सद्यःस्थिती आणि राजकारण
गेले तीन महिने वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांच्या आधारे कार्यकर्त्यांच्या काही गटांनी केलेले टिपण व त्यावरील चर्चेची एक दिशा प्रकट चिंतनामधून मांडली होती. त्याचे वाचन करून काही गटांनी चर्चा केल्याचेही कळले. सद्यः स्थितीमध्ये अनेक तपशील येतात. बाजारभाव आणि हवामानातले बदल, बँकांचे व्याजदर आणि शेअरबाजारातील निर्देशांकांतील बदल, आंदोलने, बंद, संप, नव्या कामांची उद्घाटने, स्मृतिसोहळे, सत्कार-समारंभ, पुरस्कार वितरण, बैठकी, सभा-संमेलने, सार्वजनिक उत्सव, सत्तांतरे, सत्तेसाठीचे डावपेच, गावपातळीपासून युनोच्या सरचिटणीसपदापर्यंतच्या निवडणुका, नेत्यांच्या घोषणा आणि आश्वासने, गुन्हे, अपघात, सत्कार्याची आणि विधायकतेची उदाहरणे, सदाचाराचे आणि भ्रष्टाचाराचे किस्से, कला व क्रीडा क्षेत्रातील सामने, प्रदर्शन आणि नवनिर्मिती या सवपैिकी आपण जे व जेवढे ग्रहण करू शकू त्यातून आपली सद्यः स्थितीची जाणीव तयार होते. जाणवणाऱ्या सद्यःस्थितीला कसा प्रतिसाद द्यायचा हे आपण आपले शिक्षण, व्यवसाय, आवड, परिपक्वता आणि संपर्क-वर्तुळ यातून ठरवत असतो.
सद्यःस्थितीची नेमकी व अद्ययावत जाणीव असणे खूपच उपयुक्त आहे. परंतु या जाणिवेतून होणारी कृतीही महत्त्वाची आहे. अनेक जणांना असे वाटते की सद्य:स्थितीला नेमका प्रतिसाद आपण राजकारणातून देऊ शकू. राजकारण करून सद्य:स्थिती आपल्याला पाहिजे तशी बदलू शकू. अनेक राजकीय नेते अशा पद्धतीने सद्यःस्थितीवर परिणाम करतानाही दिसतात. काही परिणाम तर दूरगामीही असतात.
अर्थकारण आणि प्रशासन
राजकीय नेत्यांचे अनेक निर्णय त्यांच्या आर्थिक परिणामांवर लक्ष ठेवून केलेले असतात. जिथे लगेच किंवा कालांतराने आर्थिक लाभ दिसतो आहे असे राजकीय निर्णय लगेच किंवा योजनापूर्वक घेतले जातात. राजकीय पातळीवर घेतलेल्या निर्णयांची कार्यवाही प्रशासनाकडून होत असते. विवेकी व कार्यक्षम प्रशासन राजकीय निर्णयांची दाहकता कमी करू शकते किंवा परिणामकारकता वाढवू शकते. त्यामुळे सद्य:स्थिती बदलायची असेल तर अर्थकारण व प्रशासनावर पकड पाहिजे असेही बऱ्याच जणांना वाटते.
उत्पादन वाढ, तंत्रज्ञान आणि पायाभूत भौतिक रचना
अजूनही भारतात पाऊस चांगला झाला नाही की शेतीचे उत्पादन कमी होते. शेती उत्पादन कमी झाले की शेतकऱ्यांची क्रय-शक्ती कमी होते. त्यांची क्रय-शक्ती कमी झाली की देशाचे अर्थकारण मंदावते. कारखान्यांतील उत्पादनवाढ व निर्यातक्षम संगणक-सेवा यामुळे शेती उत्पादनावर अर्थकारण अवलंबून असणे, आता कमी होत आहे. तरीही शेतीचे उत्पादन वाढले की अर्थ-व्यवस्थेला तुकतुकी येतेच. यांत्रिक आणि संगणकीय तंत्रज्ञानामुळे अर्थकारण आणि प्रशासन हे दोन्ही गतिशील होताना पाहतो आहोत. शेती उत्पादन, शेतमालाची विक्री, यांत्रिक उत्पादन आणि संगणक व इतर आधुनिक क्षेत्रातील उत्पादन हे सर्व पाणी, वीज, रस्ते, रेल्वे, दूरसंचार जाळे या पायाभूत भौतिक रचनेवर अवलंबून असते हे देखील अनुभवाला येते. त्यामुळे अनेकांना राजकारण, अर्थकारण, प्रशासनाआधी उत्पादनवाढ, तंत्रज्ञान-सुधारणा आणि पायाभूत भौतिक रचना यांना महत्त्व दिले पाहिजे असे वाटते.
शिक्षण आणि संशोधन
सद्य:स्थिती म्हणजे प्रवासाच्या विशिष्ट टप्प्याला दिसणारे सभोवताल; राजकारण म्हणजे प्रवासी वाहनाचे नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस; अर्थकारण व प्रशासन म्हणजे वाहन; उत्पादन, तंत्रज्ञान व पायाभूत रचना म्हणजे वाहनातील इंजिन असे मानले तर शिक्षण आणि संशोधन हे त्या इंजिनाचे इंधन आहेत. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण आवाक्यात येऊ शकेल असे दिसू लागल्यावर अर्थपूर्ण माध्यमिक शिक्षणाचा विचार देशातील शिक्षणतज्ज्ञ करू लागले आहेत. प्रबोधिनीत हा विचार आधीच सुरू होऊन त्याप्रमाणे कृतीही सुरू झाली आहे. व्यवसायाभिमुख उच्च शिक्षण देणे शक्य आहे हे आता लक्षात येऊ लागले आहे. समस्यापरिहारक्षमता वाढवणारे संशोधनाभिमुख शिक्षण म्हणजेही उच्च शिक्षण हे देखील कधीतरी कळले पाहिजे. असे उच्च शिक्षण दिले तर नंतर विद्यापीठे, संशोधन-संस्था, कारखाने, राष्ट्रीय प्रयोगशाळा येथील संशोधन वाढेल. चांगले शिक्षण व संशोधन झाले तर नवीन कौशल्ये, नवीन तंत्रे, नव्या कल्पना, नव्या पद्धती, नव्या वाटा, नवीन क्षितिजे व नवीन आव्हाने दिसतात. हे सर्व म्हणजेच विकासाचे व पराक्रमाचे इंधन आहे.
समाजकारण, संस्कृति-संवर्धन आणि समाजसंस्थापना
समाजकारण हा शब्द अनेक ठिकाणी अनेक जण वापरतात. समाजसंस्थापना हा शब्द अजून तरी आपण प्रबोधिनीतच कधी कधी वापरतो. व्यक्तीचे आणि समाजगटाचे संबंध आणि समाजगटांमधील परस्परांचे संबंध सौहार्दपूर्ण, आरोग्यपूर्ण, परस्परपूरक आणि परस्परपोषक असण्यासाठी काम करणे म्हणजे समाजकारण असे म्हणता येईल. शिक्षण संशोधनाचे इंधन ज्या अर्थकारण-प्रशासनाच्या वाहनाला गती देते ते वाहन वापरणारा समाजच असतो. समाजच या वाहनात बसणार आणि वाहनाचा सभोवताल म्हणजेही समाजच. समाजातील सगळ्यांना या वाहनात बसणे किंवा त्यातून उतरणे स्वेच्छेने शक्य व्हावे यासाठी समाजकारण करायचे. संस्कृति-संवर्धन म्हणजे या वाहनाने कुठे जायचे याचा एकच निश्चय सर्वांच्या मनात तयार करणे. समाजकारण आणि संस्कृति-संवर्धन करेल अशी संघटना निर्माण करणे हे शिक्षण-संशोधनाच्या आधी केले पाहिजे असेही काही जणांना वाटते.
सद्यःस्थितीच्या जाणिवेपासून संस्कृति-संवर्धनापर्यंतच्या एकेक किंवा एकाहून अधिक गोष्टी करणाऱ्या अनेक संघटना समाजात हव्यात. अनेक संघटनांनी मिळून या सर्व गोष्टी करणे म्हणजे समाज-संस्थापना. सद्यःस्थिती समजून घेऊन तिला आपला प्रतिसाद निश्चित करताना आपले ध्येय समाज-संस्थापनेचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.