संघर्ष करू, सहकार्य करू, नवजीवनमाग ध्यास धरू
या गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥ध्रु॥
आयुष्य असे फरफटणारे, मंजूर नसे येथून पुढे
भवितव्य उजळ होणार कधी, हा प्रश्न मनाला सतत पडे
कोणी न दुजे वाटते खडे, आम्हास रडे अमुचेच नडे
मग अस्मानी आव्हान बडे, हे हसतमुखाने पार करू
या गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥१॥
आम्हास अम्ही लेखता कमी, अडवील कसे दुनियेस कुणी
चालते जयांची मनमानी, त्या पुरुषांना मानले कुणी
दुनियेत बरोबर नरनारी, येथेच अशी का शिरजोरी
आम्हीच शिकू, स्पर्धेत टिकू, मिळवून मान मग घरदारी
जर अम्हाबरोबर मैतरणी, अडचणी खरोखर दूर करू
या गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥२॥
कर्जात बुडाला शेतकरी, पोरांस नोकरी ना दुसरी
बेबनाव गावागावात, एकीचे नाव न कोण करी
हे पुरे अशिक्षित गावकरी वळणात जुन्या, संपले तरी
मग राजकारणी बहकावी, गावास लुटाया ढोंग करी
हे असे खुंटता गाव, चला गं प्रपंच गावाचाहि करू
या गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥३॥