सांगा हो, सांगा ही
नवलाई, ही स्फूर्ती येथे कसली?
ऐका हो, ऐका हो
शिवभूमि आजला नवेच लेणे ल्याली ! ।। ध्रु. ।।
हा चकित थबकला गुंजवणीचा ओघ
हो काय वर्तले ? पुसती विस्मित मेघ
वरुषा शतकांचे मौन सोडुनी अपुले
ही पर्वतराजी हळूच हसुनी वदली
शिवभूमि आजला नवेच लेणे ल्याली ! ।।१ ।।
स्मरला सर्वांना तो शिवमंत्रित काल
तो ध्यास भारल्या श्वासांचा लयताल
ती रक्तामधली सळसळ फिरुनी येथे
नवरूप नवे आकार घेऊन आली
शिवभूमि आजला नवेच लेणे ल्याली! ।।२ ।।
हो उदंड येथे नीतिमंत श्रीमंती
या घराघरांतुन वसो क्षेम-सुख शांती
आनंदवने भुवने उभवू या येथे
या संकल्पासह पदे रोविली पहिली
शिवभूमि आजला नवेच लेणे ल्याली ! ।।३ ।।
श्रम उद्योगांचे कल्पतरू फुलवावे
हे स्फुरण येथुनी दिशांतराला जावे
शिवभूमी सुजला सुफला व्हावी म्हणुनी
ही शपथकंकणे आज करी बांधियली
शिवभूमि आजला नवेच लेणे ल्याली ।।४ ।।