तनूमनात एक ध्यान प्रिय महान हिंदुस्थान
हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान ।। ध्रु. ।।
ऋषी मुनी तपोनिधी कितीक येथ जाहले
दिव्यदृष्टि-चिंतकांनी विश्वगूढ भेदिले
गुरुपदीच शोभतो प्रिय महान हिंदुस्थान ।। १ ।।
जाहली प्रसन्न येथ जान्हवी भगीरथा
सिद्ध सूर्य कोंडण्यास ब्रह्मपुत्र सर्वथा
यत्न हाच मंत्र देइ प्रिय महान हिंदुस्थान ।। २ ।।
सरेल दैन्य येथले सुबुद्ध कष्ट सिंचता
बहरतील वैभवे ध्यासबीज पेरता
शतयुगे अदीन हा प्रिय महान हिंदुस्थान ।। ३ ।।
असंख्य ज्योति चेतवून एक आरती तुझी
असंख्य सूर मेळवून एक अर्चना तुझी
हृदयपुष्प वाहिले पदी तुझ्याच हे महान ।। ४ ।।