एखाद्या संघटनेच्या कामाचा पसारा वाढत जातो, त्या प्रमाणात तिच्या सदस्यांच्या नित्य कामाच्या जागांमधले भौगोलिक अंतर वाढत जाते. संघटनेतील काहीजणांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सदस्यांध्ये संपर्क टिकवून ठेवण्याचे काम करावे लागते. ठिकाणानुसार परिस्थिती बदलत जाते. परिस्थितीतील बदलांना वेगवेगळ्या ठिकाणचे सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. स्थानिक प्रश्नांना स्थानिक उत्तरे काढली जातात.
अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सदस्यांना आपले काम एका सूत्रात चालले आहे किंवा कसे हे तपासण्यासाठी काही मार्गदर्शक मुद्दे माहीत असण्याची आवश्यकता असते. ज्ञान प्रबोधिनीच्या बाबतीत सुरुवातीला कामाच्या निवेदनाची त्रैासिक सभा असे. मग विस्तार वाढल्यावर छापील स्वरूपात प्रथम त्रैासिक वृत्त व त्यानंतर मासिक वृत्त निघू लागले. अशा रचनेमधून हे मार्गदर्शक मुद्दे मिळत असत.
कालांतराने कामाच्या प्रकारांमध्येही इतकी विविधता आली की केवळ कामाचे निवेदन ऐकून किंवा वाचून त्यातून आपल्या कामाच्या परीक्षणासाठी नेमके मार्गदर्शक मुद्दे काढणे एकट्या दुकट्या सदस्याला अवघड जाऊ लागले. म्हणून मग मासिक वृत्तामध्ये कामामागील विचारांच्या एखाद्या पैलूकडे लक्ष वेधणारे एक छोटेसे सदर प्रबोधिनीचे माननीय संचालक ‘प्रकट चिंतन’ या नावाने लिहू लागले.
या ‘लिखाणा’चा हेतू वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि पुण्यातही प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या विभागांधील सदस्यांनी, त्या त्या महिन्यातील प्रकट चिंतनातील मुद्दयाच्या आधारे एकेकट्याने किंवा गटाने आपापल्या किंवा सर्वांनी मिळून चालविलेल्या कामाचे परीक्षण करावे, आपल्या कामाच्या पद्धतीत किंवा त्याच्या उद्दिष्टात अधिक परिणामकारकतेसाठी काही बदल करणे आवश्यक आहे का याचा विचार करावा, असा असे.
एप्रिल 1994 ते मार्च 1997 अशी सलग 3 वर्षे हे सदर लिहिल्यावर त्यातील काही लेख संकलित स्वरूपात प्रकाशित केले तर एकत्रितरित्या वाचताना त्या लेखांमधील प्रबोधिनीचा ध्येयविचार आणि कार्यविचार सुलभपणे समजू शकेल, असे मा. संचालकांना वाटले; त्यामुळे निवडक लेखांची एक पुस्तिका ‘प्रकट चिंतन’ याच नावाने प्रकाशित केली. त्यामध्ये सोळा लेख होते. त्यानंतर एप्रिल 1997 ते मार्च 2000 या काळातील प्रकट चिंतनपर आणखी सोळा लेख आता या दुसऱ्या पुस्तिकेमध्ये संकलित केले आहेत.
पहिल्या पुस्तिकेत 1) प्रबोधिनीची वैशिष्ट्ये 2) उत्तमता आणि 3) कार्यकर्त्यांची लक्षणे अशा तीन गटांध्ये लेखांची वर्गवारी केली होती. या दुसऱ्या पुस्तिकेत 1) संघटनेचे पर्यावरण 2) घडविता, मिळविता, विकसावे व 3) आमचे व्यवहार्य आदर्श अशा तीन गटांध्ये लेखांची रचना केली आहे. त्यातील अनेक विषय खरे तर कोणत्याही संघटनेतील सदस्यांना आपापल्या कार्याचे आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करायला उपयोगी पडू शकतील, असे आहेत. म्हणूनच या दुसऱ्या लेखसंग्रहाला प्रकट चिंतन : पुस्तिका 2 म्हटले आहे.
—– प्रकाशक