निरूपण –
प्रबोधिनीमधील वर्षान्त उपासनेमध्ये ‘राष्ट्रदेवा भवेम’ असे आपण सर्वजण म्हणतो. ‘आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ’ असा त्याचा अर्थ. असे झाले पाहिजे हे स्वामी विवेकानंदांनी सर्वप्रथम अतिशय आग्रहाने सांगितले. तेव्हा त्यांच्या समोर ‘वंदे मातरम्’ हे गीत होतेच. त्याशिवाय सर्व जीवांची सेवा म्हणजे ईश्वराची पूजा हे त्यांच्या गुरूंचे वचनही होते. सर्व जीवांची सेवा करायच्या आधी आपल्या देशातील लोकांची सेवा केली पाहिजे, हे त्यांच्या भारत यात्रेच्या शेवटी त्यांनी कन्याकुमारीला केलेल्या तीन दिवसांच्या ध्यानामध्ये त्यांना स्पष्ट झाले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करणारे भारतातील सर्वच लोक राष्ट्राला देव मानून राष्ट्राची आराधना करण्याचा प्रयत्न करत असतात. ती आराधना कशी करायची हेच या पद्यामध्ये सांगितले आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९४५ साली लिहिलेल्या या पद्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करायच्या पुढच्या समाजसंस्थापानेच्या कामासाठी राष्ट्राची आराधना करूया असे आवाहन कवीने केले आहे.

आराधनेचा सर्वसाधारण अर्थ पूजा असा आहे. पण एखाद्याला सन्मान देऊन, आदरपूर्वक, त्याला प्रसन्न करण्यासाठी, त्याची आळवणी करणे हा आराधनेचा विशेष अर्थ आहे. आळवणीमध्ये तळमळ, उत्कंठा, तीव्र इच्छा, आर्तता अशा सगळ्या भावना असतात. आपल्या राष्ट्राविषयी या सर्व भावना आपले शरीर, आपले मन आणि आपली सर्व संपत्ती राष्ट्रासाठी वापरायची तयारी दर्शवून व्यक्त करायच्या असतात. शरीर, मन, संपत्ती ही आपली साधने आहेत. ती साधने वापरून आपण आपले व्यक्तिगत व कौटुंबिक आयुष्य जगत असतो. पण त्याशिवाय उरलेला सर्व वेळ राष्ट्रासाठी म्हणजे आपल्या देशातल्या समाजासाठी वापरणे म्हणजे राष्ट्राची आराधना करणे. या आराधनेने राष्ट्रदेव प्रसन्न होणे म्हणजे या देशातील समाज एकात्म, संघटित, सतत विजयाची इच्छा बाळगणारा आणि जगाचे कल्याण व्हावे अशी इच्छा करणारा होणे. यासाठीचे सर्व प्रयत्न म्हणजे राष्ट्राची आराधना.

तन, मन, धन ही तर कायमची साधने आहेत. आपल्या साऱ्या जीवनाने राष्ट्राची आराधना कशी करायची हे या कडव्यात विस्ताराने सांगितले आहे. आपल्या मनातील विचार, त्या विचारांचा उच्चार आणि उच्चाराप्रमाणे प्रत्यक्ष कृती, यांच्यात एकवाक्यता किंवा सुसंगती असायला हवी. त्यात विसंगती किंवा दुटप्पीपणा आला, मनात एक, बोलतोय दुसरे आणि करतोय तिसरेच असे वागणे सुरू झाले की आपली बुद्धी अशुद्ध किंवा मलीन झाली असे म्हणतात. या सर्वांमधून एकच आशय व्यक्त होत असेल तर आपली बुद्धी निर्मल किंवा शुद्ध होते. निर्मल बुद्धी एकाच विचारावर किंवा उद्दिष्टावर एकाग्र होण्यास म्हणजे निश्चल किंवा स्थिर होण्यास सोपे जाते. विचार, उच्चार आणि आचार यातील एकवाक्यता आणि बुद्धीची स्थिरता आणायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या प्रयत्नांचा निश्चित चांगला परिणाम होणार आहे, अशा विश्वासाने म्हणजे श्रद्धेने आम्ही प्रयत्न करू. आमच्या प्रयत्नांत जे काही कमी पडेल ते राष्ट्रदेवाने म्हणजे समाजातील सर्व अनुकूल घटकांनी पूर्ण करून घ्यावे, अशी प्रार्थना आम्ही नतमस्तक होऊन, म्हणजे नम्रपणे आणि अभिवादनपूर्वक, म्हणजे नमस्कार करून, करत आहोत.

आराधनेमध्ये जसे अभिवादन येते तसेच अर्चनाही येते. अर्चनेचाही सर्वसाधारण अर्थ पूजा असाच आहे. पण आपल्या जवळच्या सर्व उत्तमोत्तम मौल्यवान वस्तू वापरून आपले आराध्य दैवत सुशोभित करणे किंवा त्याच्या भोवती आरास करणे हा अर्चनेचा विशेष अर्थ आहे. गोकुळाष्टमीला अन्नकोट करणे, शाकंभरी देवीची सर्व भाज्यांनी आरास करणे, गौरीपूजन किंवा नवरात्रामध्ये देवी सजवणे हे अर्चनेचेच प्रकार आहेत. देवाच्या प्रतिमेवर गुलाल, भंडारा किंवा कुंकू उधळणे हेही अर्चनच. आमच्या बालपणातील निरागसपणा, आमच्या तारुण्यातील सळसळणारा उत्साह आणि आमच्या प्रौढपणाच्या काळातील विवेकशक्ती या आयुष्याच्या सर्व अवस्थांमधील आमच्या सर्व गुणांचा, शक्तींचा आणि संपत्तीचा उपयोग करून होणाऱ्या अर्चनेने आम्ही आयुष्यभर राष्ट्रदेवाला म्हणजेच समाजाला प्रसन्न करणार आहोत. समाजाच्या समृद्धीबरोबर, समाजाची संस्कृती अधिक श्रेष्ठ व निर्दोष करणे हीच राष्ट्रअर्चना आहे.

प्रौढ वयामध्ये विवेकाने राष्ट्र अर्चना करायची म्हणजे देशस्थितीचा अभ्यास व त्यावर चिंतन केले पाहिजे. ‘अपने अतीत को पढकर’ म्हणजे इतिहासाचा अभ्यास करून. आणि पुन्हा ‘इतिहास उलटकर’, इतिहास उलटवून असेही म्हटले आहे. इतिहासाचा अभ्यास करायचा तो इतिहासातील गौरवाची स्थाने समजून घेण्यासाठी आणि त्यातून आजच्या कामासाठी प्रेरणा मिळविण्याकरता. अभ्यासाचा दुसरा हेतू इतिहासातील चुका आणि उणिवा शोधून काढणे हा असतो. या चुका दुरुस्त करणे आणि उणिवा भरून काढणे म्हणजे इतिहास उलटवणे. पुन्हा तशा चुका होणार नाहीत याची व्यवस्था करणे. पण चुका दुरुस्त करणे हे खड्डे भरून काढण्यासारखे काम आहे. खड्डे भरून जमीन सपाट झाली की त्याबरोबर त्या सपाट जमिनीवर कशाची उभारणी करायची याचाही विचार केला पाहिजे. म्हणजेच देशाच्या भवितव्याचा किंवा भविष्यकाळाचा विचार केला पाहिजे. भविष्यात आपण काय करू शकू याची स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि आपल्या बलस्थानांचा उपयोग करून ती स्वप्ने प्रत्यक्षात कशी आणायची याचाही विचार केला पाहिजे. इतिहास अभ्यासण्याचा, वर्तमानात त्या इतिहासातील चुका दुरुस्त करण्याचा आणि भविष्यकाळ सुधारण्याचा असा विचार करणे, म्हणजेच राष्ट्राचे चिंतन करणे.
या पद्याचे शेवटचे कडवे बरेच मोठे आहे. त्याचा अर्थ तीन भागांमध्ये पाहूया.

आपल्या देशाचा इतिहास समजून घेतल्यानंतर, युगायुगांमध्ये म्हणजे अनेक कालखंडांमध्ये आपल्या राष्ट्रावर आलेल्या अनेक आपत्तींची आठवण होत राहते. आपल्या राष्ट्राच्या अपमानांचा दाह मनाला अस्वस्थ करत राहतो. आपल्या देशाची सेवा करणाऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणणारे अनेक शत्रू आठवतात.

भारतीय संस्कृतीमध्ये परमेश्वराचे शांत रूपही आहे आणि त्याच परमेश्वराचे रौद्र-भीषण रूपही आहे. महाकाली हे देवीचे रौद्र रूप. भारतमाता ही पण त्याच देवीचे एक रूप. भारतमातेच्या शत्रूंना ठार केल्यावर त्या शत्रूंचे रक्त म्हणजेच अरि-शोणित या देशाच्या भूमीवर सांडले. तोच भारतमातेला केलेला अभिषेक. महाकालीने विविध अवतारांमध्ये असुरांचा म्हणजे दुष्ट शक्तींचा नाश केला व त्या दुष्टांची मुंडकी आपल्या गळ्यामध्ये माळ करून घातली, अशी वर्णने पुराणांमध्ये आहेत. ज्यांना हा रौद्ररस झेपत नाही त्यांना ही असुरांची मुंडकी म्हणजे शत्रूंचा अहंकार किंवा गर्व नष्ट केल्याची प्रतीके आहेत, हे रूपक समजून घ्यावे लागते. इतिहास काळात आम्ही म्हणजे, आमच्यासारखीच भारतमातेची आराधना करणाऱ्या आमच्या पूर्वजांनी मातेला, दुष्टांच्या गळालेल्या अहंकारांची मुंडकी वाहून तिला सजवले होते. हा इतिहास आम्हाला आठवतो आहे.
दुष्ट शक्तींचा नाश करून आमच्या पूर्वजांनी भारतीय संस्कृती जगातील त्या-त्या काळातल्या इतर संस्कृतींपेक्षा श्रेष्ठ बनवली. जणू काही भारतमाता सर्व संस्कृतींमध्ये सर्वोच्च स्थानावर बसून साऱ्या जगाचे शासन करत होती. म्हणजे साऱ्या जगाला मार्गदर्शन करत होती.

यानंतर काळाच्या ओघामध्ये साऱ्या संस्कृतींमध्ये सर्वश्रेष्ठ असे भारताचे स्थान ढळलेले आहे. संस्कृतीच्या श्रेष्ठतेसाठी अध्यात्म आणि उच्च विचारांच्या बरोबर शक्ती, संघटना आणि चौफेर सावध दृष्टी याही गोष्टी आवश्यक असतात. त्यातील शक्ती, संघटना आणि सावधपणा या गोष्टींमध्ये आमची घसरण झाली. पण आता आम्ही ठाम निश्चय केला आहे की आमच्याकडची सर्व साधने वापरून भारतमातेला जगातील सुसंस्कृत देशांमधले सर्वश्रेष्ठ स्थान पुन्हा मिळवून देऊ. असे करण्यालाच पूर्वीपासून धर्मसंस्थापना करणे असा शब्द वापरला आहे. धर्माची स्थापना करणे म्हणजेच समाजात पुन्हा उत्तम शाश्वत मूल्यांची स्थापना करणे किंवा समाजसंस्थापना करणे. समाजसंस्थापनेचे ध्येय समोर ठेवून भारतामातेला अभिवादन करणे, तिची अर्चना करणे आणि तिचे चिंतन करणे हीच राष्ट्र आराधना प्रबोधिनीमध्ये करायची आहे.
पद्य –

नेहमी प्रमाणे अतिशय सोप्या शब्दात सुंदर अर्थ सांगितला आहे.
🙏🙏
सुप्रभात सर,
मार्मिक उदाहरण व सरल भाषेतून अर्ध सांगितला. धन्यवाद
पुन्हा नव्याने या संकल्पनांची उजळणी झाली. सध्याच्या माझ्या अवस्थेमध्ये या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल.
खूपच आवडलं
खूपच आवडलं. हे गीत पूर्वी ऐकलं नव्हतं. म्हणून अजूनच छान वाटलं.