लेख क्र. ४६

२०/०७/२०२५
ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व काम करणार्या कै. डॉ. भीमराव गस्ती या मनस्वी कार्यकर्त्याला त्यांनी समरसून केलेली आत्मीय मदत. या कामात फक्त संत्रिकाच नाही तर पूर्ण प्रबोधिनी सहभागी झाली. या आदर्श मैत्रीबद्दल…
कै. डॉ. भीमराव गस्ती हे ‘उत्थान’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक. बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र अशा विविध राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. १९८७मध्ये त्यांचे ‘बेरड’ आत्मकथन प्रकाशित झाले. ते वाचून मा. श्री. यशवंतरावांनी त्यांना पत्र लिहिले. पुस्तक वाचून अनेकांनी पत्रे लिहिली होती. परंतु यशवंतरावांचे पत्र वेगळे होते. यामुळे त्यांची ओळख झाली आणि चळवळीला वेगळीच दिशा मिळाली. दोघांच्या या सामाजिक कामामुळे त्यांची अनेकदा भेट व्हायची व पत्राचारही होत असे. ह्या चळवळी दरम्यान यशवंतरावांची सौहार्दपूर्ण वृत्ती भीमरावांना दिसली तेव्हा त्यांनी यशवंंतरावांबद्दल शुभेच्छापर उद्गार लिहिले होते, ते येथे देत आहोत.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात भटक्या-विमुक्तांचे जगणे हे खूप वेगळ्या प्रकारचे. त्यांच्या समस्याही तितक्याच गंभीर स्वरूपाच्या. त्यांना गुन्हेगारी विश्वातून बाहेर काढण्यासाठी आमची चळवळ १९७४पासून अखंडपणे चाललेली. या समूहाची संख्या खूप मोठी असल्यामुळे राजकारणी मंडळी त्यांचा निवडणुकीसाठी उपयोग करायचे. आम्ही म्हणजे फुकटात वापरले जाणारे !
१९८७मध्ये माझे ‘बेरड’ आत्मकथन प्रकाशित झाले. ते वाचून प्रा. यशवंतरावांनी मला पत्र लिहिले. पुस्तक वाचून अनेकांनी पत्रे लिहिली होती. परंतु यशवंतरावांचे पत्र वेगळे होते. यामुळे त्यांची ओळख झाली आणि आमच्या चळवळीला वेगळीच दिशा मिळाली.
१९८८पासून देवदासींच्या पुनरुत्थानासाठी सीमाभागात ‘उत्थान’ची चळवळ सुरू झाली. सुमारे दोन वर्षे खूप मोठ्या प्रमाणात सीमाभागात देवदासी भगिनींच्या पुनर्वसनासाठी आंदोलने झाली. या लढ्यात यशवंतरावांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले आणि देवीला मुली सोडण्याची ही प्रथा बंद झाली. उत्थानच्या या यशामागे यशवंतराव होते.
यानंतर असे घडले की ही चळवळ मोडून काढण्यासाठी सीमाभागातील तथाकथित पुढारी (सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार) एकत्र आले आणि मी जीवनातून उठेन अशा बातम्या यायला लागल्या. यामुळे मी गोंधळून गेलो आणि माझी परिस्थिती खूप दयनीय झाली. वृतपत्रातून होणारी बदनामी इतक्या खालच्या थरातील होती की आता जगून काही उपयोग नाही असे वाटायला लागले. अशा वेळी यशवंतरावांनी माझी लहान मुलासारखी काळजी घेतली आणि मला त्या संकटातून सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर ‘आक्रोश’ हे पुस्तक लिहून घेतले आणि पुन्हा उत्थानची उभारणी केली. सीमाभागात आज शेकडो देवदासींचे उत्थानच्या माध्यमातून पुनवर्सन झाले आहे. या सर्वामागे यशवंतराव आहेत.
यशवंतरावांमुळे उत्थान उभे राहिले; उत्थानच्या महिला कार्यकर्त्या उभ्या राहिल्या; आणि मी लेखक व कार्यकर्ता झालो. यशवंतराव आमच्या दृष्टीने सर्वकाही आहेत. त्यांच्या छायेखाली राहण्यात आम्हांला धन्यता वाटते आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे यशवंतरावांमुळे राष्ट्रीय स्वंयसेक संघाशी आमचे नाते जुळले हे ऋण मी केव्हाही विसरू शकणार नाही. यशवंतरावांचे मन जिंकणे म्हणजे सतत कामात असणे! यशवंतरावांना उत्तम आरोग्य लाभावे ही सदिच्छा !

कै. डॉ. भीमराव गस्ती व यशवंतराव यांच्या मैत्रीबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल प्रा. शुभांगी देवरे-तांबट यांनी सविस्तर लेख लिहिला आहे. या लेखावरून आपल्याला दोघांच्या मोलाच्या कामाबद्दल निश्चितच आदर वाटेल.
समाजातल्या सर्वांत वंचित, अंधश्रद्ध, अशिक्षित स्तरातून उदयाला आलेल्या कार्यकर्त्याला किती भीषण आणि अनेक पदरी संघर्षाला सामोरे जावे लागते, ते ‘बेरड’ आणि ‘आक्रोश’ या डॉ. भीमराव गस्ती यांच्या आत्मकथनातून आपल्याला समजते. १९८७मध्ये प्रकाशित झालेल्या ‘बेरड’ या भीमरावांच्या आत्मकथनाने विक्रीचे आणि पुरस्कारांचे उच्चांक गाठले. बेरड समाजाच्या चळवळीचे हे आत्मकथन वाचून यशवंतरावांनी भीमरावांना पत्र लिहिले नसते तरच नवल ! १९८७ साली लिहिलेल्या त्या एका पत्रामुळे सुरू झालेली यशवंतराव भीमरावांची ‘कार्यप्रवण मैत्री’ भीमरावांच्या अखेरच्या श्वासापर्यंत अधिकच दृढ होत गेली. या काळात डॉ. भीमराव गस्ती हे ज्ञान प्रबोधिनीचे सदस्य तर झालेच; पण लेले कुटुंबाचे आप्तही झाले. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रत्यक्ष कामाचे दर्शन आणि यशवंतरावांनी दिलेली जीवनदृष्टी व कार्यप्रेरणा यांविषयीची कृतज्ञता भीमराव नेहमीच व्यक्त करत असत.
बेरड रामोशी सेवा समितीतील सक्रिय सहभाग
अल्पावधीतच भीमराव ज्ञान प्रबोधिनीत मुक्कामी येऊ लागले आणि यशवंतरावांचे बेळगावला जाणे-येणे सुरू झाले. ‘इंडाल’ या बहुराष्ट्रीय कंपनीने बेरड समाजाच्या जमिनी मातीमोल भावाने ताब्यात घेतल्यानंतर भीमरावांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहेच. या संघर्षानंतर कंपनीने ज्या-ज्या बेरडांच्या जमिनी घेतल्या, त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. परंतु हे आश्वासन काही प्रत्यक्षात येईना. त्या वेळी यशवंतराव ‘इंडाल’ कंपनीच्या मॅनेजरसमोर दिवसभर जाऊन बसले आणि कंपनीच्या मॅनेजरला आश्वासनाची तात्काळ कार्यवाही करायला भाग पाडले. यशवंतरावांच्या या पहिल्या सक्रिय पाठिंब्याने भीमरावांच्या संघर्षाला खरेखुरे यश आले. त्यानंतर बेरड रामोशी सेवा समितीने केलेल्या प्रत्येक संघर्षाची दखल समाजाला आणि शासनाला घ्यावी लागली.
कुठेही केव्हाही झालेल्या गुन्ह्यांसाठी पोलीस बेरड रामोशी यांची धरपकड करत असत. पोलिसांच्या अनन्वित अत्याचारांमध्ये स्वतःचे चौदा नातलग (जातभाई) गमावलेल्या भीमरावांविषयी यशवंतरावांच्या मनात अत्यंत कळवळा होता आणि अजूनही आहे. त्यामुळेच भीमरावांना कार्यकर्ते मिळवून देणं, त्यांच्यासाठी निधी उभा करणं, चळवळीच्या कामाला वैचारिक बैठक निर्माण करून देणं, हतबल व निराश होणाऱ्या भीमरावांचा आत्मविश्वास पुन्हा-पुन्हा जागा करणं; इतकंच नव्हे तर भीमराव व त्यांच्या पत्नी कमळाबाईंच्या आजारपणात पित्याच्या वत्सलतेनं त्यांची काळजी घेणं या सर्व कामांत यशवंतरावांनी स्वतःला झोकून दिलं.
देवदासींचे उत्थान
भीमरावांची मेहणी म्हणजेच कमळाबाईंची सख्खी बहीण ही देवदासी असल्याने या अमानुष आणि क्रूर प्रथेचं विदारक दर्शन भीमरावांना जवळून झालं. ही प्रथा बंद व्हावी यासाठी हजारो देवदासींचे मोर्चे काढण्यापासून ते देवदासी प्रथाबंदीचा कायदा प्रत्यक्षात येईपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर यशवंतरावांनी भीमरावांना सहकार्य केलं. डॉ. बाबा आढाव, मा. यल्लाप्पा कावळे, यशवंतराव आणि भीमराव या चौघांच्या विचारमंथनातून देवदासींच्या प्रश्नावर काम करण्यासाठी १९९६मध्ये ‘उत्थान’ या स्वतंत्र संस्थेची स्थापना झाली. परंतु देवदासींच्या प्रश्नाकडे वळल्याने स्वतःच्याच समाजात होणारी मानहानी, घरातल्यांचा प्रखर विरोध आणि आर्थिक विवंचना या सगळ्याचा खूप ताण भीमरावांवर येत असे. अशा वेळी यशवंतरावांचा नैतिक व भावनिक आधार त्यांना अधिक मोलाचा वाटे. ‘काळ्याकुट्ट मेघांनी सगळीकडून अंधार केलेला असतानाच अचानक वीज चमकावी त्याप्रमाणे यशवंतरावांचं आशादायी पत्र येत असे’, असं भीमरावांनी ‘आक्रोश’मध्ये लिहिलं आहे. देवदासी प्रथेविरुद्धची चळवळ जसजशी प्रखर होत गेली, तशी तिची दखल तत्कालीन मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आदी सर्वांना घ्यावी लागली आणि अखेर देवदासी प्रथाबंदी कायदा कर्नाटक शासनाने पारित केला. देवदासींसाठी शंभर कोटी रुपयांची भरघोस तरतूद जाहीर करण्यात आली. जवळ-जवळ तीस हजार देवदासींना घरकुल योजना आणि पाचशे रुपये महिना पेन्शन मंजूर झाली. या सर्व कामात यशवंतरावांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. भीमरावांचं हे सर्व यश त्यांनी शब्दबद्ध करावं यासाठी यशवंतरावांनी भीमरावांना जवळ-जवळ अडीच-तीन महिने सक्तीने प्रबोधिनीत राहायला लावलं. संगीता बारणे आणि रोहिणी तेंडुलकर या ‘स्व’-रूपवर्धिनीतील युवती, तर अभया टोळ आणि कल्पना भालेकर या प्रबोधिनीतील युवती यांच्या मदतीने सर्व लिखाणाची मुद्रणप्रत यशवंतरावांनी तयार करून घेतली. अशा प्रकारे ‘आक्रोश’ प्रकाशनासाठी सिद्ध झालं. आपल्या आजूबाजूला समाजात काय घडतं आहे ते डोळे उघडे ठेवून पाहावं यासाठी, सुस्तावलेल्या समाजाला जागं करण्यासाठी यशवंतरावांनी भीमरावांकडून आक्रोशचं लिखाण पूर्ण करून घेतलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
दलित पँथर ते समरसता
भीमरावांसारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला वैचारिक बैठक देण्याचं मोलाचं काम ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्याबरोबरच यशवंतरावांनीही केलं. वास्तविक भीमरावांनी त्यांच्या सामाजिक कामाची सुरुवात दलित पँथरच्या माध्यमातून केली होती. दीर्घ काळपर्यंत ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या संपर्कात होते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान यांचंही मौलिक मार्गदर्शन भीमरावांना लाभलं. भीमरावांचं पुण्यात येणं-जाणं सुरू झालं, तेच मुळी ‘साधना’मधील लिखाणाच्या निमित्ताने. ही वैचारिक पार्श्वभूमी असलेले भीमराव यशवंतरावांबरोबर हिंदुत्वावर चर्चा करू लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सामाजिक समरसता मंच आणि भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान यांच्या बैठकांना ते उपस्थित राहू लागले. भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानचे भीमराव हे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच, २००६मध्ये झालेल्या आठव्या समरसता साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
विविध वैचारिक प्रवाहांविषयी भीमराव यशवंतरावांच्या चर्चा दिवस दिवस संत्रिकेत (संस्कृत-संस्कृति-संशोधिका) चालत असत. नुसतं पुढारीपण, भाषणं, चळवळी, आंदोलनं, निवडणुकांचा प्रचार यांतून दीर्घकालीन भरीव काम होणार नाही, हे यशवंतरावांनी भीमरावांना पटवून दिलं. आपल्या देशातील विविध जाती-जमातींच्या संमिश्र समूहाला निश्चयाने व सहकार्याने एका मार्गावरून चालायला कसं शिकवायचं हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी भीमरावांनी काम करावं, अशी यशवंतरावांची अपेक्षा असे. पक्षीय राजकारणाच्या जवळ जाणाऱ्या संकुचित चळवळींपेक्षा व्यापक सामाजिक, साहित्यिक नेतृत्व करण्याचीच अपेक्षा यशवंतराव भीमरावांकडे व्यक्त करत असत. जातिभेदरहित एकरस, एकात्म, निर्दोष समाजजीवन कसं निर्माण होईल यावर दोघांची चर्चा होत असे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन ही हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनातील एक महत्त्वाची अवस्था आहे. बाबासाहेबांच्या चळवळीने हिंदूंच्या सामाजिक पुनर्घटनेस प्रारंभझाला’, ही डॉ. धनंजय कीर यांची वाक्यं यशवंतराव भीमरावांना स्पष्ट करून सांगत असत. या सगळ्यातून यशवंतरावांची वैचारिक भूमिकाही आपल्या लक्षात येते.
नाते मानवताधर्माचे
यशवंतराव भीमराव यांच्या नात्याला शब्दांत बांधणं खरंच कठीण आहे. मैत्री, गुरु-शिष्यत्व याही पलीकडचं हे ‘मानवताधर्माचं नातं’ आहे. भीमरावांच्या ‘बेरड’ या आत्मकथनाला १९९०मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा त्यांच्या काही हितशत्रूनी भीमरावांची बदनामी करायला सुरुवात केली. ‘ग्रामीण भागातील देवदासींची फसवणूक करणाऱ्या गस्तींना ताबडतोब अटक करा’, ही मागणी जोर धरू लागली. हजारो रुपयांच्या अफरातफरीचे आरोप त्यांच्यावर झाले. एकीकडे महाराष्ट्र शासन त्यांना पुरस्कार देण्याची तयारी करत असतानाच कर्नाटक शासनाने भीमरावांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं. अत्यंत अस्वस्थ झालेल्या यशवंतरावांनी पुण्यातूनच तिकडचे संघकार्यकर्ते, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, न्यायाधीश या सर्वांशी संपर्क साधला. भीमरावांना कसाबसा अटकपूर्व जामीन मिळाला. जामीन मिळताच भीमराव कमळाबाईंसह तडक यशवंतरावांच्या घरी पोचले. अतिशय विषण्ण मनःस्थितीतील भीमरावांना यशवंतराव व मामींनी (यशवंतरावांच्या पत्नी) धीर दिला आणि पुरस्कार स्वीकारायला कसंबसं तयार केलं.
या प्रसंगाची नोंद ‘आक्रोश’ पुस्तकात करताना भीमरावांनी लिहिलेली वाक्यं फार मोलाची आहेत. ‘माझ्यासाठी इतकं सगळं करणाऱ्या यशवंतरावांचं आणि माझं नातं काय? हे तर मानवताधर्माचं नातं ! हेच नातं सर्व नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे.’ याच नात्याने यशवंतरावांनी २०१०मध्ये संत्रिकेत भीमरावांची साठीशांत केली. ‘राष्ट्रार्थ भव्य कृति भीम पराक्रमाची’ असा भीमरावांचा कार्यगौरव करणारा लेखही लिहिला.
वाई येथील सत्कार
एप्रिल २०१७मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई शाखेतर्फे पहिला महर्षी कर्वे पुरस्कार भीमरावांना देण्याचं निश्चित झालं. हा पुरस्कार यशवंतरावांच्या हस्ते भीमरावांना देण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी बरेच दिवस यशवंतराव भीमरावांची भेट झाली नव्हती. वाई हे यशवंतरावांचं गाव. त्यामुळे वाई-यशवंतराव भीमराव असा छान योग कर्वे संस्थेने जुळवून आणला. कार्यक्रमात यशवंतरावांनी भीमरावांचं मनापासून कौतुक केलं. परंतु त्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या कोणालाही कल्पना नव्हती, की भीमरावांच्या आयुष्यातील तो शेवटचा जाहीर कार्यक्रम असेल.
भेटीलागी जीवा
या कार्यक्रमानंतर भीमराव खूपच आजारी पडले. त्यांना नेमकं काय झालं आहे? कुठे अॅडमिट केलं आहे? पैसे किती लागणार आहेत? त्यांच्याजवळ कोण कार्यकर्ते आहेत? अशा अनेक प्रश्नांनी यशवंतराव बेचैन झाले. संत्रिकेतून उज्ज्वलाताई पवार आणि मी भीमरावांना सतत संपर्क करायचा प्रयत्न करत होतो. आपल्या जिवलग मित्रासाठी असं कासावीस होताना आम्ही यशवंतरावांना पहिल्यांदाच पाहत होतो. भीमराव अगदी अत्यवस्थ असताना आनंददादा, स्वातीताई (यशवंतरावांचा मुलगा व सून), यशवंतराव व मी कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो. आनंददादा डॉक्टरांशी चर्चा करत होते, तर यशवंतराव भीमरावांच्या घरातील मंडळींना आधार देत होते. दुर्दैवाने भीमरावांचा ८ ऑगस्ट २०१७ रोजी मृत्यू झाला. यशवंतरावांचा एक जिवलग मित्र हरपला. पण दुःख करत बसतील तर ते यशवंतराव कुठले ? यशवंतरावांनी भीमरावांच्या पत्नी कमळाबाई, मुलगा सुरेश आणि इतर अनेक कुटुंबीयांना सांत्वनपर पत्रं लिहिली.
कार्य अजुनि राहिले
व्यक्ती गेली तरी काम आणि त्यामागचा विचार थांबता कामा नये म्हणून यशवंतरावांनी भीमरावांच्या एकेका कार्यकर्त्याला संपर्क करायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भीमरावांच्या कामाचा आढावा घेण्यासंदर्भात २०१८मध्ये योजलेल्या बैठकीसाठी ते बेळगावलाही गेले. भीमरावांचं सर्व अप्रकाशित साहित्य, त्यांचे जावई सुरेश नाईक यांच्याकडून मिळवून त्याचं वाचन केलं आणि त्यात दुरुस्त्याही केल्या. भीमरावांचं एक उत्तम प्रेरक चरित्र लिहिलं जावं यासाठी भरपूर कच्चं काम यशवंतरावांनी करून ठेवलं आहे.
यशवंतराव व भीमराव, या दोघांच्याही मैत्रीला शतशः वंदन…