मा. यशवंतराव लेले यांनी २०१५ साली लिहिलेला हा लेख आहे.
पृथ्वीवर कित्येक हिमयुगे येऊन गेल्याचा इतिहास आहे. पुढे ते हिम वितळून हा ग्रह पूर्ण जलमय होऊन गेला. क्रमाक्रमाने पाणी बाष्परूपाने कमी होत गेले. त्या भौगोलिक इतिहासाच्या आधारे ‘मनू आणि मासा’ या सारख्या पुराणकथा जगभर निर्माण झाल्या.
शतपथ ब्राह्मणामध्ये म्हटले आहे, ‘इयं वै पृथ्वी भूतस्य प्रलयात् प्रथमजा।(१४.१.२.१). पंचमहाभूतांपैकी ही धरणी ज्येष्ठा आहे, प्रलयातून, प्रचंड जलावरणातून ही वर आली. कृष्ण यजुर्वेदात म्हटले आहे की द्युः म्हणजे आकाश आणि धरणीच्या दरम्यानचे जग हे उदकरूप म्हणजेच हा भूगोल जलमय झाला होता. ‘आप् एव आदौ’ म्हणजे आधी सारे पाणीच होते असे मनुस्मृतीतही म्हटले आहे.
‘प्रजापतीला सर्वत्र पाणीच पाणी दिसल्याने तो रडू लागला. ‘पृथ्वीस वसतियोग्य करून तिच्यावर जीवसृष्टी निर्मिली नाही, तर माझा जन्म व्यर्थ’ असा विचार करून त्याने जे अश्रू गाळले ते त्या पाण्यात पडून आळले व पृथ्वीरूप बनले’ असे काव्यमय वर्णन यजुर्वेदात आले आहे. याचा साधा अर्थ हा की पाणी कमी होत गेले व हळूहळू डोंगरदर्यांनी युक्त अशी भूमी प्रकट होत गेली. मग जीवसृष्टीचा आरंभ झाला. पृथू राजाने ओबडधोबड जमीन सपाट करून निवासयोग्य केली म्हणून या भूमीला पृथ्वी हे नाव मिळाले. भूमीला ७१% जलावरणाने मर्यादित केलेले आहे ते आजही तसेच आहे. ९ मास गर्भजलात राहून जन्मास आलेल्या माणसाच्या देहातही ७१% पाणी असतेच. सार्या अंडज जीवजंतूंचे वास्तव्यही आधी अंड्यातील जलातच असते व नंतर त्यांच्या देहात ७०% जल असतेच. वनस्पतीसृष्टीही जलावाचून असंभव असते. म्हणून माणूस अनेक ग्रहांवरील पाण्याच्या शोधात असतो. पाणी असेल तर आज ना उद्या जीवसृष्टी तेथे उत्पन्न होणे शक्य आहे. प्राणवायू उपलब्ध झाला तर माणूसही तेथे जगू शकेल. पाणी सुकून बनलेल्या कासवाच्या पाठीसारखा खडबडीत खडक क्षारयुक्त असून त्यात रेती, जाड वाळू, लोह आणि सुवर्णकण यांनी भरलेल्या प्रदेशात वनस्पती उत्पन्न झाल्या. तात्पर्य, पाण्यातून जन्मलेल्या पाण्यावर जगणार्या आणि अखेर पाण्याशी एकरूप होणार्या जीवसृष्टीस पाण्यावाचून पर्याय नाही.
शतपथ ब्राह्मणामध्ये पृथ्वीस ‘अग्निगर्भा’ म्हटले आहे. लाव्हा रसाने पृथ्वीचा अंतर्भाग भरलेला आहे हे आधुनिक शास्त्राने दाखवून दिले आहे, ज्वालामुखी पर्वतातून तो अग्नी प्रत्यक्ष उसळून बाहेर येताना दिसतोही. अग्नीप्रमाणे वीज देखील महत्त्वाची ऊर्जा आहे. आज आपण कोयनेच्या पाण्यातून जलविद्युत् तयार करत आहोत. पाण्यातील सुप्त शक्ती प्रचंड कामे करताना व महानगरांना उजळून टाकताना आपण पाहतो.
जलचक्र – ‘ज्या सूर्याने उन्हाळ्यात भूमीवरील उदकाचे किरणांनी द्युलोकी आकर्षण केले त्यानेच पावसाळ्यात द्युलोकापासून वेगळ्या केलेल्या पर्जन्योदकाचा भूमीवर वर्षाव केला’ ह्या शब्दांत कृष्ण यजुर्वेदाने नैसर्गिक जलचक्राचा नेमका उल्लेख केला आहे (प्रपाठक ८, अनुवाक ५). येथे द्युलोकाचा ‘आकाश’ एवढाच अर्थ आहे. पुष्कळ वेळेस काळे काळे ढग आकाशात गर्दी करतात पण वृष्टी न करताच निघून जातात. म्हणून ऋषी वरुणाला उद्देशून म्हणतात,” उदकास अडवून ठेवणार्या मेघाला विदीर्ण करून तू भूतली उदक वृष्टी करतोस, नंतर त्यांना निम्न गतीने समुद्राकडे प्रवाहित करतोस” (प्रपाठक ६, अनुवाक ९).
पुढील एका प्रपाठकात जलाच्या घनरूपाचा म्हणजेच बर्फाचा उल्लेख आला आहे. हिमालयात बर्फरूपात पडणारी उदके इष्टकाच! कृष्णा, गोदा, इ. नावे धारण करणार्या, सतत वाहणार्या नद्या याही इष्टकाच! (प्रपाठक १२, अनुवाक ७), इष्टका म्हणजे हवीहवीशी वाटणारी गोष्ट. आणखी एके ठिकाणी ‘उदकांनो तुम्ही धुक्क्याचे रूप घेतले आहे’ असा वायुरूप जलाचा परिचय ऋषींना होता हे त्यांनी व्यक्त केले आहे.
वायुरूप, प्रवाहीरूप आणि घनरूप ह्या पाण्याच्या तीनही रूपांची ओळख वैदिकांना होती हे वरील संदर्भांवरून समजते.
सातव्या प्रपाठकातील पहिल्या अनुवाकामध्ये म्हटले आहे की पूर्व दिशेने वाहणारा वायू पर्जन्यवृष्टी प्राप्त करून देणारा आहे’. येथे पूर्व दिशेने म्हणजे पूर्वेकडे वाहत जाणारा वारा असा अर्थ घेणे योग्य होईल. त्यामुळे हाच मान्सुनच्या पावसाचा उल्लेख असावा. परंतु येथे नैऋत्य दिशेचा उल्लेख नाही.
औषधियुक्त जल – जंगलामधील वृक्षांवरून खाली येणारे वर्षाजल हे सूक्ष्मरूपाने वनस्पतींचे गुणधर्मही घेऊन येते. मातीतून वाहताना खनिजांचा अंशही पाण्यात येतो. त्यामुळे ऋषींनी ‘समग्र औषधी गुणांनी भरपूर’ असे पाण्याचे वर्णन केले आहे. पाण्याचे वर्णन करताना ‘शक्तिवर्धक, रोगनिवारक आणि सुखदायक’ ही विशेषणे ऋषींनी वापरली आहेत. पाण्याचा शीतल स्पर्श दाह दूर करतो. अशा अनेक कारणांमुळे ‘जलोपचार पद्धती’ ही देखील एक उपचार पद्धती, निसर्गोपचाराचा महत्त्वाचा घटक बनली आहे. महात्मा गांधींनी या उपचारपद्धतीचा स्वीकार केला व मातीच्या उपचारपद्धतीसोबत हिचाही वापर व प्रसार केला. श्री. मणीभाई देसाई यांनी पुण्याजवळील उरळीकांचन येथे निसर्गोपचार केंद्र सुरू केले. तेथे अनेक रुग्ण माती व पाण्याचे उपचार घेण्यासाठी येतात.
‘आपः पृणीत भेषजं, वरूथ तन्वे मम। ज्योक् च सूर्यं दृशे’।(ऋ. १.२३.२१) – ‘हे उदकांनो! चिरकाल सूर्यदर्शन घडावे म्हणजेच दीर्घायुष्य लाभावे यासाठी माझ्या शरीरास औषधांचा पुरवठा करा व माझे रक्षण करा’ असे ऋग्वेदात म्हटले आहे. पाणी हे अमृत आहे, औषधींनी संपन्न आहे. त्याच्या दिव्य गुणांनी आमचे घोडे, गाई, बलवान होवोत अशी प्रार्थना अथर्ववेदात केली आहे (१.१.४). असे हे पाणी घरात पुरेसे असावे अशीही प्रार्थना येथे आहे (१.२.४).
आपण जो भाजीपाला, फळफळावळ, अन्नधान्य खातो, त्यातही ७०% जल असते. काही काळ अन्नशिवाय राहणे शक्य असते परंतु पाण्याविना केवळ अशक्य!
पाण्याचे स्रोत – जगभरात प्राचीन संस्कृतींचा उगम आणि विकास उदंड जलाने भरभरून वाहणार्या नद्यांच्या काठी झाला. या वाहणार्या नद्या धान्योत्पादनकारक असल्याने त्या जणू अन्न उदकांच्या द्वारा निर्वाह करणार्या समाजाच्या निर्मात्याच आहेत. त्या काळी विहिरीसुद्धा असाव्यात. नदीपासून दूरच्या वस्तीत विहिरींमधून उपलब्ध होणार्या पाण्याला उद्देशून ऋषी म्हणतात, “तुम्ही सर्वकाळ नगरातील विहिरीत वास करणारे आहात, म्हणून तुम्ही नगरवासी उदकरूपी प्रजांची वसतिस्थानेच आहात.” जेथे नदी अथवा विहीर नाही तेथे जलाशय तयार करून माणूस राहत होता.
यज्ञयाग करण्याने स्वर्गप्राप्ती होते असे वेदांमध्ये, पुराणांमध्ये म्हटले आहे. परंतु मोक्षप्राप्तीसाठी पवित्र, परोपकारक कृत्ये करावी म्हणजेच पूर्ताचा मार्ग धरावा (इष्टापूर्तं द्विजातीनां प्रथमं धर्मसाधनम्। इष्टेन लभते स्वर्गं पूर्ते मोक्षं च विन्दति।). लहान-मोठ्या विहिरी बांधणे, तलाव निर्माण करणे, मंदिर बांधणे, दीनदलितांचा उद्धार करणे अशा धर्मकार्यासाठी पूर्ताचे फळ प्राप्त होते म्हणजेच मोक्षप्राप्ती होते.
सर्व प्राणिमात्रांची तृष्णा भागविणारे जलाशय स्वच्छ हवेत याचाही पुराणकारांनी विचार केला आहे. पाण्यात मलमूत्रविसर्जन करणे, कपडे धुणे, शरीरावयवाची घाण टाकणे, जलक्रीडा करणे, इ. प्रकारांनी पाणी दूषित करू नये असे ब्रह्मांड पुराण सांगते.त्यातूनही पाणी खराब झाले तर त्याच्या शुद्धीकरणासाठी पंचगव्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. गोमूत्र, गोमय, गोरस, गोघृत, गोदधी एकत्र केले म्हणजे पंचगव्य होते. वाहत्या पाण्यात प्राणवायू मिसळल्यावर पाणी शुद्ध होते. सूर्यप्रकाशानेही काही कृमी नष्ट होतात. हेच सर्व पुढील श्लोकात सांगितले आहे – सूर्यरश्मिनिपातेन मरुत्स्पर्शनेन च। गवां मूत्रपुरीषेण तत्तोयं तेन शुद्ध्यति॥(आपस्तंब २६९.७)
भूजल – निर्झर, नदी, नाले, सरोवरे अशा जमिनीवरील जलाशयांचे महत्त्व ओळखून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना पुराणांनी दिलेल्या आहेत. परंतु भूगर्भामधील पाण्याचा विचार वराहमिहिराने केला आहे. त्याच्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात तो माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे भूमीच्या पोटातील जलवाहिन्यांची दखल घेऊन त्याचा उपयोग कसा करावा, हे सांगतो. वृक्षांची मुळे किती खोलवर जातात, पाण्याचा शोध कसा घेतात, वृक्षांची उंची किती असते, इ. गोष्टींवरून भूगर्भातील पाणी कोणत्या दिशेस किती खोल असू शकते याची माहिती वराहमिहिराने दिली आहे. ती शास्त्रीय आहे हे आधुनिक शास्त्रज्ञांनीही प्रयोगाद्वारे सिद्ध केला आहे.
लोकमाता नदी – पर्वतांवरील गर्द वनांमध्ये नद्यांचे उगम होतात. गंगोत्री, यमुनोत्री, महाबळेश्वर क्षेत्र इ. ठिकाणी अनुक्रमे गंगा, यमुना, कृष्णा-कोयना इ. नद्या उगम पावल्या. हिमालयात प्लक्ष वन होते, त्या वनातून जन्म पावलेली म्हणून सरस्वती नदीला प्लक्षा हे नाव पडले. या नद्यांच्या काठी मोठमोठी नगरे निर्माण झाली, संस्कृती विकसित झाल्या, त्यामुळे त्या नद्यांना लोकमाता म्हणून गौरविले गेले. नद्यांचे उगम असोत, त्यांचे संगम असोत ही सारी स्थाने पवित्र मानली गेली. त्यांच्या काठी घाट बांधले गेले, मंदिरे उभारली गेली, नद्यांचे उत्सव सुरू झाले. यामागे मूळ उद्देश ‘जीवनाचा मूलाधार असलेले जल स्वच्छ, शुद्ध अन् पवित्र राहावे हा असावा.
ह्या पवित्र पाण्याने अमृताभिषेक करण्याची आपली जुनी प्रथा आहे. राज्याभिषेक असो, नवपरिणीत दांपत्य असो, सहस्रचंद्रदर्शनासारखी शांती असो, आप्तेष्टांकडून उत्सवमूर्तीवर पवित्र पाण्याने अभिषेक केला जातो.
प्रजापोषणक्षम सरस्वती नदी वेदकाळी भरभरून वाहणारी नदी होती. तिला यजुर्वेदकर्त्याने प्रार्थना करताना म्हटले आहे, “हे सरस्वती, तुझ्या उदकी जे माधुर्य आहे व अश्वाचे ठायी जे वहनसामर्थ्य आहे त्या सर्वांसह अन्नसमृद्धीयुक्त अशी तू माझे मुख अलंकृत कर”.
अशा ह्या सर्वविध पाण्याच्या उपलब्धतेसाठी, रक्षणासाठी वैदिक वाङ्मयात वरुणदेवाला (जलदेवतेला) प्रार्थना केली आहे की जलाशय नष्ट होऊ देऊ नकोस, त्यांचे रक्षण कर. कारण वरुण म्हणजेच राष्ट्राची संपत्ती आहे (वरुणो वै राष्ट्रश्री:।)
पाणी म्हणजे कोणत्याही राष्ट्राची सर्वश्रेष्ठ संपत्तीच आहे. ती केवळ मानवांचीच नाही तर पशू-पक्षी इ. सर्व जीवांची प्राणशक्ती आहे. म्हणून पाण्याचा अपव्यय करणे, जलाशये दूषित करणे, पाण्याचे स्रोत नष्ट करणे अशा प्रकारच्या कृत्यांसाठी शासनाकडून शिक्षा व्हावयासी हवी, तरच जीवन देणारे पाणी पृथ्वीतलावर राहील.