प्रकट चिंतन १ -पुस्तिकेविषयी थोडेसे …….

प्रबोधिनीचे संचालक माननीय वाच. गिरीशराव बापट यांचे ‌‘प्रकट चिंतन‌’ गेली तीन वर्षे सातत्याने मासिक वार्तापत्राच्या निमित्ताने विविध सदस्यांपर्यंत पोहोचत आहे. ज्या सदस्यांना हे लेखी प्रकट चिंतन नुकतेच मिळायला लागलेले आहे किंवा अधून-मधून मिळालेले आहे, त्यांच्यासाठी काही निवडक लेखांचे संकलन करून या पुस्तिकेद्वारे त्यांचे विचार प्रकाशित करीत आहोत. एकूणच प्रबोधिनीच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत प्रबोधिनीतला अलिकडचा महत्त्वाचा विचार पोहोचावा, यासाठी मुख्यत: मा. संचालकांचे हे १६ प्रकट चिंतनलेख यात निवडले आहेत.

लेखांचे चार भाग पडतील, ते असे –

(१) ‌‘रूप पालटू देशाचे‌’ असे ध्येय डोळ्यासमोर ठेवले असताना इतक्या कोटी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी विधायक काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, असायला लागतील. अशा अनेक संस्था, व्यक्ती यांध्ये पूल बांधण्याचे काम करावे लागेल. देशसेवा म्हणजे काय, कोणत्या माध्यमांधून प्रबोधिनी देशसेवा करू इच्छिते, अशी मांडणी पहिल्या भागात केली आहे.

(२) दुसऱ्या भागात, ‌‘सर्वसाधारण‌’ प्रबोधिनीपण आणि ‌‘विशेष‌’ प्रबोधिनीपण म्हणजे काय, प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये कोणती, याचा समावेश केला आहे. काम करणाऱ्या, विचारपूर्वक काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कायमचे आपले साध्य काय, त्यासाठीचे साधन कोणते याची स्पष्ट कल्पना असायला लागते. साध्य निश्चित झाले तर साधनाची काळजी करता येते. यासंबंधी मा. संचालकांनी या दुसऱ्या भागात विवेचन केले आहे.

(३) अर्थात, साधनाची काळजी करायची असेल, तर साध्यापर्यंत जाण्यासाठी काही विशेष गुण प्रबोधिनीच्या सदस्यांनी आत्मसात केले पाहिजेत. त्याबद्दल प्रबोधिनीच्या तिसऱ्या खंडात सविस्तर मांडणी झालेली आहे. त्यातील ‌‘उत्तमता‌’ या विषयावर ४ चिंतनलेख या पुस्तिकेत आहेत.

प्रबोधिनीमध्ये स्थिर काम, संघटनात्मक काम, विशिष्ट विषयांवर अभियाने, चळवळी अशा विविध स्वरूपांत काम होत असते. त्यामुळे चळवळीतील उत्तमता, स्वत:च्या कृतीतील, विभागाच्या कामातील उत्तमता याबद्दल मांडणी केली आहे. उत्तमतेचा नुसता विचार करून चालणार नाही, तर ती तशी दृष्टीच आली पाहिजे. एक महत्त्वाचे मूल्य म्हणून ती अंगवळणी पडली पाहिजे. हा झाला तिसरा भाग.

(४) ज्ञान प्रबोधिनीचा ध्येय-विचार, सर्वसाधारण प्रबोधिनीपण, विशेष प्रबोधिनीपण, कृतीतील, विभागातील उत्तमता असा प्रवास करणारी व्यक्ती म्हणजेच कार्यकर्ता. कार्यकर्ता कसा असावा – दक्ष, उत्कट, जबाबदार, प्रतिसादी, सहयोगी त्याची सोदाहरण लक्षणे चवथ्या भागातील पुढच्या ५ चिंतनलेखांध्ये मांडली आहेत.

अपेक्षा –

अशा, आकाराने लहान परन्तु आशयाने सखोल असलेल्या चिंतनलेखांधून आपल्याला काय भावले, आपला त्यावर काय विचार झाला, यासंबंधी काही प्रतिसाद मा.संचालकांपर्यंत पोहोचविता आला, तर उत्तम होईल.

दिनांक : सौर पौष १ शके १९१९ – कार्यवाह,
२२ डिसेंबर १९९७ ज्ञान प्रबोधिनी