जेथें जातों तेथें तू माझा सांगाती – अभंग क्रमांक – ९

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातींं धरूनिया ॥ धृ ॥
चालो वाटें आम्ही तुझाची आधार । चालविसी भार सवे माझा ॥ १ ॥
बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ॥ २ ॥
अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥ ३ ॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुकें । झाले तुझे सुख अंतर्बाहींं ॥ ४ ॥

आषाढी एकादशीला प्रबोधिनीमध्ये नेहमी भजन होते. दोन वेळा प्रशालेतील सहावी सातवीतल्या कीर्तन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी भजनाच्या ऐवजी कीर्तन केल्याचेही मला आठवते. १९७८ साली आषाढी एकादशीला आप्पांनी प्रवचन केले होते. ते वर्ष विशेष होते. आषाढी एकादशीला प्रवचन झाले आणि नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपासना मंदिरात अखंड हिंदुस्थानच्या चित्रमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. प्रतिष्ठापनेच्या वेळी ‘मातृभूमी हेच दैवत’ हे मुख्य सूत्र होते. आणि आषाढीच्या प्रवचनाचे सूत्र देशभक्तीचे रूपांतर अखेर ईश्वरभक्तीत झाले पाहिजे हे होते. प्रवचनासाठी निवडलेल्या अभंगाच्या अर्थाचा विस्तार करताना आप्पांनी आणखीही चार-पाच अभंग घेतले होते. ते अभंग म्हणताना त्यांच्या मागे वारकरी भजन-कीर्तनाच्या पद्धतीने काही टाळकऱ्यांनी त्यांच्या मागे उभे राहायचे अशी योजना त्यांनी केली होती. त्या पाच-सहा टाळकऱ्यांमध्ये उभे राहायची संधी मला मिळाली. ते पूर्ण प्रवचन आप्पांच्या मागे उभे राहून मी ऐकले. ईश्वरभक्तीचे मर्म सांगण्यासाठी आप्पांनी ‘जेथे जातो तेथे’ हा अभंग निवडला होता.

आदिमानवाला सूर्य, पाऊस, वीज, वृक्ष आणि काही प्राणी यांच्यामध्ये काही विशेष शक्ती आहे असे जाणवले. त्यांचा कोप आपल्यावर होऊ नये, त्यांनी आपल्यावर प्रसन्न राहावे, यासाठी त्याने त्यांची पूजा सुरू केली. मग या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक देव आहे अशी कल्पना त्याला सुचली. सूर्याची पूजा करायच्या ऐवजी सूर्याला तेज आणि उष्णता देणाऱ्या सूर्यदेवाची पूजा सुरू झाली. वृक्षाची पूजा करण्याऐवजी वृक्षांवर रसाळ फळे निर्माण करणाऱ्या वृक्षदेवाची पूजा सुरू झाली. नंतर हे सगळे देव एकाच मुख्य देवाची विविध रूपे आहेत अशी कल्पना निघाली. एकाच मुख्य देवाला लोक वेगवेगळ्या नावाने संबोधतात असे सूत्र वेदांनी जाहीर केले. हा मुख्य देव केवळ रागावणारा, शिक्षा करणारा किंवा प्रसन्न होऊन बक्षीस देणारा, असा नसून तो आपल्या सर्वांचा सुहृद, सखा किंवा मित्रही होऊ शकतो असा शोध लागला. देवाच्या कल्पनेविषयीची ही सगळी स्थित्यंतरे केवळ कल्पना किंवा विचार करून झालेली नाहीत. देवाचा शोध घेणाऱ्यांचे मन जसे विकसित होत गेले तसे त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवरचे अनुभव स्वतः घेतले. असे अनुभव घेतलेल्या अनेकांनी एकमेकांचे अनुभव पडताळून पाहिले आणि त्यातून काही आध्यात्मिक तथ्ये निश्चित केली. परमेश्वर आपल्याबरोबर कायम सखा, साहाय्यकर्ता, कृपाछत्र धरणारा म्हणून कसा असतो या अनुभवाचे वर्णन करणारा हा अभंग आहे.

तुकाराम महाराजांना सगळीकडे प्रवास करत असताना परमेश्वर कायम आपला सोबती आहे असे जाणवत होते. तो आपला हात धरून आपल्याला योग्य मार्गाने नेतो, वाट चुकू देत नाही असे त्यांना जाणवत होते. त्याच्या अखंड सोबतीचा आनंद आणि कृतज्ञता ते धृपदामध्ये सांगत आहेत. ‘चालो वाटें’ म्हणजे वाटेने चालत असताना. ही वाट परमार्थाची किंवा भक्तीची आहे. तुकाराम महाराजांना कोणी मानवी गुरू नव्हता. पुढची वाट कशी आहे हे सांगणारा कोणी नव्हता. परमेश्वरावर भरवसा ठेवून त्याच्या आधारानेच ते भक्तिमार्गावरचा एकेक टप्पा पुढे जात होते. भक्तिमार्गावरून पुढे जाताना आधार देणारा परमेश्वर, आपला आणि आपल्या कुटुंबाच्या योगक्षेमाचा भारही वाहत आहे, योगक्षेमाची त्याने जबाबदारी घेतली आहे, असेही त्यांना वाटत होते. योग म्हणजे ज्या गोष्टी जगण्यासाठी जेव्हा आवश्यक तेव्हा त्या मिळणे. आणि क्षेम म्हणजे मिळालेल्या गोष्टी सांभाळणे. विवेकानंदांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे खूपच हाल व्हायला लागले. तेव्हा रामकृष्णांनी त्यांना सांगितले की कालीमाता तुमच्या कुटुंबाच्या भात आमटीेची सोय बघेल. म्हणजे भरपूर देईल असे नाही. पण उपासमारही होऊ देणार नाही.  तुकारामांनाही आपल्या कुटुंबाची उपासमार होत नाही म्हणजेच परमेश्वर आपला भार वाहत आहे आणि भक्तिमार्गात आपल्याला पुढे नेत आहे याचाच आनंद होता.

तुकाराम महाराज हे काही लौकिक अर्थाने खूप शिकलेले विद्वान किंवा पंडित असे नव्हते. पण भक्तिमार्गावरच्या त्यांच्या वाटचालीत अचानक त्यांना अभंग स्फुरू लागले. आपण तर काही फार विचार करून बोलत नाही. पण आपल्या तोंडून चरणांमागून चरण जे बाहेर पडतात ते लोकांना मात्र महत्त्वाचे वाटतात आणि ते लिहून घेतात, याचे त्यांना वाटणारे आश्चर्य त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केले आहे. मी काय बोलतो आहे हे मला कळायच्या आत शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात, या अनुभवाला त्यांनी ‘बोलो जाता बरळ’ असे म्हटले आहे.  ऐकणाऱ्यांना ते महत्त्वाचे वाटतात, याचा अर्थ परमेश्वरच ते शब्द तोंडातून बाहेर पडत असताना शुद्ध आणि सुसंगत करून घेतोे, ते नीट करतो, असे तुकाराम महाराजांना वाटते. आपल्या तोंडून परमेश्वर काही गैर बाहेर पडू देणार नाही असा विश्वास परमेश्वरावर असल्यामुळे आता मी बोलू की नको असा मनातला संकोच किंवा लाज परमेश्वराने काढून घेतली आहे. आणि आजूबाजूला कोण आणि किती जण ऐकत आहेत याची फिकीर न करता बोलण्याचा धीटपणा आला आहे, असे त्यांना वाटते.

परमेश्वर आपल्याद्वारे बोलत आहे, ही जशी खात्री झाली, तसे ऐकणारे सगळे लोकही आपलेच आहेत, असे वाटायला लागल्याने, त्यांच्यासमोर कसे बोलू ही लाजही गेली. आजूबाजूचे सगळेच लोक सोयरे म्हणजे नातेवाईक, प्राणसखे म्हणजे जीवाला जीव देणारे मित्र आणि लोकपाळ म्हणजे या इहलोकाचे किंवा भौतिक जगाचे पालन करणारे, त्याचा सांभाळ करणारे देवच आहेत, असे तुकाराम महाराजांना वाटायला लागले. आपलेच नातेवाईक, मित्र किंवा पालनकर्ते हे सगळे आपल्याला सांभाळून घेतील, त्यामुळे घाबरायचे काही कारण नाही. त्यामुळे भक्तिमार्गाने पुढे जाण्याचा आणि मुखातून अभंगांचा प्रवाह चालू राहू देण्याचा धीटपणा तुकाराम महाराजांना आलेला आहे.

लौकिक व्यवहारात प्रवास करताना परमेश्वर सोबती आहे. भक्तिमार्गाने जाताना परमेश्वर वाटाड्या आहे. त्यामार्गाने जात असताना योगक्षेमाची जबाबदारीही त्याने घेतली आहे आणि आजूबाजूच्या सर्व लोकांच्या रूपाने तोच जणू आपल्या नातेवाईक, मित्र आणि पालनकर्त्यांसारखा आपल्या बरोबर आहे. असा बाहेर सर्वत्र परमेश्वर आपल्याबरोबर असल्याचे सुख तुकाराम महाराज अनुभवत आहेत. तोंडातून बाहेर पडणारी अभंगवाणी आपली नाही. आपण केवळ ध्वनिक्षेपक आहोत आणि परमेश्वरच आतून बोलत आहे. असा आपल्या आतही परमेश्वर असल्याचे सुख तुकाराम महाराज अनुभवत आहेत. म्हणून ते म्हणतात ‘झाले तुझे सुख अंतर्बाहीं’ म्हणजे आतही सुख आणि बाहेरही सुख. या सुखाच्या सागरात आपण नुसते डुंबायचे किंवा हुंदडायचे. कौतुक या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक आनंद आणि दुसरा लाड. परमेश्वर आपला योगक्षेम बघतोय, मार्गदर्शन करतोय; आपले असंबद्ध बोलणे सुसंबद्ध करतोय, म्हणजे तो आपले लाडच करतोय. वडिलधाऱ्या सोबत्याने लाड करावेत आणि लहानग्याने करून घ्यावेत यालाही ‘खेळतो कौतुके’ म्हणता येईल. किंवा आत बाहेर सुखच सुख आहे त्यामुळे आता फक्त आनंदात खेळ सुरू आहे असाही अर्थ घेता येईल. आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे विठो आता तुझे माझे राज्य’. म्हणजे आता आपण दोघेच आनंदात खेळूया.

भक्तिमार्गावरच्या या टप्प्याला समीपता, म्हणजेच परमेश्वर जवळ असल्याची वारंवार जाणीव होणे, असे म्हणतात. विराट समाजरूपी परमेश्वर आपली सर्व काळजी घेईल, आपण फक्त मनसोक्त देशसेवा करायची, ही देशभक्तीतील समीपता. आषाढी एकादशीला या समीपता भक्तीवरती प्रवचन झाल्यावर मग चार दिवसांनी, गुरुपौर्णिमेला ‘मातृभूमि हेच दैवत’ असे म्हणून चित्रमूर्तीची प्रतिष्ठापना प्रबोधिनीत झाली आहे. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ असा अनुभव तुकारामांना विठ्ठलाच्या बाबतीत आला. तसा आपल्याला आपल्या राष्ट्रदेवाच्या बाबतीत यावा असा प्रयत्न करायला हवा. अशी समीपता अनुभवण्यासाठी आधी सलोकता अनुभवावी लागते. देव आपल्याबरोबर आहे ही समीपता. आपण देवाच्या बरोबर राहण्याची धडपड करायची ही सलोकता. तुकारामांनी आधी ‘जाऊ देवाचिया गावा’ असा ध्यास घेतला. ती सलोकता. मग ‘तुका म्हणे आता खेळतो कौतुके’ ही समीपता त्यांना अनुभवता आली. तसे ‘हम करें राष्ट्रआराधन’ (प्रबोधन गीते भाग २, २०१५ आवृत्ती, पद्य क्र. १३) हे पद्य राष्ट्रदेवाच्या सलोकता भक्तीसाठी आहे. तर ‘मज श्रेय गवसले हो’ (प्रबोधन गीते भाग १, २०१८ आवृत्ती, पद्य क्र. ३७) हे पद्य राष्ट्रदेवाच्या बरेच जवळ म्हणजे समीप गेल्याचा अनुभव व्यक्त करणारे आहे.

गिरीश श्री. बापट