वरदविनायक, हे संचालक, युवजन नायक नमो
हे संचालक नमो॥ध्रु.॥
तुम्ही अम्हाला इथे शिकविले इतरांसाठी जिणे
घोर जरी अंधार भोवती तरुणांनी का भिणे?
उज्ज्वल माझा दिवस उद्याचा सर्वांसाठी असो
एक एक जोडीत जीवना जनसंघटना दिसो
स्वप्न असे हे तुम्हि दिधलेले प्रतिदिन आम्हा गमो॥१॥
मत्सर आहे, मस्ती आहे, पुंडजनांची भीती
दारिद्य्राचा शाप सनातन, दांभिकता ही नीती
शब्द-वेष-देशांच्या भिंती, लढत शेकडो जाती
धमन्यांमधुनी रक्त एक परि पूर्ण लोपली नाती
अशा आपुल्या हतबल देशा सुधारण्या मन रमो॥२॥
बुद्धिमंत हो पूर्ण समर्पित, विद्या हो व्रतदायी
लाचारीचा अंश नसावा समाजसेवेपायी
धर्म बनावा समाजधारक विद्वत्ता उपयोगी
निराधार खेड्यात सुखाची स्वप्ने व्हावी जागी
असे प्रबोधन हे आजीवन तुजसम आम्हा जमो॥३॥