‘श्रीसद्गुरू साईकृपा’ या मासिकात १९९५ साली प्रकाशित झालेला मा. यशवंतराव लेले यांचा हा लेख.
यज्ञसंस्थेचा उदय झाला त्याकाळी निसर्ग देवतांना आकार दिला गेला नव्हता. अग्नीद्वारा त्या त्या देवतांना आहुती पोहोचतात या श्रद्धेने यज्ञाग्नीमध्ये हवन करण्यात येई. ७-८ हजार वर्षापूर्वी ही यज्ञसंस्था सुस्थिर झालेली होती. पुढे यज्ञात अतिरिक्त पशू बळी दिले जाऊ लागल्याने त्या हिंसेविरुद्ध जैन-बौद्धांनी जनजागृती सुरू केली. या सुमारास निर्गुण निराकार देवतांना सगुण साकार स्वरूपात पूजण्यास प्रारंभ झाला. एकीकडे बुद्धाच्या निर्वाणानंतर त्याच्या मूर्तीची मंदिरात स्थापना सुरू झाली नि यज्ञसंस्थेतील हिंसा कमी होऊन त्याऐवजी मूर्तिपूजेवरचा भार वाढू लागला. नवीन मंदिरांची उभारणी होऊ लागली. यज्ञात पशूऐवजी पिष्ट पशूचा (पिठाचा पशू) बळी देण्यास प्रारंभ झाला. त्याप्रमाणे यज्ञकुंडाऐवजी उपासनेसाठी मंदिराचा गाभारा अधिक वापरात येऊ लागला.
‘यज्ञ करून किंवा तलाव, विहीर असे जलाशय निर्मून जे पुण्य प्राप्त होते तेच देवालय बांधल्यामुळेही मिळू शकते’ हा विचार मांडण्यात येऊ लागला. इतकेच नव्हे तर देवालय निर्मितीने यज्ञाचे पुण्य आणि मंदिरासमोर जलाशय आवश्यक ठरल्याने जलदानाचे पुण्य असे उभयविध पुण्य मंदिर निर्मितीने हाती येऊ लागले. त्यामुळेच वराहमिहिराने म्हटले आहे “कृत्वा प्रभूतं सलिलम् आरामान्विनिवेश्य च। देवतायतनं कुर्याद्यशोधर्माभिवृद्धये।। (बृहत संहिता)”
उदंड उदकाने संपन्न अशा वृक्षवाटिकेमध्ये मंदिर उभारावे. त्यामुळे धर्माचरण होते अन् नावलौकिकही होतो. जलाशय, वृक्षलता कशासाठी हव्यात ? तर देवतांना ही स्थाने आवडतात. तेथे हंस, चक्रवाक इ. पक्षी असतील तर देवतांना ती ठिकाणे विशेषच प्रिय होतात. देवतांना जे प्रिय ते वन ‘देववन किंवा देवराई’ म्हणून सुरक्षित राहू लागले. आज सर्वत्र वनांचा संहार झाला असला तरी बर्याच वनराया सुरक्षित आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात या वनरायांचा मोठा वाटा आहे. देवस्थान परिसरातील जीवसृष्टीही त्या वनामुळे सुरक्षित राहू शकली. देहूच्या डोहातले मासे सुरक्षित राहिले ते देवाचे म्हणून! कुठे मासे तर कुठे माकडे, कुठे मोर तर कुठे साप हे देवाचे म्हणून सुरक्षित राहिलेले आजही आपण पाहतो. सर्व वनस्पती-सृष्टीची आणि जीवसृष्टीची सुरक्षितता ही माणसाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे हे तर पर्यावरण-शास्त्री आज कंठरवाने सांगत आहेत. अशी मानव हितवर्धक देवराई व त्यामधील देऊळ हे जीवनाचे केंद्र बनून गेले. ते कसे असावे ?
भारतीय वास्तूशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार बांधलेले उत्तम मंदिर म्हणजे नाशिकचे राममंदिर! मुंबईतील ठाकूरद्वार येथील राममंदिरही असेच आहे. मंदिराचा मुख्य भाग म्हणजे त्याचा गाभारा. यालाच संस्कृतात गर्भगृह म्हणतात. येथे इष्टदेवतेची मूर्ती स्थापलेली असते. मूर्तीच्या मुखावर मंद प्रकाश पडेल अशी सौम्य प्रकाश व्यवस्था केलेली असते. गाभाऱ्यात उन्हाळ्यात थंड वाटते तर हिवाळ्यात तेथील हवा उबदार असते. अशा या शांत, प्रशांत गाभाऱ्यात नेहमीच अनुकूल हवामान राहते. म्हणूनच वीजेवाचून वातानुकूलित केलेली ही गर्भगृहे असतात असे म्हणता येते. दगडी मंदिरामधील हा अनुभव आधुनिक वास्तूमध्ये येईलच असे नव्हे.
गाभाऱ्यात वैदिक मंत्रध्वनी घुमताना ऐकू येतात. धूपामूळे, शांत वातावरणाने, मंदप्रकाशाने, गंभीर वेदध्वनीने व देवतेच्या अस्पष्टशा पवित्र दर्शनाने मन प्रसन्न होते, एकाग्र होते. म्हणूच ध्यानासाठी असले ठिकाण सुयोग्य ठरते.
ज्ञानेश्वरीत माऊलींनी ध्यानाकरिता योग्य ठिकाणाचे वर्णन करताना म्हटले आहे, “पाऊला पाऊला उदके । वर्षाकाळेही अति चोखे” म्हणजे पावसाळ्यातही स्वच्छ पाणी असाणारा जलाशय हवा. “आतपही आळुमाळू। ऊन हवे पण सौम्यसे। जाणिजे तरी शीतळू। पवनु अति निश्चळु। मंद झुळके।” (वारा नको, पण मंद थंडगार झुळक त्या ठिकाणी येत असावी) अशा स्थानी देवालय असावे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “ऐसा ठाव जोडावा। तेथ निगूद मठ होउवा। का शिवालया॥”
गाभाऱ्याबाहेरील सभामंडपात मोठी जागा असते. येथे कासवाची प्रतिमा कोरलेली असते. बाह्य सुखातून आपली सारी इंद्रिये आत ओढून घेण्यास सांगणारे ते कासव समोरच्या देवतेच्या दिशेने पाहत असते. या सभामंडपात पुराण-प्रवचन होते. पुराणिक आणि प्रवचनकार येथे जीवनातील परमेश्वरी अधिष्ठानाकडे अंगुलीनिर्देश करत असतात.
सभामंडपाच्या बाहेर अर्धमंडप म्हणून एक भाग काही मंदिरामध्ये दिसून येतो. ही जागा आम जनतेची आहे. लोककलांनी येथून लोकभाषांमध्ये ईशस्तवन करावयाचे असते. येथूनही गाभाऱ्यातील देवतेचे दर्शन होते. याहीपेक्षा दूरवरून देवदेवतांचे दर्शन होत जाते तरीही भक्ताचे हात शिखराकडे पाहून जोडले जातातच ! त्या शिखराकडे पाहूनही भाविकांना भगवंत भेटल्याचा आनंद मिळतो ! तेही बरोबरच आहे कारण मंदिराचं शिखर हे ईश्वराचं शिर असं वास्तुशास्त्रात मानलेलं आहे. मंदिर हेच मुळी ईश्वराचं शरीर आहे. प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत हे शरीर पसरलेलं असून प्रवेशद्वारी श्रीचरण कमल तर शिखराचे जागी शिरकमल गृहीत धरतात. मंदिराचं वातावरण निर्मळ राखणं हे किती आवश्यक आहे ते या शास्त्रावरून स्पष्ट होतं. पतितांना पावन करण्याएवढं पावित्र्य त्याचे ठिकाणी दिसायला हवं ! पुजाऱ्यांना हे पावित्र्य रक्षणाचं हे काम आपल्याकडे आलं याचा मोठा अभिमान, आनंद अन् धन्यता वाटायला हवी व त्या भावनेनं त्यांनी मंदिरातील प्रत्येक काम निव्वळ सेवाभावानं करायला हवं. पुजाऱ्यांचा आदर्श परमहंस रामतीर्थ आहेत हे स्मरणात हवं !
गावाबाहेर टेकडीवर काहीसे एकांतात असे वृक्षराजीनी वेढलेले मंदिर असते. तेथे तीर्थयात्रेच्या निमित्ताने गिर्यारोहण सहज करता येते. हिमालयातील गिर्यारोहण तेथील मंदिरांच्या दर्शनाने करता येते, तेही गिर्यारोहणाच्या खास, आधुनिक किंमती साधनसामग्री शिवाय ! मनात भाव पुनीत होण्याचा, पर्वतराजास जिंकण्याचा नव्हे! अशा प्रकारे मंदिरामुळे शांतरसाचे, भक्तिभावाचे महन्मंगल केंद्र उत्पन्न होऊन मानवी विकारांचे उन्नयन होत आले आहे.
आज हिंदूंची ही मंदिरे विद्याकलांची केंद्रे, भक्तिभावाची तीर्थक्षेत्रे अन् मानवाला दिव्य मानव बनवण्याची उन्नयन स्थाने राहिली आहेत का? त्यासाठी ‘शिवो भूत्वा शिवं यजेत’ या वचनाचा अर्थ सर्वांनीच समजून घ्यायला हवा, ईश्वरत्व अंशतः तरी स्वतःच्या ठिकाणी बाणवूनच ईश्वराची खरी भक्ती होऊ शकते हे आपण समजून घ्यायला हवे आहे अन् तदनुसार वागणंही सुधारत गेलं पाहिजे, यासाठी शीख बंधूकडून कारसेवेचं तंत्र शिकून घेऊया. मंदिरात दर्शनार्थ आलेल्यांचे जोडे पुसून जागेवर नीट रांगेत ठेवणे हेही गुरूद्वारातील सेवाकार्य मंत्र्यापासून ते हमालापर्यंत कोणीही विनीत वृत्तीने करत असतो. सर्व गुरूद्वारांच्या दाराशीच पाय धुवून आत प्रवेश करण्याची शिस्त पाळली जाते. मग अन्य पंथीयांची मंदिरे अस्वच्छ का दिसावीत ? मंदिरातून तरी शांतता, प्रसन्नता, निर्मळता, सद्भाव, सदाचार सौजन्याचे दर्शन होऊ लागले तर या गोष्टी समाजात पसरण्याची आशा बाळगता येईल. मंदिर है समाजमनाचं प्रतिबिंबचं नव्हे का!