१. सामूहिक द्रष्टेपणा
यंदा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण झाले. त्या दिवशी रात्री अनेकांनी ते ग्रहण अनेक ठिकाणांहून पाहिले. कोणी नुसत्या डोळ्यांनी पाहिले. आणखी कोणी दुर्बिणीतून पाहिले. विविध शक्तीच्या अनेक दुर्बिणी अनेक गच्च्यांमधून व टेकड्यांवरून ग्रहणाच्या आधीपासूनच चंद्राकडे रोखल्या गेल्या होत्या. ज्यांनी नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पाहिले, त्यापेक्षा जास्त तपशील दुर्बिणीतून पाहणाऱ्यांना बघायला मिळाले. दुर्बिण जितकी जास्त शक्तिशाली तितके जास्त तपशील बघायला मिळाले. तपशील कमी-जास्त असले तरी अनेकांनी ते बघितल्यामुळे खग्रास चंद्रग्रहण कसे असते याची एक प्रतिमा प्रत्येकाच्या मनात व समाजमनातही तयार झाली. आधीची प्रतिमा काही प्रमाणात दुरुस्त, परिपूर्ण, दृढ झाली. ज्यांनी प्रत्यक्ष चंद्रग्रहण पाहिले नाही, त्यांपैकी काहींनी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातली छायाचित्रे पाहिली. इतर अनेकांनी ग्रहणाबद्दल केवळ ऐकले. ऐकून, अप्रत्यक्षपणे पाहून, प्रत्यक्ष पाहून, दुर्बिणीतून पाहून, अशा अनेक मार्गांनी एक प्रतिमा समाजमनात पूर्वीपेक्षा अधिक स्थिर झाली.
ऐकून, अप्रत्यक्षपणे पाहून, प्रत्यक्ष पाहून, दुर्बिणीतून पाहून अशा अनेक मार्गांनी एक प्रतिमा समाजमनातपूर्वीपेक्षा अधिक स्थिर झाली.
चंद्रग्रहण ही तटस्थपणे पाहण्याची घटना. आपण त्यात काहीच ढवळाढवळ करू शकत नाही. अशी भौतिक घटना पाहून त्याबद्दलची प्रतिमा स्थिर व्हायला कमी अडचण येते. अनेकांच्या वागण्यामुळे समाजात घडत असलेल्या घटना तटस्थपणे पाहणे अवघड असते. आपल्या मन:स्थितीचा परिणाम घटना अनुभवत असताना, अप्रत्यक्षपणे पाहताना, त्याबद्दल ऐकताना होत असतो. कोणी म्हणतात पन्नास वर्षांत भारताची अधोगती झाली. कोणी म्हणतात प्रगतीच झाली. कोणी म्हणतात घसरगुंडी चालूच राहणार. कोणी म्हणतात भारत लवकरच महासत्ता बनणार. ज्याचा आवाज मोठा, जो सातत्याने बोलत राहतो, ज्याच्यावर इतरांचा वेिशास जास्त, त्याच्या बोलण्याचा, सांगण्याचा इतरांवर परिणाम जास्त; चंद्रग्रहणाच्या दृश्य प्रतिमेच्या परिणामाइतका समाजस्थितीचा परिणाम सरळ मार्गाने होत नाही. अनेकांच्या मनातील सद्य:स्थितीबद्दलच्या प्रतिमांची घुसळण होऊन त्यातून समाजमनात सद्य:स्थितीची प्रतिमा तयार होते.
समोर घडत असलेल्या वास्तवाची प्रतिमा तयार व्हायला इतकी अडचण, तर जे अजून घडायचे आहे अशा भवितव्याची प्रतिमा तयार व्हायला किती अडचणी येत असतील? अशी प्रतिमा तयार होत असतानाच तिला धक्का बसतो, अकल्पित घडते. भवितव्याची प्रतिमा पुन्हा पहिल्यापासून तयार करावी लागते. भवितव्य म्हणजे नेमके काय? दैनिक लॉटरीच्या दुकानांध्ये गर्दी करणारे तरुण, रिकामटेकडे आणि श्रमजीवी झटपट, विनाश्रमाच्या श्रीमंतीची स्वप्ने बघत असतात. लॉटरी लागली तर मिळणाऱ्या पैशाचे काय करायचे याची स्वप्ने त्यांनी पाहिलेली असतात. लॉटरी लागणे ही भविष्यातील एक घटना. ती लागलीच तर काय करायचे याची स्वप्ने म्हणजे मनोरथ रचणे. नाही लागली म्हणजे मनोरथाचा भंग झाला. हातात नसलेल्या घटनेवर पुढचे मनोरथ रचणे म्हणजे काही भवितव्य पाहणे अथवा भविष्यवेध घेणे नाही.
हातात नसलेल्या घटनेवर पुढचे मनोरथ रचणे म्हणजे काही भवितव्य पाहणे अथवा भविष्यवेध घेणे नाही.
तुल्यबळ खेळाडूंमधला टेनिसचा सामना किंवा तुल्यबळ संघांमधला क्रिकेटचा सामना कसा शेवटाला जाईल हे सांगणे कठीण असते. टेनिसमध्ये एकेका फटक्यामुळे व क्रिकेटमध्ये एकेका चेंडूमुळे सामन्याचे भवितव्य हेलकावे खात असते. दोन्ही बाजू जिंकायचेच या ईर्ष्येने खेळत असतात. टेनिसमध्ये तर कोणीतरी जिंकेपर्यंत खेळ चालूच राहतो. क्रिकेटमध्ये एखाद्या वेळी सामना अनिर्णीत राहू शकतो. निर्णय लागला नाही तर सगळेजण हळहळतात. विजयाची इच्छा आहे. जिंकण्यासाठी आवश्यक तो सराव, डावपेच सगळे तयार आहे. दोन बाजूंपैकी एकाच बाजूला जय मिळणार हे माहीत आहे. तरीही हरल्यावर पुढच्या सामन्यासाठी पुन्हा तयारी सुरू करायची. जिंकण्याची जबरदस्त इच्छा, जिंकण्याच्या दृष्टीने तयारी पण अनेक वेळा समोरच्या बाजूची इच्छा आणि तयारी यावर यश अवलंबून ! केवळ जिंकण्याची इच्छा, अजिंक्यपदाची महत्त्वाकांक्षा याने भविष्यवेध पुरा होत नाही.
सर्व देशांची संरक्षण दले देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने वीस-वीस वर्षे, चाळीस – चाळीस वर्षे पुढच्या परिस्थितीचे अंदाज बांधत असतात. आजच्या युगात फक्त शस्त्रसज्जतेबाबतचे अंदाज करून पुरत नाही. विज्ञानातील प्रगती, लोकसंख्येचे प्रमाण, शिक्षणाचे प्रमाण, परकीय संस्कृतींचा देशावरील परिणाम, अंतर्गत भांडणे वाढण्याच्या संभाव्य जागा आणि कारणे या सगळ्यांचाच अंदाज घेणे चांगल्या संरक्षण दलांमध्ये सतत चालू असते. असंभव ते होण्याची शक्यता गृहित धरून त्याला तोंड देण्याच्या योजना व त्यांचा सराव संरक्षण दलांध्ये चालू असतो. यशस्वी उद्योगपती त्यांच्या दूरदृष्टीमुळे यशस्वी होतात. संरक्षण दलांध्ये सामूहिक दूरदृष्टीचा वापर चालू असतो पण केवळ सामूहिक दूरदर्शीपणा म्हणजेही भविष्यवेध घेणे नाही.
केवळ जिंकण्याची इच्छ, अजिंक्यपदाची महत्त्वाकांक्षा याने भेवष्यवेध पुरा होत नाही.
स्वयंप्रेरित लोक स्वत:च्या वेळापत्रकाप्रमाणे काम करतात. त्यांना नवीन सुचत असते. त्यातले जे योग्य वाटेल ते स्वत:च्या हिंमतीवर ते करायला घेतात. अनेकांना आपल्या योजनांच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने ते आपल्या कामाला जोडून घेतात. केवळ कोणत्याही परिस्थितीला प्रतिसाद देण्याची तयारी ठेवणाऱ्या संरक्षण दलांच्या दूरदृष्टीपेक्षा वाळवंटात नंदनवनाचे स्वप्न पाहणारे स्वयंप्रेरित लोकांचे द्रष्टेपण आणखी चांगले. अशा द्रष्ट्या लोकांची स्वप्ने जिथे साकार होतात, त्या देशाचे संरक्षण करण्याचा संरक्षण दलांचा उत्साह आणि जिद्दही वाढते. द्रष्ट्या लोकांवर अवलंबून राहणारा समाज अडखळत पुढे जातो. एका व्यक्तीनंतर दुसऱ्या स्वयंप्रेरित द्रष्ट्या मार्गदर्शकाची वाट पाहत राहतो. अजेय समाजाला आपल्यातीलच मार्गदर्शकांवर अवलंबून राहणेही सहन होत नाही. अशा समाजाला सामूहिक द्रष्टेपणा निर्माण करावा लागतो. सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे खग्रास चंद्रग्रहणाची एकच प्रतिमा समाजमनात निर्माण होते, तसे आपल्या भवितव्याची सर्वांना माहीत असलेली प्रतिमा सामूहिक द्रष्टेपणा असलेल्या समाजात तयार होते. सामूहिक द्रष्टेपणा वाढविण्याची प्रक्रिया म्हणजे भविष्यवेध घेणे.
२. भवितव्याचा वेध
काही शब्दांना असे सामर्थ्य येते की जणू काही ते शब्द वापरल्यानेच तसे घडणार आहे, असे वाटायला लागते.
नवीन काळासाठी नवीन शब्द
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे महाअधिवेशन कलकत्त्याला झाले. त्याला समांतर अधिवेशन खासदार ममता बॅनर्जी यांनी एक दिवस आधी भरवले होते. आपल्या गटाला त्यांनी ‘तृणमूल’ काँग्रेस असे नाव दिले आहे. ‘ग्रासरूट्स’ हा इंग्रजी शब्द अनेक वर्षे प्रचारात आहे. त्याचे शब्दश: भाषांतर प्रथमच वापरलेले दिसले. ‘तृणमूल’ म्हणजे सर्वसामान्य माणसांची काँग्रेस.
ज्यांचे आयुष्य दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांशी झगडण्यातच जाते, असे सर्व लोक म्हणजे समाजाची तृणमूल पातळी. अगदी जमिनीलगत असलेली; त्यांच्या आधाराने समाजाचा पिरॅमिड उभा राहातो. ‘तृणमूल’ काँग्रेस जगली तर ‘तृणमूल’ शब्दसुद्धा प्रचारात येईल. मग आपण देखील एकमेकांना विचारायला लागू की प्रबोधिनीचे काम ‘तृणमूल’ पातळीवर चालू आहे का? काही शब्दांना असे सामर्थ्य येते की जणू काही ते शब्द वापरल्यानेच तसे घडणार आहे असे वाटायला लागते. भवितव्य लेख या शब्दाला देखील आपल्या कामानेच वलय मिळणार आहे.
भविष्यकाळ खात्याचा मंत्री
अडीच-तीन वर्षांपूर्वी जर्मनीच्या मंत्रिमंडळात एकनवीन खाते तयार करण्यात आले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पूर्वी जलसंधारण खाते निर्माण केले गेले. कारण तो शब्द आणि त्यामागची संकल्पना महत्त्वाची वाटायला लागली. त्यापूर्वी भारताच्या मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास खाते तयार झाले. कारण त्या शब्दातही नवीन काळासाठी काहीतरी विशेष आशय भरला आहे, असे वाटत होते. तसेच हे जर्मनीतले भविष्यकाळ खाते. शिक्षण, विज्ञान, संशोधन व तंत्रज्ञान या तीन खात्यांच्या एकत्रीकरणातून काही शब्दांना असे सामर्थ्य येते की जणू काही ते शब्द वापरल्यानेच तसे घडणार आहे, असे वाटायला लागते. भविष्यकाळ खाते तयार करण्यात आले. पुढील शतकात जर्मनी आर्थिकदृष्ट्या शक्तिसंपन्न व गुंतवणूकदारांचे आकर्षण बनलेला देश व्हावा म्हणून ही आतापासूनची तयारी. ’इनोव्हेशन’ (नूतनीकरण) ही भविष्यकाळाची गरज आहे. ’केवळ राजकारणाने नूतनीकरण होणार नाही म्हणून या वेगळ्या खात्याची रचना केली’ असे या खात्याच्या पहिल्या मंत्र्याने आपल्या खात्याचे धोरण जाहीर करताना सांगितले. शिक्षण आणि संशोधन यांचा परस्पर संबंध वाढावा आणि तंत्रज्ञानाचे नूतनीकरण करण्यासाठी उद्योगांनी संशोधन करावे व त्यातून नूतनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आणावा, अशी आपली इच्छा असल्याचे या मंत्र्याने सांगितले.
अनेक लोकांनी कामाची आव्हाने स्वीकारली आणि प्रतिभेने व कार्यक्षमतेने ती कामे पूर्ण केली की त्यातून भविष्यकाळ घडतो.
योजना तत्र दुर्लभा
आपले धोरण जाहीर केले त्याच भाषणात या मंत्र्याने नंतर सांगितले की या खात्याकडून गैरवाजवी अपेक्षा करू नका. भविष्यकाळाची आरेखने ड्रॉईंग बोर्डवर काढता येत नाहीत किंवा मंत्रालयातल्या टेबलांवर भविष्यकाळ घडत नाही. ज्यांच्याकडे कल्पना आहेत अशा अनेक लोकांनी कामाची आव्हाने स्वीकारली आणि प्रतिभेने व कार्यक्षमतेने ती कामे पूर्ण केली की त्यातून भविष्यकाळ घडतो. आमचे खाते तंत्रज्ञानाच्या नूतनीकरणाला वेग आणणार म्हणजे भविष्यकाळासाठी शैक्षणिक जगत्, उद्योग जगत् आणि संशोधन जगत् यांच्यामधली देवाण-घेवाण जाणीवपूर्वक वाढवणार. त्यातून नूतनीकरणाची बीजे रोवली जातील. ज्याची योजना करता येत नाही असा भविष्यकाळ योजनेप्रमाणे घडविण्याचा हा एक शासकीय प्रयत्न. प्रबोधिनीमधला भवितव्य लेख हा असाच एक पण अशासकीय प्रयत्न आहे.
जिरायती कार्य आणि बागायती कार्य
योजनापूर्वक वेळ, पैसा, श्रम, साधने या सगळ्यांचा वापर करून काम करणे हे अधिक चांगले. हे बागायती कार्य.
जिरायती शेती बेभरवशाची समजली जाते. पावसाच्या वेळापत्रकानुसार पेरणीचे वेळापत्रक ठरणार आणि पुढे पावसाच्या लहरीवरतीच शेते पिकणार. पृथ्वीच्या पाठीवर पूर्णपणे पावसाच्या लहरीवर दहा हजार वर्षे तरी शेती चालू आहे. त्यातली अनिश्चितता संपवण्यासाठीच बागाइत सुरू झाली. जिराइत शेती प्रामाणिकपणे केली व बागाइत प्रामाणिकपणे केली तर बागायतीत पाणी देण्याचे वेळापत्रक आपल्या हातात असल्यामुळे जास्त उत्पन्न मिळू शकते. प्रामाणिकपणाच्या जोडीने तंत्रज्ञान कामाला आले तर परिणाम जास्त. बागायतीमध्ये ठिबक सिंचन हे आणखी पुढचे प्रगत तंत्र. पाणी देण्याचे वेळापत्रकच नाही तर पाण्याचे प्रमाणसुद्धा प्रत्येक रोपाला मोजून देण्याचे.
सुचेल ते आणि सुचेल तेव्हा, जमेल तसे करणे हे जिरायती कार्य आहे. काहीच न करण्यापेक्षा असे करणे हे निश्चितच चांगले. पण योजनापूर्वक वेळ, पैसा, श्रम, साधने या सगळ्यांचा वापर करून काम करणे हे अधिक चांगले; हे बागायती कार्य. डोळस प्रयत्नवादावर भर देणारे. पण कोणतेही न्यून नसलेली योजना करणे दुर्लभ आहे. एखादा कार्यक्रम – काही तासांचा – नियोजनाप्रमाणे तंतोतंत करणे शक्य आहे. पण उपक्रमाचा कालावधी लांबला की त्यात अनिश्चितता – आश्चर्याचे धक्के – अनपेक्षित लाभ कवा हानी इत्यादींचा शिरकाव होतो. दीर्घकालीन काम करणाऱ्यांना या सगळ्यांवर मात करण्याचीही योजना करावी लागते.
भविष्यचित्रे रंगवणे म्हणजे योजनांची योजना
प्रत्येक भविष्य चित्रामध्ये आपण काय करायचे हे ठरवून ठेवणे म्हणजे भविष्यवेध घेण
आश्चर्यावर मात करणे, अनपेक्षिताला तोंंड देणे आणि आपल्याला पाहिजे त्याच दिशेला जात राहणे यातून आपल्याला पाहिजे तसा भविष्यकाळ घडवता येईल . आपल्याला पाहिजे तो भविष्यकाळ म्हणजे ‘इष्ट’ भविष्य. त्याचे एक चित्र आपण रंगवले पाहिजे. पण तेच घडेल असे नाही. इतर काहीसुद्धा घडू शकेल. अशी अनेक ‘शक्य’ भविष्यांची चित्रेसुद्धा रंगवता येतील. या प्रत्येक भविष्यचित्रामध्ये आपण काय करायचे हे ठरवून ठेवणे म्हणजे भविष्यवेध घेणे. प्रबोधिनीमध्ये आपण हे करू इच्छितो. त्यातून आपण तृणमूल काम करायचे, की गगनचुंबी काम करायचे, की दोन्ही करायचे ही सर्व शक्य भविष्यचित्रे जसजशी रंगवत जाऊ तसतसे आपले इष्ट भविष्यचित्र प्रत्येकाच्या मनात स्पष्ट होत जाईल
३. वर्तमानकाळाचे विस्तृतृत भान
दोन प्रकारची तंत्रे वापरावे लागतात….. क्षणात घडलेल्या हालचाली प्रत्यक्षापेक्षा काहीपट संथ गतीने दाखवतात……….…. दुसरे तंत्र द्रुत गतीने घटना दाखविण्याचे.
एखादा विषय शिकविण्यासाठी चित्रपट्टिका तयार करत असताना दोन प्रकारची तंत्रे वापरावी लागतात. काही क्षणांत घडणारी घटना उलगडून दाखविण्यासाठी त्या क्षणात घडलेल्या हालचाली प्रत्यक्षापेक्षा काही पट संथ गतीने दाखवतात. उंच उडी, जिम्नॅस्टिक्स्, पोहणे, धावणे इत्यादी क्रीडास्पर्धांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर चालू असते, तेव्हा निर्णायक प्रसंग नंतर संथ गतीने दाखवलेले बघायला मिळतात. अशी संथगतीची चित्रपट्टिका वारंवार पाहून नवीन खेळाडू आपल्या हालचालींमध्ये दुरुस्त्या करून अधिक कौशल्य मिळवतात. एखाद्या अपघाताचे चित्रण संथ गतीने पाहिले की अपघात कशामुळे झाला हे कळायला मदत होते.
दुसरे तंत्र द्रुत गतीने घटना दाखविण्याचे. एखादे फूल उमलायला काही तास लागतात. सतत कळीकडे पाहत राहिले तरी कळी पूर्ण उमलण्याचा नेमका क्षण पकडणे कठीण असते. पण ही प्रक्रिया द्रुत गतीने काही सेकंदांत किंवा एखाद-दुसऱ्या मिनिटात चित्रपट्टिकेमध्ये दाखवली की फूल उमलण्याची प्रक्रिया स्पष्टपणे समजते. कोंबडीचे पिल्लू अंड्याबाहेर येणे ही काही तासांची प्रक्रिया आहे. झाडाची पाने गळून पडणे, वाळवंटात वाऱ्याने वाळूच्या टेकड्या सरकणे ही काही दिवसांची प्रक्रिया आहे. गर्भाची वाढ होणे ही काही महिन्यांची प्रक्रिया आहे. एखादे शहर वसणे ही काही दशकांची प्रक्रिया आहे. पाण्याच्या प्रवाहाने खडकांची झीज होणे ही काही शतकांची प्रक्रिया आहे. या सर्व प्रक्रिया द्रुत गतीने पाहिल्या की त्या आपल्या समजण्याच्या आवाक्यात येतात. मग त्या बदलांचा अभ्यास करता येतो.
आपला आजचा दिवस चांगला जाण्यासाठी भूतकाळातल्या – घटनांचा चांगला परिणाम लागतो आणि भविष्यकाळातल्या चांगल्या इच्छाही लागतात.
संथ गतीने किंवा द्रुत गतीने एखादी घटना किंवा प्रक्रिया पाहणे हे चलचित्रणामुळे शक्य झाले आहे. आपले आकलन त्यामुळे वाढते. आपल्याला ठराविक गतीनेच घटना पाहण्याची शक्ती आहे आणि सवय झालेली असते. संथ किंवा द्रुत गतीने चित्रपट्टिका पाहण्याचे तंत्र आल्यामुळे अनेक गोष्टी नव्याने लक्षात येतात. जे यंत्राच्या साहाय्याने करतो ते मनाच्या मदतीने करता येते का? आपण वर्तानकाळात जगत असतो. बहुतेकांचा वर्तानकाळ एक दिवसाचा असतो. कालचे काल झाले. उद्याचे उद्या पाहू. असे त्यांचे असते. पण कालचे, परवाचे आणि आणखी भूतकाळातले प्रसंग आजच्या दिवसावर काहीतरी परिणाम करत असतात. त्याचप्रमाणे उद्या काय घडावे, परवा काय घडावे, त्यानंतर पुढे भविष्यकाळात काय घडावे अशी जी आपली इच्छा असते त्या इच्छेचाही काहीतरी परिणाम आपल्या आजच्या दिवसावर होत असतो. आपला आजचा दिवस चांगला जाण्यासाठी भूतकाळातल्या घटनांचा चांगला परिणाम लागतो आणि भविष्यकाळातल्या चांगल्या इच्छाही लागतात. आपल्या मनातल्या आठवणी आणि स्वप्ने आपला आजचा दिवस घडवीत असतात.
काहीजणांच्या आजला फक्त कालच्या आठवणी आणि उद्याची स्वप्ने अशा मागच्या पुढच्या एकेका दिवसाची जोड असते. आठवडा, महिना, वर्षभर पुढे-मागे जाऊ शकणारे काही लोक असतात. आपल्या आजच्या कामावर इतिहासाच्या जाणिवेने जेवढा परिणाम होतो तेवढे आपल्याला इतिहासाचे भान आहे, असे म्हणता येईल. पुढे काय झाले पाहिजे या जाणिवेतून आज आपण जेवढे काम करतो तेवढे आपल्याला भविष्याचे भान आहे, असे म्हणता येईल. इतिहास-भविष्याचे आपले भान जेवढे वाढेल तेवढा आपला वर्तानकाळ आजच्या दिवसाच्या दोन्ही बाजूला पसरेल. तो तो दिवस म्हणजे वर्तानकाळ असे न म्हणता त्या त्या दिवसाच्या पुढची मागची काही वर्षे मिळून आपला वर्तानकाळ होतो असे वाटायला लागेल
इतिहास-भविष्याचे आपले भान जेवढे वाढेल तेवढा आपला वर्तानकाळ आजच्या दिवसाच्या दोन्ही बाजूला पसरेल.
ज्यांचा वर्तानकाळ जेवढा व्यापक तेवढा त्यांचा पुढचा काळ आजच्याशी जोडलेला दिसायला लागेल. पुढचा विचार करणे म्हणजे आजचाच विचार करणे असे वाटायला लागेल. असा व्यापक वर्तानकाळ असलेल्यांना भविष्यवेध घेणे सोपे आहे. कारण भविष्यवेध घेताना ते आजचाच विचार करत असतात. एखादी प्रक्रिया द्रुतगतीने पाहण्यासारखे हे आहे. वर्तमानकाळ व्यापक करणे हे विचाराच्या दृष्टीने द्रुत गतीने चित्र पाहण्यासारखे आहे. तर वर्तानकाळ छोटा करणे हे कृतीच्या दृष्टीने संथ गतीने चित्र पाहण्यासारखे आहे.
‘आज करे सो अब’ म्हणजे वर्तानकाळ एका दिवसाहून लहान करून एका तासाइतका, एका मिनिटाइतका लहान करण्यासारखे आहे. काम चांगले होण्यासाठी एकाग्रता लागते. ती एकाग्रता त्या त्या क्षणाला मागचा-पुढचा क्षण विसरून जाण्याने मिळते. हातातल्या कामामध्ये स्वत:ला पूर्ण हरवून जाणे म्हणजे तो तो क्षणच वर्तानकाळ आहे असे मानून काम करणे. काम करणाऱ्याला एकेक क्षण म्हणजे जणू सर्वस्व असते. तो वर्तानकाळाची व्याख्या करताना महाकंजूष बनतो. प्रत्येक क्षणाला जाणीवपूर्वक वर्तानात राहणारे कामाचे पर्वत उभे करू शकतात. विचार करणाऱ्याला वर्तमानकाळची व्याख्या करताना उदार व्हावे लागते. पुढची मागची पाच-पाच वर्षे, दहा-दहा वर्षे म्हणजे वर्तानकाळ असे म्हणावे लागते. काम करणारेच जेव्हा काम ठरवणारे असतात तेव्हा त्यांना आपला वर्तानकाळ लवचिक करावा लागतो. काम करताना क्षणाएवढा लहान केलेला वर्तानकाळ काम ठरवताना काही वर्षांएवढा मोठा करावा लागतो. भविष्यवेध घेणे म्हणजे आपल्या मनातील व्यापक वर्तानकाळाचा ‘आँखों देखा हाल’ वर्णन करून सांगणे आहे.
काम करताना क्षणाएवढा लहान केलेला वर्तमानकाळ काम ठरवताना काही वर्षांएवढा मोठा करावा लागतो.
४. प्रेरणा आणि सहभाग
परवा एका ज्येष्ठ मित्राबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलणे चालले होते. बुद्धिबळ खेळणारा संगणक, कविता लिहिणारा संगणक, चित्रे काढणारा संगणक, मान्सूनचा अंदाज वर्तवणारा संगणक या सर्वांमधून बुद्धिमत्तेचीच झलक दिसत असते. संगणकशास्त्रामध्ये अधिकाधिक प्रगती होऊन मानवी मेंदूपेक्षा कार्यक्षम संगणक तयार करण्याचे स्वप्न अनेकांच्या मनात असते. असा संगणक तयार झालाच तर त्याची कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेवर मात करील का? या प्रश्नावर आम्ही बोलत होतो.
जोपर्यंत संगणक अशा व्हाॅल्टेज स्टॅबीलायझरवर अवलंबून आहे तोपर्यंत संगणकाची बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेच्या वरचढ होणे शक्य नाही.
गप्पा संपल्यावर मला एकदम सुचले की हे होणे शक्य नाही. याचे कारण व्होल्टेज स्टॅबिलायझर ! कोणताही संगणक घेतला तरी त्याला लागणारी ऊर्जा विजेच्या स्वरूपात पुरवावी लागते. वीजपुरवठा अनियमित असेल तर संगणक नीट चालत नाही. वीज, पुरवठा नियमित असला तरी तो विशिष्ट दाबाने व्हावा लागतो. कमी दाब असला तरी संगणक चालणार नाही आणि जास्त दाब असला तरी चालणार नाही. बाहेरून कमी-जास्त होणारा वीजपुरवठा नियंत्रित करून विशिष्ट दाबाने तो संगणकाला पुरवण्याचे काम व्होल्टेज स्टॅबिलायझर करतो. सगळ्याच विद्युत उपकरणांना व्होल्टेज स्टॅबिलायझर लागतो. तो वेगळा जोडलेला असेल कवा आतमध्येच बसवलेला असेल. परंतु तो अपरिहार्य आहे. जोपर्यंत संगणक अशा व्होल्टेज स्टॅबिलायझरवर अवलंबून आहे, तोपर्यंत संगणकाची बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेच्या वरचढ होणे शक्य नाही.
मानवी बुद्धिमत्तेच्या कामात अशी मर्यादा कोणती आहे? शरीर व मनाचे आरोग्य राखणारा आहार, भावनिक संतुलन, बुद्धीचा नियमित वापर या सर्व गोष्टी व्होल्टेज स्टॅबिलायझरसारखेच काम करतात. या गोष्टी कमी असून चालत नाही. जास्त असून पण चालत नाही. पण या सर्वातून मिळणाऱ्या ऊर्जेशिवाय मानवी बुद्धिमत्ता आणखी एका प्रकारेसुद्धा कार्यरत होते. हा दुसरा मार्ग प्रेरणेचा आहे. प्रेरणेतून मिळणारी शक्ती आहार, व्यायाम, भावनिक संतुलन यांतून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा वेगळीच आहे. या शक्तीला स्टॅबिलायझरचा नियम लागू नाही. तिला एकाच बाजूने मर्यादा आहे. प्रेरणा शून्य असेल तर मानवी बुद्धीसुद्धा काम करत नाही. प्रेरणा खूप वाढली तर एकदम बुद्धी काम करायला लागते. पण याला विजेच्या दाबासारखी मर्यादा नाही. प्रेरणा खूप वाढली तर एकदम बुद्धी कामच करायची थांबली असे होत नाही. बुद्धी अधिकाधिक कार्यक्षम होत जाते. प्रेरणेच्या शक्तीने काम करण्याचा हा दुसरा मार्ग संगणकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला उपलब्ध नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता कधी मानवी बुद्धिमत्तेच्या वरचढ होईल असे वाटत नाही.
प्रेरणा खूप वाढली तर एकदम बुद्धी कामच करायची थांबली असे होत नाही. बुद्धी अधिकाधिक कार्यक्षम होत जाते.
प्रेरणा वाढविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. “जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाउच जाऊ” असे आपण पद्यात म्हणतो. “जिथे जायचे ठरले” हे कसे ठरते? भविष्यवेध घेणे हा एक मार्ग हे ठरवण्यासाठी उपलब्ध आहे. प्रबोधिनीचा भवितव्य लेख तयार करताना भविष्यवेधशास्त्रातली काही तंत्रे आपण वापरली. कुठे जायचे? का जायचे? त्यासाठी काय करायचे? हे स्पष्ट असेल व मनापासून जिथे जायचे ठरले तेथे जावेसे वाटत असेल तर प्रेरणा वाढतेच वाढते. त्यामुळे प्रबोधिनीतील सदस्य आणि विद्यार्थ्यांनी आपापला भविष्यवेध घेऊन स्वत:चा भवितव्य लेख मांडायचा प्रयत्न केला तरच प्रबोधिनीच्या भविष्यवेधातून आपणा सर्वांना वाढती प्रेरणा मिळणार आहे.
माझ्या कल्पनेतील “उद्या” प्रत्यक्षात येण्यासाठी “मला” किती बदलायला हवे याचा विचार आपण करतो का?
प्रबोधिनीतील सर्वांचाच विचार करायचा झाला तर आपण स्वत:, आपले कुटुंब आणि आपला प्रबोधिनीतील विभाग कोणत्या दिशेने चालले आहेत हे आपण किती पाहात असतो? “उद्या” मी स्वत:, माझे कुटुंब, माझा प्रबोधिनीतला विभाग कसा असला पाहिजे याचे काही चित्र आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे का? माझ्या कल्पनेतील “उद्या” प्रत्यक्षात येण्यासाठी “मला” किती बदलायला हवे याचा विचार आपण करतो का? आज मी करत नाही असे मला आणखी काय करायला हवे? आज मी करत आहे असे मला काय थांबवायला हवे? स्वत:च्या भवितव्याचा विचार करताना आपण कितीजणांना तो विचार करण्यात सामावून घ्यायला तयार आहोत? एकाच विभागात, एकाच खोलीत, एकाच प्रकारचे काम करणाऱ्यांच्या मनातली “उद्या” ची कल्पना वेगवेगळी असू शकते. ती परस्परांना सांगून त्यातून आपल्या सर्वांच्या “उद्या” ची कल्पना स्पष्ट होते. प्रबोधिनीचा वीस वर्षांचा भवितव्य लेख प्रत्यक्षात अवतरायचा असेल तर वीस वर्षांनी आपण सगळे कसे असणार आहोत याचे आपापले चित्र आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात तयार व्हायला लागेल.
५. गटाचे सार्वभौमत्व
व्यक्तिगत निर्णय घ्यायला व्यक्ती जशी सार्वभौम असते, तसे गटाचे निर्णय घ्यायला गट सार्वभौम असला पाहिजे.
निर्णयकर्ता कोण?
एका गटातील अनेक सदस्यांनी सुट्टीमध्ये अभ्यास करायचा ठरवला. प्रामाणिकपणे मन:पूर्वक अभ्यास करायची त्यांची इच्छा होती. परंतु ज्या काळात अभ्यास करायचा ठरवले होते तेव्हाच नेमके वार्षिक परीक्षांचे निर्णय लागले. सर्वांचे निर्णय चांगले लागले. परंतु बाहेरील वातावरणामुळे बहुतेकांना आपल्याला पुढील अभ्यासक्रमांमध्ये कुठे प्रवेश मिळेल याची चिंता लागली होती. चिंता करू नये हे खरे. पण चिंताग्रस्त मनाने अभ्यासही नीट होत नाही. त्यामुळे सुट्टीत योजलेला अभ्यास स्थगित करावा, असे अनेकांना वाटत होते. आपण स्वत: योजून जाहीर केलेला कार्यक्रम आता रद्द कसा करायचा? यापूर्वीही घाईघाईने जाहीर केलेल्या काही योजना नंतर ऐनवेळी बदलाव्या लागल्या होत्या. त्या त्या वेळी या गटाला इतरांची बोलणी, टोमणे, चेष्टा ऐकून घ्यावी लागली होती. शेवटी आमच्या गटाचा आम्हीच ठरवलेला कार्यक्रम करायचा की नाही हे आम्हीच ठरवणार अशी हिंमत करून या गटाने अभ्यासाची योजना स्थगित केली. या ठिकाणी निर्णयप्रक्रिया आणि शिकण्याची प्रक्रिया दोन्ही स्वतंत्रपणे बघितल्या पाहिजेत. व्यक्तिगत निर्णय घ्यायला व्यक्ती जशी सार्वभौम असते, तसे गटाचे निर्णय घ्यायला गट सार्वभौम असला पाहिजे.
गटाचे निर्णय कसे घ्यायचे?
प्रत्येकाला स्वत:च्या म्हणण्याला कधी, कशी व किती मुरड घालायची हेसुद्धा शिकावे लागते.
गटामध्ये एखादी व्यक्ती वयाने किंवा अनुभवाने किंवा कर्तृत्वाने किंवा अधिकाराने मोठी असेल तर बऱ्याच वेळा निर्णय घेण्याची जबाबदारी ओघाने त्या व्यक्तीकडे येते. विचारी लोक जाणीवपूर्वक एकत्र येतात तेव्हा सहमतीने-सर्वसंमतीने निर्णय घेता येऊ शकतो. आणीबाणीची परिस्थिती नसेल तेव्हा सहमती होईपर्यंत परस्परांची मते समजून घेण्यासाठी किंवा आपापली मते पटवून देण्यासाठी लागेल तेवढा वेळ घेता येतो. परंतु पुरेसा वेळ नसेल तर मग कोणाला तरी पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा लागतो. काही वेळा विषय महत्त्वाचा नसेल तर सर्वांनी विचार करत बसण्यापेक्षा ज्याला त्या विषयात रस आहे, अनुभव आहे त्याने निर्णय घेतलेला चालतो. गटातील सर्वांच्या सहमतीने निर्णय होणे ही आदर्श स्थिती. निर्णयाची तातडी, विषयाचे महत्त्व, गटातील सदस्यांचा कमी-जास्त अनुभव यामुळे सहमतीने निर्णय होण्याऐवजी गटातील एखादी व्यक्ती निर्णय घेते, ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीत गटातील सदस्यांचा एकमेकांवर वेिशास असणे आवश्यक असते. एकाने निर्णय घेण्यापेक्षा सर्वसंमतीने निर्णय होण्याकडच्या प्रवासामधला टप्पा म्हणजे सहविचारात्मक नेतृत्वपद्धती.
गटामध्ये काय शिकायचे असते?
आपण ठरवलेली गोष्ट पार पाडलीच पाहिजे हा प्रत्येक व्यक्तीने व गटाने शिकण्याचा पहिला धडा आहे. यातून आत्मवेिशास वाढत जातो. एकट्याने शिकण्यापेक्षा गटाने शिकण्याचा आणखी एक पैलू आहे. गटाचा निर्णय व काम चांगले व लवकर व्हावे यासाठी प्रत्येकाला स्वत:च्या म्हणण्याला कधी, कशी व किती मुरड घालायची हेसुद्धा शिकावे लागते. एखादी व्यक्ती स्वत: ठरवलेल्या अनेक गोष्टी पार पाडू शकते. पण कोणत्या तरी क्षणाला इतर लोकांनी ठरवलेल्या गोष्टी जास्त प्रभावी ठरतात. तिथे त्या व्यक्तीला इतरांनी ठरवलेल्या गोष्टींशी जुळवून घ्यावे लागते. त्यातून एखादा गट तयार होतो. हा गटही स्वत: ठरवलेली अनेक मोठमोठी कामे करून दाखवतो. त्या गटाला मग आणखी मोठ्या गटाशी किंवा इतर गटांशी जुळवून घ्यावे लागते. त्यातून नवा मोठा गट तयार होतो. आपण केलेला संकल्प पूर्ण करायला शिकणे व इतरांच्यासाठी आपल्या म्हणण्याला मुरड घालायला शिकणे या दोन्ही गोष्टी व्यक्ती आणि गटाला, गटामध्ये काम करतच शिकाव्या लागतात.
अनेक स्तरांवर अनेक लोकांना नेतृत्वकौशल्ये शिकवायला लागणार आहेत. त्यांच्यामध्ये नेतृत्वाची वृत्ती निर्माण करायला लागणार आहे.
संघटन प्रभागाचा भविष्यवेध
व्यक्ती सार्वभौम असते. तसाच गट पण सार्वभौम असतो. परंतु कोणाच्याही सार्वभौमत्वाला मर्यादा असते. कारण सार्वभौमत्व सापेक्ष असते. या तथ्यांचा विचार करून संघटन प्रभागाचा भविष्यवेध घ्यायला पाहिजे. प्रबोधिनीच्या सध्याच्या भवितव्य लेखात संघटन-प्रभागाचा वेगळा उल्लेख नाही. तथापि, नेतृत्वविकसन व राष्ट्रीय एकात्मता या भवितव्य लेखातील दिशा संघटन प्रभागाच्या वाढीच्याच दिशा आहेत.
सर्वसंमतीने निर्णय होणे ही आदर्श स्थिती असल्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात गटातील कोणाला तरी निर्णय घ्यावे लागतात. अनेक वेळा आधी निर्णय घेऊन मग सर्वांना सहमत करून घ्यावे लागते. प्रसंगी सहमती झाली नाही तरी असहमती असणाऱ्यांनासुद्धा स्नेहाच्या, मैत्रीच्या शक्तीने बरोबर न्यावे लागते. छोट्या गटांपासून प्रारंभ झाला तरी काही प्रसंगी संपूर्ण देशच एक गट म्हणून मानावा लागतो. त्यामुळे अनेक स्तरांवर अनेक लोकांना नेतृत्वकौशल्ये शिकवायला लागणार आहेत. त्यांच्यामध्ये नेतृत्वाची वृत्ती निर्माण करायला लागणार आहे. नेतृत्वविकसन ही संघटन प्रभागाच्या कामाची महत्त्वाची दिशा आहे.
गटाला निर्णयाला व त्यानुसार कामाला प्रवृत्त करण्यासाठी नेतृत्वविकसनाची गरज आहे. तर ‘आपल्या विशिष्ट मताला’ म्हणजे ‘इतरांपेक्षा आपल्यामधील वेगळेपणाला’ मुरड घालून इतरांच्या मताबरोबर जाण्यासाठी त्यांच्याबरोबर एकात्मतेचा अनुभव वाढवण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वविकसनाची गरज आहे तशीच राष्ट्रीय स्तरावरील एकात्मतेची गरज आहे. प्रबोधिनीचे एक स्नेही डॉ. जगन्नाथ वाणी एकदा म्हणाले होते की, ‘कॅनडामधून दहा हजार किलोमीटरवरून पाहिल्यावर कुठली संस्था कुठल्या विचारसरणीची आहे याचा विसर पडून ती भारतीय आहे एवढेच लक्षात राहते’. हा अनुभव आपापल्या गावात राहूनच येणे – देशभराच्या संस्थांच्या आणि व्यक्तींच्या बाबतीत – म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. मतैक्याचे मुद्दे शोधून त्या आधारे कामाला सुरुवात करणे म्हणजे एकात्मता वाढविण्यासाठी काम करणे.
इतरांच्या मताबरोबर जाण्यासाठी त्यांच्या बरोबर एकात्मतेचा अनुभव वाढवण्याची गरज आहे.
संघटनांचे भवितव्य
व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना विस्तारत जात असताना लहान गटापासून पूर्ण देश संघटित करण्याची भाषा किती कालोचित आहे? या प्रश्नाचे उत्तर ‘सार्वभौत्व सापेक्ष आहे’ या सूत्रात आहे. म्हणजेच कामानुसार- काळानुसार एकत्र येऊन काम संपवून अंतर्धान पावणारे लहान मोठे लोकसंघ हवेत आणि साऱ्या जगापेक्षा वेगळा विचार मांडून तो प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणाऱ्या
व्यक्तीही तेवढ्याच हव्याहव्याशा आहेत. व्यक्तीला असे धैर्य देणाऱ्या आणि हजारोंना-लाखोंना सामूहिक कृतीची सवय शिकवणाऱ्या ज्या ज्या व्यवस्था असतील त्या व्यवस्था आणि त्यामध्ये सहभागी असलेले सदस्य मिळून संघटना तयार होते. पुढच्या काळामध्ये अशी संघटना पारदर्शक, समाजाला आणि आपल्या सदस्यांना उत्तरदायी, नवीन व्यक्ती आणि विचारांच्या बाबतीत स्वीकारशील, संघटनेचा वेग सहन न करू शकणाऱ्यांच्या बाबतीत क्षमाशील आणि संघटनेचा वेग व्यक्तीच वाढवू शकतील यावर वेिशास असणारी अशी असायला लागेल. व्यवस्था औपचारिक किंवा उत्स्फूर्त कशीही असली तरी या लक्षणांनी युक्त पुरुषार्थी संघटनाच पुढच्या काळात व्यक्तींना धैर्य देण्याचे व सामूहिक कृतीची सवय लावण्याचे आपले काम करू शकतील.
पुढच्या काळामध्ये अशी संघटना पारदर्शक, उत्तरदायी, स्वीकारशील क्षमाशील असायला लागेल.