जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती
ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।ध्रु. ।।
कुणि हसरे, रुसके, लाघवि कुणि लडिवाळ
कुणि स्पर्श पाहती नभ हे नील-विशाल
कुणि अबोल, उत्कट, कुणि तर्काची धार
कुणि तिखट, तेज जणु शिवबाची तलवार
परि सर्वारूपी नटला तो जगजेठी
ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।१।।
फुलण्यास यांजला माती संस्कारांची
प्रेमाचे पाणी, ऊब सूर्यकिरणांची
जिज्ञासा यांची शोधि अथांग, अनंत
अन् पराक्रमाला अपुरे यांस दिगन्त
विश्वाला भिजविल करुणा ऐसी
चित्ती ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।२।।
हे इतिहासाची नवीन लिहितील पाने
अशुभाची येथुन पुसतिल नावनिशाणे
हे नव्हेत छोटे, हे तर युगनिर्माते
हे मायभूमिचे भावी भाग्यविधाते
शौर्याने अपुल्या नमवितील जे नियती
ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।३।।
याहून कोणते श्रेय अम्ही इच्छावे ?
वा अन्यप्रकारे भगवंतास भजावे ?
राधा-मनमोहन अन्य कुणा मानावे?
अन् कोणावरूनी जीवन ओवाळावे ?
धन-मान खरोखर तृणवत् त्यांच्यापुढती
ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।४।।