लेख क्र. २७
१/७/२०२५

वीस वर्षांपूर्वी मा. यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीषा शेटे यांनी केलेल्या अभ्यासातून ‘यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना’ हा लेख तयार झाला. भारताला राष्ट्र संकल्पना ब्रिटिश आल्यानंतरच समजली असे म्हटले जाते. त्या पार्श्वभूमीवर यजुर्वेदातून दिसणार्या राष्ट्रीय जीवनाचा विचार इथे मांडला आहे.
वेदत्रयींमधील ‘यजुर्वेद’ हा एक सामाजिक वेद, यज्ञ व त्याच्याशी निगडित सर्व कर्मकांड त्याच्यामध्ये येते. यजुर्वेद अभ्यासार्थ घेतला की त्यातील विषयांची व्यापकता पाहून मन स्तिमित होते. यजुर्वेदाच्या अनेक शाखा-उपशाखांचे अध्ययन व विवेचन आजपर्यंत झाले आहे. शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद हे दोन भाग व त्यांच्या वेगवेगळ्या शाखांच्या बाह्य स्वरूपाचा विचार न करता अंतर्गत मांडणीचा विचार केल्यास त्यातील सामाजिक संदर्भ लक्षात येतात. ज्या वेळी हा विषय अभ्यासार्थ घेतला तेव्हा यजुर्वेदातील अंतरंग पहात असतानाच त्यातील समाजजीवनाचा वेगळा रंग लक्षात आला. यजुर्वेद हा यज्ञसंस्थेमुळे दैनंदिन जीवनाशी निगडित होता. चातुर्वर्ण्य कल्पना, नीती-नियमांनी बद्ध समाजव्यवस्था, विविध व्यवसाय, जाती-जमाती, कृषी, वैद्यक, अनेक देवतारूपे या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. परंतु या सर्वांपेक्षा यातील वेगळेपणा म्हणजे समाजाची दिसून येणारी एकात्मिक भावना. एका सुसंबद्ध समाज रचनेचे चित्र यजुर्वेदातून साकार होते.
कोणत्या सूत्राने हा समाज बांधलेला होता? याचा विचार केल्यावर असे दिसते की ते सर्व एका भूमीवर राहणारे होते आणि राष्ट्र या संकल्पनेने बद्ध होते. एक राष्ट्रीयत्वाची भावना त्यांना ठाऊक होती. आजपर्यंतचा भारतीय इतिहास बघितला तर ही कल्पना सुसंगत वाटणार नाही कारण राष्ट्रीयत्व आम्हाला ब्रिटिशांच्या आगमनानंतर पारतंत्र्यात बुडल्यावरच कळले असा एक प्रवाद आहे. त्यामुळे यजुर्वेद व त्याचे तैत्तिरीय ब्राह्मण-आरण्यक यामध्ये राष्ट्र शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे, याचा विचार आवश्यक वाटतो. Vedik Index of Names and Subjects मध्ये राष्ट्र या शब्दाने राज्य किंवा Kingdom असे सूचित होते, परंतु यजुर्वेदातील राष्ट्रविषयक संदर्भ पाहिल्यास असे दिसते की हा अर्थ मर्यादित स्वरूपाचा आहे. यजुर्वेदात ‘राष्ट्र’ या संकल्पनेचा उदय व विस्तार दिसतो का हे बघण्याचा हा प्रयत्न आहे.
वेदांमधील आद्य ग्रंथ म्हणजे ‘ऋग्वेद’. ‘राष्ट्र’ शब्द ऋग्वेदात फार थोड्यावेळा येतो. त्याचा विचार करताना असे दिसते की प्रत्यक्ष ऋग्वेदाच्या काळात ‘राष्ट्र’ या शब्दाने आज अभिप्रेत असलेली समाजरचना दिसत नाही. परंतु लोकमतानुवर्ती विस्तृत स्वराज्याची अपेक्षा मात्र दिसून येते. ऋग्वेद ५. ६६. ५ मध्ये या ऋचेचा अर्थ येतो तो असा- ‘हे सर्वव्यापी स्त्रोतसुत मित्रावरुणांनो, विस्तृत आणि लोकमतानुवर्ती स्वराज्याच्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून द्या.’
World Book of Encyclopedia मध्ये ‘राष्ट्र’ या शब्दाला समानार्थी शब्द Nation वापरला आहे. त्याची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे.
“Nation means a large group of human beings who form an Independent political unity and are subjects to a single supreme Central Govt. usually occupying a clearly defined geographical area, and further united by an ancient community of race, customs, traditions and general spirit and feeling themselves to be united.”
या व्याख्येचा सर्वसाधारण मराठी अनुवाद असा “राष्ट्र म्हणजे एक सुसूत्रपणे बांधलेला विस्तृत समाज जो राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असतो व त्याची स्वतःची केंद्रीय शासन प्रणाली असते, तसेच त्यांनी एक विशिष्ट भूभाग व्यापलेला असतो. हा समाज पूर्वजांच्या समृद्ध वारशाने व परंपरेने जोडलेला असतो व त्याच्यामध्ये एकतेची भावना दृढमूल असते.”
वरील अर्थ पाहता ‘राष्ट्र’ शब्दाची व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी या लेखात ५ घटकांचा विचार केला आहे.
१) सुसंघटित समाज – यजुर्वेदामध्ये चातुर्वर्ण्याबरोबरच पंचम वर्णाचाही उल्लेख येतो. समाजामध्ये या पंचवर्णीयांचे संबंध एकोप्याचे असावेत असे दिसते. कारण सर्वत्र आम्हाला भूमी प्राप्त होवो, सर्व देशांच्या अधिपत्यरुपाने असणारे राष्ट्र आम्ही संपादन करु, आमच्या राष्ट्रातील सर्व प्राणीमात्रांचा योग-क्षेम उत्तम प्रकारे चालो असे सकारात्मक विचार येतात. यज्ञ विधीमध्ये सर्वांचा समावेश असे. कृष्ण यजुर्वेद तैत्तिरिय ब्राह्मण व आरण्यकामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय व शूद्र हे चार वर्णाचे पुरुष “ओदनसव” क्रतूचे अधिकारी आहेत असे म्हटले आहे. समाजाच्या परस्परानुवर्ती संबंधामुळेच राजा व प्रजा यांचे संबंधही दृढ होत असत. वाजपेय यज्ञामध्ये समाजाने राजाला मान्यता द्यावी म्हणून तो १६ रत्नींच्या घरी जाऊन अग्नी प्रज्वलित करत असे. हे १६ जण त्या त्या गटाचे प्रतिनिधी असत. राजा व प्रजेच्या अशा ऐक्याने सुसंघटित समाज निर्माण होत असे. राजा प्रजेवर व प्रजा राजावर अधिकार गाजवीत असे.
या समाजव्यवस्थेमध्ये कुणबी, कोष्टी, साळी, परीट, न्हावी, सोनार, विणकर, कुंभार, फासेपारधी, बुरडीण, शिकलगार, ज्योतिषी, चाबूकस्वार, गोपाळ, वाणी, भिल्ल, वनवासी गायक, कोळी इ. भिन्न व्यावसायिक व जाती जमाती आपल्याला भेटतात. या सर्वावरून सर्वसमावेशक समाज दिसतो.
२) एक मध्यवर्ती शासकीय / राजकीय सत्ता केंद्र – ज्यावेळी समाज सुसंघटित बनतो तेव्हा त्याच्या चलनवलनासाठी तिसऱ्या एका शक्तीची आवश्यकता निर्माण होते. ती म्हणजे शासनप्रणाली. शासनाद्वारे समाजाचे नियंत्रण केले जाते. इथे सुद्धा अशा तऱ्हेच्या मध्यवर्ती शासन प्रणालीचे चित्र दिसते. क्षत्रिय राजा हा मुख्य आधारस्तंभ तर ब्राह्मण पुरोहित त्याचा मार्गदर्शक आहे. या पुरोहिताचे स्थान स्पष्ट करण्यास ११ व्या अध्यायातील खालील भाग उपयुक्त ठरतो.
पुरोहित स्वतः बद्दल म्हणतो, ‘माझे ब्राह्मण्य मी उत्तम प्रकारे तीक्ष्ण असे केलेले आहे. त्याप्रमाणें माझी इंद्रिय शक्ती व माझे शरीर सामर्थ्य हे मी स्वकार्यक्षम केले आहे. मी ज्या क्षत्रिय वर्गाचा पुरोहित आहे त्या वर्गाचे क्षात्रबल जयिष्णु होईल अशा प्रकारे मी ते तीव्र केले आहे.’
क्षत्रियांमध्ये शूर व अचूक बाण मारणारा, शत्रू शरीराचा चुराडा करणारा वीर, युद्धासाठी परराज्यात सैन्य घेऊन जाणारा व रथामध्ये बसण्यात शहाणा असा रथगुत्स नावाचा सेनानी, ग्रामाधिपती हे राष्ट्रसंरक्षक वीर दिसतात. शत्रूचे आक्रमण होण्याआधीच आपण सुसज्ज असावे असा विचार यात दिसतो. राजाच्या अधिकाराखाली वरील पदे असत. या राजाला समाजातील सर्व स्तरांनी पाठिंबा देणे अपेक्षित असे.
यजुर्वेदात कांड ५-७-४ मध्ये म्हंटले आहे की, “ह्या यजमानासाठी सर्व देशांच्या आधिपत्यरूपाने असणारे राष्ट्र आम्ही संपादन करू, हे सर्व मानवांनो, निरनिराळ्या प्रदेशातून तुम्ही एकत्र होऊन माझ्या या यजमानाच्या जवळ या तो, तुम्हा सर्वांना शिस्त लावणारा व तुम्हा सर्वांचा अधिपती होवो. याच्या आश्रयाखाली तुम्ही आपले जीवन सुखी करून घ्या. या सर्वांद्वारे राजा हा मध्यवर्ती सत्ताकेंद्र होता हे स्पष्ट होते. राजाच्या मध्यवर्ती सत्ताकेंद्रावर समाजाचा अंकुश असे. राज्याभिषेकाचा एक मंत्र असा आहे – ‘आत्वा हार्षमन्तर भूर ध्रुवास्तिष्ठा विचाचलन्। विशस्त्वा सर्वा वाञ्वन्तु मात्वद्राष्ट्र अधिभृशत॥
हे प्रजाश्रित राजन, राजा म्हणून प्रजाजन तुझा स्वीकार करोत. नित्य आणि स्थिर राहून तू चिरस्थायी राज्याचा स्वामी हो. दुसरीकडे म्हंटले आहे हे राजन, इंद्रसदृश अथवा पृथ्वीलोकीच्या पर्वतासदृश स्थिर राहून तू राष्ट्ररक्षण कर. तू अढळ रहा.
आज ज्या लोकशाहीची अपेक्षा आम्हाला आहे ती लोकशाही त्या काळात असावी याचे एक उदाहरण वेण राजाच्या कार्यात मिळते. वेण राजाने जेव्हा प्रजाजनांच्या विरुद्ध काही दुखावणारे कृत्य केले तेव्हा त्याला त्या पदावरून दूर करून त्याच्या मुलाला राज्याभिषेक करण्यात आला. तेव्हा त्याला काही अटींचे पालन करण्यास सांगण्यात आहे. त्या अटी अशा –
‘यन्माम् भवन्ती वश्यन्ति कार्यम् अर्थ समन्वितम्। तदहं व: करिष्यामि नात्र कार्यविचारणा॥ – प्रजाजन जे म्हणतील तेच मी करेन ज्यामुळे प्रजाजनांना आनंद होईल असेच वर्तन माझ्या हातून घडेल. लोकशाही तत्त्वांचे पालन कसे केले जात होते हे या कथेतून दिसते.
या राजाला राष्ट्रासाठी अन्न, पशुधन व द्रव्य प्राप्त करावे लागे. त्यासाठी युद्ध करणे आवश्यक असे. काही वेळा आक्रमणालाही तोंड द्यावे लागे. मुबलक पशूधन, अन्न, भूमी यांच्या प्राप्तीसाठी विशिष्ट ऋतूंमध्ये विशिष्ट भागात युद्धासाठी जाण्याची पद्धत होती. ‘शिशिरात कुरू, पांचाल देशीचे राजे पूर्वेकडे जाऊन दिग्विजय करतात. वसंतात पूर्व दिग्विजयास गेलेले राजे धान्य लुटून परततात व सैनिकांना वाटतात. वर्षाऋतूत कुरू, पांचाल परकीय राष्ट्रांचा नाश करून पश्चिमेस स्वदेशी येतात. या सर्वांमधून समाजाची शौर्यवृत्ती दिसते. वेदांमध्ये आर्त्नी, इषु, कवच, ज्या, धनुष, प्रतोद, रथ, हस्तघ्न, खड्ग, कवच, तलवार इ. शस्त्रांची नावे येतात.
या राष्ट्रात एक राजा असे व बाकीच्या प्रदेशातील राजे त्याचे ‘मांडलिक’ असत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या राज्यात ‘स्वतंत्रता’ असली तरी एका सार्वभौम सत्तेचा स्वीकार करावा लागे.
३) एक भूमी – वरील मुद्द्यात आपण भूमीचा उल्लेख केला आहे. शुक्ल यजुर्वेद ९-५-२ मध्ये भूमीला उद्देशून जे मंत्र आहेत ते या अर्थाचे आहे.
“सदैव अन्नाच्या अनुज्ञेत राहणारे आम्ही ज्या पूजनीय अखंडित व जगज्जननी भूमीला प्रसिद्ध अशा वेदवाक्याच्या पठणाने अनुकूल करून घेतली आहे आणि जिच्या ठिकाणी हे जग समाविष्ट झालेले आहे त्या भूमीवरच जेणेकरून आमचे चिरकाल राहणे होईल अशा प्रकारे सविता देव आम्हाला प्रेरणा देवो.”
या प्रार्थनेचा अर्थ फार व्यापक स्वरूपाचा आहे. कोणत्याही राष्ट्राच्या अस्तित्वासाठी व उभारणीसाठी विशिष्ट भूभाग आवश्यक ठरतो. त्या भूमीवरून राष्ट्र ओळखले जाते. परंतू भूभागाच्या लांबी रुंदीपेक्षा भूमीतील नागरिकांची राष्ट्रनिष्ठा ही महत्त्वाची ठरते. ५ प्रवाहांनी वाहणारी सरस्वती, मेरू पर्वत, हिमालय पर्वत, गंगा यमुना, कुरू-पांचाल प्रदेश यांचे उल्लेख वेदांत आहेत.
४) परंपरा, रूढी, पद्धती – कोणतेही राष्ट्र निर्माण होते तेव्हा तेथील समाजाचे दीर्घकालीन परिश्रम त्यामागे असतात. यातूनच समाजाचा राष्ट्रीय विचार तयार होतो. यज्ञ ही इथल्या संस्कृतीची परंपरा होती. याच्याशी निगडीत अनेक रीती पद्धती होत्या. अश्वमेध, वाजपेय, अतिरात्र, वगैरे यज्ञ करण्याची परंपरा होती. रूढी परंपरांमध्ये काही वैयक्तिक अथवा सामाजिक रूढी येतात. यज्ञाच्या परंपरा वेगळ्या होत्या. राजाशी संबंधित परंपरांमध्ये राजाची निवड करणे, राज्याभिषेक करणे, त्याला धर्मबंधनांच्या चौकटीत कायद्याचे पालन करायला लावणे, प्रजेन राजाचा सन्मान करणे या सर्व परंपरा दिसतात.
५) एक राष्ट्रीयत्वाची दृढ भावना – राष्ट्राच्या अस्तित्वासाठी तिथल्या प्रजेच्या मनात एक-राष्ट्रीयत्वाची भावना दृढमूल असावी लागते. राजा आणि प्रजेवर काया, वाचा, मनाने एक-राष्ट्रीयत्वाचा संस्कार झाला पाहिजे. वेदांमध्ये अनेक मंत्र समाजाला एकत्रित आणणारे आहेत. राष्ट्राच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी राष्ट्रकार्यधुरंधर पुढारी अपेक्षित आहे. यजुर्वेदात कांड ५-७-६ मध्ये असे म्हटले आहे की, हे अग्निदेवा आमच्या ब्राह्मणांच्या ठिकाणी प्रकाश उत्पन्न कर, आमच्या क्षत्रियाच्या ठिकाणी प्रकाश उत्पन्न कर, आमच्या वैशांच्या व शूद्रांच्या ठिकाणी प्रकाश निर्माण कर.
अध्याय २२-२२.१ मध्ये येणाऱ्या मंत्राचा अर्थ तर अतिशय परिपूर्ण आहे. हे ब्रह्मन्, आमच्या राष्ट्रात अध्ययनशील व ब्रह्मतेजाने संपन्न असा ब्राह्मण उत्पन्न होवो. आमच्या राष्ट्रात शूर, अचूक बाण मारणारा महारथी क्षत्रिय उत्पन्न होवो आमच्या राष्ट्रात अत्यंत दुधाळ अशी गाय, पुष्कळ ओझे वाहणारा बैल, जलद चालणारा घोडा आणि सर्वगुणसंपन्न अशी स्त्री उत्पन्न होवो. या यजमानाला जयशाली रथात बसणारा पंडित आणि तरुण असा पुत्र होवो. आमच्या राष्ट्रात जेव्हा हवा तेव्हा पाऊस पडो. आमच्या राष्ट्रातील सर्व प्रदेशात असलेले आम्रपनसादि वृक्ष फलभाराने लवून जावोत व सर्व शेतांमध्ये सर्व प्रकारची धान्ये पिकोत. आमच्या राष्ट्रातील सर्व प्राण्यांचा योग व क्षेम उत्तम प्रकारे चालो.
ही विजिगीषु वृत्ती व आत्मविश्वास हेच या राष्ट्राचे बळ होते. राष्ट्राचे अस्तित्व हे समाजाच्या एकतेवर अवलंबून आहे याची दृढ कल्पना त्यांना होती म्हणूनच राष्ट्रातील लोकांना उद्देशून ते म्हणतात तुमचा कार्यविचार एकरूप राहो, भेटीचा हेतूही एकरूप असो, वाटाघाटीत सर्वांच्या मनाचा कल एकाच दिशेस राहो. समूहातील सर्वांचे अंत:करण एकरूपतेने कार्य निश्चित करो. एकजुटीचे प्रतीक म्हणून उभारलेल्या ध्वजांवर लक्ष ठेवून तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. विप्रियता जावो, ऐक्यमत येवो.
या राष्ट्र उभारणीच्या कामात ‘कोष’ हा अत्यंत आवश्यक घटक असतो. पुढील काळात कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ‘कोष’ म्हणजे धनाने भरलेले भांडार हे राष्ट्राचे जणू हृदयच आहे असे म्हटले आहे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी व अंतर्गत शासकीय व्यवस्थेसाठी कोष व्यवस्था आवश्यक असते. करसंकलनाद्वारा कोष भरला जातो. तैत्ति. ब्राह्मण व आरण्यकामध्ये या व्यवस्थेची स्पष्ट चिन्हे दिसतात. कोषाधिकारी नियमित करसंकलन करणारा भागदुध, राजधनाचे उत्कृष्ट रक्षण करणारा भांडाराधिकारी, या सर्वांनी आपापली कामे सदाचरणाने करावीत असे अपेक्षिले आहे. (यातील सदाचरण हा शब्द फार सूचक आहे नाही का!)
तैत्ति. ब्राह्मणातील ५-२-१० मध्ये करचुकवेगिरी करणार्यांचा पुरावा मिळतो. करवसुलीसाठी इंद्राने प्रजा सत्तेखाली आणल्या. अन्नधान्यावरील कर टाळणाऱ्यांकडे पूर्वेस अधिकारी धाडला तेव्हा लोक दक्षिणेल पळाले दुसरा अधिकारी धाडला तर लोक पश्चिमेस पळाले मग उत्तरेस पळाले व शेवटी ऊर्ध्व दिशेस गिरीकंदरी पळाले पण शेवटी निरूपायाने अधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाले व ५ अधिकाऱ्यांनी करवसुली केली.
मुळात भारतीय विचारातील राष्ट्राचे स्वरूप हे व्यक्ती व समष्टी यांच्या एकरूपतेचे एक सुरेख दर्शन आहे. व्यक्तीला स्वातंत्र्य तर आहे परंतू ते अनिर्बंध नाही, त्याला विचारांची परंपरेची संस्कृतीची एक चौकट आहे आणि ती लादलेली नाही. तिचे बाळकडू अशा तर्हेने दिले जाते की व्यक्तीमध्ये स्वयंशिस्त निर्माण होते. त्यामुळेच आमचे राष्ट्र हे शस्त्रास्त्रांच्या धाकाने उभे राहिले नाही. एकमेकांतील साहचर्य, परस्पर विश्वास दुसर्यांच्या विचारांचा आदर राखणे यामुळे येथील राजसता सुद्धा अनियंंत्रित झाली नाही. धर्मदण्डाचे अधिकार मान्य केले गेले तेही व्यावहारिकतेच्या कसोटीवर घासून आपल्या अधिकारांचा योग्य, परंतू मर्यादित वापर करणे हे या राष्ट्राचे वैशिष्ट्य बनले.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल यांनी आपले ‘नियतीशी करार’ हे भाषण केले त्यात त्यांनी म्हंटले आहे, “हिंदुस्थानचा अविरत शोध इतिहासाच्या उषःकाली सुरु झाला आणि या आपल्या मायभूमीच्या प्रयत्नांनी तीच्या यशाच्या उज्वलतेने व अपयशांनीही असंख्य शतके भरून गेली आहेत. सौभाग्य व दुर्भाग्य या दोनही अवस्थात या भूमीला आपल्या शोधाचा कधी विसर पडला नाही किंवा ज्या आदर्शांनी तिला सामर्थ्य दिले त्या सामर्थ्याचा तिला विसर पडला नाही. आज आपण दुर्भाग्याच्या पर्वाचा अंत करीत आहेत आणि हिंदुस्थान पुन्हा आत्मशोधन करीत आहे. ज्या कार्य सिद्धिचा सोहळा आपण संपन्न करीत आहोत तो केवळ एक टप्पा आहे, अनेक मोठे विजय व कार्यसिद्धी (भविष्यकाळात) आपली प्रतीक्षा करीत आहेत, त्या साध्य करण्याची संधी मिळवण्याचा आरंभ आहे. या संधीची पकड घेण्याइतके आणि भविष्यबळाची आव्हाने स्वीकारण्याइतके आपण शूर व शहाणे आहोत काय?
स्वामी रामतीर्थांचे काही विचार या प्रश्नाचे जणू समर्पक उत्तरच आहे. ते म्हणतात,”माझ्या बांधवांनो हिन्दुस्तानातील प्राचीन ऋषींचे तुम्ही वंशज आहात. परंतु त्यांच्या काळात तुम्ही आज राहत नाही. या विसाव्या शतकातील युरोप व अमेरिका या देशातील शास्त्रज्ञ, शिल्पज्ञ व मजूरदार यांच्याशी तुम्हास झुंजावयाचे आहे. वाफेची यंत्रे, तारायंंत्रे, आगबोटी ही तुमच्या आजूबाजूस पसरलेली आहेत या नव्या ज्ञानाचे ग्रहण करून ते आपलेसे करा, पचनी पाडा आणि आपली उन्नती करून घ्या. मात्र, श्रुतिरुपी प्राण आपल्या हृदयात सदैव जागृत ठेवा.”
ज्या आदर्शांची चर्चा नेहरूंनाही करावीशी वाटते ते आदर्श हजारो वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेचे सार आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक परकीय राजवटी आल्या आणि गेल्या पण त्यांना इथल्या संस्कृती पुढे झुकावेच लागले. या समाजाची सांस्कृतिक मानकं, नैतिकतेच्या कल्पना सर्वदूर समान होत्या आणि राष्ट्र या जाणिवेशी सुसंगत असेच त्यांचे स्वरूप होते. हे राष्ट्र हजारो वर्षांनंतरही आपली अस्मिता विसरू शकले नाही कारण हा समाज निरंतर पुढे जात राहिला. जिथे गती थांबली तिथे प्रगती थांबली. परिवर्तन हाच परिपूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेला नियम आहे. आमच्या या राष्ट्रात रूढी परंपरांचे पालन केले गेले पण योग्य तेव्हा त्यांना बदलविले गेले. ‘स्मृति’ या नवीन परिस्थितीला अनुकूल अशाच नियमांनी बनलेल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम राष्ट्र संकल्पनेवर झालेला आहे.
पाश्चात्य देशांच्या राष्ट्र संकल्पनेशी आमच्या राष्ट्र संकल्पनेची तुलना करणे म्हणूनच अनैसर्गिक आहे. राष्ट्र म्हणजे काय? हे आमच्या लोकांना आमच्याच प्राचीन विचारांमधून ज्ञात करून दिले पाहिजे, हीच आजची गरज आहे. राष्ट्र व राष्ट्रीयता यांचे बीज आमच्या समाजामध्ये हजारो वर्षांपूर्वीच पेरले गेले होते. त्याचा विकास कालानुरूप आजही अव्याहतपणे चालू आहे. राष्ट्र हे आमच्या जीवनाचे सजीव अंग आहे. त्यामुळेच जाती-उपजाती, निरनिराळे धर्म, विविध विचारधारा, लोकजीवनातील विविध रंग हे भिन्नभिन्न असले तरी आसेतू हिमाचल भारत हे एक परिपूर्ण राष्ट्र आहे.