परत फिरा रे

परत फिरा रे गावाकडती, घेउन नव विज्ञान
विहंगमांनो ! तुम्हाला मायभूमिची आण ॥ध्रु॥

गावोगावी पिढ्यापिढ्यांची तीच दुर्दशा ठरलेली
दारिद्य्राचा शाप सनातन मुळी न आशा उरलेली
उजाड राने पाण्यावाचून भेगाळत ही पडलेली
कितीहि करूनी कष्ट आमची गणिते सारी चुकलेली
या रानांचा कायापालट, करील कोणी मांडून ठाण
या भूमीला देइल जोडून, नव्या युगाचे तंत्रज्ञान
वळविल पाणी, टिकविल माती, पिकविल मोती रानोरान
परत फिरा रे गावाकडती पेरा ताजे तंत्रज्ञान ॥१॥

गावशिवारे लुटण्यासाठी कितीक टोळ्या झटतात
पत्थर, पाणी, मनुष्य, माती सगळे अलगद लुटतात
भकास करिती गावपांढरी विकास ऐसे देऊन नाव
राजकारणी हातचलाख्या निव्वळ चोरा येतो भाव
शहरी भपका भुलवित जाय, गावकुसातून काढी पाय
पुन्हा कुणी तरी म्हणेल काय, पवित्र माझी काळी माय
इथे पराक्रम हिरव्यारानी, इथेच उद्यम, इथेच मान
परत फिरा रे गावाकडती नवे निर्मिण्या तंत्रज्ञान॥२॥

जुन्या पुराण्या प्रथा पद्धती घट्ट उराशी धरणारे
रीतीभाती जुन्या त्याच त्या मठ्ठपणे अनुसरणारे
अज्ञ समजुती वेडी वैरे चिवटपणे मति धरणारे
असे लोक हे खेडोपाडी उत्तम तेच विसरणारे
तर्काचा घेऊन वसा, शास्त्राचा उमटवी ठसा
नवे व्यवस्थाशास्त्र दिसे, लोकसंघटन तंत्र असे
घेउन येवो कुणी विवेकी सुपुत्र फुंको येथे प्राण
परत फिरा रे गावाकडती घेउन उजवे तंत्रज्ञान ॥३॥