ्या मनाचे खेळ आहेत हे आणि तेच तर दूर करायचे आहेत. माझा परमेश्वर, त्याचा अल्ला आणि तिसऱ्याचा God वेगळा कसा असेल? भले माझा या तिघांवरही विश्वास नाही पण त्या मशिदीत मी सोडून उरलेल्या ९९ जणांचा आहे (यात आमचे ५ जण ही), मग त्यांच्यासाठीच आरोग्य, संपत्ती, समाधान मागूया ना, त्या अल्लाह कडे, असं वाटलं आणि मग झर्रकन मनातलं द्वंद्व संपलं आणि द्वैत ही. पूर्वी लाऊड स्पीकर वरची अझान ऐकली की चिडचिड व्हायची. काही वर्षांपूर्वी तीन महिने दुबईत होतो तेव्हा ऐकून ऐकून त्या अझान मधली आर्तता जाणवू लागली.”
“शांतता सोडलं तर मशीद आणि मंदिराची तुलना होऊ शकत नाही.. चांगल्या/ वाईट दोन्ही अर्थाने… असं माझं तरी प्रामाणिक मत आहे..” असेही एका युवतीने नोंदविले तर दुसरीचा अनुभव वेगळा होता.
“ नमाजाच्या वेळी मागे बसून जेव्हा मी बघत होते तेव्हा असं जाणवल की देवाची प्रार्थना करायची सगळ्यांची नियत सारखीच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा का असेना. प्रार्थनेच्या आधी करायच्या गोष्टी पण बऱ्यापैकी सारख्याच आहेत फक्त नावं आणि काही कृतींचा फरक आहे. नमाजाला जेव्हा सुरवात झाली तेव्हा असेही एक लक्षात आले कि इथे सगळे जण समान आहेत. म्हणजे श्रीमंत घरातले वडील-मुलगा आणि भाजी विकणारे काका हे शेजारीशेजारी बसूनच नमाज पढत होते. आपले सर, दादा मंडळी जेव्हा नमाज पढणाऱ्या गटात सामील झाले तेव्हा बाहेरून बघताना काही फरक समजत नव्हता कि हे हिंदू आहेत आणि हे मुस्लिम आहेत. हे दृश्य ‘परब्रह्मशक्ती सर्वत्र आहे आणि ती आपल्या प्रत्येकाला जोडते’ ह्या विचाराच्या खूप जवळ घेऊन गेले.
ह्या भेटीनंतर मनात काही विचार येऊन गेले की हे जे मानवनिर्मित फरक आहेत, वेगळेपणा आहे तो कुठल्या टोकापर्यंत पाळायचा आहे किंवा आचरणात आणायचा आहे हा खरं तर सगळ्यांसाठीच (जग) विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जितक्या सहजतेने आपले सर, दादा नमाजाला बसले तितक्या सहजतेने बाकी लोकं पण हे करू शकतील का? किंवा तितक्याच सहजतेने मुस्लिम व्यक्ती गणपतीच्या आरतीला उभी राहू शकेल का किंवा वारीत सहभागी होऊ शकेल का? आणि जी लोकं हे सगळं करतायेत त्यांना ते एवढ्या सहजतेने ह्यापुढेहि करता येईल का? असे एक वाटते. “धर्म हा माणसाला व्यापक आणि सक्षम बनवण्यासाठी असावा आणि कोण कोणाची कश्या पद्धतीनी प्रार्थना करू इच्छितो, कोणाला काय वाचावेसे वाटते, कोण कुठल्या प्रकारे अर्थपूर्ण आणि चांगले जीवन जगू इच्छितो हा स्पर्धेचा किंवा तुलनेचा विषय नसावा! “
“नमाज पढताना मात्र विशेष वेगळे वाटले नाही, जशी आपण प्रार्थना करतो त्याप्रमाणेच प्रसन्न वातावरणात केलेली प्रार्थना वाटली. अजान/बांग दिल्यानंतर काहीच मिनिटांत पटापट लोक जमले ह्याचे आश्चर्य वाटले. जाणवण्या इतपत कट्टरता कृतीतून दिसून येत होती. नमाज पढण्याचा हॉल म्हणजेच मशिद किंवा काबागृह, त्यामध्ये पूजेसाठी इतर फोटो, हार,फुले, धूप इत्यादी सरंजाम नाही हे समजले. चिश्ती सरांच्या मित्रासोबत बोलत असताना त्यांनी आवर्जून सांगितले की इतर धर्माप्रमाणे अल्लाला फुले-मेणबत्ती वगैरे लागत नाही फक्त तुमचा वेळ लागतो. हे ऐकून थोडे कौतुक वाटले. फार प्रतिकांचा वापर नसताना दिवसातून पाच वेळेला नमाज पढायला येण्याची प्रेरणा काय असावी असा विचार सुरू झाला.”
“खरतर डोके झाकणे, हातपाय धुवून मंदिरात जाणे हे हिंदुधर्मात पण होतेच की आधी! त्यात आदर आणि स्वच्छता हा हेतू असावा तो तिथे जपला गेलाय असे वाटले. आत गेल्यावर मंदिरात जातो तेव्हा अनुभवला येणारी आत्मिक शांतता जाणवली. श्रद्धायुक्त वातावरण होते, आधी पाहिलेल्या दर्ग्याच्यापेक्षा थोडेसे वेगळेपण जाणवले. सर्वधर्म समभाव असे म्हणताना मनात न कळत मंदिर आणि मशीद तुलना होत होती”
“मशिदीत गेल्यावर आपण फार वेगळे आहोत ही भावना मनात आली नाही. मात्र भेटीमध्ये निवडक २-३ व्यक्तींपलीकडे संवाद झाला नाही. कदाचित चिश्ती सर नसताना सहज मशीद भेट द्यायला गेलो असतो तर अशाच भावना मनात असत्या का असा प्रश्न मनात आला. गुरुद्वारा किंवा देवळामध्ये ज्याप्रमाणे अनोळखी/नवीन लोकांशी सहज मोकळेपणाने संवाद होतो तसा आपल्याला मशिदीतही जमू शकेल का? असा प्रश्न स्वत:ला ह्या निमित्ताने विचारून पाहिला.. धर्माची मानवाला गरज आहे का हा तसा न सुटणारा प्रश्न. धर्माच्या नावाखाली झालेल्या युद्धांमध्ये गेल्या दोन हजार वर्षात कोट्यावधींचा जीव गेला आहे ही वस्तुस्थिती. ज्या देवदूतांनी आपापल्या धर्मांची स्थापना केली त्यांनीच किंवा त्यांच्या नंतर कधीतरी त्यांच्या वारसांनी, मीच शेवटचा देवदूत असे म्हणत त्या धर्माच्या विकासाला पूर्णविराम दिला. त्या सर्वांनी हे असं का केलं असेल हा प्रश्न मला तरी सुटला नाही. त्यांना अशी भीती वाटत असेल का की, आता आपण थांबलो नाही तर पुढे या धर्माचं distortion होईल. का त्यांना असं वाटलं असेल की आता या धर्म विचारात अजून काही बदल होण्याची शक्यता नाही. एक perfection आले आहे यात आता, एखाद्या चित्रकाराने आपलं चित्र पूर्ण केल्यानंतर त्याला वाटतं तसं. हिंदू धर्मामध्ये आणि तशा सारख्या अनेक धर्म-पंथ यामध्ये एक ग्रंथ वा एक देवदूत असं नाही. त्यामुळे अशी परिस्थिती नसेल ही. पण त्यामुळे इंटरप्रेटेशन्स भरपूर असतात. त्यांत distortions ही खूप होतात.
थोडक्यात काय तर, एका बाजूला, प्रत्येक धर्म छान बांधलेल्या तळ्यासारखा आहे, त्यात नितळ पाणी आहे तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक धर्म दररोज बदलणाऱ्या वाहत्या नदी सारख़ा आहे. त्या दोन्हीतील पाणी एकाच हायड्रोजन आणि ऑक्सीजनचं बनलंय. फक्त काहींना वाटतंय की नदीतलं पाणीच तेवढं स्वच्छ आहे तर काहींना वाटतंय की तलावाचं पाणी म्हणजे अमृत आहे आणि हे दोघेही एकमेकांवर आणि इतरांवर आपला विचार लादू पाहत आहेत. पाण्याची खरी गोडी चाखणारे दोन्हीकडे थोडेच आहेत.. थोड्या भारावलेल्या मानाने नंतर सगळेजण चिश्ती सरांच्या घरी गेलो. त्यांच्या घरातील झालेला प्रेमळ पाहुणचार लक्षात राहण्यासारखा होता.
इस्लाम, कुरआन ,मुस्लिम या शब्दांना उच्चारताना अनेकांच्या मनात निरनिराळ्या भावना असतात त्यामुळे साहजिकच मशीद भेटीविषयी वाचताना काहीतरी वेगळी उत्सुकता काहींच्या मनात येउ शकते. प्रसारमाध्यमे, आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटना यांतून निर्माण होणारे चित्र वेगळे आहेच. पण मशीद भेटीचा उद्देश मुळातच तिथलं वातावरण जाणून घेणे, निखळ दृष्टीने पाहणे असे होते. अनीस सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुरआन समजून घ्यायचा जो प्रयत्न केला त्याचा परिपाक म्हणजे प्रत्यक्ष मशीद भेट! एका भेटीतून सगळे कळते का? पुन्हा पुन्हा भेटायला हवे का? असे प्रश्न गटाच्याही मनात आहेत. परंतु मुस्लिम माणसाला समजून घेण्यासाठी आम्ही उचललेले हे एक छोटेसे पाउल होते.. प्रवास तर बराच दूरचा आहे याची गटातील सगळ्यांना नक्की कल्पना आहे.