राम आकाशीं पाताळी । राम नांदे भूमंडळी ।
राम योगियांचे मेळी । सर्व काळी शोभतो ॥धृ ॥
राम नित्य निरंतरी । राम सबाह्य अंतरी l
राम विवेकाचे घरी । भक्तीवरी सांपडे ॥ १ ॥
राम भावे ठायींं पडे । राम भक्तांसी सांपडे ।
राम मीपणें नातुडे । मौन घडे श्रुतींंसी ॥ २ ॥
राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम आनंदरक्षण । संरक्षण दासाचें ॥ ३ ॥
१९७६-७७ च्या थंडीच्या महिन्यांमध्ये युवक विभागाच्या सर्व दलांची सज्जनगडावर निवासी सहल गेली होती. गडावरच्या कार्यक्रमांमध्ये रात्री भजन ठेवले होते. त्यावेळी हा अभंग पहिल्यांदा म्हटला. १९८७ साली युवकांचे एक अभ्यास शिबिर कन्याकुमारीला झाले. तिथे एका संध्याकाळी, पाचशे जण बसतील एवढ्या मोठ्या सभागृहात, समयांच्या मंद प्रकाशात, तीस-पस्तीस जणांच्या गटात मा. आण्णांनी हा अभंग सांगितला. तोपर्यंत म्हणत असलेल्या चालीतच आण्णांनी अभंग सांगितला. मात्र प्रत्येक कडव्यानंतर ते काही काळ थांबायचे आणि मग धृपद सुरू करायचे. संगीतातल्या निःशब्द क्षणांचा अनुभव तेव्हा प्रथम घेतला. प्रत्येक कडव्यानंतर त्या क्षण दोन क्षण शांततेच्या काळातच त्या आधीची दहा वर्षे फक्त म्हणत असलेल्या अभंगाचा अर्थ उलगडत गेला.
सत् म्हणजे अस्तित्व
धृपदामध्ये रामाचे अस्तित्व सर्व ठिकाणी आहे असे सांगितले आहे. इथे स्वर्ग आणि पाताळ हे काल्पनिक लोक सांगितलेले नाहीत. अंतरिक्षाच्या पोकळीचे पृथ्वीमुळे दोन भाग होतात. पृथ्वीच्या वर आकाश आणि पृथ्वीच्या खाली पाताळ. पृथ्वी नसती तर आकाश पाताळ असे भाग न होता केवळ अंतरिक्षच असते. ते अंतरिक्षच पूर्णपणे रामाच्या अस्तित्वाने भरून गेलेले आहे. पृथ्वी आहे, म्हणून राम आकाशात आहे आणि पाताळात आहे असे म्हटले आहे. भूमंडळ म्हणजे पृथ्वीदेखील रामाच्या अस्तित्वाने भरून गेलेली आहे. हे पृथ्वी आणि अंतरिक्षातले अस्तित्व कळणे जरा कठीण. परंतु जिथे जिथे योगी एकत्र जमलेले असतात तिथे रामाचे अस्तित्व लवकर जाणवते. जे शोभून दिसते त्यात राम आहे असे आपण म्हणतो. चैतन्यमय शरीराने चैतन्यमय जगात जगण्यातच राम आहे. चैतन्य हरपले की कशात काही राम नाही असे आपण म्हणतो. सर्व नष्ट झाल्यावरही जे राहते ते अस्तित्व म्हणजे सत् म्हणजेच राम. म्हणून राम सर्वकाळी शोभतो.
चित् म्हणजे जाणीव
या अभंगाच्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये धृपदामध्ये ओळखू आलेलं रामाचं अस्तित्व समजून कसे घ्यायचे हे सांगितले आहे. सर्वत्र भरून राहिलेला राम काही काळ असतो आणि काही काळ नसतो असे नाही. आपण त्याच्याशी एकरूप झालो नाही तरी तो असतोच. म्हणून त्याला नित्य म्हटले आहे. तो निरंतरही आहे. त्याच्या नित्यपणाबद्दल शंका येऊ नये म्हणून निरंतर असे सांगितले आहे.
आपल्याला जे चलचित्र दिसते ते खरे तर अनेक स्थिर प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून वेगाने जातात म्हणून ते चलचित्र वाटते. चित्रपट्टिकेचा वेग कमी झाला तर सुट्या सुट्या प्रतिमा दिसतील आणि चलचित्रामध्ये जाणवणारी एकसंध हालचाल तुटक जाणवायला लागेल. म्हणजे चलचित्रातली दृश्ये मुळात एकसंध नसून तुटक असतात. दाखवण्याच्या वेगामुळे ती एकसंध वाटतात. रामाचे अस्तित्व कशाच्या तरी वेगावर अवलंबून असल्यामुळे नित्य भासते असे नाही. म्हणून त्याला, मध्ये किंचितही अंतर नसलेले असे सलग, म्हणून निरंतर म्हटलेले आहे.
अंतर काळाचे नाही तसेच स्थळाचेही नाही. आकाश, पृथ्वी आणि पाताळ या सगळ्यांमध्ये जसा राम आरपार भरलेला आहे तसाच तो आपल्या शरीराच्या बाहेर आणि आतही आहे. त्याला पृथ्वी अडवू शकत नाही. तसेच आपली त्वचा आणि आतले अवयव पण अडवू शकत नाही. तो बाहेर, आत आणि त्वचा व सर्व अवयवांमध्येही म्हणजेच सबाह्य अंतरी आहे. प्रथम शरीरात स्थिर काय व बदलते काय याचा शोध घेतल्यावर, म्हणजे विवेक केल्यावर, म्हणजेच विवेकाच्या घरी गेल्यावर, त्याची जाणीव होते. बाहेरील जगातील नित्य निरंतर राम आणि आपल्या शरीरातील स्थिर किंवा नित्य तत्त्व वेगळे नाहीत, विभक्त नाहीत, हे अनुभवल्यावर म्हणजे भक्ती केल्यावरच राम खरा सापडतो. जो विभक्त नाही तो भक्त, अशी व्याख्याच रामदासांनी केली आहे. रामाचे अस्तित्व विभक्तपणे म्हणजे वेगळेपणाने सापडणार नाही. रामाशी एकरूप होऊन रामाचे अस्तित्व अनुभवाला येईल.
आधी विवेक, विवेकानंतर भाव
भाव म्हणजे विश्वास. प्रल्हादाचा विश्वास होता की राम आकाशी, पाताळी, भूमंडळी, नित्य, निरंतर, सबाह्य अंतरी आहे. म्हणून तो समोरच्या खांबातही आहे. त्याचा तसा भाव असल्यामुळे खांबातून नृसिंह प्रकट झाला. जिथे जिथे राम आहे असा आपला विश्वास असेल त्या ‘ठायी’, म्हणजे स्थळी, राम ‘पडे’, म्हणजेच प्रकटे किंवा प्रकट होतो. आपण मनाने रामाशी एकरूप झालेलो असलो तरच आपल्या मनात भाव निर्माण होतो. म्हणून राम केवळ भक्तांनाच सापडतो असे म्हटले आहे.
रामाशी एकरूप होणे म्हणजे आपले ‘मी’ पण विसरून जाणे. मी रामापेक्षा वेगळा आहे असे थोडेसे जरी मनात असेल, तर मी आहे याच्याबद्दल विश्वास असतो, पण राम आहे की नाही अशी शंका मधून मधून मनात येऊन जाते. मीपणाची जाणीव शिल्लक ठेवून राम शोधायला गेलो तर तो ‘नातुडे’, म्हणजेच सापडत नाही. श्रुती म्हणजे वेद. आम्हाला राम सापडला असे वेद सांगू पाहतात, तेव्हा त्यांना काहीच सांगता येत नाही. सांगायचे झाले तर राम म्हणजे हे नाही, ते नाही, ‘नेति’, ‘नेति’ अशा नकारात्मक भाषेतच सांगावे लागते. वेदातले एक ऋषी सांगायला गेले तेव्हा ‘हाऽवु हाऽऽवु हाऽऽऽवु’ असे आनंददर्शक उद्गार फक्त त्यांना काढता आले. शब्दात सांगता आले नाही. त्यांनाही मौन घडले. आम्ही रामाबद्दल सांगतो असे वेदांनी म्हणणे म्हणजे त्यांच्यामधले मीपण शिल्लक आहे. म्हणून त्यांना मौन घडते.
आनंद म्हणजे ज्यात दुःखाचा स्पर्शही होत नाही असे नित्य निरंतर सुख
राम सर्वत्र आणि सर्वकाळ आहे हे स्वतःचे वेगळेपण विसरून गेलेल्यांना कळते. ध्यानाच्या मार्गाने जाणारे योगी आणि भक्तीच्या मार्गाने जाणारे भक्त या दोघांच्या जाणीवेमध्ये केवळ रामच भरून राहिलेला असतो. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या कोणत्याही इच्छा शिल्लक राहिलेल्या नसतात. काही शिल्लक राहिल्याची रुखरुख मनात असेल तर मनात दुःख असते. ज्यांना काहीच इच्छा शिल्लक नाही, मिळावे किंवा मिळवावे असे वाटत नाही, त्यांना सतत अवघा आनंदी आनंदच असतो. अशी स्थिती असणे हेच त्यांच्या असण्याला शोभा आणते. मंडण आणि भूषण म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाची शोभा. त्यांची ही आनंदमय स्थिती त्यांच्यामध्ये राम भरून राहिलेला असल्यामुळे आणि ते रामाच्या अस्तित्वात पूर्ण बुडून गेल्यामुळे असते.
राम आनंदरक्षण
‘सदा सर्वदा देव सन्नीध’ आहे या चरणाने सुरू होणारा एक मनाचा श्लोक आहे. ‘सदा सर्वदा’ म्हणजेच ‘नित्य निरंतर’. ‘सन्नीध’ म्हणजेच ‘अंतरी’. असा ‘देव’ म्हणजेच ‘राम’. त्याच श्लोकात राम ‘सुखानंद आनंद कैवल्यदानी’ आहे, असाही चरण आहे. हवी ती गोष्ट मिळाल्यावर जो आनंद होतो तो ‘सुखानंद’. संकटे पळून गेल्यावर होतो तो नुसता ‘आनंद’. राम आणि आपण एकच आहोत ह्या आनंदाचा अनुभव तो ‘कैवल्य’. या तीन्हीमध्ये सर्वांचा सर्व प्रकारचा आनंद आला. सर्वांना अमर्याद आनंद देणाऱ्या आनंदाचेच रूप असलेल्या रामाकडे जणू आनंदाचा न संपणारा ठेवा आहे. जो कोणी योगाने किंवा भक्तीने रामाशी एकरूप होईल, त्याच्यासाठी रामाने जणू काही आनंद राखून ठेवला आहे. तो रामाशी एकरूप होईपर्यंत त्याच्या वाटच्या आनंदाचे राम जणू रक्षण करतो आहे. म्हणून ‘राम आनंदरक्षण’ म्हटले आहे.
जे भक्त किंवा योगी अजून रामाशी अनन्य झालेले नाहीत, परंतु रामाला शरण गेले आहेत, आपले बरे वाईट जे काही व्हायचे ते रामाच्या इच्छेने होऊ दे असा ज्यांचा निश्चय झाला आहे, ते स्वतःला रामाचे दास म्हणवतात. ज्यांनी रामाचे असे दास्यत्व स्वीकारले आहे, त्यांना आनंदरक्षण राम अजून सापडायचा असला तरी सर्व परिस्थितीत राम आपले संरक्षण करतो असा त्यांचा विश्वास असतो.
उपासनेबद्दल लिहिताना कै. आप्पांनी चित्तशुद्धी, चित्तउल्हास आणि चित्तप्रेरणा अशा तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. चित्तशुद्धी जशी होत जाईल तसा धृपद आणि पहिल्या दोन कडव्यांमधला अनुभव अधून मधून येत राहतो. म्हणजेच रामाच्या सत् आणि चित् या पैलूंचा अनुभव येतो. जेवढी चित्तशुद्धी होते त्याप्रमाणात चित्तउल्हासाचा अनुभव येतो. चित्तउल्हासाची पहिली झलक अनुभवायला मिळते ती आपण रामाच्या संरक्षणात आहोत या अनुभवाची. राम आपले मंडण किंवा भूषण झाला किंवा आनंदरक्षण झाला ही स्थिती येण्यास खूपच काळ लागतो. हजारातल्या किंवा लाखातल्या एखाद्याला ही स्थिती प्राप्त होते. रामाच्या संरक्षणात आपण आहोत हा अनुभव मात्र अनेक जण घेऊ शकतात. एका कार्यकर्त्याला लिहिलेल्या पत्रात आप्पांनी लिहिले आहे की राम आपले संरक्षण करतो ही भावना दृढ होण्यासाठी रात्री झोपताना आपण परमेश्वराच्या कुशीत झोपत आहोत अशी भावना करावी. योगी अरविंदांना अलीपूर तुरुंगात असताना ज्या कांबळ्यावर ते झोपले होते ते कांबळे म्हणजे श्रीकृष्णाने कवेत घेण्यासाठी पसरलेले बाहू वाटले. हेच संरक्षण दासाचे.
गिरीश श्री.बापट