लेख क्र. ५४
२३/०८/२०२५

‘यज्ञ’ या मासिकाच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती विशेषांक, दिपावली २००८’ मध्ये डॉ. मनीषा शेटे यांचा जैन धर्माचा परिचय करून देणारा लेख प्रकाशित झाला. जैन धर्म आपल्याला नि:श्रेयसाचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग शिकवतो. हा मार्ग शिकवणारे तीर्थंकर व या मार्गावर जाताना आवश्यक असणारी तत्वे आणि त्यातून मिळणारे फळ यांचीही माहिती या लेखात आहे. असा हा लेख पर्युषण पर्वाच्या निमित्ताने येथे पुनर्प्रकाशित करीत आहोत.
जैन धर्मविचार
रागद्वेषादि दोषान् वा कर्मशत्रून् जयतीति जिनः, तस्यानुयायिनो जैनः । – ज्यांनी काम, क्रोध, मद, मोहादि अठरा दोषांना म्हणजेच रिपूंना जिंकले ते जिन व त्यांचे अनुयायी म्हणजे जैन. जैन धर्माचे सार किंवा वैशिष्ट्य या व्याख्येत पूर्णत्वाने आले आहे.
जैनांचे चोवीसावे म्हणजेच शेवटचे तीर्थकर प्रभू महावीर यांचा काळ २५५७ वर्षापूर्वीचा मानला जातो व त्यांच्या पूर्वी तेवीस तीर्थंकर होऊन गेले आहेत. यावरून जैन धर्माची पाळेमुळे भारतभूमीत किती खोलवर रूजली आहेत याचे अनुमान करता येते. महावीरांच्या काळात १६ महाजनपदे भारतात अस्तित्वात होती. जैन धर्माचा प्रसार करताना महावीरांचा अनेक राजांशी संपर्क आला. त्यासाठी महावीरांनी भारतभर पदभ्रमण केले. जैन धर्माला त्यामुळे बऱ्याच अंशी राजाश्रय मिळाला. मगध येथील नंद राजे, तमिळनाडूचे चौल, पांड्य नंतर कुशाण, राष्ट्रकूट कलचुरी यांनी जैन धर्माला आपलेसे केले. महाराष्ट्रात कोल्हापूर व पैठण ही जैनांची प्रमुख धर्मपीठे होती असा उल्लेख मिळतो. महावीरांनी चारही वर्गातील समाज स्त्रिया व पुरुष यांना एकत्र आणले व जैन धर्माची दीक्षा दिली.
आजच्या जैन धर्माचे विस्तृत स्वरूप जैनांच्या चोवीस तीर्थकरांमुळे निर्माण झाले. या चोवीस तीर्थंकरांत ऋषभदेव हे आद्य तीर्थंकर व महावीर हे चोवीसावे म्हणजे शेवटचे तीर्थंकर. मधल्या बावीस जणांची नावे याप्रमाणे – अजित, संभव, अभिनंदन, सुमती, पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभ, पुष्पदंत, शीतल, श्रेयांस, वासुपूज्य, विमल, अनंत, धर्म, शांती, कुंथू, अरह, मल्ली, मुनिसुव्रत, नमी, नेमी व पार्श्वनाथ या साऱ्यांनी निर्मोही वृत्तीने व व्रतस्थ राहून समाजासाठी अलौकिक कार्य केले.
धर्माचे प्रयोजन
कोणत्याही धर्माची रचना ही व्यक्तीला अभ्युदय व निःश्रेयस यांची प्राप्ती करून देण्यासाठी असते. समाजाची स्वतःची अशी एक भूमिका नसते. परंतू त्या त्या समाजाला एकत्रित आणणारा धर्म व्यक्त्तिची व तदनुषंगाने त्या समाजाची उन्नती घडवून आणतो. ‘धर्म’ या शब्दातील ‘धृ’ म्हणजे धारण करणे तर धर्म म्हणजे पालन करणे. ‘धरति लोकान् ध्रियते पुण्यात्मभिः इति वा’ म्हणजे जो लोकांना धारण करतो किंवा पुण्यात्मा लोकांकडून जो धारण केला जातो तो धर्म. जैमिनी, व्यास, कणाद आदि आचार्यांनी धर्माची निरनिराळी व्याख्या केली आहे. यातील कणादांनी केलेली व्याख्या विशेष अप्रतिम आहे. वैशेषिक सूत्रामध्ये ते म्हणतात धर्म म्हणजे तरी काय हो? तर – यतोऽभ्युदय-निःश्रेयससिद्धिः स धर्मः । याचा अर्थ ज्या योगे अभ्युदय व निःश्रेयस यांची प्राप्ती होते तो म्हणजे धर्म. अभ्युदय म्हणजे लौकिक जीवनात लागणारे ऐहिक सुख तर निःश्रेयस म्हणजे पारलौकिक जीवनाकडे नेणारा मार्ग. व्यक्तीच्या जीवनात एकदा उत्कर्ष झाला की त्याने निःश्रेयस या उन्नतीच्या शेवटच्या पायरीकडचा प्रवास सुरू करावयाचा जेणेकरून संसारबंधनातून मुक्ती मिळेल. पण मुक्तीचा मार्ग सोपा नाही. सारेच जण उच्चतपी होऊ शकत नाहीत. संसारात राहूनही जीवनशुद्धी करता यावी याचे मार्गदर्शन करणारा तो खरा धर्म.
आचार्य ऋषभदेव व प्रभू महावीर
जैन धर्माचे आद्य आचार्य ऋषभदेव व शेवटचे प्रभू महावीर यांनी आपल्या अनुयायांना संसारात राहूनही निःश्रेयसाकडे वाटचाल कशी करावी याचे मार्गदर्शन केले. हे दोघे या समाजाचे दिशादर्शक होते. जैन धर्म समजून घेत असताना या दोघांचे जीवन चरित्र, त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान व पर्युषण पर्व यांचा समग्र विचार करावा लागतो.
ऋषभेदवांचा जन्म नाभिराज व मरूदेवी यांच्या पोटी झाला. सुनंदा व सुमंगला या सुंदर युवतींनी त्यांचे पत्नीपद भूषविले. भरत, बाहुबली, ब्राह्मी इ. अपत्यांचा जन्म त्यांच्या पोटी झाला. ऋषभदेवांचा जन्म ज्या काळात झाला त्याकाळी समाज अप्रगत अवस्थेत होता. ऋषभ देवांनी तत्कालिन समाजाला ऋषि, असी, मसी, वाणिज्य व विद्या यांची दीक्षा दिली. समुद्रपर्यटन, शेती, चित्रकला, वास्तुकला, व्याकरण, संगीत वादन यामध्ये लोकांना पारंगत केले. ऋषभदेव हे खरे कर्मयोगी होते. त्यांना प्रजेने राजा म्हणून स्विकारले. लोक त्यांना आदराने आदिनाथ म्हणू लागले. राज्यव्यवस्था निर्माण झाली, समाजाचा उत्कर्ष झाला, ऋषभदेवांचे निर्मोही मन त्यांना संसारापासून दूर नेऊ लागले. सारे कामकाज मुलांच्या स्वाधीन करून धन, धान्य, संपत्तीचा त्याग करून ऋषभदेव जंगलात निघून गेले. संसारात राहूनही अलिप्त राहणे, सर्व सुखे हात जोडून पुढे उभी असतानाही वैराग्य पत्करणे, यातून त्यांनी समाजाला निवृत्ती धर्माची दीक्षा दिली. संसारातील कर्तव्ये पूर्ण झाल्यावर त्यातून बाहेर पडता यायला हवे अन्यथा आत्मिक उन्नती होऊ शकत नाही हेच त्यांनी दर्शविले. ‘संसार करावा नेटका’ या उक्तीप्रमाणे ते स्वतः वागल्यामुळेच त्यांच्या अनुयायांच्या मनातील कर्तव्यभावना जागृत राहिली असे दिसते. जैन धर्माच्या सर्वांगिण उत्कर्षामागे ऋषभदेवांची प्रवृत्ती व निवृत्ती यांची शिकवण दिसते.
ऋषभदेवांनंतरच्या बावीस तीर्थंकरांनी समाजाला पुढे नेण्याचे कार्य जोमाने केले. भगवान महावीर हे या परंपरेचा कळसाध्याय आहेत. ऋषभदेवांनी त्यांच्या शंभर पुत्रांना उपदेश करताना म्हटले, “पुत्रहो हे शरीर कष्टदायक आहे म्हणून तुम्ही अनंत सुखाची प्राप्ती करून घ्या. जोपर्यंत शरीरातील जीव कर्मकांडात गुंतून पडतो तोपर्यंत सर्व कर्मे, प्रलोभने शरीर मनाद्वारा आत्म्याला गुंतवून ठेवतात जणू काही सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपट. पण जेव्हा या विकारांपासून मुक्तता मिळते तेव्हा जीव मुक्त होतो व परलोकाची प्राप्ती त्याला होते.”
वर्धमान महावीर लिच्छवी या गणराज्याचे राजपुत्र! सिद्धार्थ महाराज व त्रिशलादेवी यांच्या समृद्ध राज्याचे वारस. वयाच्या तिशीतच सर्वस्वाचा त्याग करून ते तीर्थंकर बनले. परंतू तीर्थंकर झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला जाणले व मुक्तीचा उपदेश केला. साधु, संन्यासी जीवनमुक्त होत असताना समाजापासून दूर जातात. महावीरांनी मात्र केवलज्ञानाची प्राप्ती झाल्यावर अनेक वर्षे लोकांना प्रेमाचा अहिंसेचा उपदेश केला. ते संपूर्ण देशात फिरले. त्यांच्यामुळे जैन धर्माला राजाश्रय मिळाला.
अहिंसा, सत्य, अस्तेय व अपरिग्रह या चार तत्त्वांचा सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला. अहिंसा या शब्दाचा साधा सोपा सरळ अर्थ सगळ्यांना ठावूक आहे. दुसऱ्या जीवाची हत्या न करणे म्हणजे अहिंसा हा तो वरवरचा अर्थ, प्रत्यक्षात अहिंसेचा अर्थ व्यापक आहे. कारण हिंसा ही मानसिक, वाचिक व कायिक म्हणजे शारीरिक असते. अपरिहार्य कारणाने होणारी हिंसा ही काही वेळा अटळ असू शकते परंतू या हिंसेपेक्षाही लोभ, विद्वेष यांनी होणारी हिंसा अधिक गंभीर व खोल परिणाम करते ती दिसत तर नाही पण अधिक वेगाने पसरते. ह्या प्रकारची मानसिक व वाचिक अहिंसा संयमाने थांबविणे म्हणजे अहिंसा तत्वाचे पालन करणे. सत्य तत्त्व अंगिकारणे म्हणजे खऱ्याची कास धरणे, पदोपदी खोट्याचा आश्रय घ्याव्या लागणाऱ्या आजच्या युगात या तत्वाचे पालन करणे किती अवघड? तिसरे तत्व, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. जे आपलं नाही त्याची अभिलाषा धरून आपला व्यवहार न करणे. चौथे तत्त्व अपरिग्रह, मानवाला परमेश्वराने पशु पक्ष्यांपेक्षा अनेक देणग्या सढळ हाताने दिल्या ज्यामुळे तो परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करू शकतो. पण या गुणांबरोबरच काही अवगुणांचे ही दान दिले. त्यातील एक अवगुण आहे ‘तृष्णा’ किंवा हव्यास! त्यासाठी तो सतत कशाच्यातरी मागे धावत राहतो. संग्रहाची आवश्यकता गृहस्थ धर्माचे पालन करणाऱ्यांसाठी. पण किती संग्रह करायचा त्याचे काही मोजमाप असू शकते का? सौ हाथोंसे इकठ्ठा करो लेकिन हजार हाथोंसे बाँटो, म्हणजेच अपरिग्रह. जैनांच्या पाच अणुव्रतांमध्ये गृहस्थाचे आचरण कसे असावे यावर मार्गदर्शन केले आहे. ज्यामध्ये वरील चार व्रते तर येतातच पण पाचवे व्रत ही तितकेच महत्त्वाचे, ते आहे स्वदारा संतोष व्रत म्हणजे फक्त स्वस्त्रीशी रममाण होणे. परस्त्रीची अभिलाषा न करणे. स्त्रीचा आदर महावीरांनी आग्रहपूर्वक केलेला आहे. स्त्रियांना भिक्षू संघात श्रमणांच्या बरोबरीने स्थान मिळाले ते महावीरांमुळे. जैन मुनीं इतकेच कठोर नियम साध्वींसाठी आहेत. निःश्रेयस म्हणजेच मुक्तीच्या मार्गावरून होणारी खडतर वाटचाल. ऋषभदेव किंवा महावीर यांनी जीवनाचा केलेला सम्यक विचार त्यांच्या तत्वज्ञानातून दिसतो. अनेक संक्रमणातून जात असताना आजही जैन धर्म पालक किंवा जैनानुयायी काही विशिष्ट नियमांचे पालन निष्ठापूर्वक करतात.
पर्युषण पर्वाचा काळ
जैनांच्या विविध सणांपैकी वर्षाऋतूत येणारा पर्युषण पर्वाचा काळ हा सर्वार्थाने जैन धर्म तत्त्वांचे सार आबाल वृद्धांच्या मनावर बिंबवण्यासाठी आहे. चोवीस तीर्थंकरांच्या तत्त्वज्ञानाचा जैन धर्मियांवर प्रभाव आहेच पण त्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधी प्रत्येकाला पर्युषण पर्वामध्ये मिळते. श्रावक व श्राविक यांना अभ्युदयाकडून निःश्रेयसाच्या वाटेवर हलकेच बोटाला धरून घेऊन जाणारे पर्व म्हणजे पर्युषण पर्व. ‘निशिथचूर्णी’ या जैनांच्या ग्रंथात एक कथा आहे. कालक आचार्य वर्षावास करण्याच्या हेतूने उज्जैन नगरीत दाखल झाले. वर्षावास म्हणजे चातुर्मासाचे चारही महिने एकाच ठिकाणी राहून श्रमण व श्रमणी यांनी कठोर नियमांचे पालन करावयाचे, तर याच हेतूने कालकाचार्य उज्जैनीला गेले खरे, पण तिथला राजा रागावला होता. ते पाहून कालकाचार्य तिथून प्रतिष्ठानपूर येथे जाण्यास निघाले. तिथल्या सातवाहन राजाने आदरपूर्वक आचार्यांना आपल्या नगरात नेले. भाद्रपद शुक्ल पंचमीपासून पर्युषणपर्व सुरू करावयाचे असे आचार्यांनी जाहीर केले. राजाने विनयपूर्वक विनंती केली की, या दिवशी इन्द्रमहोत्सव आहे तेव्हा आपण पंचमी ऐवजी षष्ठीला पर्वाची सुरुवात करूयात का? आचार्य उद्गारले ‘हे शक्य नाहीं’ शास्त्रानुसार पंचमीचे अतिक्रमण होऊ शकत नाही. लगेच राजाने विनंती केली की असे असेल तर आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाच पर्युषण सुरू करायचे का? आचार्यांनी या पर्यायाला स्वीकृति दिली. पर्युषण ला प्राकृत भाषेत पज्जोसवण म्हटले जाते. त्याव्यतिरिक्त पज्जोसमणा (पर्युपशमना), परिवसणा (परिवसना), पज्जुसणो (पर्युषण), वासावास (वर्षावास) पागइया (प्राकृतिक), पढमसमोसरण (प्रथमसमवशरण) अशी बरीच पर्यायवाची नावे आहेत.
क्षमा करा व क्षमा मागा
श्री जैन धर्मात श्वेतांबर, दिगंबर असे दोन पंथ व शाक्य, तापस, गरुक, आजीवक असे वेगवेगळ्या वृत्तीचे साधु आहेत. या साऱ्यांसाठी पर्युषण पर्व आहे. जैन परंपरेप्रमाणे आषाढी पोर्णिमेला सांवत्सरिक वर्ष संपते व श्रावण प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होते. आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद शुक्ल पंचमी यातील कोणताही एक दिवस पर्युषणाचा असू शकतो.
पर्युषण कशासाठी? महावीरांची दोन वचने आहेत. कडाण कम्माण न मुक्ख आत्थि – केलेल्या पापकर्माचे फळ भोगल्याशिवाय पापकर्मातून सुटका होत नसते. तसेच, कम्मस ते तस्स उपेयकाले न बन्धवा बन्धवयं उवेन्ति – केलेल्या कर्माचे बरे वाईट फळ भोगण्याची पाळी जेव्हा येते तेव्हा ते आपल्यालाच भोगायला लागते. कुटुंबातील मंडळी अशा वेळी दूर जातात. आप्तस्वकीय पाठ फिरवितात त्यामुळे पर्युषण पर्वाच्या काळात क्षमायाचनेला फार महत्त्व आहे. क्षमा करणे व क्षमा मागणे यासारखा सोपा मार्ग कोणता असू शकतो?
पर्युषण पर्वाच्या काळात श्रावक, श्राविका यांनी व श्रमण व श्रमणी यांच्यासाठी पाळावयाचे नियम दिले आहेत. श्रमण व श्रमणी यांनी कठोर साधनेद्वारे जे मिळवायचे तेच गृहस्थाश्रमियांनी संसारात राहून मिळवायचा प्रयत्न करावयाचा असतो. संन्यास मागपिक्षा हा मार्ग अधिक खडतर काट्याकुट्यांनी भरलेला. यासाठी श्रावकाने मोह, आसक्ती, ममत्वापासून दूर राहायचे. त्यानंतरच उपासकाला श्रावकत्व प्राप्त होते. श्रावक व श्राविका यांना प्रत्यक्ष श्रमण व श्रमणिंच्या मातापित्याचे उच्चस्थान दिलेले आहे. पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस म्हणजे संवत्सरी त्यालाच क्षमापना म्हटले आहे. वैर विझवायचे, प्रेमाचा आपुलकीचा झरा वाहता ठेवावयाचा. फक्त माणसांचीच नव्हे तर ८४ लाख जीवयोनींची क्षमा या दिवशी मागावयाची व निःश्रेयसाकडे पुढची पावले टाकायची.
व्रताचरण
जैन धर्माच्या तत्वज्ञानात पांच अणुव्रते, तीन गुणव्रते, चार शिक्षा व्रते, नवकार मंत्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पाश्चात्य तत्वज्ञानात Know thyself, Accept thyself, be thyself अशा Phrases सांगितल्या आहेत. ज्याला जैन दर्शनात सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र म्हटले आहे. हे सर्व जाणून कशासाठी घ्यावयाचे?
तामिळनाडूतील आचार्य पदुमनार यांच्या नालदियर नावाच्या ग्रंथात अनेक जैन मुनींच्या रचना आहेत. या रचना मूळ तामिळमध्ये असून त्यांचा हिंदी अनुवाद असा आहे – दिवस शीघ्र है बीतते, बिना कहे अनजान, मृत्यू देव भी क्रुद्ध हो, आ जाता अनजान। अर्जित धन औ भाग्य सब क्षण भंगुर सतिशील इसलिए अर्जित करो पुण्य पुंज दृढशील॥ Do your duties knowing the instability of all thing. time flies! Death comes! म्हणूनच मुक्तीच्या वाटेकडे सतत चालत राहायचे, जीवनशुद्धीसाठी संयम, तपस्या, त्याग यांचा उत्कटतेने स्विकार करावयाचा. असा हा अभ्युदय व निःश्रेयस यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजेच जैन धर्म!