इतकीच प्रार्थना माझी!

मा. यशवंतराव लेले यांनी लिहिलेला हा लेख छात्र प्रबोधन, २००९ या अंकात प्रकाशित झाला आहे.

प्रार्थना म्हणजे विनंती, याचना किंवा मागणे असा सर्वसाधारण अर्थ! परंतु या शब्दातील ‘प्र’ म्हणजे विशेष, श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट! म्हणून प्रार्थना शब्दाचा अर्थ झाला ‘महत्त्वाचे मागणे’ किंवा ‘विशेष याचना’. आरंभी आपल्या आईकडे मूल भूक भागवण्यासाठी दुधाची जी मागणी करते ती कुरकुरण्याच्या वा रडण्याच्या भाषेत असते. पुढे भाषा अवगत झाल्यावर शब्दरूपाने नाना मागण्यांना प्रारंभ होतो. या मागण्या असतात आई-वडिलांसारख्या मोठ्या माणसांकडे! त्यात खाऊ असेल, खेळणी असतील किंवा चंद्रासारखे ‘हवे ते’ असू शकेल!

व्यक्तिगत प्रार्थना  – आपण खूप मोठ्ठं व्हावं अशी माणसाची इच्छ असते. त्यासाठी वाटेत येणाऱ्या लहान-मोठ्या अडचणी पार कराव्या लागतात. अडचणी ओलांडणे अवघड वाटू लागले की मदतीसाठी माणूस इकडे-तिकडे पाहू लागतो. कोणी भेटलं तर तो त्याला विनंती करून अडचणी ओलांडण्यात यशस्वी होऊ शकतो. पण काही वेळा परिस्थिती अशी येते की ती पालटणे आपल्याला खूप अवघड किंवा अशक्य वाटू लागते. कोणी मदत करू शकेल असेही वाटत नाही. अशा प्रसंगी देवाची आठवण होते. माणूस देवाला मदतीसाठी विनंती करू लागतो. याला आपण प्रार्थना म्हणतो! आपलं काम, म्हणजे ध्येय, जेवढं मोठं, अवघड, तेवढी प्रार्थनेची गरज मोठी हे तर खरंच! पण माणसाने आपली सर्व शक्ती लावून प्रयत्न केल्याविना त्याला दुसरा कोणी मदत करेल असे नाही. अगदी देव देखील प्रयत्नवादी माणसालाच मदत करतात. ‘न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः।’ –  ‘देव हे परिश्रम करणाऱ्याशिवाय अन्य कोणास साहाय्यक होत नाहीत’ असं म्हटलं आहे. स्वप्रयत्नांची शर्थ करून आपले ध्येय गाठणे यास लोक पुरुषार्थ म्हणतात. अशी माणसे आपल्याला आदरणीय वाटतात, मोठी वाटतात. काही वेळा तर त्यांचे मोठेपण येवढे असते की लोक त्यांना ईश्वरी अवतार समजू लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्यप्राय वाटणारे असे स्वराज्यस्थापनेचे कार्य करून दाखवले. मग त्यांना लोकं शिवाचा अवतार म्हणत. हे आपण जाणतोच ! महाराजही ‘आपले’ राज्य असे म्हणत नसत, ‘हे श्रींचे राज्य आहे’ असे म्हणत. ‘युक्ति नाही बुद्धि नाही। विदया नाही विवेकता। नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका अशी प्रभु रामचंद्रांकडे बुद्धिमत्तेची मागणी करणारे समर्थ रामदास प्रयत्नवादाचे प्रबळ पुरस्कर्ते होते, त्यांनी तर प्रयत्नालाच परमेश्वर म्हटले आहे (यत्न तो देव जाणावा). ते म्हणत यत्नाचा पुरुष भाग्याचा। यत्नेवीण दरिद्रता। – खटपट करत राहणे हे भाग्यवंतांचे लक्षण असून कपाळाला हात लावून बसणारा हा दरिद्रीच राहतो’. एकीकडे जाणत्यांची संघटना करीत रामदास प्रार्थना करतात ती बुद्धीसाठी ! प्रेरणा, स्फूर्ती, प्रतिभा, उदंड स्नेहशीलता आणि विवेक बुद्धी असल्या गोष्टी त्यांनी रामाकडे मागितलेल्या दिसतात. संघटनेची वाढ व्हावी यासाठीच तर ते मागतात कोमल, सौम्य भाषा आणि निर्दोष कृती! ते म्हणतात, ‘कोमल वाचा दे रे राम। विमल करणी दे रे राम।’. संघटनेचं बळ हे ईश्वरी कामाला हवं असतं आणि तसं बळ मिळवायला गोड वाणीची नितान्त आवश्यकता असते हे जाणून रामदासांनी गोड भाषा मिळवली आहे. प्रयत्नपूर्वक माणसे जोडण्यासाठी, जाणीवपूर्वक मधुर भाषा कमावण्याचे तप रामदासांनी केले. संघटनेसाठी तर ते म्हणाले, ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’

स्वराज्य हे व्यापक ध्येय, त्यासाठी संघटना हे साधन, संघटना करण्यासाठी माणसे मिळवणे आवश्यक आणि त्यासाठी मधुर वाणी हे साधन! शरीराला जशी अन्नाची तशी आपल्याला प्रार्थनेची जरुरी असते. पुढे ते म्हणतात ‘प्रयत्नाला प्रार्थनेशिवाय पूर्णत्वच येत नाही.’ परमेश्वराचा पाठिंबा नसेल तर उत्तम गोष्टही फलदायी होणार नाही.

श्रद्धा जेवढी मोठी तेवढे यश मोठे. स्वतःचा स्वभाव तुसडा, चिडखोर असेल तर तो बदलावा म्हणून प्रयत्न केले तरच कुटुंबात, समाजात व्यक्ती प्रिय होऊ शकते. आपण प्रिय होण्यासाठी आपणही प्रेम देणारे व्हायला हवे. आपण इतरांचे भले चिंतावे तर लोकही आपल्याविषयी कल्याणाची कामना करतील. म्हणून वेदातील ऋषी म्हणतात,‘तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु। – त्या माझ्या मनी मंगल विचार यावेत.’ माझ्या मनात वाईट, अशुभ, अनिष्ट असे विचार भरून राहिले असतील तर माझा चेहराही प्रसन्न राहात नाही, सारे जग मला प्रतिकूल, वाईट आणि दुष्ट वाटू लागते! म्हणून नकारार्थी, अहितकारी विचार मनातून काढून टाकावे लागतात, असे आपली संस्कृती सांगत आली आहे.‘भद्रं भद्रमिति ब्रूयात्। प्राणैः कंठगतैरपि।’ म्हणजे प्राण कंठाशी आले ना तरीही मंगल, शुभ असच बोलावं!

व्यक्तीच्या विकासासाठी एकेक गुण प्रयत्नपूर्वक मिळवावा लागतो, त्यासाठी बरोबरीने आपल्या आवडत्या देवाची प्रार्थनाही करावी. मनाचे श्लोक त्यासाठी आहेत. आपल्याच मनाला उद्देशून मनःपूर्वक म्हणावे, “जनी निंदय ते सर्व सोडूनि दयावे। जनी वंदय ते सर्व भावे करावे।” – ‘जगाचे दृष्टीने जे जे नावे ठेवण्याजोगे ते ते टाकून दे आणि जगाला जे जे वंदनीय वाटते ते ते तू आवर्जून करत जा’ अशा प्रकारे रामदासांनी आपल्या मनास शिकवण्यासाठी २०५ श्लोकांची रचना केली आहे. आजही अशी रचना करणारी मंडळी सापडतील, मनाचे श्लोक पाठ म्हणणारेही सापडतील; पण समर्थ विचारतात, “अर्थाविण पाठ कासया करावे, व्यर्थची मरावे घोकोनिया। घोकोनिया काय, वेगे अर्थ पाहे अर्थरूप राहे होवोनिया॥” श्लोकात म्हटल्याप्रमाणे आपले आचरण व्हायला हवे. ‘अर्थरूप राहे होवोनिया’ – अर्थरूप होऊन राहणे म्हणजे मनास उद्देशून जे जे चांगले चांगले आहे असे आपण म्हणतो तसे प्रत्यक्ष आचरण सुरू करणे.

सामूहिक प्रार्थना – समर्थ रामदासांप्रमाणे अशा सदाचारी, समर्थ माणसाने मग कल्याणासारख्या शिष्याबरोबरीने म्हणावे, “रक्षावे उभयता, देवा! घेऊ सौख्य बरोबर। पराक्रम करू दोघे। असावे ज्ञान प्रदीपक। नसावा कधिही द्वेष, एकामेकामधे मुळी।” याचा मूळ मंत्र संस्कृतात आहे तो असा – ‘ॐ सहनाववतु सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै। तेजस्विना अवधीतमस्तु। मा विद्विषावहै।’ 

सदाचार संपन्न, स्नेहाने एकमेकांशी निबद्ध झालेले असे लोक एका ध्येयाकडे मग संघटितपणे विजयी प्रवास करू लागतील. मग त्यांची प्रार्थना वेगळी असेल. रामदास हे सूर्याजींचे सुपुत्र. आपण सारे लोकही त्या सूर्यकुलातील घटक आहोत! मग तो दशसहस्रवर्षांचा प्राचीन  गायत्री मंत्र आपण सहस्र सहस्र कंठातून एकदमच म्हणूया – श्रेष्ठ ते सूर्यदेवाचे मनी साठवितो बळ! आमुच्या इंद्रियां देवो प्रेरणा तो सुनिर्मळ। (गायत्री मंत्र – ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात्।) चारही वेदातील हा विश्वामित्र महर्षींचा मंत्र आपापल्या बुद्धीचे तेज वाढावे म्हणून भारतातील सर्वांनी नित्य समजून उमजून म्हणायला हवा. “त्या सूर्यदेवाच्या सोनेरी बिंबाचे आम्ही ध्यान करतो, आमच्या साऱ्यांची बुद्धिमत्ता त्याच्यायोगे अतीव तेजस्वी व्हावी.”

श्रद्धाळू अशा आमच्या सर्वांच्या जीवनात मूर्ती दिसली की लीनता येते, मग सहजच प्रार्थना सुचते – जीवनी जितके मी घेतो, दयावे त्याहून आणखी। इतकीच प्रार्थना माझी, करावी परिपूर्ण ती। (जीवने यावदादानं स्यात्प्रदानं ततोऽधिकम्। इत्येव प्रार्थनाऽस्माकं भगवन् परिपूर्यताम्॥) 

आपण देव मानणारे असलो वा मानणारे नसलो तरी आपण शक्तीची, ऊर्जेची उपासना करू शकतोच की! जशी व्यायामाने आपण शारीरिक ऊर्जा मिळवतो तशी मानसिक, बौद्धिक व आत्मिक शक्ती मिळवण्याची गरज आपल्याला असतेच की! त्यासाठी चराचरातील म्हणजे या विश्वातील जीव आणि जगतापासून; म्हणजे त्यांच्या ठिकाणच्या ऊर्जापासून आपण काही शक्ती मिळवावी. ती कशी? तर सूर्य ही आपल्या पृथ्वीची संजीवन शक्ती आहे हे विज्ञानाला मान्य आहे, म्हणून आपण सूर्याची प्रार्थना करण्यासाठी तर गायत्री मंत्र म्हणतो.

आपण आपापला विकास करण्यासाठी वैयक्तिक प्रार्थना निवडावी व तिच्या योगे शरीर-मन-बुद्धीची उन्नती साधावी. पण आपल्या कुटुंबाची उन्नती व्हावी, समाज प्रगत व्हावा आणि देश आदर्श व्हावा यासाठी सामूहिक उपासना कुटुंबात, मंडळात, शाळेत, संघटनेत अवश्य करावी. आधुनिक काळात अनेक संघटनांनी, संप्रदायांनी अनेक प्रार्थना लोकभाषांमधून रचून ठेवल्या आहेत. या संदर्भात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांनी सर्वांना प्रार्थनेसाठी चित्त अनुकूल करण्यास सुचवले आहे ते म्हणतात, “मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण। मोक्ष अथवा बंधन। सुख समाधान इच्छा ते।”