गावासाठी जेथे झटती रंकासोबत अवघे राव|
अभंग निर्मळ जसा आरसा ऐसे माझे नमुनागाव॥ध्रु.॥
मुसळधार आभाळझडीने या मातीचे गेले फूल
रानखाटिकांना ही विकली अम्हीच माती, पडली भूल
गावपुढारी सफेद झाले मातीपासून गेले दूर
उन्हाळवेळी झरे आटता शिवार झाला हा भेसूर
नवे कराया तरीहि वाव, चला मिशीवर मारा ताव॥१॥
फुटे भावकी तुटे गावकी ज्याचा त्याचा तो मुखत्यार
बिनकष्टाचे चंगळवादी शहरी पैसे झाले फार
रानमळ्यातील घामापेक्षा ठरला तगडा केवळ दाम
झगमगीत शहरी भपक्याला भुलले खेडे करी सलाम
सावरायला आहे वाव, शहरे फसवी, सोडा राव॥२॥
आम्हीच केली उजाड अमुची गावे दुर्लक्षित अनिवार
रानवनाची हिरवी छत्री जाळुन केला नग्न शिवार
कुणा न पर्वा गावशिवेची बघत राहिलो लूट अपार
आजवरी जे बिघडवले ते फिरुनी घडवू हिरवे गार
नवे कराया आहे वाव, एकजुटीने घालू घाव॥३॥
आभाळीची झेली गंगा शिवशंभूची रानजटा
आडचरातुन फिरता मुरुनी थबकुन राहील ऐलतटा
इथली माती इथे थांबली निर्मळ झाले पाणवहाळ
बारा महिने पाणवठ्यावर उगवे गंगा सांजसकाळ
करता आपण आहे वाव, नवे रचू या, होईल नाव॥४॥